पर्वरी येथील उन्नत मार्गावरील अपघाताने दोन निष्पाप जीव हिरावले अन् सहाशे कोटींच्या या प्रकल्प नियोजनाकडे शंकेने पाहण्याची गरज निर्माण झाली. एखाद्या प्रकल्पाचे श्रेय घेण्याची वेळ आली की राजकीय नेतृत्व पुढे असते. मात्र, त्याच प्रकल्पात अडचणी निर्माण झाल्यास जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया तितक्याच वेगाने पुढे सरकत नाही. सहापदरी उन्नत मार्गाचा मुख्य उद्देश म्हापसा-पणजी मार्गावरील वाहतूक कोंडी भेदणे हा आहे. आज मात्र चित्र काहीसे उलटे आहे.
उन्नत मार्गाचा काही भाग मोकळा आहे, तर जुन्या रस्त्यांवरील वाहतूक पुन्हा वाढत आहे. अपघातानंतर सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकींना बंदी घालण्यात आली. काही प्रवेश-निर्गमन मार्गिका बंद करण्यात आल्या. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती व्यवस्था म्हणून हा निर्णय समजून घेता येईल. मात्र, हा कायमचा उपाय होऊ शकत नाही. वाहतूक एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावर वळविणे म्हणजे मूळ अडचणीचे निराकरण नव्हे. इथे सरकारमधील समन्वयाचा मुद्दाही गंभीर आहे.
पर्वरीचे आमदार तथा मंत्री रोहन खंवटे यांनी उन्नत मार्ग खुला करताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला आहे. आरोपाची सत्यता संबंधितांनी स्पष्ट करावी. तथापि, आपल्या मतदारसंघातील एवढ्या मोठ्या प्रकल्पाच्या कार्यान्वयनाबाबत स्थानिक आमदार असलेल्या मंत्र्यालाच विश्वासात घेतले नसल्याचा आरोप होणे, हे प्रशासनातील विसंवादाचे द्योतक आहे. सरकारमध्येच ताळमेळ नसल्यास रस्त्यावर वाहतुकीचा ताळमेळ कसा साधणार?
गोव्यात दुचाकी हे सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे उन्नत मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा फेरविचार करताना या वर्गाचा विचार अपरिहार्य आहे. दक्षिण गोव्यातून करासवाड्याकडे जाणाऱ्या दुचाकीचालकांना झुआरी ब्रिज ओलांडल्यानंतर अटल सेतूवरून जाता येत नसल्याने पर्यायी मार्ग घ्यावा लागतो. पर्वरीत आल्यानंतर ही वाहतूक जुन्या मार्गावर राहिल्यास कोंडी वाढणे स्वाभाविक आहे. त्यामुळे अटल सेतूचा दुचाकींसाठी वापर शक्य आहे का, याचाही स्वतंत्र तांत्रिक विचार व्हावा. (आताही हौशी पर्यटक पुलावरून दुचाकी घेऊन जातातच) अर्थात, त्यासाठी दुचाकीस्वारांच्या सुरक्षेची पूर्ण व्यवस्था करावी लागेल.
दोन्ही बाजूंना योग्य प्रकारच्या संरक्षक जाळीची व्यवस्था करणे शक्य आहे का, याचे तांत्रिक परीक्षण व्हावे. एखादा पर्याय व्यवहार्य नसेल तर त्याचे कारणही स्पष्ट झाले पाहिजे. देशातील इतर शहरांमध्येही उन्नत मार्गांच्या रचनेनंतर अपघात किंवा वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या आहेत. हैदराबादमधील ‘बायोडायव्हर्सिटी फ्लायओव्हर’वर अपघात झाल्यानंतर त्याच्या रचनेविषयी तसेच सुरक्षाव्यवस्थेविषयी चर्चा झाली. दिल्लीतील काही उड्डाणपुलांवरही तीव्र वळणे, दिशादर्शक फलक, वाहतूक व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञांनी आक्षेप नोंदवले होते.
अशा घटनांमधून एक बाब स्पष्ट होते, रस्ता बांधला म्हणून काम संपत नाही. त्याच्या प्रत्यक्ष वापरातून समोर येणाऱ्या अडचणी ओळखून, त्यावर वेळेत उपाय करणे हीच प्रकल्पाची खरी पुढची पायरी आहे. पर्वरीत ही पायरी आता विलंब न करता पार पाडली पाहिजे. श्रेय कोणाचे, कोणाला विश्वासात घेतले, यापेक्षा मार्ग सुरक्षित, वाहतूक सुरळीत कशी होईल, यावर भर हवा. रस्ता असो वा उन्नतमार्ग, तो नागरिकांच्या सोयीसाठी असतो; अडचणी वाढवण्यासाठी नव्हे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.