Ponda Usgao Water Streams Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Usgao: भलामोठा सिद्धाचा डोंगर, म्हादई - खांडेपार नद्यांचा संगम; उजगावचा ओहोळ

Ponda Usgao Water Streams: आषाढातला मेघ प्रीतीचे भरते आणीत आकाशात दाटून वाऱ्याच्या मीलनाने विरघळतो. त्यातून खाली येणारा झरझरीत रस पिऊन लताकुंज, वनश्री प्रणय-सुभग होते. वृ

Sameer Panditrao

मधू य.ना. गावकर

आषाढातला मेघ प्रीतीचे भरते आणीत आकाशात दाटून वाऱ्याच्या मीलनाने विरघळतो. त्यातून खाली येणारा झरझरीत रस पिऊन लताकुंज, वनश्री प्रणय-सुभग होते. वृक्षांची कोवळी पालवी वरच्या ढगांच्या सावलीने धूसर बनते. रात्रीसारखा एकांताचा तो जणू प्रणयसखा भासतो. रतिक्रीडेतील चातुर्य केवळ त्यांच्या जवळ असल्याने कामिनी सौंदर्य पाहावयास मिळते. सुकुमार शृंगाराला तो प्रवृत्त करीत निसर्गाच्या साक्षीने फुलत संकेतस्थळाची शोभा वाढवतो.

पारिजातकाची अवयव सुमने संध्याकाळी फुलत दरवळ पसरवितात आणि इजा झाली तरी आवाज न करणाऱ्या सफेद पुष्पांचा सडा पडलेला पहाटे पाहावयास मिळतो. नदीच्या पाण्याने पर्वतातील वृक्ष मोठे होऊन ते जीव जीवाष्मांना जगवत, उंची गाठतात. पण परमाणू जीव जीवाष्मांचा प्राण घेत मोठा होतो, त्यावेळी पाणीसुद्धा त्याच्याकडे शरणागती पत्करते. शेतकरी शेतातील पाणी सांभाळण्यासाठी अनेक रात्री जागवतो, पावसात भिजतो, थंडीत गारठतो, उन्हाचे चटके सहन करतो.

म्हणूनच पाणी त्याला माणूस म्हणून जगवते. पाण्याच्या प्रभावाने निसर्ग उत्कृष्ट वातावरण निर्माण करतो. तेच पाणी माणसाच्या सुखदुःखाशी एकरूप होते. आषाढातील वर्षा ऋतूत मेघगर्जना होत पाऊस कोसळतो, त्याने ओहळ, नद्या तुडुंब भरून वाहतात. हत्ती आपल्या चीत्काराने तुतारीचे स्वर काढतो, मोर पिसारा फुलवून रणमाले खेळतो, माकडे दाट पानांच्या झाडावर आसरा घेतात, पावसाच्या आषाढ सरींनी वनराई शृंगाराने नटते, गुरांचे कळप आपले अंग चोरून एखाद्या झाडाचा आश्रय घेतात, चिमणी वळचणीला ध्यान लावून बसते, रुपेरी पाण्याने उन्हाळ्यात झुळझुळ वाहणारा झरा,

आषाढात ओहोळाच्या काठाकडील मातीत लोळत पाणी लाल करून तुडुंब वाहत नदीच्या पात्राकडे धाव घेतो. पावसाच्या पाण्याने भरून वाहणाऱ्या ओहोळातील प्रवाहाकडे वारा बरोबरी करू शकत नाही, असे हे जड घनरूपी वजनदार असलेले, पृथ्वीच्या जैवविविधतेला वाचवणारे, मानवास पिण्यास उपयोगी पडणारे तरीही एकदम पातळ असे हे पाणी या पृथ्वीवर आहे, म्हणून जीवसृष्टी टिकाव धरून उभी आहे.

माझा प्रवास फोंडा तालुक्यातील उजगाव ओहोळाकडे असल्याने उजगावच्या पूर्वेकडील सिद्धाच्या डोंगर पायथ्याशी जावे लागले. उजगाव गावाला म्हादई आणि खांडेपार नद्यांनी नैसर्गिकदृष्ट्या फोंडा तालुक्यापासून तोडले आहे. मात्र कृत्रिम रीतीने मानवाने या गावांची नाळ फोंडा तालुक्यास जोडली आहे. हा गाव उजगाव-गांजे पंचायत म्हणून गोवा स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात आला. त्याला फोंडा, धारबांदोडा, सत्तरी आणि डिचोली तालुक्यांच्या सीमांनी वेढले आहे. त्याचबरोबर उजगावच्या पश्चिम बाजूने जैवविविधतेने नटलेला, अतिसंवेदनशील सोनारबाग भागाने म्हादई आणि खांडेपार नदींचा संगम घडवून मांडवी नदीचा उगम निर्माण केला आहे.

उजगाव गावाला निसर्गाने तिथली जैवविविधता जगवण्यासाठी दोन नैसर्गिक ओहळ दिले आहेत. ते दोन्ही ओहळ पूर्वेकडील भल्यामोठ्या लांब रुंद सिद्धाच्या डोंगर पायथ्याकडून वाहतात. एक ओहळ वळणावळणाने उत्तर बाजूने म्हादईस मिळतो आणि दुसरा ओहळ पश्चिम बाजूने खांडेपार नदीस मिळतो. उत्तर-पूर्व भागातील ओहोळाचा उगम उडी भागात दाबामळ ठिकाणी होऊन तो तिथल्या वनराईला पाणी देतो.

कल्लपवाडा भागातील बागायतीला पाणी देऊन त्या खालच्या शेतीच्या मध्य भागातून पाणी पुरवतो. आपला प्रवाह मुख्य रस्ता ओलांडून गावकरवाड्याकडील शेती आणि कुळागराला पाणी पुरवीत त्या खालच्या मेडीतेंब भागातील शेती, बागायती आणि तिथल्या मानवास पिण्याचे पाणी देतो. पुढील शेतीला पाणी पुरवीत ताकवाडा आणि तिराळ भागांना छेदून म्हादईवरील पुलाच्या वरच्या भागात म्हादई नदीस मिळतो.

दुसरा ओहळ सिद्धाच्या डोंगर पायथ्याशी पिळ्ये भागात उगम पावतो व तो त्या भागाला पाणी देतो. त्या खालच्या अवंती भागातील परिसराला पाणी पुरवीत पुढच्या धावशीरे भागातील कुळागर आणि शेतीला पाणी देतो. धाट परिसरातील बागायती, कुळागर आणि मरड शेतीला पाणी देत उजगाव-फोंडा महामार्ग ओलांडून ‘मद्रास रबर फॅक्टरी’च्या परिसरात खांडेपार नदीस मिळतो.

या दोन ओहोळांच्या मध्यभाग, म्हारवा सडा या विशाल परिसराने व्यापला आहे. या ओहोळांच्या पाण्यावर उजगावची कृषी संस्कृती तिथल्या पूर्वजांनी घडवली व जगवली होती. नारळ, सुपारी, काजू, केळी, भात, मिर्ची, कांदा, अळसांदा अशी धान्ये आणि फळे पिकवली. पावसाळ्यात नाचणी, कुळीथ, उडीद, वरी, कांग आणि भाजीपाला पिकवून ते जगले.

वायंगण, सरद शेती बैलाच्या साहाय्याने नांगरणी करत, शेण खत घालून कुंभांनी भात पिकवून कष्टाचे जेवले. ओहळ आणि दोन नदीतील खारी आणि गोडी मासळी घरी आणून त्या मत्स्य आणि उकड्या भाताचा आस्वाद घेतला. शेतातील कोंगा शिंपले आणि कडू खरवांच्या कालवणाने नाचणीची भाकरी खाल्ली. पण आज हे दोन्ही ओहळ माती आणि घनकचरा यांनी भरून गेले आहेत. तिथल्या संपूर्ण भातशेतीची नासाडी झाली आहे. नैसर्गिक बंधारे इतिहासजमा होऊन गावची कृषीसंपत्ती व संस्कृती नष्ट झालेली पाहावयास मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session Live: केरये- खांडेपार येथे रविवारी रात्री धोकादायक जंक्शनवर कारची दुभाजकाला धडक

Road Widening Goa: 'ग्रामीण भागात रस्‍ते रुंदीकरण हॉटेल्‍स आणि दिल्लीकरांसाठी'! सरकारच्‍या निर्णयावर कांदोळकरांचे टीकास्र

Regional Plan: गोव्‍यातील जमिनी विकण्‍यास काँग्रेस, भाजप, गोवा फॉरवर्ड कारणीभूत! नवा प्रादेशिक आराखडा हवाच; परब यांची मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; गप्‍प बसतील तर ते गोविंद कसले?

Goa Rain: राज्‍यात पावसाची पुन्‍हा हजेरी! गतवर्षीपेक्षा 34 इंचांची तूट; मुरगावात सर्वात कमी पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT