
Subodh Bhave on Priya Marathe: 'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचे ३१ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झाले. त्या गेल्या वर्षभरापासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत होत्या. अवघ्या ३८ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतल्याने कलाविश्वात शोककळा पसरली आहे.
प्रियाच्या निधनानंतर तिचे चुलत भाऊ आणि मराठीतील ज्येष्ठ अभिनेते सुबोध भावे यांनी एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सुबोध यांनी म्हटले की, "प्रिया मराठे एक उत्तम अभिनेत्री होती. काही मालिका आणि चित्रपटांमध्ये माझी सहकलाकार. पण माझ्यासाठी त्याहीपेक्षा महत्त्वाचं नातं तिच्याबरोबर होतं. प्रिया माझी चुलत बहीण. या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहनत आणि कामावरची तिची श्रद्धा खूप कौतुकास्पद होती. प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली."
प्रियाच्या कॅन्सरच्या प्रवासावर बोलताना सुबोध म्हणाले, "काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचे निदान झाले. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक, मालिका यातून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली. पण त्या कॅन्सरने काही तिची पाठ सोडली नाही. 'तू भेटशी नव्याने' या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला. माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली." सुबोध यांनी प्रियाचा जोडीदार शंतनू मोघे याने दिलेल्या खंबीर पाठिंब्याचेही कौतुक केले.
प्रिया मराठेने शेवटचे 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत काम केले होते. मात्र, आरोग्याच्या कारणामुळे तिने ही मालिका मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा तिने एका व्हिडिओद्वारे चाहत्यांना याबद्दल माहिती दिली होती. त्यात तिने म्हटले होते की, "आरोग्याची समस्या अचानक उद्भवल्यामुळे मालिकेच्या शूटिंग आणि आरोग्यात समतोल साधणे कठीण झाले आहे."
२०१२ साली प्रिया मराठेने ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा मुलगा आणि अभिनेता शंतनू मोघे यांच्याशी लग्न केले. मराठी अभिनय क्षेत्रातील एक सुंदर जोडपे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. अभिनय क्षेत्रासोबतच प्रियाने दोन वर्षांपूर्वी मुंबईतील मीरा रोड येथे 'द बॉम्बे फ्राईज' नावाचे स्वतःचे कॅफेही सुरू केले होते.
लहानपणापासून इंजिनीअर किंवा डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रियाने ठाण्याच्या महाविद्यालयात असतानाच अभिनयाच्या जगाकडे पावले वळवली. तिने २००५ साली 'या सुखांनो या' या मराठी मालिकेतून व्यावसायिक अभिनयाची सुरुवात केली. यानंतर 'चार दिवस सासूचे', 'तू तिथं मी', 'संभाजी' अशा अनेक मराठी मालिका तिने गाजवल्या. २००७ साली 'कसम से' या हिंदी मालिकेतून तिने हिंदी इंडस्ट्रीतही प्रवेश केला. 'उतरण' आणि 'पवित्रा रिश्ता' या हिंदी मालिकांमुळे तिला राष्ट्रीय पातळीवर मोठी ओळख मिळाली. मालिकांसोबतच 'विघ्नहर्ता महागणपती', 'किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी' आणि 'ती आणि इतर' यांसारख्या सिनेमांतूनही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.