Patri Ganpati Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Patri Ganpati Tradition Goa: निसर्गरम्य काणकोण तालुक्यातील पैंगीण गावच्या महालवाड्यात गणेश चतुर्थी म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

योगेश प्रभुगांवकर

निसर्गरम्य काणकोण तालुक्यातील पैंगीण गावच्या महालवाड्यात गणेश चतुर्थी म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही. प्रभुगांवकर कुटुंबीयांसाठी ती पूर्वजांच्या श्रद्धेची, संघर्षाची, एकजुटीची आणि संस्कृतीची पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली जिवंत परंपरा आहे.

गोव्यात घरोघरी गणेश चतुर्थी मोठ्या भक्तिभावाने साजरी होतेय. मातीच्या गणेशमूर्ती, माटोळी, फुले, आरास, आरत्या, नैवेद्य आणि कुटुंबीयांचा आनंदी मेळा हे चतुर्थीचे परिचित चित्र. मात्र महालवाड्यातील प्रभुगांवकर कुटुंबांची चतुर्थी यापेक्षा आगळीवेगळी आहे. कारण येथे गणरायाचे रूप मातीच्या किंवा धातूच्या मूर्तीत नव्हे, तर निसर्गाने दिलेल्या एकवीस प्रकारच्या औषधी व पवित्र पत्रींमध्ये पाहिले जाते.

एकवीस पत्रींची पवित्र ‘पुडी’

या परंपरेत २१ प्रकारच्या औषधी व पवित्र पत्री एकत्र करून पारंपरिक पद्धतीने त्यांची ‘पुडी’ बांधली जाते. ही साधी दिसणारी पुडीच श्रीगणेशाचे प्रतीक मानून अत्यंत श्रद्धेने तिची स्थापना आणि पूजा केली जाते. गणपतीसाठी एक पुडी, गौरीसाठी दुसरी पुडी आणि महादेवाचे प्रतीक म्हणून नारळ; अशा निसर्गाशी एकरूप असलेल्या स्वरूपात गणपती, गौरी आणि महादेव यांची पूजा करण्याची परंपरा प्रभुगांवकर कुटुंबियांनी आजही जपली आहे. बाहेरून पाहणाऱ्याला ती केवळ पत्रींची बांधलेली पुडी वाटेल; पण प्रभुगांवकर कुटुंबासाठी ती साक्षात गणरायाचे रूप आहे.

संघर्षातही टिकवली परंपरा

पोर्तुगीज काळात हिंदू धर्माच्या अनेक प्रथा आणि उत्सवांवर निर्बंध होते. प्रभुगांवकर कुटुंबांच्या गणेशपूजेतही अडथळा आणला गेल्याची कथा कुटुंबीयांच्या मौखिक इतिहासात आजही जपली जाते. परंतु संकट आले म्हणून पूर्वजांनी गणेशभक्ती सोडली नाही. त्यांनी मार्ग बदलला; पण देव बदलला नाही. गरज पडल्यास ही संपूर्ण पूजेची मांडणी लपवता येत असल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही श्रद्धा टिकवणे शक्य झाले.म्हणून ही ‘पुडी’ केवळ एक धार्मिक प्रतीक नाही. ती पूर्वजांच्या कल्पकतेची आणि आपल्या धर्म-संस्कृतीवरील अढळ श्रद्धेची साक्ष आहे.

प्रभुगांवकरांची सार्वजनिक चतुर्थी

या परंपरेला आणखी एक महत्त्वाचा सामाजिक आणि धार्मिक पैलू आहे. महालवाड्यातील श्री नरसिंह–परशुराम मंदिरात प्रभुगांवकर कुटुंबियाकडून साजरी केली जाणारी सार्वजनिक चतुर्थी ही परिसरातील जुन्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरांपैकी एक मानली जाते. घराघरांतील परंपरेबरोबरच मंदिरातील ही सामूहिक चतुर्थी प्रभुगांवकर परिवाराला एकत्र आणणारा सुंदर धागा आहे. मंदिरातील श्री नरसिंह आणि श्री परशुराम यांच्या साक्षीने गणरायाच्या प्रतीकरूपातील पत्रीची पुडी स्थापित करून विधिवत पूजा केली जाते. आरती, नैवेद्य आणि सामूहिक प्रार्थनेने मंदिर परिसर भक्तिमय होतो.येथे व्यक्तीपेक्षा कुटुंब, समाज आणि परंपरा मोठी ठरते.

विविध पिढ्यांतील प्रभुगांवकर एकत्र येतात; ज्येष्ठांच्या हातून धार्मिक परंपरा पुढच्या पिढीकडे जाते आणि लहान मुले ती प्रत्यक्ष पाहत-पाहत आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडली जातात. विसर्जनही तितकेच वैशिष्ट्यपूर्ण या चतुर्थीचा आणखी एक सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे पत्रीच्या पुडीचे विसर्जन. गणेशाचे प्रतीक मानलेल्या या पुडीचे विसर्जन श्री नरसिंह–परशुराम मंदिराच्या विहिरीत पारंपरिक पद्धतीने केले जाते. या विसर्जनात कृत्रिम रंग नाहीत, प्लास्टर नाही, रासायनिक पदार्थ नाहीत. निसर्गातून आलेली पत्री पुन्हा निसर्गातच विलीन होते.

‘इको-फ्रेंडली’ शब्द नव्हता; पण विचार होता!

आज आपण ‘इको-फ्रेंडली गणपती’ ही संकल्पना आवर्जून मांडतो. मूर्ती कोणत्या साहित्याची असावी, पाण्याचे प्रदूषण कसे टाळावे, पर्यावरणाची हानी कशी कमी करावी याबाबत जागृती करतो. मात्र आपल्या पूर्वजांनी या संकल्पनेला नाव देण्याच्या कितीतरी आधी ती जगून दाखवली होती. २१ प्रकारच्या वनस्पती, साधी पुडी, नैसर्गिक पूजा आणि पुन्हा निसर्गात विलीन होणारे विसर्जन, यापेक्षा पर्यावरणपूरक उत्सवाची सुंदर कल्पना कोणती असू शकेल? ही परंपरा श्रद्धा आणि पर्यावरण यांच्यातील सुंदर नातेही अधोरेखित करते.

आणि म्हणूनच महालवाड्यातील ही चतुर्थी श्रद्धेबरोबरच स्मृतींचाही उत्सव आहे. पुढच्या पिढीकडे सोपवायचा अनमोल वारसा आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात अशा परंपरांचे महत्त्व अधिक वाढते.आपल्या पूर्वजांनी कोणत्या परिस्थितीत आपली संस्कृती जपली याची आठवण करून देते. महालवाडा, पैंगीण येथील प्रभुगांवकर कुटुंबांची ‘पत्रीची चतुर्थी’ आणि श्री नरसिंह–परशुराम मंदिरातील ‘सार्वजनिक चतुर्थी’ हा म्हणून केवळ गणेशोत्सव नाही; तो एक जिवंत सांस्कृतिक वारसा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT