

बार्देश: म्हापसा शहरातील अनधिकृत बॅनर हटविण्याच्या पालिकेच्या कारवाईवरून राजकीय वातावरण तापले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले असताना, पालिकेने रात्रीच्या वेळी काही फलक हटविल्याचा आरोप मयूर सावकार, संजय बर्डे आणि सीतेश मोरे यांनी केला आहे.
सत्ताधाऱ्यांचे फलक कायम असताना विरोधक व आगामी पालिका निवडणुकीतील इच्छुकांचे फलकच निवडकपणे हटविल्याचा त्यांचा दावा आहे. अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यास विरोध नाही; मात्र ती सर्वांवर समान असावी. एका गटाच्या फलकांवर कारवाई आणि दुसऱ्यांना मोकळीक असेल, तर पालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, असे वरील तिघांनी म्हटले आहे.
पालिका प्रशासनाने कारवाई कोणत्या नियमांनुसार केली, किती फलक हटविले, कोणाला नोटिसा बजावल्या आणि शहरातील सर्व अनधिकृत बॅनरवर समान कारवाई झाली का, याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक नागरिकांमध्ये जनसंपर्क वाढवत आहेत. त्यामुळे बॅनर कारवाईकडे राजकीय हेतूने पाहिले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र शहराचे सौंदर्य, पादचारी सुरक्षा व वाहतूक लक्षात घेता अनधिकृत फलकांवर कारवाई आवश्यक असून, ती सर्वांसाठी समान असावी, अशी भूमिका संबंधितांनी मांडली.
‘कारवाई सर्वांवर समान हवी’
अनधिकृत बॅनरमुळे शहर विद्रूप होत असेल किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण होत असेल, तर पालिकेने कारवाई करावी. मात्र सत्ताधारी, विरोधक, सामाजिक कार्यकर्ते किंवा कोणताही राजकीय गट असा भेद न करता नियम सर्वांसाठी समान असावेत. निवडक कारवाई झाल्याचा संशय निर्माण होणार नाही, यासाठी पालिकेने मोहीम पारदर्शकपणे राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.