सर्वेश बोरकर
गोव्यातील वास्को शहराजवळ, मुरगाव बंदरातील गदारोळ आणि जहाजे जळताना पाहण्यासाठी रस्त्यावर येणाऱ्या वास्कोतील लोकांना कधीच न विसरता येण्यासारखी घटना दुसऱ्या महायुद्धा वेळच्या ८ मार्च १९४३ रोजी घडली होती, यावर आज कुणाचाही विश्वास बसणार नाही. दुसऱ्या महायुद्धादरम्यान गोव्यात घडलेल्या घटनांबद्दल फारच कमी लोकांना माहिती व आठवणी आहेत.
पोर्तुगीज राजवटीत प्रमुख मुरगाव बंदराजवळील वास्को शहरात जर्मन आणि इटालियन व्यापारी जहाजे आगीत भस्मसात झाल्याची घटना आज पण अचंबित करणारीच आहे.
एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे दुसऱ्या महायुद्धा दरम्यान (१ सप्टेंबर १९३९ - २ सप्टेंबर १९४५) पोर्तुगाल हा तटस्थ भूमिका घेणाऱ्या युरोपीय देशांपैकी असूनसुद्धा गोव्यातील जर्मन आणि इटालियन व्यापारी जहाजे आगीत भस्मसात का म्हणून केली असतील ? ही खरी घटना जेम्स लीसर यांनी लिहिलेल्या ‘बोर्डिंग पार्टी: द लास्ट चार्ज ऑफ द कलकत्ता लाईट हॉर्स’ या कादंबरीत शब्दबद्ध केलेली आहे.
ही घटना ८ मार्च १९४३च्या रात्री मुरगाव बंदरात ‘ऑपरेशन क्रीक’ किंवा ‘ऑपरेशन लॉन्गशँक्स’ या सांकेतिक नावाने घडली. ही कारवाई कलकत्त्यापासून सुमारे १,४०० मैल दूर नियोजित होती आणि द कलकत्ता लाईट हॉर्सच्या वृद्ध, निवृत्त कमांडोंनी ती पार पाडली.
अशा हल्ल्याचे खरे कारण म्हणजे जर्मन जहाजे हेरगिरीच्या कृत्यांमध्ये गुंतलेली होती आणि त्यावेळी मुंबई बंदरातून निघालेल्या मालवाहू जहाजांच्या हालचालींची माहिती पुरवत होती. त्यानंतर ‘जर्मन यू बोटी’ या जहाजांचा माग काढत आणि त्यांना समुद्राच्या मध्यभागी बुडवत. जरी महायुद्ध मुख्यतः युरोप आणि उत्तर आफ्रिकेमध्ये केंद्रित होते, इंग्रज हे जर्मनी त्यांचे मुख्य शत्रू असूनसुद्धा युद्धादरम्यान कोणतीही इंग्रज मालमत्ता जर्मन सैन्याने नष्ट केली नव्हती.
तत्कालीन इंग्रज साम्राज्याच्या अखत्यारीत असलेल्या मुंबई बंदरावर आणि येथून जाणाऱ्या जहाजांच्या हालचालींची माहिती जर्मन नौदलाला देण्यासाठी गोव्याच्या मुरगावजवळ नांगरलेली जर्मन आणि इटालियन जहाजे शक्तिशाली ट्रान्समीटर घेऊन इंग्रज जहाजांच्या हालचालींची माहिती पुरवली जात होती.
असे असले तरीही तोपर्यंत जर्मन नौदलाच्या कारवाईत अरबी समुद्रात कोणतेही जहाज बुडाले नव्हते त्यामुळे या हेरगिरीच्या कृत्याचा पोर्तुगीज सरकारला थांगपत्ताही नव्हता. २८ ऑगस्ट १९३९ रिहीपासून, तीन जर्मन व्यापारी जहाजे - ‘एमएस एहरेनफेल्स’, ‘एमएस ब्रॉनफेल्स’ आणि ‘एमएस ड्रॅचेनफेल्स’ आणि एक इटालियन व्यापारी जहाज ‘एसएस अँफोरा’, देशांमधील शत्रुत्व कमी होईपर्यंत आश्रय शोधत गोव्याच्या मुरगाव बंदरात दाखल झाली.
पोर्तुगीज तटस्थ असल्याने त्यांनी युद्धात भाग घेतला नाही किंवा मदत केली नाही आणि या जहाजांना त्यांच्या बंदरात नांगरायला दिले.
इंग्रज अधिकाऱ्यांना या हेरगिरीचे कारण कळले आणि त्यांच्या तपासणीमुळे तटस्थ प्रदेशात या जहाजांची संशयास्पद उपस्थिती आढळली. १९४२च्या सुमारास, जर्मन यू-बोट्सने खोल हिंद महासागरात १५ दिवसांच्या आत ४६ मित्र राष्ट्रांच्या जहाजांचे सैनिक, दारूगोळा आणि वैद्यकीय मदत टॉर्पेडोने उडवून नष्ट केली.
‘यू-बोट्स’ना मार्गांची माहिती असल्याने ब्रिटिश गोंधळले आणि त्यांनी माझगाव येथे एका जर्मन गुप्तहेराला पकडले. त्याने त्यांना सांगितले की त्याने मित्र राष्ट्रांच्या जहाजांच्या हालचालीची माहिती अल्तिन्हो पणजी येथे राहणाऱ्या रॉबर्ट आणि ग्रेटे कोच या जर्मन जोडप्याला दिली.
त्यांनी ही माहिती एमएस एहरेनफेल्स यांना दिली, ज्यांनी नंतर ती ‘यू-बोट्स’ना दिली. १९ डिसेंबर १९४२ रोजी रॉबर्ट आणि ग्रेटे कोच यांचे त्यांच्या घरातून अपहरण करण्यात आले आणि गोवा सीमेवर त्यांची हत्या करण्यात आली. महायुद्धात पोर्तुगाल तटस्थ देश असल्याने कोणतीही कारवाई होणार नाही हेही इंग्रज अधिकाऱ्यांना माहीत होतं.
ज्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांनी पोर्तुगीज अधिकाऱ्यांना माहिती न देता ही जहाजे नष्ट करण्याची गुप्त योजना हाती घेतली. या मोहिमेसाठी एक इंग्रज सशस्त्र दल तयार करण्यात आले होते.
इंग्रज सशस्त्र दल तत्कालीन भारतीय किनाऱ्यावरून निघाले आणि गुपचूप शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन गोव्यातील पोर्तुगीज राजवटीत असलेल्या वास्को शहरातील मुरगाव बंदरात सर्व शत्रूंच्या जहाजांजवळ पोहोचले. ८ मार्च १९४३च्या संध्याकाळी, जर्मन खलाशी पार्टी करण्यासाठी किनाऱ्यावर गेले होते, कारण ती कार्निव्हलची रात्र होती.
काही जणांना मागे ठेवून, ब्रिटिश सैनिकांनी संधी साधली. ९ मार्चच्या मध्यरात्री आणि पहाटे, ‘स्पेशल ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह’चे लेफ्टनंट कर्नल लुईस प्यूघ यांच्या नेतृत्वाखाली, कमांडो फोबे नावाच्या एका लहान हॉपर बार्जमधून मुरगाव बंदरात घुसले, ज्याचे नेतृत्व बर्नार्ड डेव्हिस करत होते.
ते एमएस एहरनफेल्सवर चढले आणि थोड्या बंदुकीच्या चकमकीनंतर ट्रान्समीटर नष्ट केला. एमएस एहरनफेल्सवर गोळीबार आणि स्फोट ऐकल्यानंतर, इतर दोन जर्मन जहाजांनी जहाजावरील महत्त्वाच्या वस्तूंना आग लावली.
हल्लेखोरांपैकी कोणीही जखमी झाले नाही, अचानक झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर, फोबी जहाज बंदराबाहेर पडले आणि गायब झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर बऱ्याच काळानंतर, हल्लेखोर कोण होते किंवा ते कुठून आले होते याबद्दल कोणालाही स्पष्टता नव्हती. जेम्स लीसरच्या ‘द बोर्डिंग पार्टी’ नावाच्या पुस्तकाने हे सत्य उघड केले. ८ मार्च १९४३ हा दिवस उपस्थित वास्को शहरातील लोकांसाठी कायम लक्षात राहणारा दिवस ठरला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.