

नीमा आमोणकर
पणजी ही महोत्सवांची राजधानी. अलीकडेच सेरेंडिपीटी आर्ट महोत्सवात गोव्यातील ‘मिठाचे भविष्य’ ह्या विषयावरील चर्चेबद्दलचा लेख वाचनात आला. गोव्यातील मिठागरे, गावठी मिठाचे गुणधर्म, गावठी मिठाची महती वाचताना बालपणापासून जाड्याभरड्या गावठी मिठावर जगणाऱ्या आमच्या पिढीवर सुळसुळीत, पांढऱ्याशुभ्र आयोडाइज्ड सॉल्टने कधी, कसं आणि किती अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली ह्याचा आढावा घेण्यास भाग पाडलं.
बालपणी एप्रिल-मे महिन्यात गावठी मिठाचे टेम्पो वाड्या-वाड्यांवर फिरत. लाकडी बॅरल, मोठमोठ्या बरण्यांमध्ये (बुयांवात) मिठाचा ‘पुरुमेत’ केला जात असे. आयुष्याची कित्येक वर्षे या मिठाच्या पर्यायाचा विचार मनाला शिवलाच नाही.
पण काही दशकांपूर्वी जाहिरातबाजीच्या दुनियेने ‘आयोडाइज्ड सॉल्ट’चं महत्त्व मनावर बिंबवण्यास सुरुवात केली. शिजवताना त्यातील आयोडीन कमी होते, हे ‘विज्ञाननिष्ठ’ सत्य कुणी सांगितलेच नाही. सल्ले, उपदेश मनावर अधिराज्य गाजवू लागले. त्यामुळे, इतकी हजारो वर्षे हे गावठी मीठ खाऊनच जगलेल्या गोमंतकीयांच्या पिढ्यांना, आयोडीनची कमतरता कशी जाणवली नाही, हा प्रश्नच आम्हांला पडला नाही.
गावठी मीठ विक्रेत्यांकडे पाठ फिरवणं सुरू झालं. गोवा व गोमंतकीय पोर्तुगीज येण्यापूर्वी मीठ निर्यात करत होते, अरब व्यापाऱ्यांमार्फत ते जगभरातील स्वयंपाकघरांत पोहोचत होते, हे सत्य आज कुणाला सांगितले तरी खरे वाटणार नाही.
१८७८चा ब्रिटिश-पोर्तुगीज तह होईपर्यंत गोव्यात सातशेच्या वर मिठागरे होती व ४४ हजार टन दर्जेदार मिठाची निर्मिती होत होती. किमान दीड हजार वर्षांचा ज्ञात इतिहास असलेला हा गोमंतकीय मिठाचा व्यवसाय व मिठागरांचे वैभव माहीत नसल्याने त्यावर आज त्यावर ‘नाइटक्लब’ उभे राहातात व आग लागून माणसे मरतात.
पोर्तुगिजांनी, ब्रिटिशांनी व नंतर आपल्याच राज्यकर्त्यांनी गोव्याची मिठागरे बंद पाडल्यानंतर आपले जीवन कायमचेच अळणी झाले. गावठी मिठाची जागा ‘फ्री फ्लो’, ‘आयोडाइज्ड’ मिठाने घेतली.
दर महिन्याला किराणा मालात एखाद्या नावाजलेल्या ब्रँडेड सफेद मिठाचं पाकीट हक्काने मिरवू लागले. सफेद मिठाचा प्रवास सध्या ‘पिंक सॉल्ट’पर्यंत येऊन थबकलाय. न जाणो भविष्यात निळ्या, पिवळ्या इतर रंगांचं मीठ स्वयंपाकघरात मिरवताना दिसेल.
शालेय जीवनात मिठाशी आपली ओळख झाली ती पाठ्यपुस्तकातील ‘दांडी सत्याग्रहा’मुळे. पुढे जाऊन As dear as salt ही कथा मिठाचं अनन्यसाधारण महत्त्व पटवत गेली. अन्न ही आपली मूलभूत गरज, पण त्या अन्नाला मिठाशिवाय पर्याय नाही.
पंचपक्वान्न का असेनात मिठाचा अभाव रंगाचा भंग करत असतो. म्हणूनच तर As dear as salt ह्या कथेतून आपल्या प्रिय व्यक्तीची तुलना मिठाशी (एका सूक्ष्म वस्तूशी) करणाऱ्याला ‘इक्कीस तोपों की सलामी!’
मिठाचे महत्त्व हे फक्त अन्नाची लज्जत वाढविण्यापुरतेच मर्यादित नसून तो मानवी जीवनातील एक अपरिहार्य घटक आहे. मानवी शरीरात पाण्याचं प्रमाण संतुलित राहण्यासाठी, शरीराला आणि मेंदूला ऊर्जा मिळण्यासाठी, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी मीठ आवश्यक आहे.
त्याचबरोबर अन्नप्रक्रियांसाठी, मांस-मच्छी टिकवण्यासाठी सूक्ष्मजिवांची वाढ रोखून पदार्थ खराब होण्यापासून वाचवण्यास मीठ हे परिरक्षक (preservative) म्हणून सर्रास वापरलं जातं. मिठाशिवाय लोणच्याची नाही तर आपण कल्पनाच करू शकत नाही. तर असं हे बहुपयोगी मीठ चव, आरोग्य त्याचप्रमाणे संस्कृतीचासुद्धा भाग आहे.
दृष्ट काढण्यासाठी मिरची-मोहरीला सोबत लागते ती मिठाची. मीठ हातात देऊ नये. रात्रीच्या समयी मीठ घरात आणू नये, तसंच कुणाला देऊही नये असं बालपणापासून ऐकत आलो आहोत. पण ह्या मागील नक्की कारण काय हे विचारायचं मात्र राहूनच राहूनच गेलं.
ज्योतिष शास्त्रातही मीठ उपयोगी असल्याचे अलीकडेच वाचनात आले. आपल्या रोजच्या जीवनात घशाच्या दुखण्यावर घशाच्या खवखवीवर मिठाच्या गुळण्या प्रथमोपचाराचं कार्य निभावतात. स्वयंपाकात मिठाचं प्रमाण हे खूप महत्त्वाचं.
प्रमाण व्यवस्थित नसेल तर सुगरण नापास. ‘अति तिथे माती’ उक्तीनुसार मिठाचं अतिसेवन हे आरोग्यास हानिकारक. उच्चदाब, हृदयविकाराला आमंत्रण.
दैनंदिन जीवनात, मिठाचा उल्लेख असणाऱ्या कित्येक म्हणींचा, वाक्प्रचारांचा आपण वापर करत असतो. ‘खाल्ल्या मिठाला जागणे’, ‘जखमेवर मीठ चोळणे’, ‘हळद-मिठाचा संसार’, ‘मीठ मसाला लावणे’, ‘नावडतीचे मीठ अळणी’ वगैरे वगैरे. ठरावीक गोष्टीत मीठ वर्ज्य असतं. मीठ आणि दूध, मीठ आणि जखम ह्याचं मधुर मीलन होऊच शकत नाही. आयुष्यातसुद्धा आनंदात विरजण घालणारी माणसं नकोशी वाटणं स्वाभाविकच.
माणसानं मिठासारखं जगण्याचा प्रयत्न करावा. जसं एखाद्या पदार्थात हळद, मिरची, मसाले (खास करून खडा मसाला) यांसारख्या वस्तूंचे अस्तित्व दिसून येत असते. पदार्थांचं रंगरूप वाढवणाऱ्या ह्या वस्तू. पण मीठ ही अशी सूक्ष्म वस्तू ज्याचं महत्त्व पदार्थाचा आस्वाद घेतानाचा जाणवत असते.
चिमूटभर मिठाप्रमाणे आपणही आपल्या कार्याचा, दिखाऊपणाचा आव न आणता, गाजावाजा न करता कार्यरत राहावं. आपलं असणं, आपल्या अस्तित्वाची जाणीव हीच तर खरी श्रीमंती.
मिठाकडून आणखीन एक शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे मीठ, साखर हे जरी परिरक्षक (preservative) असले तरी साखरेला कीड लागते पण मिठाला कीड लागत नाही. त्याचप्रमाणे मनाला कीड लावून न घेण्याचा प्रयत्न करणेच योग्य. आणि हो जीवनात ‘नमक हराम’ नव्हे तर ‘नमक हलाल’ बनून जगणं महत्त्वाचं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.