NCERT Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

NCERT Dancing Girl Controversy: इतिहासाशी छेडछाड! 4500 वर्षांपूर्वीच्या 'डान्सिंग गर्ल' मूर्तीला कपडे घालण्याचा एनसीईआरटीचा अजब पराक्रम; पुरातत्त्वशास्त्राची ऐशीतैशी

NCERT Dancing Girl Controversy: इयत्ता नववीच्या कला विषयाच्या पाठ्यपुस्तकातील मोहेंजोदडो येथील प्रसिद्ध ‘डान्सिंग गर्ल’च्या मूर्तीचे मूळ चित्र बदलून त्याऐवजी कपडे घातलेले चित्र ‘एनसीईआरटी’ने छापल्याने वादाला तोंड फुटले आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

इयत्ता नववीच्या कला विषयाच्या पाठ्यपुस्तकातील मोहेंजोदडो येथील प्रसिद्ध ‘डान्सिंग गर्ल’च्या मूर्तीचे मूळ चित्र बदलून त्याऐवजी कपडे घातलेले चित्र ‘एनसीईआरटी’ने छापल्याने वादाला तोंड फुटले आहे. टीका झाल्यानंतर ‘एनसीईआरटी’ने या पुस्तकात मूळ चित्र पुन्हा समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणासारख्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित क्षेत्रात निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा कारभार यानिमित्ताने उघडा पडला आहे.

असे आहे प्रकरण

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) इयत्ता नववीच्या ‘मधुरिमा’ या कला शिक्षण पाठ्यपुस्तकात मोहेंजोदडो येथील प्रसिद्ध ४५०० वर्ष जुन्या ‘डान्सिंग गर्ल’ या ऐतिहासिक कास्यमूर्तीचे मूळ चित्र बदलून फेरबदल केलेले चित्र छापल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

मूळ मूर्ती निर्वस्त्र असून केवळ हातामध्ये बांगड्या आणि गळ्यात हार घातलेली आहे. मात्र, नवीन पाठ्यपुस्तकात मूर्तीच्या खांद्यापासून खालील धडाचा भाग गडद रंगाने झाकण्यात आला. यामुळे ही मूर्ती कपडे घातल्यासारखी भासते.इतिहासकार, पुरातत्त्व तज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांनी यावर तीव्र आक्षेप घेत, हा इतिहासाशी छेडछाड करण्याचा आणि सेन्सॉरशिपचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

‘एनसीईआरटी’ला उपरती

सुरुवातीला हे बदल बालकांच्या वयाच्या मर्यादेनुसार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, देशभरातून झालेल्या टीकेनंतर ‘एनसीईआरटी’ने आपली चूक सुधारत पुन्हा मूळ ऐतिहासिक चित्रच पुस्तकात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. संकेतस्थळावरील डिजिटल आवृत्तीतून हे फेरबदल केलेले चित्र लगेच बदलण्यात आले असून, पुढील शैक्षणिक वर्षापासून छापल्या जाणाऱ्या पुस्तकांमध्येही मूळ मूर्ती पूर्ववत छापली जाणार आहे.

दृष्टिकोन कसा होता?

अतिप्राचीन सिंधू संस्कृतीमध्ये लिंग आणि योनी हे मोठे सांस्कृतिक आधार होते, त्यांची पूजाही केली जात असे. त्याच्या मुळाशी सृजनत्वाचे अंग होते. तिथे अश्लीलतेचा काहीही संबंध नव्हता. अश्लीलतेचा जन्मच उशिरा झाला आहे. आपल्याकडे शेतीचा शोध हा महिलांनी लावला, त्यामुळे शेतीचे आणि स्त्रीचे सृजनत्व यांचा सहसंबंध जोडला गेला. खुलेपणाने योनी किंवा लिंगपूजा करणे यात काहीही गैर मानले जात नसे. सिंधूकालीन नर्तिकेच्या मूर्तीकडे पाहिले तर एक बाब स्पष्टपणे दिसून येते ती म्हणजे तत्कालीन जनांचा नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा कामप्रधान किंवा विकृत नव्हता. अगदी अलीकडच्या काळामध्ये कामप्रधानता ही नग्नतेशी जोडली गेली हे आपण विसरता कामा नये, असे मत सिंधू संस्कृतीचे अभ्यासक प्रा. रवींद्र इंगळे व्यक्त केले.

आक्षेप का?

इतिहास बदलण्याचा प्रयत्न

हडप्पा संस्कृतीतील प्रगत तंत्रज्ञान आणि शिल्पकलेचे ‘डान्सिंग गर्ल’ हे एक उत्तम प्रतीक आहे. तिच्या अंगावरील दागिने आणि मूळ नग्न अवस्था ही त्या काळातील संस्कृतीचे वास्तवदर्शी दर्शन घडवते.

विचित्र मानसिकतेचे प्रतिबिंब

इतिहासकारांच्या मते, ऐतिहासिक कलाकृतींना अशा प्रकारे ‘मॉडेस्टी’च्या नावाखाली झाकणे हे एका कालबाह्य व्हिक्टोरियन मानसिकतेचे प्रतीक आहे. ज्याचा भारतीय इतिहास आणि कलेच्या अभ्यासाशी संबंध नाही.

पुरातत्त्वीय पुराव्यांचे चुकीचे सादरीकरण

संग्रहालय व इतिहास ग्रंथांमध्ये मूळ शिल्प जसे आहे तसेच मांडणे आवश्यक असते. चित्रात छेडछाड केल्यामुळे विद्यार्थ्यांना मूळ कलाकृतीमधील तिचे हावभाव आणि तंत्रज्ञान समजण्यास अडचण निर्माण होते.

संकुचित मानसिकता

सिं धू संस्कृतीतील अजोड वारसा असलेल्या मोहेंजोदडो येथील ‘डान्सिंग गर्ल’ (नर्तकी) या ४५०० वर्षांपूर्वीच्या जागतिक कीर्तीच्या कांस्यमूर्तीचे रूप बदलण्याचा अजब पराक्रम ‘एनसीईआरटी’ने केला. इयत्ता नववीच्या ‘मधुरिमा’ पुस्तकातील ‘हिस्ट्री ऑफ आर्ट् स’ या पाठात या मूर्तीचे धड कपड्याने झाकलेले दाखवण्यात आले आहे. गेल्या २५ वर्षांपासून ही मूर्ती तिच्या मूळ स्वरूपातच पुस्तकात छापली जात होती. पुरातत्त्वशास्त्राची कोणतीही पर्वा न करता, केवळ ‘नैतिकतेच्या’ खोट्या चौकटीत बसवण्यासाठी इतिहासाशी केलेली ही छेडछाड केवळ धक्कादायक नसून चिंताजनक आहे.

आजचा नववीतील विद्यार्थी हा ‘आयटी’ युगातील ‘डिजिटल नागरिक’ आहे. ही मुले इंटरनेटमुळे जगातील अथांग ज्ञान, विज्ञान, कला आणि जागतिक घडामोडी अत्यंत प्रगल्भतेने हाताळत आहेत; त्याच वयात त्यांना एका ऐतिहासिक मूर्तीच्या मूळ रूपापासून दूर ठेवणे हास्यास्पद आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या हातात इंटरनेटचे खुले आकाश आहे, त्यांना एका धातूच्या मूर्तीवरून नैतिकतेचे धडे देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्यांच्या परिपक्वतेचा अपमान आहे.

जर आपली शिक्षणव्यवस्था किशोरवयीन मुलांना कलेकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाने पाहण्यास शिकवण्याऐवजी, त्यांच्यापासून वास्तव लपवणार असेल, तर आपण कशा प्रकारची पिढी घडवत आहोत?

आपण वैचारिकदृष्ट्या अधोगतीकडे जात असल्याचे हे लक्षण आहे. तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेत पुढे जात असल्याचा डांगोरा पिटत असताना, आपली सामूहिक विचारप्रक्रिया मात्र वेगाने आकुंचन पावत आहे.

आज जर आपण एका ऐतिहासिक मूर्तीला ‘सेन्सॉर’ करत असू, तर उद्या अजिंठा-वेरूळची शिल्पे, खजुराहोची मंदिरे वा प्राचीन साहित्यातील वर्णनेही असल्या नैतिकतेला खटकू लागतील. मग त्याही इतिहासावर अशीच कात्री चालवणार का? इतिहास जसा घडला तसाच तो अभ्यासला गेला पाहिजे, त्यात सोयीस्कर बदल करून नाही.

या मूर्तीला झाकून एनसीईआरटीने मूर्तीची अब्रू राखलेली नाही, तर आजच्या व्यवस्थेची वैचारिक जळमटे व असुरक्षितताच चव्हाट्यावर आणली आहे. टीका झाल्यानंतर ‘एनसीईआरटी’ने धडा मूळ रूपातच ठेवण्याचा निर्णय घेतला, ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब. शिक्षणसंस्थांनी आजच्या पिढीच्या प्रगल्भतेवर विश्वास ठेवायला हवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT