Goa Education: धक्कादायक! शालेय वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, 'SCERT'च्या परिपत्रकामुळे गोंधळ; शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम

: गोवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) शाळांना पाठविलेल्या नव्या परिपत्रकामुळे हिंदी भाषा विषयाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Goa Education
Goa EducationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) शाळांना पाठविलेल्या नव्या परिपत्रकामुळे हिंदी भाषा विषयाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नव्या शैक्षणिक वर्षासाठी जारी करण्यात आलेल्या विषयनिहाय वेळापत्रकात हिंदी विषयाचा कुठेही उल्लेख नसल्याने राज्यातील हिंदी शिक्षक, विद्यार्थी आणि शाळा प्रमुखांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता पसरली आहे.

हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा आहे की हिंदी विषयाला जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न, अशी चर्चा आता शैक्षणिक क्षेत्रात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात इयत्ता सहावी, सातवी आणि आठवीसाठी हिंदी विषयाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. मात्र, ८ जून रोजी जारी करण्यात आलेल्या नव्या परिपत्रकात हिंदी विषयाचा पूर्णपणे लोप झाल्याचे दिसून येते. त्यामुळे हिंदी विषयाचा अभ्यासक्रम कायम आहे की रद्द करण्यात आला आहे, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.

Goa Education
Goa Crime: गोव्यात पळून येण्याचा प्लॅन फसला! मंगळूरमधील हत्याप्रकरणातील मुख्य संशयित मडगावात जेरबंद, पोलिसांचे मोठे यश

हिंदी विषयाबाबत निर्माण झालेले प्रश्न

१) फेब्रुवारीच्या परिपत्रकात हिंदीचा उल्लेख होता, जूनच्या परिपत्रकात तो का नाही?

२) इयत्ता पाचवीसाठी हिंदी विषय कायम आहे की रद्द करण्यात आला आहे?

३) सहावी, सातवी आणि आठवीच्या वेळापत्रकात हिंदीचे तास कुठे आहेत?

४) हा प्रशासकीय गोंधळ आहे की जाणीवपूर्वक विषयाला डावलण्याचा प्रयत्न?

५) हिंदीचा उल्लेखच नसल्याने विषय कायम आहे की नाही, याबाबत स्पष्टता का देण्यात आलेली नाही?

वेळापत्रक कसे करणार? मुख्याध्यापकांसमोर प्रश्न

यंदा इयत्ता पाचवीसाठीही वेळापत्रकात हिंदी विषयाचा समावेश नसल्याचे समोर आले आहे. त्यातच सहावी, सातवी आणि आठवीच्या विषयनिहाय तक्त्यात हिंदीचा उल्लेख गायब झाल्याने प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. या परिपत्रकानुसार शाळांनी नवीन वेळापत्रक तत्काळ लागू करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, हिंदी विषयासाठी आवश्यक तासांची तरतूदच नसल्याने मुख्याध्यापकांपुढे वेळापत्रक तयार करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते...

शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते, जर हा केवळ मुद्रणदोष किंवा प्रशासकीय चूक असेल, तर ती तातडीने दुरुस्त करून सुधारित परिपत्रक जारी करणे आवश्यक आहे. मात्र, विषयाचा उल्लेख जाणीवपूर्वक वगळण्यात आला असेल, तर त्यामागील भूमिका सरकार आणि एससीईआरटीने स्पष्ट करावी.

Goa Education
Goa Forest Department: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! वन विभागातील 'या' पदांवर दिव्यांगांना मिळणार आरक्षण; सरकारचा मास्टरप्लॅन काय?

परिपत्रकावर प्रशासकीय संचालक सरिता गाडगीळ यांची स्वाक्षरी असून, त्यामुळे या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही होत आहे. हिंदी विषयाचे अस्तित्वच शालेय वेळापत्रकातून पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला आहे का, असा सवाल शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.

शिक्षण क्षेत्रात आधीच अनेक बदल आणि प्रयोग सुरू आहेत. त्यातच भाषा विषयासारख्या संवेदनशील मुद्द्यावर निर्माण झालेला हा गोंधळ कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरत आहे. हिंदी विषयाबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत एससीईआरटी किंवा शिक्षण खात्याकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com