

India Women Asia Cup Trophy Controversy: भारतीय महिला संघाने फायनल सामन्यात श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव करत तब्बल आठव्यांदा महिला आशिया चषक 2026 चे विजेतेपद पटकावले. मात्र, हा ऐतिहासिक विजय मिळवूनही भारतीय संघाला अद्याप अधिकृत ट्रॉफी मिळालेली नाही. एशियन क्रिकेट कॉन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे कॅबिनेट मंत्री मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय महिला संघाने स्पष्ट नकार दिला.
गतवर्षी पुरुष आशिया चषक जिंकल्यानंतरही भारतीय पुरुषांच्या संघाला अशीच ट्रॉफी मिळाली नव्हती. त्यामुळे या दोन्ही ऐतिहासिक ट्रॉफ्या भारताला (India) कधी मिळणार, असा प्रश्न क्रिकेट वर्तुळात उपस्थित केला जात होता. आता या संपूर्ण वादावर बीसीसीआयने अधिकृत भाष्य करत ट्रॉफी मिळवण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे संकेत दिले आहेत.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी या प्रकरणी बोलताना सांगितले की, लवकरच भारतीय संघाला पुरुष आणि महिला अशा दोन्ही आशिया चषक स्पर्धांच्या ट्रॉफ्या मिळतील. बीसीसीआयने सुरुवातीलाच एसीसीकडे एक पर्याय सुचवला होता. त्यानुसार एसीसीचे उपाध्यक्ष आणि एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे अधिकारी खालिद अल जरुनी यांच्या हस्ते विजेत्या टीमला ट्रॉफी देण्यात यावी, असा प्रस्ताव भारताने ठेवला होता. भारताच्या हिताच्या विरोधात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून ट्रॉफी स्वीकारायची नाही, ही बीसीसीआयची भूमिका अत्यंत स्पष्ट होती. परंतु, दुर्दैवाने भारताचा हा रास्त सल्ला फेटाळण्यात आल्यामुळे भारतीय संघाला ट्रॉफी वितरण सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता.
या संपूर्ण प्रकरणा मुळे मोहसिन नक्वी यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी नाचक्की झाली. पुरुष आशिया चषकाची ट्रॉफी स्वतःसोबत घेऊन गेल्यामुळे नक्वी यांच्यावर आधीच टीका होत होती. त्यातच महिला आशिया चषकाच्या फायनलमध्ये बीसीसीआयची भूमिका स्पष्ट असूनही नक्वी स्वतःच्या हस्ते ट्रॉफी देण्यासाठी मैदानात अडून बसले. मात्र, भारतीय महिला खेळाडूंनी स्टेजवर जाण्यास नकार दिल्याने नक्वी यांना तब्बल 45 मिनिटे ताटकळत राहावे लागले. शेवटी अपमानित होऊन त्यांना स्टेडियम सोडावे लागले. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी त्यांना चिडवल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, बीसीसीआय आता कायदेशीर मार्गाने या दोन्ही ट्रॉफ्या भारतात आणण्याच्या तयारीत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.