कविता आमोणकर
एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात किंवा आसपास असली तरी तिच्या असण्याने वा नसण्याने तुम्हाला आता कोणताही फरक पडत नाही, अशी पक्व आणि तटस्थ अवस्था प्राप्त करणे म्हणजेच खरेखुरे मानसिक स्वातंत्र्य होय, जो आंतरिक प्रवास नक्कीच सोपा नसतो कारण यासाठी मनावर प्रचंड ताबा ठेवावा लागतो, स्वतःच्या स्वाभिमानाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागते आणि स्वतःशी प्रामाणिक राहावे लागते.
माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्यामुळे जन्मापासूनच तो वेगवेगळ्या नात्यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यात स्वतःला गुंतवून घेत असतो आणि आई-वडील, बहीण-भाऊ, मित्र-मैत्रिणी आणि आयुष्याच्या एका टप्प्यानंतर स्वतः तयार केलेले संसाराचे वर्तुळ यासारखी कितीतरी नाती जगण्याभोवती एक संरक्षक कवच किंवा कधीकधी एक कडक वेढा तयार करत असतात. सुरुवातीला ही नाती जगण्याचा आधार देतात आणि सुरक्षिततेची व आपलेपणाची उबदार जाणीव करून देतात; परंतु जसजसा काळ बदलतो, तसतशी नात्यांची समीकरणेही बदलू लागतात.
जेव्हा याच नात्यांमध्ये प्रेमाची जागा गैरसमज, अनादर, टोकाचा मानसिक ताण आणि वर्चस्ववादाची भावना घेऊ लागते, तेव्हा तेच ऋणानुबंध हळूहळू एका श्वास कोंडणाऱ्या मानसिक तुरुंगात रूपांतरित होतात. अशा वेळी स्वतःच्या मानसिक शांततेचा, आत्मसन्मानाचा आणि अस्तित्वाचा गांभीर्याने विचार करणे अत्यंत गरजेचे बनते. आपल्या समाजात आणि संस्कृतीत प्रत्येक नातं आयुष्यभर कोणत्याही अटींशिवाय जपायलाच हवं, असा एक अलिखित नियम मानला गेला आहे. आणि रक्ताची नाती असोत वा विवाहाने जोडलेली नाती असोत, त्यांच्याकडून समाजाच्या काही विशिष्ट अपेक्षा असतात.
जोवर हे बंध परस्पर आदराने फुलत असतात, तोवर आयुष्य सुंदर आणि सुसह्य वाटते. परंतु जेव्हा एखादं नातं प्रेमाचं किंवा आदराचं न राहता केवळ एक ओझं बनून राहतं, जिथे संवाद पूर्णपणे तुटलेला असतो आणि केवळ अपेक्षांचा व टोमण्यांचा मारा उरलेला असतो, तिथे मन आतून कोमेजू लागतं. कुटुंबातील जवळच्या व्यक्तींकडून वा जोडीदाराकडून जेव्हा सातत्याने अपमान, दुर्लक्ष किंवा मानसिक छळ सहन करावा लागतो, तेव्हा व्यक्ती हळूहळू आतून तुटत जाते आणि आपण बरेचदा हा सर्व त्रास निमूटपणे व मुकाट्याने सहन करत राहतो, कारण आपल्या मनात समाजाच्या प्रतिमेची किंवा लोकांच्या बोलण्याची अनामिक भीती असते.
‘लोक काय म्हणतील?’ किंवा ‘चारचौघात आपली नाचक्की होईल का?’ या विचारापोटी आपण स्वतःच्याच मनाचा आणि स्वाभिमानाचा गळा दाबतो. पण विचार करण्यासारखी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की, ज्या नात्यात तुमचा श्वासच गुदमरून जातोय, ते नातं टिकवून ठेवण्याचा हा अनाठायी अट्टहास कशासाठी? शारीरिक बंदिवासापेक्षा मनाची बंदिवान अवस्था माणसाला अधिक वेगाने मारत असते. आणि अशा वेळी मनाची स्थिती अतिशय केविलवाणी होऊन जाते. प्रत्येक वेळी परिस्थिती आपल्या मनासारखी असेलच, असे नाही. कधी कधी वास्तव असे असते की आपण एखाद्या नात्यातून किंवा कुटुंबातून कायदेशीर वा प्रत्यक्षरीत्या पूर्णपणे बाहेर पडू शकत नाही.
कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक बाबी, सामाजिक बंधने किंवा इतर बऱ्याच अपरिहार्य गोष्टींमुळे थेट संबंध तोडणे अशक्य असते. अशा वेळी त्या नात्यामुळे दररोज होणारा मानसिक त्रास कमी करणे हाच एकमेव आणि प्रभावी मार्ग उरतो, ज्याला मानसशास्त्राच्या भाषेत किंवा आधुनिक जीवनशैलीच्या संदर्भात भावनिक पाश तोडणे असे म्हटले जाऊ शकते. याचा अर्थ असा मुळीच नव्हे की तुम्ही कुणाचा द्वेष करताय, कुणाशी भांडताय किंवा आयुष्यातून पळून जाताय. तर याचा खरा आणि खोल अर्थ असा आहे की, समोरच्या व्यक्तीच्या टोकाच्या वागण्याचा, तिच्या बोलण्याचा किंवा तिच्या नकारात्मक ऊर्जेचा तुमच्या मनावर होणारा परिणाम तुम्ही कायमचा थांबवता आणि भावनिकदृष्ट्या स्वतःला त्या विशिष्ट जाचक परिस्थितीपासून अलिप्त करून घेता.
जेव्हा तुम्ही तुम्ही कोणावरही अशांत करणाऱ्या अपेक्षांची कोणतीही भिंत रचत नाही, तेंव्हा समोरची व्यक्ती कशीही वागली तरी त्याचा तुमच्या मनावर तिळमात्र परिणाम होत नाही, हा एक प्रकारचा मानसिक संन्यास असून स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याची आणि स्वतःचा आंतरिक प्रकाश शोधण्याची अमूल्य संधी देतो. आपल्या सर्व दुःखाचे, तणावाचे आणि नैराश्याचे मूळ मुख्यत्वे ‘एक ना एक दिवस समोरची व्यक्ती बदलेल’ या एकाच पोकळ अपेक्षेत बांधून ठेवलेली असते. कारण आपल्याला सतत असे वाटत असते की, आज नाही तर उद्या समोरच्या व्यक्तीला आपली किंमत कळेल, ती आपली महती समजून घेईल आणि आपल्याशी प्रेमाने व आदराने वागेल, आणि याच एका अवास्तव अपेक्षेत आपण वर्षानुवर्षे स्वतःचे अमूल्य आयुष्य दुःखात, विरहात आणि मानसिक तणावात घालवून बसतो. आणि आपल्या आयुष्याची महत्वाची वर्षे, आपला महत्वाचा कालखंड आपण अक्षरशः बरबाद करत असतो.
वास्तव आणि मानवी स्वभाव बरेचदा या अपेक्षेशी विसंगत असतात आणि जगात काही गोष्टी व व्यक्ती अशा असतात ज्या लाख प्रयत्न केले तरी कधीही बदलत नाहीत, कारण आपण जगातील प्रत्येक नातं वाचवू शकत नाही आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाला बदलूही शकत नाही. हा निसर्गाचा आणि जीवनाचा एक मोठा नियम असून, या कडू सत्याचा स्वीकार करणे म्हणजेच आयुष्यातील ताणतणाव एका झटक्यात कमी करणे होय. कधी कधी स्वीकार हाच आयुष्यात पुढे जाण्याचा आणि स्वतःला मुक्त करण्याचा पहिला टप्पा असतो, जिथे समोरची व्यक्ती जशी आहे, तिला तिच्या गुण-दोषांसह तशीच स्वीकारणे किंवा तिच्याकडून कुठलीही अपेक्षा न ठेवणे म्हणजेच खरी मानसिक मुक्ती होय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.