Voyager 1 One Light Day: विज्ञानाचे तंत्रज्ञान वापरतो, पण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारतो का?

Scientific Temper in India: व्हॉयेजर-१च्या यशामागे कोणताही शुभमुहूर्त, ग्रहशांती किंवा भविष्यकथन नाही.
Scientific Temper in India
Voyager 1 One Light DayDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डॉ. नंदकुमार कामत

व्हॉयेजर-१च्या यशामागे कोणताही शुभमुहूर्त, ग्रहशांती किंवा भविष्यकथन नाही. त्यामागे न्यूटनचे गतिनियम, गुरुत्वाकर्षणाचे गणित, ग्रहांच्या कक्षांची अचूक गणना, संगणकीय नियंत्रण आणि हजारो वैज्ञानिकांचे परिश्रम आहेत. गुरू आणि शनीच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून यानाचा वेग व दिशा बदलण्यात आली.

नासाच्या व्हॉयेजर-१ या अवकाशयानाने १८ नोव्हेंबर २०२६ रोजीपृथ्वीपासून एक प्रकाश-दिवसाचे अंतर गाठून इतिहास घडविला. ५ सप्टेंबर १९७७ रोजी प्रक्षेपित झालेले हे यान जवळजवळ अर्धशतक अखंड प्रवास करीत आहे. प्रकाशाचा वेग सेकंदाला सुमारे २,९९,७९२ किलोमीटर असून, चोवीस तासांत तो सुमारे २५.९ अब्ज किलोमीटर अंतर पार करतो. पृथ्वीवरून पाठविलेला रेडिओ संदेश आता व्हॉयेजर-१पर्यंत पोहोचण्यासाठी चोवीस तास घेतो. त्याचा प्रतिसाद मिळण्यासाठी आणखी चोवीस तास लागतात. हा विक्रम मानवी बुद्धिमत्ता, गणिती अचूकता आणि अभियांत्रिकी कौशल्याचा अभूतपूर्व पुरावा आहे.

Scientific Temper in India
Abhijeet Dipke Goa Visit: नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणारे सीजेपीचे अभिजीत दीपके गोव्यात; तरुणाईशी साधणार संवाद

या ऐतिहासिक घटनेकडे भारतीय समाजाने आत्मपरीक्षणाची संधी म्हणून पाहिले पाहिजे. एका बाजूला चंद्रावर आणि मंगळावर याने पाठविणाऱ्या देशाचा अभिमान बाळगायचा आणि दुसरीकडे जन्मपत्रिका, हस्तरेषा, ग्रहांची कथित अवकृपा, ग्रहणांचे दुष्परिणाम, वास्तुदोष आणि शुभाशुभ मुहूर्त यांवर विश्वास ठेवायचा, हा मोठा विरोधाभास आहे. विश्वाच्या वैज्ञानिक आकलनात आणि आपल्या दैनंदिन व्यवहारात प्रचंड दरी निर्माण झाली आहे.

व्हॉयेजर-१च्या यशामागे कोणताही शुभमुहूर्त, ग्रहशांती किंवा भविष्यकथन नाही. त्यामागे न्यूटनचे गतिनियम, गुरुत्वाकर्षणाचे गणित, ग्रहांच्या कक्षांची अचूक गणना, संगणकीय नियंत्रण आणि हजारो वैज्ञानिकांचे परिश्रम आहेत. गुरू आणि शनीच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून यानाचा वेग व दिशा बदलण्यात आली. ग्रह मानवी नशिबावर प्रभाव टाकतात, याला विश्वसनीय वैज्ञानिक पुरावा नाही; परंतु ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे अवकाशयानाची दिशा कशी बदलेल, याची गणिती भाकिते प्रत्यक्ष पडताळता येतात. खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांतील मूलभूत फरक येथे स्पष्ट होतो.

आधुनिक विज्ञानाची सर्व फळे उपभोगताना वैज्ञानिक विचारपद्धती न स्वीकारणे, ही आपल्या समाजाची गंभीर विसंगती आहे. स्मार्टफोन, उपग्रहाधारित स्थाननिर्धारण, विमानप्रवास, वैद्यकीय उपकरणे आणि डिजिटल अर्थव्यवस्था विज्ञानावर चालतात. तरीही त्याच स्मार्टफोनवर राशिभविष्य पाहिले जाते. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या नैसर्गिक खगोलीय घटना असून त्यांच्या वेळा गणिताने अचूक ठरविता येतात. ग्रहणामुळे अन्न विषारी होते किंवा गर्भाला अपाय होतो, अशा समजुतींना वैज्ञानिक आधार नाही. विज्ञानाचे तंत्रज्ञान वापरणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे नव्हे.

या मानसिकतेमागे पृथ्वीकेंद्री आणि मानवकेंद्री विश्वदृष्टीही आहे. पृथ्वी विश्वाचे केंद्र नाही. सूर्य आकाशगंगेतील अब्जावधी ताऱ्यांपैकी एक आहे आणि आपली आकाशगंगा असंख्य आकाशगंगांपैकी एक आहे. ग्रह, तारे आणि आकाशगंगा मानवी जन्मवेळा, विवाहमुहूर्त किंवा वैयक्तिक भवितव्य यांच्याभोवती फिरत नाहीत. व्हॉयेजर-१चा प्रवास विश्वाच्या अफाट विस्ताराची आणि त्यातील आपल्या नगण्य भौतिक स्थानाची जाणीव करून देतो.

Scientific Temper in India
Goa Equality Index 2026: 28 राज्यांत गोवा नंबर 1! आरोग्य, मूलभूत सुविधा आणि समान संधींच्या निर्देशांकात बाजी

इस्रोच्या मंगळयान, चांद्रयान-१ आणि चांद्रयान-३ मोहिमांनी भारतीय विज्ञानाचे सामर्थ्य सिद्ध केले. चांद्रयान-३चे यशस्वी चंद्रावतरण हे अचूक गणित, कक्षीय यांत्रिकी, संगणकीय नियंत्रण आणि कठोर चाचण्यांचे फलित होते. अशा मोहिमांचा राष्ट्रीय अभिमान बाळगणे स्वाभाविक आहे; परंतु त्यांच्यामागील वैज्ञानिक विचारपद्धती जीवनात स्वीकारली नाही, तर त्या अभिमानाचे शैक्षणिक मूल्य अपुरे राहते.

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ५१-अ(एच) नुसार वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, जिज्ञासू वृत्ती आणि सुधारणेची भावना विकसित करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. तरीही विज्ञानाच्या पदव्या मिळविणारे अनेकजण अवैज्ञानिक समजुतींपासून मुक्त झालेले दिसत नाहीत. विज्ञान हे उपजीविकेचे साधन बनले; परंतु जीवनाकडे पाहण्याची चिकित्सक विचारपद्धती बनलेले नाही. शिक्षक, प्राध्यापक आणि संशोधकही या विरोधाभासाला अपवाद नाहीत.

व्हॉयेजर-१च्या ऐतिहासिक विक्रमाला भारतीय शिक्षणविश्वात अपेक्षित व्यापक प्रतिसाद दिसला नाही. शाळा आणि विद्यापीठांनी या निमित्ताने प्रकाशाचा वेग, गुरुत्वीय साहाय्य, कक्षीय गणित आणि आंतरग्रहीय संदेशवहन यांवर चर्चा घडवून आणायला हवी होती. पाठांतर, परीक्षा आणि पदव्यांपेक्षा स्वतंत्र विचार, प्रश्न विचारण्याचे धैर्य आणि पुराव्यांची चिकित्सक पडताळणी महत्त्वाची आहे.

Scientific Temper in India
57th IFFI Goa: गोव्यात सिनेमाचा उत्सव सुरू! 57 व्या इफ्फीचा 'फादरलॅण्ड'ने होणार दिमाखदार शुभारंभ

१९९० मध्ये व्हॉयेजर-१ने सहा अब्ज किलोमीटर अंतरावरून पृथ्वीचे छायाचित्र घेतले. त्यातील सूक्ष्म निळसर बिंदूने मानवी अहंकाराला आव्हान दिले. आता हे यान त्याहून चारपट अधिक दूर गेले आहे. एक दिवस त्याचा पृथ्वीशी संपर्क तुटेल; परंतु प्रवास चालूच राहील. ग्रहांच्या कथित अवकृपेची भीती बाळगण्याऐवजी त्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून मानवाने यान अब्जावधी किलोमीटर दूर कसे पाठविले, हे समजून घेणे आवश्यक आहे. विश्वाची रहस्ये अंधविश्वासाने नव्हे, तर जिज्ञासा, गणित, प्रयोग आणि सत्याच्या अथक शोधाने उलगडतात. (लेखक विख्यात वैज्ञानिक आणि प्लॅनेटरी सोसायटी,पासाडेना,अमेरिकाचे सदस्य आहेत.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.