Goa Politics: सुदिन ढवळीकरांची निष्ठावंतांना संधी देण्याची मागणी; भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांच्या जखमेवर फुंकर?

Sudin Dhavalikar on Party Switching: सुदिन ढवळीकर यांनी केलेले ‘निष्ठावंतांना संधी द्या’ हे सल्लावजा वक्तव्य म्हणजे अशा निष्ठावंताना ‘डूबने वाले को तिनके का सहारा’ सारखे वाटू लागले आहे.
Sudin Dhavalikar on Party Switching
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मिलिंद म्हाडगुत

सुदिन ढवळीकर यांनी केलेले ‘निष्ठावंतांना संधी द्या’ हे सल्लावजा वक्तव्य म्हणजे अशा निष्ठावंताना ‘डूबने वाले को तिनके का सहारा’ सारखे वाटू लागले आहे. मगो पक्षाचे सर्वेसर्वा तथा वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पक्षांतरावर केलेली टीका करून प्रामाणिक कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या, असे आवाहन केल्यामुळे गोव्याच्या राजकीय क्षेत्रात सध्या ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण पसरल्याचे दिसत आहे.

तसे पाहायला गेल्यास पक्षांतर हा गोव्याच्या राजकारणाला लागलेला मोठा रोग आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. यामुळे गोव्याचे राजकारण दिशाहीन झाल्यासारखे झाले आहे. निवडून यायचे एका पक्षाच्या उमेदवारीवर आणि नंतर जायचे दुसऱ्या पक्षात असे सोयीचे राजकारण गोव्याच्या राजकीय क्षेत्रात अनेक वेळा खेळले गेले आहे. आणि ही आजची गोष्ट नाही. या पक्षांतरामुळेच एकेकाळी टॉपवर असलेला मगो पक्ष खिळखिळा झाला. १९८० साली गोव्यात काँग्रेस सत्तेवर आली ती मगो पक्षाने पुरवलेल्या आमदारांमुळेच.

Sudin Dhavalikar on Party Switching
Goa Land Prices: पणजी, म्हापसा, कळंगुटमधील जमीन महागली; सरकारकडून 2026-27 चे किमान दर अधिसूचित

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर हे पूर्वाश्रमीचे मगोवासीच. पण त्यांनी थेट पक्षांतर केले नाही. त्यांनी मगो सोडून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली आणि जिंकून आल्यानंतर सरकार स्थापन केले. पण खरे घाऊक पक्षांतर झाले ते १९९१ साली. त्यावर्षी मगोचे आमदार रवी नाईक यांनी मुख्यमंत्री होण्याकरता काही आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये केलेले पक्षांतर मात्र ‘ट्रेंड सेटर’ ठरले. त्यामुळे मगो पक्षाचे एवढे खच्चीकरण झाले, की आजपर्यंत हा पक्ष या धक्क्यातून सावरू शकलेला नाही. रवीनंतर २००० साली तोपर्यंत मगो पक्षाचे सर्वेसर्वा म्हणून गणले जात असलेल्या रमाकांत खलपांनीही मगो सोडून रवी बरोबर भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यामुळे मगोचे उरले सुरले अस्तित्वच संपुष्टात आले. आणि तेव्हा प्रथमच निवडून आलेल्या सुदिन ढवळीकरांनी पक्षाची कमान सांभाळली नसती तर मगो तेव्हाच इतिहासजमा झाला असता. आता तर गोव्यात पक्षांतर म्हणजे एक प्रथाच बनली आहे. आणि काँग्रेस पक्ष हा या प्रथेचा प्रणेता बनत चालला आहे. २०१७ व आता २०२२ साली या पक्षाच्या आमदारांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. म्हणूनच काँग्रेस म्हणजे भाजपकडे जाण्याची शिडी, अशी एक नवी व्याख्या तयार होऊ लागली आहे. आणि यात चूक आहे, असे कुणीच म्हणणार नाही.

सध्याच्या भाजप सरकारात जे मंत्री आहेत त्यांच्याकडे पाहिल्यावर आज भाजप किती काँग्रेसयुक्त झाला आहे, हे लक्षात येते. पण यामुळे भाजपचेही खास करून भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचे नुकसान होऊ लागले आहे. ज्यांनी पक्षाच्या वाईट दिवसांत जीव तोडून काम केले त्यांच्यावर आज ‘हेची फळ काय मम तपाला’ असे म्हणण्याची पाळी आली आहे. आम्ही शेवटपर्यंत कार्यकर्ते म्हणून राहायचे का, असा प्रश्न आज अनेक निष्ठावंत भाजप कार्यकर्ते विचारताना दिसत आहेत. मनोहर पर्रीकर असताना जशी आमची दखल घेतली जायची तशी दखल आज घेतली जात नाही, अशीही तक्रार हे कार्यकर्ते करताना दिसत आहेत.

आणि त्यामागचे मुख्य कारण म्हणजे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आमदारांचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे वर्चस्व. यामुळेच मूळ भाजप कार्यकर्ते गटांगळ्या खाताना दिसत आहेत. आणि अशावेळी सुदिन यांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे अशा निष्ठावंताना ‘डूबने वाले को तिनके का सहारा’ सारखे वाटू लागले आहे. सुदिन यांनी मगो पक्षाचा किती विस्तार केला हा चर्चेचा विषय असला तरी त्यांनी गेल्या २७ वर्षांत एकदाही पक्षांतर केले नाही, ही वस्तुस्थिती कुणीच नाकारू शकत नाही. दिवंगत मनोहर पर्रीकर आजारी असताना सुदिन यांना भाजपमध्ये या तुम्हाला मुख्यमंत्री करतो, अशी ऑफर होती.

Sudin Dhavalikar on Party Switching
Goa Azulejos Art: भिंतींवर रंगलेला गोव्याचा इतिहास! अझुलेजोस कलेची अनोखी परंपरा

त्यांनी ती स्वीकारली असती तर मगोची तेव्हाच मृत्युघंटा वाजली असती. असे एकाच पक्षाला प्रदीर्घ काळ चिकटून राहणारे दुसरे ठळक उदाहरण सध्या तरी काँग्रेसमध्येही दिसत नाही आणि मगोतही. २०१७ साली मगोचे तीन आमदार निवडून आले होते. पण बाबू आजगावकर व दीपक पावसकर भाजपमध्ये जाऊन मंत्री झाल्यामुळे शेवटी सुदिन हे एकमेव आमदार शिल्लक राहिले होते. तत्पूर्वी २००२ साली मगोच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या पांडुरंग मडकईकरांनीही असेच पक्षांतर केले होते.

आता तर हा इतिहास फोफावत चालला आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही मागे गोव्यातल्या या घाऊक पक्षांतरावर अशाच प्रकारची टिपणी केली होती. त्यामुळे या सगळ्याची दखल घेऊन भाजपसारखा पक्ष या निवडणुकीत निष्ठावंतांना उमेदवारी देऊन हा इतिहास पुसतो का, हे बघावे लागेल. अन्यथा ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’, असे म्हणत आक्रंदन करणाऱ्या निष्ठावंतांची उपेक्षा मागील पानावरून पुढे सुरूच राहणार!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.