Marathi Literature, Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

कावळ्यांच्या गोंगाटात कोकिळेचा स्वर हरवला! 'लाईक्स' आणि व्हायरल संस्कृतीत साहित्याच्या गुणवत्तेचे काय?

Impact of Social Media on Marathi Literature: अस्यां सखे बधिरलोकनिवास भूमौ’, हे संस्कृत सुभाषित वाचताना कृष्णशास्त्री चिपळूणकरांची ‘कोकिलान्योक्ति’ आता आठवते आणि नकळत मन वर्तमानकाळाशी तुलना करू लागते.

गोमंतक ऑनलाईन टीम

आमोद कुलकर्णी

अजूनही काही कोकिळा आहेत. शांतपणे, प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर, शब्दांची साधना करणाऱ्या. पण त्यांचा स्वर अनेकदा कर्कश गोंगाटात हरवतो. कारण आजचा काळ गहनतेपेक्षा तत्काळतेचा आहे. विचार नको, ‘व्हायरल’पणा हवा, ही मानसिकता केवळ समाजालाच नव्हे तर साहित्यालाही बाधित करत आहे.

अस्यां सखे बधिरलोकनिवास भूमौ’, हे संस्कृत सुभाषित वाचताना कृष्णशास्त्री चिपळूणकरांची ‘कोकिलान्योक्ति’ आता आठवते आणि नकळत मन वर्तमानकाळाशी तुलना करू लागते. ‘येथे समस्त बहिरे वसताति लोक’ ही ओळ केवळ एका काळाची तक्रार नव्हती; ती प्रत्येक युगाला लागू पडणारी शोकांतिका आहे. फरक इतकाच की त्या वेळी बहिरे कमी आणि कोकिळा अधिक असाव्यात; आज बहिरे वाढले आहेत, आणि कोकिळा शोधावी लागते.

कलेचे, साहित्याचे आणि प्रतिभेचे मूल्यमापन जेव्हा गुणवत्तेपेक्षा गदारोळावर होऊ लागते, तेव्हा कोकिळेलाही कावळा समजले जाते. आजच्या साहित्यविश्वात ही वेदना प्रकर्षाने जाणवते. कारण आज शब्दांचा सत्कार आणि सन्मान कमी, अन शब्दांचा वापर अधिक दिसतो. कविता आता अनेकदा अनुभूतीचे फलित नसून तात्कालिक प्रतिसाद, सोशल मीडियावरील टाळ्या किंवा त्वरित प्रसिद्धी मिळवण्याचे साधन बनली आहे.

एक काळ असा होता, की कविता घडवावी लागे; आज कविता पोस्ट केली जाते. पूर्वी कवी शब्दांना तपश्चर्येसारखे घडवत; वृत्त, यमक, लय, आशय, प्रतीक, सूचकता, संस्कार यांचा गंभीर विचार होत असे. आता अनेकदा चार विस्कळित ओळी, काही भावनिक शब्द आणि दोन उदास प्रतिमा म्हणजे कविता, असा एक भ्रामक समज वाढताना दिसतो. ‘मला जे वाटलं ते मी लिहिलं’ हा अभिव्यक्तीचा अधिकार असला, तरी त्यालाच साहित्यिक गुणवत्ता म्हणणे हा भाषेवर अन्याय ठरतो.

साहित्याचा हा संकोच केवळ लेखकापुरता मर्यादित नाही, तर तो वाचकांच्या मानसिकतेशीही जोडलेला आहे. आज आपल्याकडे माहितीचा महापूर आहे, पण ज्ञानाची आणि जाणिवेची प्रचंड टंचाई आहे. आपण ‘स्क्रोल’ करण्याच्या युगात जगत आहोत, जिथे बोटांच्या एका हालचालीसरशी विचार बदलतात. अशा काळात एखाद्या कवितेवर खिळून राहणे, तिच्या गर्भार्थाचा शोध घेणे आणि ती मनात साठवून ठेवणे, यासाठी लागणारा संयमच जणू आपण हरवून बसलो आहोत. ‘इन्स्टंट’ संस्कृतीने साहित्याचा गाभाच पोखरून काढला आहे.

पूर्वी साहित्य हे समाजाचे प्रबोधन करायचे, आज ते केवळ रंजनपर आत्मप्रौढीचे साधन बनताना दिसत आहे. जेव्हा व्यासपीठावरून दर्जेदार साहित्याऐ्वजी केवळ टाळ्या मिळवणारे चटपटीत शब्द विकले जातात, तेव्हा कोकिळेचा कंठ आपोआप मूक होतो. आजच्या काही साहित्यिक प्रवाहांवर टीका करण्याचे धाडस केले, की लगेच ‘तुम्ही जुन्या विचारांचे’ असा शिक्का बसतो. पण प्रश्न जुन्या-नव्याचा नाही; प्रश्न कसदारपणाचा आहे. तुकाराम जुने आहेत म्हणून मोठे नाहीत, तर त्यांचे शब्द आजही अंत:करण हलवतात म्हणून मोठे आहेत. कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, मर्ढेकर, गदिमा किंवा शांता शेळके यांना काळाने नव्हे, तर गुणवत्तेने अमर केले.

आजच्या साहित्याची एक मोठी शोकांतिका म्हणजे तिची क्षणभंगुरता. कविता वाचली जाते, ‘लाईक’ मिळतात, दोन दिवस चर्चेत राहते आणि नंतर डिजिटल विस्मृतीत हरवते. शब्दांचे आयुष्य कमी झाले आहे, कारण शब्दांमागील साधना कमी झाली आहे. लोकप्रियतेचा वेग एवढा प्रचंड आहे की टिकाऊपणाचा विचारच उरलेला नाही. दर्जेदार साहित्याला राजाश्रय किंवा लोकाश्रय मिळणे कठीण झाले आहे, कारण बाजाराच्या गणितात ‘जे विकते तेच टिकते’ हा नियम साहित्यालाही लावला जात आहे. पण साहित्याचा बाजार होऊ लागला की संस्कृतीचा ऱ्हास सुरू होतो, हे आपण सोयीस्करपणे विसरत आहोत. आज रसिक कमी आणि प्रेक्षक अधिक दिसतात. विचारांना वेळ देणारी पिढी दुर्मिळ होत चालल्याची खंत वाटते.

पुढच्या पिढीला आपण वारसा म्हणून काय देणार आहोत? डिजिटल प्लॅटफॉर्मवरील तात्पुरत्या वाहवांचे स्क्रीनशॉट्स की पिढ्यानपिढ्या पुरेल एवढी वैचारिक आणि भावनिक समृद्धी? हे म्हणताना संपूर्ण आजचे साहित्य टाकाऊ आहे, असे मुळीच नाही. अजूनही काही कोकिळा आहेत. शांतपणे, प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर, शब्दांची साधना करणाऱ्या. पण त्यांचा स्वर अनेकदा कर्कश गोंगाटात हरवतो. कारण आजचा काळ गहनतेपेक्षा तत्काळतेचा आहे. विचार नको, व्हायरलपणा हवा, ही मानसिकता केवळ समाजालाच नव्हे तर साहित्यालाही बाधित करत आहे. कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या कोकिळेला सांगितले गेले ‘जेथे बोल अमोल वाटति तुझे, तो देश, बा वेगळा’. आजच्या कवी, लेखक आणि रसिकांनाही कदाचित हेच वाक्य लागू पडते. प्रश्न एवढाच की असा ‘देश’ अजून उरलाय का? की आपल्यालाच तो निर्माण करावा लागेल?

जरी आज अवतीभवती शब्दबंबाळ लेखकांचा आणि दाद न समजणाऱ्या बधीर प्रेक्षकांचा गराडा असला, तरीही एक आशेचा किरण अजून बाकी आहे. जोपर्यंत एखादा वाचक कोपऱ्यात बसून कुसुमाग्रजांच्या ओळींवर डोळे पाणावतो आहे किंवा मर्ढेकरांच्या कवितेतील व्याकुळता समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, तोपर्यंत साहित्याचा श्वास सुरू आहे. गरज आहे ती या सुजाण वाचकांनी एकत्र येण्याची. आपल्याला पुन्हा एकदा शब्दांच्या शुद्धतेचा, त्यांच्या सामर्थ्याचा आणि साहित्यातील शांततेचा उत्सव साजरा करावा लागेल. गदारोळाला नाकारून, मौनातून उमलणाऱ्या खऱ्या प्रतिभेला दाद देण्याची नवी संस्कृती आपल्यालाच रुजवावी लागेल.

तरीही आशा सोडण्यास कारण नाही. कारण इतिहास सांगतो प्रत्येक गदारोळानंतर काही शाश्वत स्वर उरतातच. कावळ्यांच्या गर्दीतही कोकिळेचे कूजन कधीतरी कानावर येते आणि तेव्हा जाणवते सौंदर्य संपलेले नसते, फक्त त्यासाठी कान तयार ठेवावे लागतात. आपण नशीबवान आहोत की निखळ सोन्यासारखे साहित्य वाचायला मिळाले, ते शिकवणारे शिक्षक मिळाले, रसग्रहण शिकायला मिळाले. आता प्रश्न एकच ,त्या सोन्याचा उजेड पुढे न्यायचा की गोंगाटात हरवू द्यायचा?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT