Theatre Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Marathi Drama Competition: नाट्यस्पर्धांत नव्या संहितांची कमतरता का?

Goa Marathi Drama Competition: या गोव्याच्या मातीचा वास येणाऱ्या संहिता स्पर्धेत आल्या तर स्पर्धेला खरा ‘गोमंतकीय टच’ येऊ शकेल. खऱ्या अर्थी स्पर्धा रंगू शकेल.

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

नुकतीच कला अकादमीची मराठी ‘अ’ गट नाट्यस्पर्धा झाली. स्पर्धेत एकूण १८ प्रवेशिका होत्या. पण प्रत्यक्षात मात्र अकराच प्रयोग बघायला मिळाले. मराठी ‘अ’ गट नाट्यस्पर्धा ही कला अकादमीची एक प्रतिष्ठेची स्पर्धा. या स्पर्धेचे कनेक्शन महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेशी असल्यामुळे या स्पर्धेला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

पूर्वी या स्पर्धेत तीव्र चुरस असायची. दर्जाही उच्च असायचा. बौद्धिक मेजवानीही मिळायची. संख्याही चांगली असायची. पण आता या स्पर्धेवर अनेक प्रश्नचिन्हे उमटायला लागली आहेत. आणि यात सर्वांत मोठे प्रश्नचिन्ह आहे ते संहितेचे. यंदाच्या या मराठी नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या बहुतेक संहिता या रूपांतरित होत्या. या स्पर्धेपूर्वी पार पडलेल्या कोकणी नाट्यस्पर्धेतही हीच परिस्थिती दिसून आली.

यंदा कोकणी नाट्यस्पर्धेत एकूण १७ नाटके सादर झाली. आणि यातल्या बऱ्याच संहिताही रूपांतरितच केलेल्या होत्या. त्याशिवाय या स्पर्धेला गालबोट लागले ते वाङ्मयचौर्याचे. एका परदेशी नाटकाची हुबेहूब नक्कल करून ती संहिता आपल्या नावावर एका लेखकाने खपविल्यामुळे ते नाटकच स्पर्धेतून बाद करण्याचा प्रकारही या स्पर्धेत घडला. असे प्रकार पूर्वीही घडले असल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे आता प्रत्येक संहिता ही संशयाच्या पिंजऱ्यात उभी राहताना दिसायला लागली आहे. त्यामुळे ‘असली क्या है नकली क्या है’ हेच कळेनासे झाले आहे. आणि तरीही कला अकादमी तोंडात गुळणी घेऊन चूप बसली आहे. याबाबतीत कला अकादमीची नेमकी भूमिका काय यावर कोणतेही स्पष्टीकरण नाही. वास्तविक जेव्हा कोकणी नाट्यस्पर्धेत ही वाङ्मयचोरी उजेडात आली तेव्हाच यावर अकादमीने कडक पावले उचलायला हवी होती.

किंवा याबाबतीतचे निकष तरी तयार करायला हवे होते. इथे म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो आहे याचे मात्र दुःख आहे. अशा प्रकारवर नियंत्रण आणले नाही तर भविष्यात ही प्रथा बनून बसेल याची भीती वाटत आहे. आता कला अकादमीने कोकणी नाट्यस्पर्धेला पन्नास वर्षे झाली म्हणून एक खास कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू केली आहे.

हे करताना या ५० वर्षांत काय कमावले आणि काय गमावले याचाही आढावा अकादमीने या कार्यक्रमात घेतला पाहिजे. खरे तर आता फक्त ओरिजिनल संहिता असलेली नाटकेच स्पर्धेत घेण्याची वेळ आली आहे. या गोव्याच्या मातीचा वास येणाऱ्या संहिता स्पर्धेत आल्या तर स्पर्धेला खरा ‘गोमंतकीय टच’ येऊ शकेल. आणि खऱ्या अर्थी स्पर्धा रंगू शकेल.

आज गोव्यात अनेक समस्या आहेत. पण त्यावर संहिता उभी करू शकणारे लेखक आपल्याकडे नसावे हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल. नाटक हे तसे पाहायला गेल्यास प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. आणि स्पर्धा या ज्वलंत प्रश्न संहितेद्वारे रंगमंचावर आणण्याकरताच असतात हेही तेवढेच खरे आहे. स्पर्धेचा मूळ हेतूच तो असतो. किंबहुना तसा असायला हवा. पण परकीय संहिता रूपांतरित करून नाटके स्पर्धेत यायला लागल्यामुळे स्पर्धेच्या मूळ हेतूवरच घाला पडायला लागला असून स्पर्धेचा गाभाच नष्ट झाल्यासारखा वाटायला लागले आहे.

आता कला अकादमीने स्पर्धात्मक रंगभूमीकरता नाट्यसंहिता लिहू पाहणाऱ्या लेखकांकरता कार्यशाळांचे आयोजन करायला हवे. कोकणी रंगभूमीवर प्रकाश वजरीकर, मुकेश थळी, दत्ताराम बांबोळकर, युगांक नायक यांसारखे काही लेखक तरी दिसताहेत. पण मराठी रंगभूमीवर मात्र सगळा आनंदी आनंदच आहे. यामुळेच कला अकादमीने नाट्यलेखनाची ही प्रक्रिया गांभीर्याने घेण्याचे बघितले पाहिजे.

त्याचबरोबर संहिता आपलीच आहे कोणत्याही प्रकारची नक्कल नाही अशा प्रकारचे लेखकाकडून ‘अंडरटेकिंग’ घेण्याचेही सुरू केले पाहिजे. आणि यात काही तफावत आढळली तर उचित कारवाई करण्याचे हक्कही अकादमीने राखून ठेवले पाहिजेत. त्यामुळे स्पर्धेत एक प्रकारची शिस्त येऊ शकेल. नुकत्याच झालेल्या कोकणी नाट्यस्पर्धेतील ‘नक्कल कम चौर्य’ प्रकरणामुळे अकादमीची जी नाचक्की झाली आहे तिला अशा प्रकारची खंबीर पावले उचलली तरच आळा बसू शकेल.

संहिता हा कोणत्याही नाटकाचा देव्हारा असतो. त्याच्यावरच संपूर्ण नाटकाचा डोलारा उभा राहत असतो. त्यामुळेच नवे लेखक तयार होणे आवश्यक असते. आणि जेव्हा नवे लेखक असे म्हटले जाते तेव्हा त्याचा रोख फक्त नव्या संहिता लिहू शकणाऱ्या लेखकाकडे असतो हे विसरता कामा नये. रूपांतरित करून किंवा एखाद्या संहितेची हुबेहूब नक्कल करून लेखक बनत नसतो. आणि बनला तर तो टिकत नसतो.

यामुळेच स्पर्धेचा दर्जा जर टिकवायचा असेल तर कला अकादमीला लेखनाच्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन आचरणात आणावा लागेल. नाहीतर या स्पर्धा म्हणजे ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ यातला एक प्रकार ठरून लोकांच्या मनात वसलेल्या स्पर्धेच्या प्रतिमेला कायमचा तडा जाईल, हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Actress Video: "भारतीय पुरुष पाकिस्तानी मुलींसाठी वेडे...", पाक अभिनेत्रीच्या दाव्याने सोशल मीडियावर वाद, व्हिडिओ VIRAL

Viral Post: "आता तरी गंभीर व्हा!" विजयाचा पत्ता नाही अन् पराभवांचे रेकॉर्ड्स; नेटकऱ्यांनी गौतम गंभीरला धरलं धारेवर

Goa Crime: मांद्रेत धक्कादायक प्रकार, 6 जणांच्या टोळक्याकडून वृद्ध पती-पत्नीसह मुलाला मारहाण; प्रॉपर्टीच्या वादातून राडा!

Benaulim Beach: एव्हरी डे इज ए गुड डे! फिशरमन पेलेचा बम्पर कॅच; विद्यार्थ्यांनीही घेतले मासेमारीचे धडे Watch Video

VIDEO: स्पेनमध्ये भीषण अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेनची समोरासमोर धडक; 21 प्रवाशांचा मृत्यू, 70 हून अधिक जखमी

SCROLL FOR NEXT