Elephant Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Human Animal Conflict: नेमकं हद्दीत घुसलंय कोण? माणूस की हत्ती?

Omkar Elephant Goa: माणसांनी जनावरांच्या क्षेत्रात घुसण्याचे, मालकी हक्क प्रस्थापित करण्याचे पशुत्व अंगीकारले नसते तर माणसाला वर्तमानातले त्यांचे उपद्रव सहन करावे लागले नसते.

Sameer Panditrao

मॅन व्हर्सेस वाईल्ड ही विख्यात डिस्कव्हरी चॅनलवरील जगप्रसिद्ध माहितीपट मालिका. त्यात मानव आणि निसर्ग यांच्यातील संघर्षाचे व सहजीवनाचे अद्वितीय चित्रण आहे. विशेष म्हणजे या मालिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महत्त्वाचे पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. त्याची जगभर चर्चा झाली होती. पंतप्रधान निसर्ग, प्राण्यांप्रति प्रचंड आस्थेचे आवाहन करत आले आहेत. मोदी नेहमी सांगतात की - निसर्ग आणि प्राणी आपली परंपरा आहे.

त्यांचे संरक्षण करणे सरकारांसह समाजाची जबाबदारी आहे. मोदींनी सिंह, वाघ, हत्ती, गेंडे आणि चित्ते यांसारख्या प्रमुख प्रजातींच्या संवर्धनासाठी धोरणात्मक पावले उचलली, ज्यामुळे भारताला ‘लीडरशिप इन वाइल्डलाइफ कन्झर्वेशन ॲवॉर्ड’ मिळाला.

आज पंतप्रधान मोदी यांचा वाढदिन. गोव्यासह भाजपशासित राज्यांतील सरकारे त्यांच्या कार्याला उजाळा देतील. स्तुतिसुमने उधळतील. परंतु वाढदिन जसा प्रासंगिक आहे, त्याच आत्मीयतेने वन्य प्राण्यांच्या संरक्षणाचा, संवर्धनाचा मुद्दाही दररोज हाताळण्यासारखा आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा सीमावर्ती भागांत वन्य प्राणी नागरी वस्तीकडे वळू लागलेत. मानव-प्राणी संघर्ष टिपेला पोहोचला आहे. परंतु मोदींचे गुणगान गाणाऱ्या सरकारांना त्याचे सोयरसुतक नाही. मानवाने स्वार्थासाठी निर्माण केलेली कुंपणे, आखलेल्या सीमा मुक्या प्राण्यांना कळत नाहीत.

पेडण्यातील उदाहरण ताजे आहे. सिंधुदुर्गातील दोडामार्गातून गोव्याच्या हद्दीत मोपा परिसरात आलेला एक हत्ती नागरी सुरक्षेच्या दृष्टीने अडचणीचा भासू लागला आहे. हत्तीला गणेशाचे रूप मानणारा समाज त्याच्या ताकदीच्या भयाने गर्भगळीत झाला.

फटाके लावण्यासारख्या केविलवाण्या प्रयत्नांद्वारे हत्तीला पांगवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिन्ही राज्यांच्या सीमेवर सातत्याने रानटी हत्तींचा अधिवास राहिला आहे. घाटमाथ्यावरील जंगले तोडल्यानंतर त्यांच्या उपजीविकेचा निर्माण झालेला प्रश्न जटिल बनला आहे.

मात्र, राज्यांनी वन्य प्राण्यांच्या अधिवासाविषयी ठोस भूमिका घेण्याऐवजी त्यांचा ‘फुटबॉल’ केला. एका हद्दीतून दुसऱ्या हद्दीत पिटाळण्यात धन्यता मानली.

कायमस्वरूपी तोडग्यासाठी व्यापक धोरणात्मक पाऊल उचलण्याची तसदी कुणीही घेतलेली नाही. २००१पासून हत्ती कर्नाटकातून गोव्यात येऊ लागले. सत्तरी, डिचोली, पेडण्यातील सीमा भागांत त्यांचे अधूनमधून दर्शन होत आले आहे. कर्नाटक-दांडेली येथे मोठ्या प्रमाणात बांबूतोड झाल्यापासून वन्य प्राण्यांचा तिळारी, माणगाव, कोल्हापूर-चंदगड परिसरात अधिवास राहिला.

हत्ती मानवी वस्तीजवळ जेव्हा येतात तेव्हा त्यांना हाकलण्याचे पर्याय अवलंबले जातात. मुळात हत्ती मानवी वस्त्यांकडे वळलेच का, याचा विचार कोणतेही सरकार करत नाही. जंगल क्षेत्र घटणे, अन्न-पाण्याची टंचाई, स्थलांतर मार्गांवर मानवी हस्तक्षेप आणि पिकांच्या शेतांमध्ये सहज अन्न मिळणे यामुळे संचार वाढणारच आहे.

तात्पुरते उपाय काढत राहिल्यास पुढे माणूस व वन्य जीव यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचेल. हत्तींच्या हल्ल्यात मानवी बळी गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. गेल्या वर्षी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यातील एकूण जंगल क्षेत्र १५० हेक्टरने कमी झाले आहे.

हाच पश्चिम घाटासंदर्भात विचार केल्यास २०१३ ते २३ या दहा वर्षांत सुमारे ५८.२२ चौरस कि. मी. जंगलक्षेत्र कमी झाले आहे. त्याचा परिणाम असा- भटक्या कुत्र्यांप्रमाणे बिबट्यांचे गावागावांतून दर्शन घडू लागले आहे. बळाच्या जोरावर शिकार करणारे बिबटे केविलवाणे झालेत. ज्या भागांत वीस वर्षांपूर्वी माकडे नव्हती अशा भागांत त्यांचा संचार वाढला आहे.

सुपाऱ्या, शहाळी हे त्यांचे खाद्य बनले. नारळांची तुट निर्माण होऊ लागली. मोरांचा उपद्व्यापदेखील लक्षणीय आहे. शेती, बागायती करावी की नको, अशी विवंचना वाढली आहे. कर्नाटक-गोवा हद्दीनजीक अस्वलांचे हल्ले वाढलेत.

हे थांबवायचे असल्यास व्यापक धोरण ठरवावे लागेल. त्याच्या अभावामुळे वाघांना, हत्तींना मारले जाते. वन्य प्राण्यांचा अधिवास जपण्यासाठी कोर्टाला कान उपटावे लागतात. दुर्दैवाने जोपर्यंत व्यक्तिगत पातळीवर दुष्परिणाम दिसत नाहीत तोवर त्याची तीव्रता लक्षात येत नाही. पण, म्हणून ती असतच नाही, असे समजणे चुकीचे आहे.

वास्तविक, माणसांनी जनावरांच्या क्षेत्रात घुसण्याचे, मालकी हक्क प्रस्थापित करण्याचे पशुत्व अंगीकारले नसते तर माणसाला वर्तमानातले त्यांचे उपद्रव सहन करावे लागले नसते. जंगली श्वापदांनी गोधन नष्ट केले, अन्नधान्य फस्त केले असे म्हणून कांगावा करणाऱ्या माणसानेच त्यांच्यावर ही पाळी आणली आहे.

निसर्गचक्राचा घटक असलेला प्रत्येक प्राणी, पशू, पक्षी निसर्गाने नेमून दिलेले आपापले करत आहे; फक्त माणूस ती जाणीव निसरून गेलाय. निसर्गाचे घटक आहोत, निसर्गात इतरांसोबत राहून व्यष्टी आणि समष्टीचा समतोल सांभाळायचे भान माणसाला उरले नाही.

रात्री कमळाच्या आत अडकलेला भुंगा, ‘सकाळ होईल, कमळ उमलेल, मी बाहेर पडेन’ असा विचार करत असतानाच हत्ती तिथे येतो आणि ते कमळच उपटून फेकून देतो; ‘हा हंत हंत नलिनीं गजउज्जहार’. पशू, पक्षी, प्राणी यांचे संवर्धन न करता विकास करणाऱ्या माणासात आणि त्या भुंग्यात काहीच अंतर नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC T20 क्रमवारीत मोठा फेरबदल! अभिषेक शर्मा नंबर 1 वर कायम, भारतीय फलंदाजांना फटका; सूर्या-तिलक वर्मा यांची घसरण

Goa Drug Bust: थिवी रेल्वे स्थानकावर 3.5 लाखांचा अंमली पदार्थ जप्त, 25 वर्षीय नेपाळी नागरिकाला अटक; कोलवाळ पोलिसांची कारवाई

...त्यांनी मला रडवलं, ओझं घेऊन भर पावसात 5KM चालले; दक्षिण गोव्यात टॅक्सी माफियांची गुंडागर्दी, गुजराती महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव Video

Akasa Air चा सावळा गोंधळ, पुण्यात सुरक्षा तपासणी विलंबामुळे सहाजण गोव्यातील शूटिंग चॅम्पियनशिपला मुकले

Goa Live Updates: मुंगुल हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला सशर्त जामीन मंजूर!

SCROLL FOR NEXT