कविता आमोणकर
एकाकीपणाचे दुसरे स्वरूप म्हणजे एकांत.. एकांत ही स्वतः ची निवड असते. हा एकांत आपल्यावर कोणी लादलेला नसतो, तर तो आपणहून स्वतः स्वीकारलेला असतो. माणसांच्या गर्दीपासून दूर निवडलेला असा शांत एकांत हा खरं तर जाणीवपूर्वक निवडलेली मनाची प्रगल्भताच म्हणावी लागेल...
माणूस हा समाजप्रिय असला, तरी त्याच्या आयुष्यात एकाकीपण हे कधी न कधी येतंच...या एकाकीपण झेलताना त्याच्या मनाची अवस्था ही अगदी उद्विग्न होते. एकाकीपणाचा प्रवास हा माणसाला कधी उद्ध्वस्त करून टाकतो.. त्याच्या मनाची स्थिती पार कमकुवत करून टाकतो.. तर कधी कधी हाच एकाकीपणाचा प्रवास विवशतेतून प्रगल्भतेकडे नेणाराही ठरतो...
या दोन्ही स्थिती पैकी पहिली स्थिती म्हणजे एकाकीपण, तर दुसरी स्थिती म्हणजे शांत एकांत..वरवर पहायला गेलं तर या दोन्ही गोष्टी एकसारख्या वाटत असल्या, तरी त्यांच्यातील फरक हा जमीन अस्मानाचा फरक आहे. माणसाला कधी कधी आपल्या मनाप्रमाणे वागता किंवा जगता येत नाही..अशा वेळी, किंवा जेंव्हा त्याच्या मनात विचारांचे प्रचंड काहूर उठलेले असताना ते व्यक्त करण्यासाठी, त्याच्या समोर कोणीही नसतं... तसेच, त्याच्या संकटाच्या वेळी त्याला समजून घेणारी कोणीही व्यक्ती नसते, तेंव्हा त्याला एकाकीपणाची भावना सतत टोचत, बोचत राहते.
सर्व नात्यांच्या गर्दीत असूनही आपल्याला कोणी समजून घेत नाही, आपले दुःख कोणी ऐकून घ्यायला तयार नाही, दुःखाच्या व संकटाच्या क्षणी आपल्याला मदत करायला कोणी नाही, ही भावना जेंव्हा मनाला त्रास देऊ लागते, ती भावना म्हणजे ही एकाकीपणाची भावना...या भावनेमध्ये असुरक्षितता लपलेली असते. अशा वेळी मन हे असुरक्षितता, भीती यांच्या छायेत सतत वावरत राहते व सतत दुसऱ्याच्या आधाराची किंवा मदतीच्या आशेवर जगत राहते.
एकाकीपण जेंव्हा माणसावर भारी होते, तेंव्हा माणूस स्वतःपासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो कारण त्याच्या स्वतःच्याच मनात येणारे घातकी विचार विचार भीतीदायक वाटू लागतात... माणसांच्या गर्दीत असूनही अशा वेळी आपण कुणासाठी नाही किंवा कोणी आपल्यासाठी नाही या विचारांचे हल्ले सतत त्याच्या मनावर होत राहतात आणि याचे शल्य त्याच्या मनाला सतत टोचत राहते. अशा वेळी माणूस होत्याचा नव्हता होऊन जातो.
म्हणूनच, एकाकीपणाचे दुसरे स्वरूप म्हणजे एकांत.. एकांत ही स्वतः ची निवड असते. हा एकांत आपल्यावर कोणी लादलेला नसतो, तर तो आपणहून स्वतः स्वीकारलेला असतो. माणसांच्या गर्दीपासून दूर निवडलेला असा शांत एकांत हा खरं तर जाणीवपूर्वक निवडलेली मनाची प्रगल्भताच म्हणावी लागेल...
या एकांतात माणूस इतरांच्या गर्दीपासून दूर असा एकटा असतो खरा, पण तो स्वतःच्या सोबतीने सुखी असतो... एकांतात माणसाचं जगणं हे स्वतःला स्वतःशीच भेटण्याचं एक सुंदर माध्यम आहे, असं मला वाटतं .. आजुबाजूच्या नेहमीच्या गोंगाटातून स्वतःला बाजूला एकांतात ठेवताना माणूस जेंव्हा स्वतःशी संवाद साधू लागतो, तेंव्हा नवे विचार त्याच्या अंतरंगात प्रसवतात. लेखकाच्या लेखणीला नवा आयाम मिळतो.. कलाकाराची कला पुन्हा नव्याने जन्म घेते.. अशा वेळी सृजनतेला अनेक धुमारे फुटतात.. या निवडलेल्या एकांतात मनुष्याला कोणाची तरी कमतरता भासण्याऐवजी, स्वतःच्याच अस्तित्वाचा आनंद मिळतो आणि हा आनंद तो अगदी मनमुराद लुटतो.
स्वतःच्या विचारांकडे तटस्थपणाने पाहताना आपण अशा वेळी स्वतःला परिपूर्णतेच्या मार्गावर आणतो. म्हणूनच तसं बघायला गेलं, तर एकांत ही साधनेची, आत्मज्ञानाची, ध्यानाची पहिली पायरी आहे... जिथे अनेक कल्पनांचा उगम होतो. म्हणूनच लेखक, कवी, चित्रकार आणि विचारवंत जाणीवपूर्वक एकांताचा ध्यास घेतात, ते याच साठी. कारण याच शांततेत नवनिर्मितीचे बीज रुजते. आणि मग या एकांतात माणूस स्वतःशी संवाद साधायला सुरुवात करतो.
स्वतः च्या जीवनाचे सिंहावलोकन करताना स्वतःच्या चुकांचे विश्लेषण करायला शिकतो. जीवनाच्या मार्गावर आपण कसे चुकलो याचा ठाव तो स्वतःच घ्यायला शिकतो. आणि स्वतःची शक्ती ओळखतो. जगातील महान साहित्याचा इतिहास पाहिला तर लक्षात येते की, अनेक अजरामर कलाकृती या अत्यंत खोल एकांतातून निर्माण झाल्या आहेत. जेव्हा बाहेरचा आवाज शांत होतो, तेव्हाच अंतर्मनातील आवाज आपल्याला स्पष्टपणे ऐकू येतो. आयुष्यात आलेले ‘रितेपण’ जेव्हा माणूस आनंदाने स्वीकारतो, तेव्हाच त्यातून ‘ब्रह्मांड’ निर्माण करण्याची जिद्द निर्माण होते.
कवीच्या मनातील वेदना जेव्हा कवितेच्या रूपाने एकांतात कागदावर उतरतात, तेव्हा ती कविता वाचणाऱ्या प्रत्येकाला आपली वाटते. एकांतात मनाचे झालेले रितेपण हे कवीला किंवा लेखकाला त्याच्यातील आंतरिक शक्तीची, सत्याची जाणीव करून देते. स्वतःला एकांतात हरवून स्वतःलाच जिंकताना जो आनंद प्राप्त होतो, तो परमानंद असतो. एकांतात असताना माणूस स्वतःवर प्रेम करायला शिकतो. आयुष्याच्या रहाटगाडग्यात फिरताना तो स्वतःचे मन जपायला विसरलेला असतो. आपल्या मनाला काय हवं, काय नको, याचा त्याला विसर पडलेला असतो. शरीराच्या गाभाऱ्यात असलेले आपले मन एकांतात पाहताना विचारांच्या गोंगाटापासून दूर राहिल्याने आपले मन हे किती मलूल होऊन गेलेले आहे, याची जाणीव झाली, की या आपल्या मनाला आपणच उल्हासीत करायला हवं , हे त्याला उमगून येतं.
जो माणूस स्वतःच्या मनाला आनंदी ठेवत त्याच्याच सोबतीने सुखी, आनंदी होऊ शकतो, तोच माणूस दुसऱ्याला खऱ्या अर्थाने प्रेम, आनंद देऊ शकतो. एकांतात आपल्या मनाला पूर्णपणे रिकामे केल्याशिवाय आपण दुसऱ्याच्या भावनांना आपल्या मनात जागा देऊ शकत नाही. हे ‘शून्य’ होणे म्हणजेच स्वतःला हरवणे आहे आणि याच हरण्यातून दुसऱ्यामध्ये स्वतःला जिंकण्याची नवीन प्रक्रिया सुरू होते...
आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाने जोडलेल्या जगात आपण एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत, पण तरीही अनेकांच्या वाट्याला भीषण एकाकीपण येते, हे नाकारता येत नाही...म्हणूनच यावरचा खरा उपाय म्हणजे एकाकीपणाला घाबरून त्याचा बाऊ करण्यापेक्षा या एकाकीपणाचे ‘रूपांतर’ आपण जर शांत अशा एकांतात केले, तर दिवसातला थोडा वेळ स्वतःसाठी देताना स्वतःच्या विचारांशी मैत्री केल्यास आपल्याला एक नव्या अनुभूतीची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. नाईलाजाने जरी काही कारणास्तव एकाकीपण आले, तर हे एकाकीपण हसत स्वीकारताना त्या एकाकीपणाचा शांत एकांत करून आपल्या मनाच्या आरशात आपण आपले खरे स्वरूप पाहू शकतो. आणि स्वतःला पुन्हा नव्याने शोधू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.