Balanced Life Motivation Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

इतरांशी तुलना नव्हे, स्वतःची ताकद ओळखा; आनंदी जीवनाचा खरा मार्ग

Balanced Life Motivation: आपली परिस्थिती काय, किंवा आपली क्षमता काय, आपल्याला काय येतं, आपल्याला कुठल्या विषयात गती आहे, आपल्याला काय भावतं, आपल्याला आनंद मिळेल का?

दैनिक गोमन्तक डिजिटल

स्मिता तिंबले

आपली परिस्थिती काय, किंवा आपली क्षमता काय, आपल्याला काय येतं, आपल्याला कुठल्या विषयात गती आहे, आपल्याला काय भावतं, आपल्याला आनंद मिळेल का? अशा साध्या पण महत्वाच्या गोष्टींचा उलगडा करून घ्यावा व नेहमी आयुष्यात पुढचे पाऊल टाकावे.

अंथरूण पाहून पाय पसरावेत’ अशी एक जुनी म्हण आहे. जुनी असली तरी आजच्या घडीलाही तिचे तेवढेच महत्व आहे. अगदी साधा अर्थ आहे. जेवढे आपल्याला जमेल तेवढेच करावे. जमत असल्याचा खोटा आव आणल्यावर तो एक ना एक दिवस तोंडघशी पडतो. असं बघा, आपल्या हाताची पाचही बोटे सारखी असतात का? पण प्रत्येक बोट महत्वाचे असते.

सारी बोटे एकदम एकत्र आणून आपण कितीतरी कामे करतो. एक छोटे एक मोठे-वेगवेगळे असणे हेच तर नैसर्गिक आहे. सगळीच सारखी असती तर त्यात वैशिष्ट्य राहिले असते का? आपणही त्या बोटांप्रणाणेच असतो, भिन्नभिन्न. म्हणून आपण खास आहोत. एक, दुसऱ्या सारखा नाही. सख्खी भावंडेही एक सारखी नसतात. जुळी सुद्धा समान नसतात.

प्रत्येकाने आपले वेगळेपण जपले पाहिजे. निसर्ग प्रत्येकाला काही ना काही तरी देतोच. कुणालाच रिता ठेवत नाही. आपली खासियत आपण ओळखायची. ती जपायची, पुढे न्यायची, जोपासायची, फुलवायची, तिचे चीज करायचे. आपल्यापाशी जे आहे त्याचा वापर करून पुढे जाण्यात शहाणपण आहे. सगळेच पळतात म्हणून आपणही पळत राहण्यात हशील नाही. जे आपल्यात आहे त्याचा उपयोग करण्यासाठी झटल्यास लवकर फळ मिळेल.

नाहीतर हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्यासारखे होईल. शिवाय आत्मिक समाधानही मिळेल हे महत्वाचे. त्यासाठी सतत आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत. आपली परिस्थिती काय, किंवा आपली क्षमता काय, आपल्याला काय येतं, आपल्याला कुठल्या विषयात गती आहे, आपल्याला काय भावतं, आपल्याला आनंद मिळेल का?

अशा साध्या पण महत्वाच्या गोष्टींचा उलगडा करून घ्यावा व नेहमी आयुष्यात पुढचे पाऊल टाकावे. इतर कुठल्याही निकषावर आपण निर्णय घेऊ नये. आपण फसू. आणखीन एक म्हण आहे. ‘तिचे केस लांब म्हणून मी माझे ओढले तर ते लांब होतील का?’ तर नाही असं त्याचं साध सरळ उत्तर आहे. तुम्ही म्हणाल, हे झालं नैसर्गिक वेगळेपण. आपण काही ग़ोष्टींचा अभ्यास करून , खूप मेहनत घेऊन यश मिळवू शकत नाही का?

तर, एका मर्यादे पर्यंत असं यश मिळवणं शक्य असत. पण फार तांणलं तर तुटण्याची शक्यता असते. आजकाल आपण पहात व ऐकत असलेल्या आत्महत्येच्या घटना हेच दर्शवत आहेत. कशासाठी असा फोल प्रयत्न करायचा? चांगले आयुष्य जगायचे सोडून आपण दर दिवशी शिवधनुष्य का पेलत बसायचे? ज्याला ते लिलया शक्य आहे त्याला ते उचलू दे.

बाकीची धनुष्ये उचलायला नकोत? सगळेच अर्जुन व्हायला पाहिजेत असं कुणी सांगितले आहे?अर्जुन सोडून इतर कुणी चांगले आयुष्य जगले नाही का? एकदाच मिळणारे ते जीवन जगायचे आहे की, न झेपणा-या ध्येयापोटी जगणे ताणून धरायचे आहे. मुलं लहान असताना मी एक बाल संगोपन या विषयावर पुस्तक वाचलं होतं. नांव आता आठवत नाही.

पण त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ मात्र चांगलं आठवतं. एका मुलाला दोन्ही बाजूंनी धरून त्याचे आई -बाबा ओढत असतात. आणि ते मूल ओऽ असं ओरडत असतं. फारच बोलकं असं हे मुखपृष्ठ होय. मुलांच्या संगोपनात आपण काय चूक करतो त्यावर अचूक बोट ठेवणारं. असं ओढून मूल मोठ होत नाही. ते नैसर्गिकरित्याच मोठं होत जातं. आपण फक्त त्याला योग्य खतपाणी घालायचं. फार वाकलं तर धीगी लावून सरळ करायचं.

पाणी रहात असेल तर त्याला वाट करून द्यायची... ऊन द्यायचं. पण उन्हापासून संरक्षणही करायचं. जसं झाड असेल तशीच त्याला फळं येतील. आंब्याच्या झाडाला फणस नाही लागत. जुईला गुलाब नाही फुलत. खत वापरून फारतर, गुणवत्ता सुधारते, पण त्याचा पिंड नाही बदलत. हे समजायला फारशी अक्कल लागत नाही. फक्त आपले पाय जमिनीवर असणे आवश्यक आहे.

दिवसेंदिवस बदलत जाणाऱ्या नवीन तंत्रज्ञानामुळे नोकरी-व्यवसायात कठोर बदल घडतात. नवीन पिढी समोर दर दिवशी नवे आव्हान उभे असते. या आव्हानांना सामोरे जावे, की कामाच्या ठिकाणी अतिरिक्त शिल्लक म्हणून उघड्या दारातून चालते व्हावे, अशा स्थितीत आजची युवापिढी आहे. या प्रकारामुळे हतबल न होणे गरजेचे. ‘अच्छेदिन’ वळणे घेत कुठेकुठे स्पर्श करतील, त्याचा परिणाम कुणाला भोगावा लागेल याचा नेम नाही. सावध राहून आपली शक्ति ओळखून शांतपणे जगत राहिल्यास आपले शीर सलामत राहील हे सांगणे न लगे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

Viral Stunt Video: वयाच्या 97 व्या वर्षीही जबरदस्त जिद्द! आजीने उडत्या विमानातून केला थरारक स्टंट, नेटकरी हैराण; एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडिओ

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

SCROLL FOR NEXT