Poem  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

स्वतःची कविता वाचली, म्हणे गंगेत घोडं न्हालं! कविसंमेलनात कवितेला खरेच महत्त्व उरलेय?

Poem Literature: कविता मंचावरचा प्रकाशबिंदू राहिलेली नाही; ती एक सजावटीचा घटक - एक कार्यक्रमाला प्रतिष्ठा देणारा छोटा तपशील - इतकीच उरली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

आमोद कुलकर्णी

आजच्या साहित्यविश्वातील एक गंभीर आणि विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे-कविसंमेलनाचा मूळ हेतू बदलू लागलेला दिसतो. एकेकाळी जिथे कविता हा कार्यक्रमाचा आत्मा होती, तिथे आता कवींची उपस्थिती - त्यांचं नाव, त्यांची दृश्यता, आणि कधीकधी त्यांची सोशल मीडियावरील प्रतिमा - यांना कवितेपेक्षा अधिक वजन येऊ लागलं आहे. हा बदल सूक्ष्म असला तरी दुष्परिणामकारक आहे; आणि तो साहित्याच्या मूळ संस्कृतीवर खोल ओरखडा उमटवतो.

आयोजकांच्या दृष्टिकोनात एक नवा व्यवहारवाद शिरला आहे. कार्यक्रम यशस्वी दिसावा, फोटोंना आकर्षक पार्श्वसजावट मिळावी, आणि सोशल मीडियावर कार्यक्रम भरगच्च भासावा या विचारांनी कवींना मोठ्या प्रमाणावर बोलावलं जातं. त्यामुळे कवींचा सहभाग हा कलेच्या गरजेपेक्षा गर्दीच्या पूर्ततेचा घटक बनत चालला आहे.

कविता हे त्यांच्या उपस्थितीचं कारण राहिलेलं नाही; उलट त्यांची उपस्थितीच कवितेचं निमित्त बनली आहे.

अनेक ठिकाणी तर कविसंमेलन हे मुख्य कार्यक्रमाच्या शेवटी जोडलेलं नाममात्र परिशिष्ट असतं. उद्घाटन, प्रकाशन, गौरव - कार्यक्रमाचा मध्यभाग काहीही असो, शेवटी ‘कविसंमेलन’ असा एक औपचारिक उल्लेख दिसतो. ही रचना जणू साहित्याच्या मूलमूल्यांना विसरून फक्त परंपरा निभावण्याचा प्रयत्न आहे. कविता जेवणातील मुख्य पदार्थ असण्याऐवजी, फक्त जेवणानंतर दिल्या जाणाऱ्या मिठाईसारखी - असल्यास बरं, नसली तरी कार्यक्रम पार पडतो अशी स्थिती निर्माण झाली आहे.

कवींच्या वागणुकीतही बदल जाणवतो. काही कवी संमेलनात सहभागी होतात, पण त्यांच्या वर्तनातून कविता ऐकण्याची साधना, मनन, चिंतन - ही मूल्यव्यवस्था हरवलेली दिसते.

‘माझा नंबर लावा’, ‘थोडी घाई आहे’, कविता झाली की, ‘मला निघायचं आहे’ अशी वाक्ये आज अनेक कार्यक्रमांच्या नवीन ‘पायघड्या’ बनली आहेत.

कविता वाचली की जणू त्यांनी आपलं कर्तव्य पूर्ण केलं, आणि बाकी संमेलन त्यांच्यासाठी अप्रासंगिक ठरतं. इतरांच्या कवितेबद्दल आदर राखण्याची परंपरा-जी एकेकाळी साहित्यिक संस्कारांचा पाया मानली जायची-ती आज क्षीण होत चालली आहे.

काही वेळा कवींच्या पिशव्या आधी मंचावर पोहोचतात, कवी नंतर. कविता वाचून ते ज्या वेगाने मंचावरून उतरतात, तो वेग एखाद्या वाहतूक सिग्नलसारखा- क्षणभर थांबा, आणि पुन्हा पुढे!

परिणाम असा की संमेलनाच्या शेवटी मंचावर उरतात- निवेदकाचा निरंतर संयम आणि अध्यक्षांची शांत छाया. बाकी कवींच्या पावलांनी उडवलेली धूळच जास्त दिसते. या सर्व व्यवहाराचा सर्वात मोठा बळी म्हणजे-कवितेचा सन्मान.

कविता मंचावरचा प्रकाशबिंदू राहिलेली नाही; ती एक सजावटीचा घटक - एक कार्यक्रमाला प्रतिष्ठा देणारा छोटा तपशील - इतकीच उरली आहे. कवितेचा अर्थ, तिचं चिंतन, तिची ऊर्जा ही मूल्ये हळूहळू बाजूला सारली जात आहेत.

कविसंमेलन पुन्हा प्रभावी आणि काव्यकेंद्रित व्हायचं असेल, तर दोन्ही बाजूंनी-आयोजकांनी आणि कवींनी-एक मूलभूत आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. आयोजकांनी विचार करायला हवा- कार्यक्रमाला गर्दी हवी आहे? की कार्यक्रमाला संस्कार, विचार, आणि कलात्मक खोली हवी आहे? गर्दी दिसेल; पण कविता ऐकली तरच कार्यक्रम स्मरणात राहील.

कवींनी स्वतःला विचारावं-

मी मंचावर येतो कारण मला कविता घडवायची आहे? की फक्त माझी उपस्थिती दाखवायची आहे? हा फरक स्पष्ट झाला की, कवींच्या पावलांना पुन्हा ओळींची शिस्त, आणि त्यांच्या वाणीला पुन्हा कवितेची आस्था मिळेल. संमेलनांना जीवन परत मिळेल तेव्हा- जेव्हा कवींच्या नावावर नव्हे, कवितेच्या स्वभावावर प्रकाशझोत पडेल.

जेव्हा मंचावर गर्दी नव्हे, विचारांचे शहारे उतरतील. आणि जेव्हा कविता पुन्हा त्या सभागृहात आपल्या पूर्ण श्वासाने उमलेल. यावर सुचलेल्या चार ओळी :

कवी, कविता व कविसंमेलन

हल्ली साहित्याच्या भाऊगर्दीत कवींचे होते स्मरण कवींचीच गर्दी जमवतात सांगून संमेलनाचं कारण मग निवेदकाच्या समोर काही मोजके कवीं जमतात लांबून आलोय इथे म्हणत आपला नंबर लावतात. काहीतरी निमित्त असतं नेहमीच ह्यांना काढायचं फक्त संमेलनात दिसायचं, इन्स्टावर पोस्ट टाकायचं जरा लवकर जायचंय मला, थोडी घाई आहे इथे कवितेच्या पाट्या टाकून बस धरायची आहे पहिल्यांदा कविता वाचतात हे संमेलनात थाटात, मग पळतात मंचावरून, बॅग धरून हातात

इतरांना ऐकायची त्यांची जशी वेळ येते,

आम्ही फार व्यग्र आहोत, कुजबुज कानी येते

असं म्हणत मंचावरून कवी काढता पाय घेतात

शेवटी फक्त निवेदक आणि अध्यक्षच उरतात

कधी कधी ठीक आहे पण हे नेहमीचंच झालं

स्वतःची कविता वाचली, म्हणे गंगेत घोडं न्हालं

कविसंमेलन हा परंपरेचा झेंडा नाही; ती साहित्यस्वरूपाची जिवंत शपथ आहे. ती शपथ पुन्हा जागवण्याची वेळ आता आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

Goa Kala Academy : कला अकादमीला आता तरी जाग येणार का?

SCROLL FOR NEXT