Opinion: 'लायब्ररिअन म्हणाला, आमच्याकडे कोकणी भाषेची फक्त 900 पुस्तकं आहेत'! विचारांच्या बाजारपेठेत

Indian phd student in USA: अमेरिका हा देशच मुळात भांडवलशाहीवर आधारलेला देश आहे आणि ही विचारसरणी त्यांच्या संस्थांमध्येही भिनवलेली आहे.
American private universities capitalism
American private universities capitalismDainik Gomantak
Published on
Updated on

कौस्तुभ नाईक

भर कोविडच्या काळात २०२१साली अमेरिकेतल्या ‘यूपेन’ ह्या एका खासगी विद्यापीठात माझी पीएचडी सुरू केली. दिल्लीतील विद्यापीठांच्या तुलनेने इथल्या शिक्षणसंस्थांच्या कामकाजातला बदल केवळ भौगोलिक नव्हता, तर तो दोन भिन्न शैक्षणिक विचारांमधील प्रवास होता. अमेरिका हा देशच मुळात भांडवलशाहीवर आधारलेला देश आहे आणि ही विचारसरणी त्यांच्या संस्थांमध्येही भिनवलेली आहे. त्यामुळे आपल्यासारख्या समाजवादाचा इतिहास असलेल्या देशातून येताना हे बदल लगेच जाणवतात.

एकार्थाने पाहायला गेलो तर ही एक अगदी सुरळीत, स्वयंचलित व्यवस्था आहे. त्याचे फायदेही खूप आहेत. तरीही मी इथे रुळलो हे म्हणता येणार नाही. इथेही काहीतरी कमी आहेच.

जेएनयूत असताना संसाधनांची कमी होती, प्रशासन ठीक नव्हते, हवी ती पुस्तकं वेळेवर मिळत नव्हती आणि तरीही तिथल्या हवेत ज्ञानसंपादन, जिज्ञासा ह्या गोष्टींना काहीतरी महत्त्व होतं. इथे ते नाही. २०२१मध्ये, कोविडच्या शांततेत मी फिलडेल्फियाला पोहोचलो.

पहिली सहामाही वेस्ट फिलिमध्ये एका खोलीत बसून ‘ऑनलाइन’ पार पाडली. पण जेव्हा कॅम्पस खुला झाला, तेव्हा मला जाणवले की मी एका अशा ‘गोंगाटा’ला मुकलो आहे जो मी दिल्लीत मागे सोडला होता.

जेएनयूसारख्या ठिकाणी, वर्गातील तास संपला की खऱ्या शिक्षणाची सुरुवात ढाब्यावरच्या चर्चांमधून व्हायची. तिथे वेळेचे बंधन नसायचे; तिथे विचारांचा आणि संवादाचा एक मुक्त ‘अड्डा’ असायचा. आपण लोकांनी दिलेल्या पैशांनी शिकतोय तर आपण समाजाचे देणे लागतो हा भाव कायम मनात असायचा.

पण इथे मात्र चित्र वेगळे आहे. येथे घड्याळाचा काटा फिरला की तास संपतो, वह्या बंद होतात आणि विद्यार्थी त्यांच्या पुढच्या अपॉइंटमेंटसाठी धावतात.

जेएनयूतल्या विद्यार्थी संस्कृतीला सारवलेल्या आमच्यासारख्यांना तिथल्या उत्स्फूर्त चर्चांची आणि विस्कळीत पण जिवंत विचारांची उणीव प्रकर्षाने जाणवते. अमेरिकन विद्यापीठांतील सामाजिक संवाद अनेकदा ‘व्यावसायिक’ आणि फसवा वाटतो.

इथे मैत्रीपेक्षा नेटवर्किंगला जास्त महत्त्व असते. हे अमेरिकन खासगी विद्यापीठांच्या भांडवलशाही स्वरूपाचे लक्षण आहे. ते स्वतःला ‘विचारांची बाजारपेठ’ म्हणतात. या बाजारात तुमच्या कल्पना, विचार या ‘वस्तू’ आहेत. जिथे शिक्षण हा हक्क मानला जात होता, तिथून मी अशा ठिकाणी आलो होतो जिथे शिक्षण हे एक ‘उत्पादन’ आहे.

परंतु या ‘खासगी’ मॉडेलवरील टीका केवळ भांडवलशाहीपुरती मर्यादित नाही. या चकचकीत इमारती आणि कॅम्पस ज्या जमिनीवर उभे आहेत, तिचा इतिहासही अस्वस्थ करणारा आहे. उदा. आमचे विद्यापीठ ‘लेनापे’ लोकांच्या मूळ जमिनीवर उभे आहे, जी १७३७च्या ‘वॉकिंग परचेस’सारख्या फसव्या करारांद्वारे बळकावली गेली होती.

इतकेच नाही तर, ज्या संपत्तीतून या संस्था उभ्या राहिल्या, त्यामागे अनेकदा गुलामांच्या घामाचा आणि रक्ताचा इतिहास आहे. विद्यापीठाच्या स्वतःच्या ‘पेन अँड स्लेव्हरी प्रोजेक्ट’ने हे उघड केले आहे.

ज्या तथाकथित आयव्ही लीग प्रतिष्ठेचा मी भाग आहे, ती केवळ शैक्षणिक गुणवत्तेतून आलेली नसून ऐतिहासिक शोषण आणि संचयनातून आलेली आहे. इथे मी कशाच्या प्रेमात पडलो असेन तर आमच्या लायब्ररीच्या.

American private universities capitalism
Goa Opinion: पदोन्नतीचा पूर आणि कार्यक्षमतेचा दुष्काळ?

संशोधन करणाऱ्यांसाठी ही लायब्ररी एक अफाट संसाधन आहे. तुम्हांला हवे ते पुस्तक इथे तुम्ही मागण्याआधी उपलब्ध असते. आणि ते नसेल तर इतर विद्यापीठातून ते मागवण्यापर्यंतचे लाड इथली वाचनालये पुरवतात. संसाधनांची इथे उणीव नाही.

युरोपियन पोर्तुगीज शिकण्यासाठी विद्यापीठात नीट सोय नव्हती म्हणून त्यांनी मला संपूर्ण खर्च देऊन सात महिने लिस्बनला पाठवले. या संदर्भात एक प्रसंग आठवतो.

American private universities capitalism
Goa Opinion: शिरगाव चेंगराचेंगरी, हडफडे, चिंबल आंदोलन; प्रत्येक प्रकरणात सरकार बॅकफूटवर जातेय

जेव्हा मी पीएचडीला प्रवेश घेतला, तेव्हा तिथल्या एका लायब्ररिअनने मला विचारले की मी कोणत्या भाषांवर काम करणार आहे. जेव्हा त्यांना समजले की कोकणी ही माझ्या संशोधनाची एक भाषा असेल, तेव्हा त्यांनी अत्यंत संकोचाने कबूल केले की, आमच्याकडे कोकणी भाषेचा अगदीच माफक संग्रह आहे, फक्त ९०० पुस्तके.

हे ऐकून मी थक्कच झालो. मी त्यांना म्हणालो, इतकी कोकणी पुस्तके तर खुद्द गोव्यातील लायब्ररीमध्येही मिळणे दुर्मीळ आहे! ही तफावत मनाला चटका लावणारी होती. जिथे ९०० पुस्तके ‘कमी’ वाटतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com