Katyo Festival Udhalashe Goa Tulsi Vivah Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Katyo Festival Udhalashe: कातयो बाये कातयो आकाशी उद्याल्यो! उधळशाचा लोकोत्सव

Katyo Festival Udhalashe Goa Tulsi Vivah: दक्षिण गोव्यातल्या धारबांदोडा तालुक्यातल्या साकोर्डा या गावाच्या कक्षेत उधळशे गावाचा समावेश होतो.

राजेंद्र केरकर

दक्षिण गोव्यातल्या धारबांदोडा तालुक्यातल्या साकोर्डा या गावाच्या कक्षेत उधळशे गावाचा समावेश होतो. कार्तिकात इथल्या कष्टकरी स्त्रिया चार रात्री ‘कातयो’चा तर पौषात नऊ रात्री नृत्य, नाट्य, गायन यांचा आविष्कार घडवणारा धालोचा उत्सव साजरा करतात तेव्हा इथल्या चांदण्या रात्री मंतरलेल्या होतात!

म्हादईची उपनदी असणारी रगाडो उधळशेहून बारमाही वाहत असल्याने कृषी बागायतीच्या उत्पन्नावर इथले कष्टकरी आनंदाने गुजराण करायचे. जेव्हा लोहखनिज उत्खनन आणि वाहतुकीच्या व्यवसायाने अराजकतेची परिसीमा गाठली, तेव्हा इथल्या शेती बागायतीवर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले. खनिज व्यवसायावर सध्या निर्बंध आल्याने, लोकमानसाची शेतीबागायतीबरोबर लोकोत्सवाविषयी असलेली वीण पुन्हा घट्ट होत आहे.

निसर्गसंपन्न अशा उधळशेत कार्तिक शुद्ध एकादशीचे पर्व तिथल्या विठ्ठल मंदिरात साजरे झाल्यानंतर द्वादशीला तुळशी विवाहाचे उत्साहाने आयोजन होते आणि त्यानंतर इथल्या कुमारिका, विवाहित स्त्रिया ‘कातया’च्या उत्सवासाठी सिद्ध होतात .

कातयो बाये कातयो आकाशी उद्याल्यो,

चंद्रमा उद्याल्यो कातयो,

कातयो उद्याल्यो आकाशी गे

रामारोळ्यो भायेर सरिल्यो शिंगारिळयो कातयो

पुनवेचा उद्यार चांदण्या गिराण लागले अत्माचे मा, गिराण लागले अत्मा चे

आकाशातला चंद्र आपल्या चांदण्याचा वर्षाव करताना नववधू स्त्रिया तुळशी वृंदावनाभोवताली स्त्रिया उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन कातयोच्या उत्सवात सहभागी होतात. कार्तिकातल्या पौर्णिमेच्या तीन रात्री नानाविध गाणी आणि पारंपरिक खेळ, नृत्यांचा आविष्कार घडवून जेव्हा या स्त्रिया समारोपाच्या रात्रीला सिद्ध होतात, तेव्हा गणपत कालेकर यांच्या घरासमोरच्या मांडावरती जणू काही चैतन्याची सनद अवतीर्ण झालेली असते.

आदिम काळापासून मानवी समाजाला आकाशात दृष्टीस पडणाऱ्या या कृत्तिका नक्षत्रांच्या पुंजक्याने वारंवार आकर्षित केले होते. त्यातल्या त्यात सूर्यास्तानंतर पौर्णिमेचा चंद्रोदय होत असतानाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांचे होणारे दर्शन दिव्यत्वाचा आभास घडवणारे असते व गोव्यातल्या आदिवासी, कष्टकरी स्त्रियांना ते विशेष भावले.

त्यामुळेच तुळशीवृंदावनाच्या सान्निध्यात मांडावरती तांदळाच्या पिठाला बोटांच्या चिमटीत पकडून चंद्र आणि कृत्तिका नक्षत्रांना स्त्रिया रांगोळीद्वारे समूर्त करतात.

सूर्यास्त आणि चंद्रोदयाच्या मध्यकाळात आकाशातले हे अनोखे दृश्य शेताभाटांत कष्टाची कामे करणाऱ्या स्त्रियांना दिलासादायक ठरले. त्यासाठी त्यांच्या उगवण्याचा संदर्भ लोकगीतांतून सलामीलाच देतात.

देवळा फाटकडेर फुलयली वेणी गे

पायका जलम्या देवाक सायसोन्याची शेणी गे

देवळा फाटकडेर फुलयली वेणी गे

समिस्ती देवाक सायसोन्याची शेणी गे

जल्मी, पायक, केळबाय आदी देवतांचा उल्लेख कातयोच्या लोकगीतांत येतो. उधळशेशी संलग्न आगलोत गावाबरोबर साकोर्ड्याचा मुख्य गाव असून त्याच्या शेजारी पानशी आहे आणि त्यामुळे ही गीते सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाबरोबर इथल्या भौगोलिक परिस्थितीला समूर्त करतात. एकेकाळी उधळशे गाव कृषिप्रधान होता आणि इथले आदिवासी तसेच अन्य कष्टकरी भात, नाचणी, कुळीथ, वरी आदींची पैदास करायचे. पावसाळ्यातील सर्द शेतीनंतर वायंगणी भाताचे भरघोस पीक घ्यायचे .

कोणयो बाये कोणयो

समुलग्या भाताच्यो कोणयो

उदळशाकारणी राणयो म्हणोन

आगळोतकारांक धाडा पाणया गे

आगळोतकारांक धाडा पाणया

उधळशेच्या शेतजमिनीत त्याकाळी स्थानिक कसदार आणि चविष्ट दाण्यांनी युक्त भाताचे पीक भरघोसपणे यायचे आणि त्याचा वापर दैनंदिन जेवणाबरोबर भाकऱ्या करण्यासाठीही आवडीने केला जायचा. शेती, बागायतीच्या कष्टाच्या कामात दिवस व्यतित करायचा तो निसर्गाच्या सान्निध्यात आणि हे सारे करताना सृष्टीच्या चराचरात नांदणाऱ्या शक्तीच्या दिव्यत्वाची प्रचिती त्यांना यायची ती कार्तिक पौर्णिमेच्या संधिकाली दृष्टीस पडणाऱ्या कृत्तिका नक्षत्रांच्या पुंजक्याने . अग्नी ही कृत्तिका नक्षत्रांची देवता असल्याने, आपल्या नाचण्याच्या शेताला आग लागून, ते भस्मसात होऊ नये म्हणून कातयांना गार्‍हाणे घातले जाते . कातयांना मातेच्या रूपात पाहिले जाते.

देवळा फाटकडेर कळसाचे मूडे गे

कातया मायाक सायसोन्याचे चुडे गे

देवळा फाटकडेर कळसाचे मूडे गे

गारबाय केळबाय मायेक सायसोन्याचे चुडे गे

गोव्यात तुळशीवृंदावन आणि झुडूप असणाऱ्या कलाकुसरीने युक्त दिंडा यांचे लग्न संपन्न झाल्यानंतर अविवाहितांना लग्नाची मुभा असते. कातयांच्या लोकगीत गायनाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना अविवाहित आदिवासी तरुण वस्त्रांनी चेहरे लपवून तुळशीसमोर ठेवलेले अन्नपदार्थ घेऊन पसार होतात आणि त्यानंतर उत्सवाचा समारोप होतो. चार रात्री अक्षरशः मंतरल्यागत अल्लड कुमारिका, यौवनगंधा सुवासिनी यांच्याबरोबर अन्य स्त्रियाही नृत्य, नाट्य आणि गायनाचा आविष्कार घडवणाऱ्या ‘कातयो’च्या उत्सवात सहभागी होतात.

सावोरीची सावर बोणा

हास्ता तोणा दिण्याची गे

हास्ता तोणा दिण्याची

धाव वल्ले मारले खाकेक

दिणे चेडे गेले साशेक

दिणे चेडे गेले साशेक

तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या युवक आणि युवतीच्या मनोमीलनाचे प्रसंग अशा लोकोत्सवातून यायचे. आज आपले जुने संदर्भ झपाट्याने बदलत चालले आहेत आणि त्यामुळे ‘कातयो’सारख्या उत्सवाचा मूळ गाभा विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आधी कौतुकाची थाप, मग दिला धक्का! डॅरिल मिचेलच्या शतकानंतर कोहलीने नेमकं काय केलं? पाहा व्हायरल व्हिडिओ

छ. संभाजी महाराजांनी सांत इस्तेव्हांव किल्ल्यावर हल्ला केला, पोर्तुगिजांना समजायच्या आत जुवे किल्ला घेतला; गोव्यावर औरंगजेबाची वक्रदृष्टी

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Robbery Attempt: होंडा येथील नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

SCROLL FOR NEXT