Goa Culture: धालोत्सवाने भारलेला पौष महिना

Goa: धालोत्सव हा गोमंतकीय स्त्रियांचा महत्त्वाचा नृत्य, नाट्य, गायन, वादन आदी कलागुणांच्या आविष्कारांना व्यासपीठ देणारा उत्सव आहे.
Dhalo utsav, Goa
Dhalo utsav, Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa: गोवा कोकणात पूर्वापार जी कालगणना प्रचलित आहे, तिच्यानुसार आजपासून पौष मासारंभ होत आहे. गोवा, कोकणातल्या लोकधर्मातल्या प्रचलित रीतीरिवाजात पौषाला महत्त्वाचे स्थान आहे. या कालखंडात लग्नांची साधी बोलणी करायला कोणी धजत नाही की, लग्नसोहळ्याचे आयोजन करण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही.

पौषाच्या पौर्णिमेला मागेपुढे पुष्प नक्षत्र येत असल्यानेच या महिन्याला ‘पौष’ नाव मिळाले असे मानले जाते. हेमंत ऋतूतला हा दुसरा महिना असून, यावेळी गुलाबी थंडीचे आगमन झालेले असायचे आणि त्यामुळे धालो- कालोत्सवाच्या उत्साहाला उधाण आलेले असायचे.

मकरसंक्रांती व्यतिरिक्त या महिन्यात विशेष महत्त्वाचे सणसुदिन नसल्याकारणाने पौषाला ‘भाकडमास’ असे म्हणण्याची लोकरूढी आहे. परंतु असे असले तरी पौषातल्या पौर्णिमेला धार्मिक महत्त्व असून माघस्नानाचा प्रारंभ पौर्णिमेला केला जातो. त्याचप्रमाणे पौषातल्या अमावास्येला अर्धोदय पर्व आले असता भाविक स्नानदानादी धर्मकृत्ये करत असतात.

गोवा - कोकणात पौष महिन्यात लग्नासारख्या मंगलकार्याची बोलणी केली जात नाही. हेमंत ऋतूतल्या या काळात गर्भधारणा फलदायी होत नाही आणि लग्नासारख्या मंगलदायी कृत्यातून अपेक्षित गृहसौख्य लाभत नाही अशी कित्येक पिढ्यांपासून लोकधारणा असल्याने पौष महिन्याला सून, मालूण मास अशा संज्ञा प्रदान केलेल्या आहेत.

पौष महिन्यात हिवाळ्यातली वायंगणी शेतीतली कष्टाची कामे संपलेली असतात. पूर्वी नांगरणी, पेरणी आदी कृषिकर्माशी जरी पुरुषांच्या प्रामुख्याने सहभाग असला तरी स्त्रियांचा संबंध शेतीशी असायचा. पावसाळ्यात एखाद्या जलाशयात साठलेले पाणी पूर्वीच्या काळी पाटांद्वारे शेतजमिनीत आणले जायचे.

हे पाणी व्यवस्थितपणे शेतीला वळवणे, भाताच्या पिकाची लागवड सुरळीतपणे होईल याची जबाबदारी कष्टकरी स्त्रिया आत्मीयतेने पार पाडायच्या. पौषात ही कष्टाची कामे कमी व्हायची आणि त्यांना जो मोकळा वेळ मिळायचा, त्याचा उपयोग लोकनृत्यांत एकरूप होण्यासाठी त्यांना करण्याची प्रेरणा व्हायची.

शेती व्यवसायाचा संबंध भूमीशी येत असल्याकारणाने अन्नधान्यांच्या निर्मितीस कारण ठरणाऱ्या जमिनीला भूमाता मानून तिच्याविषयीची कृतज्ञता, आदरभाव व्यक्त करण्यास ‘धालोत्सव’ हे एक प्रभावी माध्यम ठरायचे. पौष महिन्यात लग्नाची बोलणी किंवा लग्न सोहळे आयोजित करण्यात प्रचलित लोकसंकेतांनी मुभा दिली नाही.

त्याला या कालखंडात स्त्रियांना उत्स्फूर्तपणे धालोत्सवाच्या पारंपरिक मांडावरती आयोजित केल्या जाणाऱ्या लोकविधी, लोकनृत्यांत सहभागी होता यावे हे उद्दिष्ट असले पाहिजे.

धालोत्सव हा गोमंतकीय स्त्रियांचा महत्त्वाचा नृत्य, नाट्य, गायन, वादन आदी कलागुणांच्या आविष्कारांना व्यासपीठ देणारा उत्सव आहे. एकेकाळी आपल्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांचे सादरीकरण करण्यास त्यांना वाव मिळत नसे.

यासाठी गोव्यातल्या आपल्या कला संस्कृतीविषयीची आत्मीयता असणाऱ्या पूर्वजांनी धालोत्सवाच्या रूपाने स्त्रियांना एक सशक्त व्यासपीठ देण्यासाठी पौष महिन्यात कष्टाच्या बऱ्याच कामांना विराम देऊन त्यांचे स्नेहबंध धालोत्सवाशी निर्माण केले.

संपूर्ण पौष महिन्याच्या कालावधीत गोव्यातल्या स्त्रीचा आपल्या सोयीनुसार धालोत्सव खेळण्याचे निश्चित करतात आणि गावातल्या समस्त देवदेवतांविषयीचा आदरभाव व्यक्त करतात. धरित्री ही आपली अन्नदात्री आणि तिच्यात जोपर्यंत पेरलेल्या बियांना कोंब आणण्याची क्षमता असते, तोपर्यंतच भुकेलेल्यांना अन्नाचा घास मिळू शकतो. त्यासाठी धालोत्सवाच्या माध्यमातून स्त्रिया मातीविषयीची कृतज्ञता व्यक्त करतात.

कार्तिक म्हयना कार्तिक म्हयना

मालनी पुनये आनंद जाला गे

जाला जाल्या बरा जाला

तुळशी साडी आमी नेसवू गे

तुळशी ओटी आमी भरू गे..

पौष महिन्यात गावोगावी असलेले पारंपरिक मांड स्त्रियांच्या लोकनृत्य, गायनाच्या परंपरेची प्रचिती देणाऱ्या धालोत्सवाने फुलून येतात. रात्री सुरू झालेले गायन, नृत्य मध्यरात्रीही चालू राहून निसर्ग पर्यावरणाविषयीची आदरभाव व्यक्त करते. पौष महिन्यात धालोत्सव होत असला, तरी पौर्णिमेच्या आसपास या उत्सवातला उत्साह शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतो.

पौष महिन्यातली धालोत्सवाची समृद्ध परंपरा आम्हाला तुळशीच्या रूपात धरित्री वनदेवतेविषयीचा आदरभाव व्यक्त करते. त्याविषयीची जाणीव करून देत असते. गोव्यात आणि कोकणातल्या काही गावांत पौष महिना धालोत्सवाशी निगडित आहे.

कुमारिका, सुवासिनी आणि विधवा स्त्रिया त्यात एकोप्याने सहभागी होऊन पारंपरिक लोकगीतांचे गायन करतात. गोव्यातल्या बऱ्याच गावांत धालोत्सव केवळ पाच दिवसांसाठी साजरा केला जातो.

Dhalo utsav, Goa
Goa Noice Pollution: राज्य सरकारचे कानही फुटले आहेत का?

परंतु, काही ठिकाणी पूर्वी 7 ते 9 दिवस हा उत्सव व्हायचा. धारबांदोडा तालुक्यातल्या रगाडो नदीच्या काठावरती जो उधळशे वाडा आहे, तेथे कार्तिकात आदिवासी गावडा जमातीच्या मांडावरती कातयाचा उत्सव साजरा होतो.

इथल्या कष्टकरी स्त्रिया आकाशातल्या चंद्र, सूर्य आणि कृत्तिकादी नक्षत्रांना आपल्या रांगोळीतून समूर्त करतात आणि त्याच्याविषयीची सुंदर अशा लोकगीतांचे नर्तनाद्वारे सादरीकरण पेश करतात. याच उधळशेत पौष महिन्यात चक्क नऊ दिवस धालोत्सव खेळला जातो आणि त्यात आदिवासीच नव्हे तर इतर कष्टकरी शेताभाटात राबणाऱ्या स्त्रिया उत्स्फूर्तपणे धालोची गीते अत्यंत भावतल्लीनतेने गातात.

पौषातल्या नऊ रात्रीला स्त्रिया पारंपरिक मांडावरती एकत्रित येतात आणि आपल्या परिसरातल्या निसर्ग आणि पर्यावरणाविषयीचा वारसा सजीव करतात.

लोह खनिज व्यवसायापायी इथल्या वृक्षवेली, पशुपक्षी आदी जैविक संपदेवरती गंभीर दुष्परिणाम झाले. परंतु असे असताना आपल्या अंतरीची भावस्पंदने त्यांनी धालो गीतांतून गायिलेली आहेत. डिचोलीतल्या सर्वण, साळसारख्या गावांत धालोत्सवाच्या मांडावरती रंभांचे भारावलेल्या अवस्थेत आगमन होते.

रंभा या खरे तर देवलोकीच्या, परंतु गोमंतकीय धालोत्सवाच्या मांडावरती त्यांचा संचार ठराविक स्त्रियांच्या अंगी होतो आणि त्याच्या समोर भाविक स्त्रिया नतमस्तक होतात, त्या आपल्या सांसारिक संकटांतून मुक्ती लाभावी या हेतूने. धालोत्सवातून स्त्रिया जी लोकगीते गातात, त्यातून शेती, बागायती व्यवसायाची परंपरा जोपासलेली आहे.

त्याविषयीचे भावविश्व समूर्त केले जाते. पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीत येथील लोकांच्या पारंपरिक सण, उत्सवांच्या सादरीकरणावरती केवळ प्रतिबंध घालून ख्रिस्ती पंथोपदेशक थांबले नाहीत, तर त्यासंदर्भातली त्यांची श्रद्धास्थाने त्यांनी समूळ नष्ट केली. परंतु असे असले तरी त्यांनी नव्या काबिजादीतल्या महालात आश्रय घेऊन तेथे चालू असलेले रीतिरिवाज अखंड ठेवले.

त्यामुळे, धालोत्सवातल्या काही लोकगीतांतून जी प्रतिकूल परिस्थिती उद्भवली त्याची स्पंदने, स्मृती अव्याहतपणे जतन केलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे घालोत्सवातल्या गीतांतून भाषिक मूल्यांचे दर्शन ज्याप्रमाणे घडते, त्याचप्रमाणे सामाजिक, सांस्कृतिक संचितांचा आविष्कार झालेला पाहायला मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com