कलेची साधना ही तपश्चर्या असते. जेव्हा तपश्चर्येचे मंदिर पोखरले जाते तेव्हा इमारतच नव्हे तर मूल्ये ढासळतात. कला अकादमीचे प्रशासन दीर्घकाळ दृष्टीआड राहिल्याचे दुष्परिणाम उघडपणे समोर येत आहेत. खुल्या रंगमंचाने जणू प्राण सोडले आहेत, इमारत अश्रू ढाळत आहे. पूर्वी भौतिक रचना कोसळली; आज नैतिक अधिष्ठान कोसळत आहे. कला अकादमीच्या ‘अ’ गट नाट्यस्पर्धेसाठी राज्यभरातील नाट्यसंघ महिनोन्महिने झटतात.
तहान-भूक हरपून, वैयक्तिक वेळ आणि हजारो रुपयांची गुंतवणूक करून केवळ एकच स्वप्न उराशी बाळगतात - कला अकादमीच्या भव्य रंगमंचावर आपली कलाकृती सादर करण्याचे! मात्र, त्या आशा-आकांक्षांवर जर अकादमीतीलच कर्मचारी पाय देत असतील, तर त्याहून मोठी शोकांतिका ती कोणती? परीक्षकांना पैसे आणि मद्यपार्टीचे आमिष दाखवले जाते, ते मान्य न केल्यास त्यांच्याशी हुज्जत घातली जाते. हा प्रकार केवळ धक्कादायक नाही, तमाम कलारसिकांचे काळीज चिरणारा आहे.
इतकेच नव्हे तर लाच देऊन निकाल लावले जातात, अशा स्वरूपाची उघड शेरेबाजीच जर ‘त्या’ द्वयींकडून होत असेल तर व्यवस्था किती खोलवर सडलेली आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हा प्रकार स्वच्छ चारित्र्याचा दावा करणाऱ्या राज्य सरकारसाठी थेट आव्हान आहे. कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे जाळे घट्ट होत आहे.
अशा काळात ते मूकपणे सहन करणे गुन्हेगारीच ठरेल. महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेच्या नकाशावरून गोवा केंद्रच गायब होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नाट्यचळवळीतील धुरीणांनी, कलावंतांनी आणि सांस्कृतिक संस्थांनी एकत्र येऊन ठाम भूमिका घ्यायला हवी.
अकादमीचे कार्यक्रम विकास अधिकारी प्रदीप गावकर यांना थेट परीक्षकांच्या निकट जाण्याचे धाडस होतेच कसे? ‘वरिष्ठ आपल्या मुठीत आहेत’ असा आविर्भाव जेव्हा तयार होतो, तेव्हाच अशा घटना घडतात. ते व्यक्तींचे अपयश नसून संपूर्ण व्यवस्थेचे नैतिक दिवाळे आहे. कला अकादमीचे भविष्य काय? नाट्यकलाकारांना अन्य कोणते मोठे व्यासपीठ नाही.
अकादमीत सध्या कुठले मार्गदर्शन मिळत नाही. जी रिपर्टरी कंपनी बंद होती, ती अस्तित्वात नसतानाही ‘सुरू आहे’, असे दाखवून ‘भारत रंग महोत्सवा’त नाटक पाठवण्याचा खोटारडेपणा अकादमीकडून झाला आहे. त्याचे नेतृत्वही सुशांत नायक यांनी केले आहे. हा एखाददुसरा अपराध नाही; ही अपराधांची मालिकाच आहे. म्हणूनच, परीक्षकांवर दबाव आणल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस देऊन भागणार नाही.
हा गैरव्यवहाराचा एक नमुना झाला. परीक्षकांना चहापानाला बोलावून बक्षीस मिळवल्याचा आरोप यापूर्वीही झाला आहे. इथे परीक्षक न बधल्याने प्रकरणाला वाचा फुटली. कला अकादमीच्या व्यवस्थेलाच कीड लागली आहे. ती मुळासकट दूर करावी लागेल. दुर्दैव म्हणजे, कला अकादमीचे अध्यक्षपद मिळणे म्हणजे सरकारने उपकार केले, अशी धारणा बाळसे धरते. मान मिळतोय ना, चार ओळखीच्यांना कार्यक्रम देता येतात ना, यावर समाधान मानले जाते व त्यांना साह्य करण्याचा आव आणणारे, वर्षानुवर्षे अकादमीत पाय घट्ट रोवलेले ‘झारीतले शुक्राचार्य’ बळकट बनतात.
‘परीक्षकांना मॅनेज करण्याचे प्रकार या पूर्वीही चालत आले आहेत’, असे नायक, गावकर जोडगोळी म्हणत असल्यास लोकांनी कला अकादमीवर कसा विश्वास ठेवावा? मंत्री तवडकर, अकादमी अध्यक्ष बाबू कवळेकर यांनी पदाची आब राखावी. तीन परीक्षकांनी जबाब दिले आहेत. त्या आधारे कारवाई करा.
कला अकादमीत नाटक करणाऱ्या कलाकारांनीही पुढे येण्याची गरज आहे. समांतर, प्रयोगशील रंगभूमीसाठी आपण काय करतो, हा प्रश्न रंगकर्मींनी स्वत: विचारावा. तेव्हाच त्यांचा स्वाभिमान जागा होईल. इथे कला अकादमीचे उपाध्यक्ष प्रवीण गावकर यांचे अभिनंदन करायला हवे. त्यांनी आपले कर्तव्य जपले, विधायकेतला प्राधान्य देत, अनिष्ट प्रकार बंद होण्यासाठी ‘भूमिका’ घेतली. कला अकादमी नाट्यगृह व्यवस्थापक, नाट्य निर्माता सुशांत नायक व प्रदीप गावकर यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हायला हवी.
‘कारणे दाखवा’ हा प्रक्रियेचा भाग झाला; तेवढ्यापुरताच तो राहिला तर ते तोंडास पाने पुसणे होईल. हा केवळ ‘निकाल फिरवण्यासाठी लाच देणे’ एवढा साधा गुन्हा नाही. कला अकादमीची विश्वासार्हता घालवण्याचा भयंकर गुन्हा आहे. हजारो रंगकर्मी या कलायज्ञात आपल्या आयुष्याची, सुखसंसाराची आहुती देत असतात.
सचोटीने काम करून, केवळ स्वत:मधल्या कलागुणांवर पहिले बक्षीस मिळालेल्या कलाकारांना कुणी ‘तुम्ही पैसे चारून, दारू पाजून पारितोषिक मिळवले आहे’, असे म्हटल्यास काय यातना होतील, याचा जरा तरी अंदाज या द्वयींना आहे का? कला अकादमीसोबत त्यांनी कलेचाच गळा घोटला आहे. ‘ताजमहाल’ बांधायचा झाल्यास मुमताजचे मरण झाले पाहिजे, या नाट्यमय अपरिहार्यतेतून कलेचाच खून झाला आहे. थडगे कितीही सुंदर असले, तरी ते मेलेल्यासाठीच असते. कलेचे मरण याचि देही याचि डोळा अकादमीच्या इमारतीसही पाहवले नाही, ती ढासळू लागली. हेतूही संपला; वास्तूही संपली. आता सगळे नव्याने उभारावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.