shri ram jamun tree story Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Jamun Tree: सीतामाईच्या शोधात सह्याद्रीमध्ये रामाने मिठी मारलेला कच्छ, राजस्थान सोडून भारतभर आढळणारा 'जांभूळ वृक्ष'

Jamun Tree Information: जांभळाचे मूळ आणि कूळ भारतीय उपखंडात उत्क्रांत झाले तो कच्छ आणि राजस्थान सोडून जांभूळ वृक्ष भारतात सर्वच भागांत दिसतो. म्हणूनच कदाचित एकेकाळी भारत देशाला ‘जम्बूद्वीप’ म्हटले जात असावे काय?

गोमन्तक डिजिटल टीम

मधू य. ना. गावकर

जांभूळ वृक्ष आयुर्वेदात औषध गुणकारी आहे. म्हणून त्याला देवराई स्थानी देवत्व बहाल केले आहे. भारतात तो सर्वत्र पाहावयास मिळतो. त्याच्या अंगात आरोग्यदायक औषधी गुण असल्याने आज त्याची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. त्याचे मूळ आणि कूळ भारतीय उपखंडात उत्क्रांत झाले तो कच्छ आणि राजस्थान सोडून हा जांभूळ वृक्ष भारतात सर्वच भागांत दिसतो. कदाचित एकेकाळी भारत देशाला ‘जम्बूद्वीप’ म्हटले जात असावे काय? हा प्रश्‍न मनात उभा राहतो.

संस्कृत साहित्यात त्याचे वर्णन, उल्लेख सापडतात. संस्कृत भाषेत त्याच्या फळाला जम्बू, राजजम्बू, सुरभी पत्रा, सहफल, फलेंद्र अशी नावे वाचावयास मिळतात. हिंदीत जामुन, बंगाली-कालो जाम, मणिपूर-जाम, तेलगू-नेरेडू, आसामी-जमू, गुजराथी-जाम्बुडी, कन्नड नेराले, तामीळ-नवाल परझाम किंवा नागई, मल्याळम-न्यारा किंवा न्यावल, ओरिसा-जामकोल, इंग्रजी-ब्लॅक इंडियन प्लम अशी नावे आहेत.

त्या वृक्षाचा समावेश मिरटेशी कुळात केला जातो. पूर्वी त्याचे शास्त्रीय नाव सनाम युजेनीया जाम्बोलाना-सिजिनीयम क्युमीनी, भारतातील सदाहरित आणि निमसदाहरित पानझडी जंगलात जांभूळ वृक्ष कमी अधिक प्रमाणात पाहावयास मिळतात. कमी जास्त पर्जन्यमानात त्याची चांगली वाढ होते.

आपल्या गोव्यात जांभूळ फळावरून अनेक भागात नावे दिली आहेत. पश्‍चिम घाट, जंगल भागात अनेक ठिकाणी या वृक्षाच्या बागा पाहावयास मिळतात. बेतकी गावच्या डोंगर भागात जांभळा ठिकाणी लोकवस्तीचा वाडा आहे. मे महिन्याच्या शेवटी आणि जून लागताच तिथल्या डोंगर परिसरात जांभूळ वृक्षांना निळ्या जांभळ्या फळांचे घोस दाटीने पाहावयास मिळतात.

पिकलेली फळे खाण्यास रात्रीच्या वेळी वटवाघळांची झुंबड असते. सकाळच्या वेळी कैक प्रकारचे पक्षी त्या फळांचा आस्वाद घेतात. रात्री रानडुक्कर पडलेल्या फळांवर ताव मारतात.

गिमोणे येथील माझे मित्र उमेश नाईक यांच्याबरोबर तिथल्या लोकांना पाणी मिळावे म्हणून तळ्याचा बांध बांधण्यासाठी त्यांच्याबरोबर मी काम करण्यास गेलो होतो. त्यावेळी त्या झाडांना पिकलेली जांभूळ फळे खाण्यास मिळाली होती.

बेळगावला जाताना चोर्ला घाटात ‘जांभळीकडे’ म्हणतात, सावंतवाडीला जाताना घाट रस्त्यावर ‘पंच जांभळीकडे’ म्हणतात. आपल्या म्हादई अभयारण्यात जांभूळ वृक्ष विपुल प्रमाणात आहे. प्रा. राजेंद्र केरकर सरांबरोबर फिरताना अनेक ठिकाणी जांभूळ वृक्ष पाहिले आहेत. त्या वृक्षांना मार्च, एप्रिल महिन्यात फुलोरा येऊन महिनाभरात हिरवी फळे दिसतात. नंतर त्यांचा रंग लाल दिसू लागतो आणि पुढच्या काही दिवसांत द्राक्षांच्या घोसाप्रमाणे झाडांवर हिरव्या पानात काळे निळे घोस आपले रूप दाखवत तो वसुंधरेवरील जैवविविधतेतील सर्वांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करतो.

काही झाडांवर पिकलेली फळे पाहिली की माणसाच्या तोंडाला पाणी सुटते. चिंच, करमल, आंबाडा, बिंबल, चिप, बोर, हिरवी कैरी, जंगम, आवळा अशा फळांना पाहताच तोंडाला पाणी सुटते. मात्र ही फळे मानवाच्या आरोग्याचे औषध आहे. जांभूळ फळांचे अनेक प्रकार पाहावयास मिळतात. मोठी, लांबट, गोल, बारीक, मांसल, घट्ट.

जांभूळ वृक्ष पर्वतीय भागात दीड-दोन हजार मीटर उंचीवरसुद्धा जगण्यास समर्थ असतो. त्याला दाट गच्च पाने असल्याने जमिनीवर दाट सावली पसरते. हल्लीच्या काळात त्याचे औषधी गुण समजल्याने त्याची लागवड शाळा, हायस्कूल, कॉलेज, खेळाची मैदाने, बागायती, शेताचे बांध, पठारे, अशा जागी करण्यास सुरुवात झाली आहे. झाड लावल्यानंतर अंदाजे दहा वर्षांनी तो वर्तुळ आकारात पसरण्यास सुरुवात करतो.

त्याच्या प्रमुख तीन जाती आहेत. राजजंबू किंवा राईजांभुळ, काष्ठ जांभूळ आणि लेडी जांभूळ, शिवाय राई थाई बारडोली आणि बियाण्या अशा इतर प्रकारच्या जाती जांभूळ वृक्षात आहे. भारताप्रमाणेच त्याला जावा सुमात्रा देशातही मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

आज जांभूळ वृक्ष लागवड आशिया खंडातून आफ्रिका, अमेरिका खंडात पोहोचली आहे. पश्‍चिम घाट परिसरात गरपी, मुटकी, रेडी, खाटी, कुत्री, किरकस खडकी असे अनेक प्रकार त्यांच्या कुळातील पाहावयास मिळतात. पर्णसंभाराच्या अनुकूल परिस्थितीमध्ये वाढत असून तेसुद्धा भविष्यात महावृक्ष होऊ शकतात.

हा वृक्ष पस्तीस-चार मीटरपर्यंत आपल्या अंगावर अनेक फांद्या घेऊन वाढतो. वाढ झालेल्या वृक्षाचा बुंधा अडीच-तीन मीटरपर्यंत वर्तुळात वाढ झालेला असतो. एखाद्या वेळी तो पोकळ होऊन त्यात रान मांजर, खार, पक्षी, साप आपले बस्तान बसवतात. त्याचे लाकूड घट्ट असून लाकडाचा रंग तांबूस करडा असतो.

त्याच्या लाकडाचे घरासाठी वासे पाट्या, रीप, फळी बनवून उपयोग करतात. शेताच्या मानशीला लावण्यात फळी, पाट्या, खांब, बनवतात. सालीचा रस काढून तो मोठ्या भांड्यात उकळून त्यात मासळी पकडण्याची सुती जाळी बुडवून ठेवल्याने सुतात टिकाऊपणा येऊन वेणी, काटाळी, फुटावणी, चांगली टिकते.

जांभूळ झाडाचा रस मेलेल्या गाईगुरांच्या चामड्यास वापरत होते. त्याने चामडी न कुजता टणक बनते. उन्हात वाळवल्याने आणखी घट्ट बनते. नंतर त्या चामड्याचा उपयोग पादत्राणे, ढोल, नगारा, ढोलकी, कमरपट्टा बनवण्यासाठी करतात.

मधुमेह झालेल्या माणसाला औषध म्हणून त्याच्या बियांची पूड खाण्यास देतात. खास करून पिकलेली जांभूळ फळे खातात, फळे कुजत ठेवून काजू रसात मिसळून दारू बनवतात. मधुमेह झालेली माणसे ती दारू औषध म्हणून सेवन करतात. त्याचा हिरवा पाला गुरांना चारा देतात. जांभूळ वृक्ष जरी आकाशी झेप घेण्यास गेला तरी त्याच्या खालच्या फांद्या-जमिनीकडे वाकतात.

हा वृक्ष सदाहरित आहे. त्याला पाणी जास्त लागले तरी कमी पाण्यात तो टिकाव धरतो, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. वसंत ऋतूची चाहूल लागताच त्या झाडाला मोहर येतो. फुलोरा बहुशास्त्रीय असतो.

त्याच्या फुलांच्या दरवळाने फुलपाखरे, मधमाश्या मध लुटण्यास येतात. पिकलेल्या फळांची चव आंबट, गोड, तुरट अशा मिश्रणाने बनते. आपण एक जांभूळ खाल्ले तर आणखी खाण्याचा मोह आवरता येत नाही. मात्र जीभ निळी बनून फळांचा रस जिभेवर बसल्याने जीभ जाड बनते.

बियांच्या गरात बी-एक, बी-दोन, बी-तीन आणि व्हिटामिन सी अशी जीवनसत्त्वे मिळतात. शिवाय खनिज, कॅल्शिअम, फॉस्फरस, सोडिअम, पॉटेशिअम असते. त्याच्या कोवळ्या पानात ई जीवनसत्त्व मिळते. फळांच्या रसात कॅलरी ऊर्जा कार्बोदक, मेद फायबर प्रथिने मिळतात. माणसाचे वजन कमी होण्यास जेवणानंतर जांभूळ फळे खातात. त्याच्या फळात फॉलिस आम्ल असल्यामुळे त्याचा उपयोग मुतखडा, मूळव्याध, कर्करोग प्रतिबंधासाठी करतात. सालीचा काढा जुलाब आणि रक्तआवेर उपचार करण्यास तज्ज्ञ, वैद्य लोक वापरतात. जांभूळ झाड चिवट असते.

हिंदू, जैन, बौद्ध धर्मीय जांभूळ वृक्ष सहसा कापत नाहीत, हे देवराईत गेल्यास कळते. साविक, पिंपळ, वड, रुमड, चिंच, आवळा, कारा, बेल या वृक्षांना जसे देवाचे स्थान आहे. त्याच प्रकारे जांभूळ वृक्षालाही महत्त्व आहे. सीता शोधात सह्याद्री पर्वतात रामाने जांभूळ वृक्षास मिठी मारली. श्रीकृष्णाला त्याची फुले वाहतात. कालिदासाच्या मेघदूतात, रामायणात, तसेच कौटिल्य, बाणभट्ट, कृष्णचंदर यांच्या साहित्यात जांभूळ वृक्षाला मोठे स्थान दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: वेफर्स-कॉफीच्या पाकिटातून कोकेन विक्री, आंतरराष्ट्रीय रॅकेटवर ED ची नजर; 43 कोटींच्या तस्करीप्रकरणी 7 जणांवर गुन्हा

Omkar Elephant: ‘ओंकार’ने रोखला मुंबई-गोवा महामार्ग, वाहतूक दीड तास ठप्प; दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा, नागरिक भयभीत

Horoscope: प्रतिष्ठा आणि कीर्ती वाढेल, कामातील यशामुळे आत्मविश्वास दुणावेल; जुने व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता

मोडलेला हात आणि पाय, लंगडी घालत आला पोलिस स्थानकात; ऑस्ट्रेलियन खेळाडुंची छेड काढणाऱ्या संशयिताला अटक Watch Video

Satish Shah: सलग 55 एपिसोडमध्ये साकारल्या 55 भूमिका, सतीश शाहांचे निधन; हसऱ्या चेहऱ्याचा पडला पडदा

SCROLL FOR NEXT