Kadamba Tree Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Kadamba Tree: पावसाळा सुरू होतो, पांढरीशुभ्र फुले येतात; फुलपाखरे - पक्षी रस पिण्यासाठी तुटून पडतात, बहरला 'कदंब वृक्ष'

Kadamba tree in Goa: एखादा वृक्ष जसा आपल्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा पुरवीत असतो तसा तो आपल्या आजूबाजूला वास्तव करणाऱ्या जीवनसृष्टीला जीवन आधार असतो.

गोमन्तक डिजिटल टीम

अ‍ॅड. सूरज मळीक

भारतीय लोकमानसाने कुठे झाडे, झुडपे, वेली यांपासून औषधी गुणधर्म प्राप्त होत असल्याने त्यांना महत्त्वाचे स्थान दिले. वड, पिंपळ, आपटा, कदंब यासारख्या वृक्षांचे निसर्गातील कार्य त्यांनी ओळखले.

वृक्ष हे कित्येक सजीवांसाठी आश्रयस्थानाबरोबर त्यांचे ते जन्मस्थान असतात. तेच त्यांचे जणू निसर्गसमृद्ध घर असते. आपल्या विचारांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे भारतीय संविधानात सांगितलेले आहे.

एखादा वृक्ष जसा आपल्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा पुरवीत असतो तसा तो आपल्या आजूबाजूला वास्तव करणाऱ्या जीवनसृष्टीला जीवन आधार असतो. वृक्ष, वनस्पती, फुले यांच्या नैसर्गिक सुंदरतेमुळे अनेक कविता, गोष्टी रचण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते.

परंतु वैज्ञानिक दृष्टीने विचार केला तर झाडे आपल्याला प्राणवायू, जल प्राप्त करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर आपण जसे ऊन आणि वारा, पाऊस यापासून रक्षण करण्यासाठी चिरेबंदी घरात राहतो, त्याप्रमाणे विविध पक्षी, फुलपाखरे, पतंग, वृक्षनिवासी बेडूक, वटवाघूळ, मुंग्या यांसारख्या असंख्य जीवांसाठी वृक्ष हे एक घर असते.

गोव्याबरोबर संपूर्ण पश्चिम घाटात भरपूर प्रमाणात आढळणाऱ्या रुबीएसी कुळातील कदंब वृक्ष जेव्हा बहरतो तेव्हा ते खरे जैवविविधतेचे केंद्र बनते. नाना तर्‍हेच्या सजीवांना विणीसाठी सक्रिय होऊन आपल्या पिल्लांना जन्म देण्यासाठी भरपूर खाद्याची गरज असते तेव्हा ही गरज कदंब वृक्ष पूर्ण करतो.

वर्षातून विशेषत: दोन किंवा त्याहून अधिक वेळा बहरणाऱ्या कदंबाला पावसाळा सुरू होताच गोलाकार पांढरी शुभ्र फुले येतात. भरपूर संख्येने बहरलेल्या या फुलांच्या अल्प सुगंधाने विविध फुलपाखरांबरोबर, पक्षी व असंख्य कृमी कीटक आकर्षित होऊन रस पिण्यासाठी तुटून पडतात.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बहरलेला कदंब काही आठवड्यानंतर येणाऱ्या पावसाच्या मुसळधार वर्षावाने आपली सगळी फुले जमिनीवर टाकतो. त्यामुळे हा वृक्ष जणू पावसाळ्याच्या सुरुवातीच्या कालखंडात भरपूर फुलांनी बहरून कित्येक सजीवांना खाद्य पुरवून त्यांना जीवन चक्र पूर्ण करण्यासाठी प्रेरित करून जातो.

कदंब वृक्ष म्हणजे जणू निसर्गाबद्दलचे शिक्षण घेणाऱ्यांसाठी विज्ञानाचा खजिनाच असतो. पहाटेपासून ते रात्रीच्या मध्यंतरापर्यंत विविध जीवांचे त्याच्याबरोबर वेळबद्ध नाते जुळलेले असते. वेगवेगळ्या जीवांसाठी लावलेल्या या नियमामुळे निसर्गातील समतोल कसा टिकून राहतो याचे कदंब वृक्ष हे एक उत्तम उदाहरण आहे.

संपूर्ण परिसराला हिरवळीने व्यापून मान्सून जेव्हा परतीच्या प्रवासाला लागतो तेव्हा कदंब वृक्ष पुन्हा बहरतो. या कालावधीत तर तो दिवसरात्र नाना तर्‍हेच्या सजीवांचे आश्रयस्थान बनतो. त्यामुळे सकाळ, संध्याकाळ व रात्र या तिन्ही प्रहरी त्याच्या पाना-फुला- फांद्यावर परत परत येऊन विश्रांती घेणाऱ्या कित्येक जीवांच्या अद्भुत जगण्याचे अप्रूप दर्शन आपल्याला होत असते.

कदंब वृक्षाची नैसर्गिक रचनाच कुठल्याही पक्षाला आकर्षित करणारी असते. त्याच्या फांद्यांना आजूबाजूला पसरण्याचा विशिष्ट नियम असतो. सरळ वर जाणाऱ्या मजबूत खोडाला चारही बाजूने लांब लांब पसरलेल्या फांद्या जमिनीशी सरळ रेषेत असतात.

त्यावरील पर्णाच्छादनामुळे खाली थंडगार सावली असते. कुणी आपले हात सरळ बाजूला करून उभा राहिल्यासारख्या त्याच्या फांद्या एकसारख्या ताठ पसरलेल्या असतात. भर पहाटेपासून अनेक वेळा मलय राखाडी धनेश पक्षी या झाडावर येऊन हजर होतो.

दूरवर पोहोचणाऱ्या कर्कश आवाजावरून त्याचे अस्तित्व लक्षात येते. कदंबाच्या एकदुसऱ्या फांद्यामध्ये मोकळी जागा असल्यामुळे तो एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाताना लगेच नजरेत येतो. सूर्योदय होताच सूर्य पक्षी, शिंपी त्याचबरोबर कोकिळा व भारद्वाज हे पक्षी प्रसन्नतेने या फांद्यावर बसून विविध आवाजाने संपूर्ण परिसराला नैसर्गिक संगीताचा जणू साज चढवतात.

भारद्वाज हा पक्षी विशेषत: उडताना दिसत नाही, तर तो झाडाच्या फांद्यावर उड्या मारत मारत वर खाली येताना दिसतो. त्यामुळे कदंबाचे झाड त्याला विशेष आकर्षित करत असते. या झाडाच्या सावलीत जमिनीवर कीटकांवर ताव मारतानादेखील त्याचे दर्शन होते. भारद्वाज या पक्षाला स्थानिक भाषेत ‘कुंभारीण’ असे म्हणतात.

त्याच्या आकार कावळ्यासारखाच असून त्याच्या अंगावरील पिसांचा रंग मातीसारखा राखाडी असतो. सकाळच्या वेळी झाडावरून चळचळ असा आवाज आल्यावर ‘कुंभारीण लागली पोळीयो काडूंक’ असे म्हटले जायचे.

कारण तांदळाच्या भाकरी काढण्यासाठी कालवलेले पीठ जेव्हा तव्यावर गोलाकार ओतले जाते तेव्हा ‘चळ चळ’ असा आवाज येतो. कदंबाचे खोड एकंदर खरखरीत असून त्याच्या खवल्यामध्ये मुंग्यांबरोबर इतर कीटक खाली वर जात असतात. भारद्वाज व सुतार पक्षी सकाळ-संध्याकाळ त्यांना खातात.

दुपार होता होता विविध फुलपाखरे सक्रिय होतात. ‘पाल्म फ्लाय’, ‘चॉकलेट पॅन्सी’, ‘ग्रेट एग फ्लाय’, ‘ब्ल्यू टायगर’, ‘ग्लासी टाइगर’, ‘कॉमन इव्हनिंग ग्राउंड’ यांसारखी मध्यम आकाराची फुलपाखरे त्याच्या पानांवर आपले पंख उघडे करून सूर्यापासून ऊर्जा मिळवतात तर, काही त्यांच्या सुगंधित फुलातून रस चाखण्यासाठी तुटून पडतात.

उत्तर गोव्यातील कणकीरे, गुळेली व वांते या गावांना जोडणाऱ्या म्हादई आणि रगाडा नदी संगमाच्या काठावर कदंबाची झाडे पाहायला मिळतात. गोव्यातील जंगलात आढळणारे पानासारखे दिसणारे फुलपाखरू या वृक्षांच्या फुलावर येतात.

कदंबाची काही फुले कुजल्यावर गळून खाली पडतात तेव्हा तीसुद्धा अनेक जीवांसाठी खाद्य असतात. ‘कॉमन इव्हिनिंग ब्राऊन’ नामक फुलपाखरे संध्याकाळच्या वेळी सक्रिय होतात. त्यामुळे ही फुलपाखरे खाली पडलेल्या फुलातून रस चाखण्यासाठी संध्याकाळच्या वेळी भरपूर प्रमाणात आलेली दिसतात.

रात्र होताच या झाडावरील फुलपाखरे एका जागेवर स्थिरावतात तेव्हा रात्रीचे सक्रिय होणारे पतंग या फुलावरती तुटून पडतात. त्याची पांढरी फुले लहान-मोठ्या पतंगांना आकर्षित करतात. या वृक्षाची पाने मोठी व लांब टोकदार असतात. जगातील सर्वांत मोठ्या पतंगांमधील एक असलेला ‘टलास’ नामक पतंग या झाडावरती जन्म घेतो.

त्याचे सुरवंट या झाडाची पाने खाऊन पानाखाली लपून राहतात. रात्र पुढे सरकते तेव्हा पतंग फुलांतील रस चाखतात. मध्यरात्रीपर्यंत त्यांची संख्या अजून वाढते. चक्क याच क्षणाचा फायदा घेण्यासाठी वटवाघळे तेथे हजर होतात.

पतंग हे वटवाघळांचे खाद्य असते. कदंबाची फुलेदेखील त्यांना भरपूर आवडीची. त्यामुळे या फुलांवर ताव मारताना वेगवेगळ्या पतंगांना पकडून त्यांना आपले भक्ष्य बनवतात. यामुळेच विविध कीटकांवर नियंत्रण ठेवण्याचे काम वटवाघळे करत असतात. पहाटेपासून रात्रीपर्यंत निसर्ग व पर्यावरणातील जीवमात्रांचे अविरतपणे भरणपोषण करण्याचे कदंब वृक्षाचे कार्य उल्लेखनीय आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेला सलाम! काही तासांतच शोधून दिलं बेळगावच्या महिलेचं 4.5 लाखाचं 'मंगळसूत्र', बागा येथील घटना

World Cup Prediction: 'मी 2026 च्या विश्वचषकात खेळेन...' अनकॅप्ड खेळाडूचा दावा कशाच्या आधारावर? प्रीती झिंटाचा आवडता खेळाडू चर्चेत

Filmfare Award: बॉलीवूडमध्ये गोव्याचा डंका! 'Article 370' साठी आदित्य जांभळे यांना फिल्मफेअर पुरस्कार

Sattari Accident: होंडा सत्तरी रिक्षा आनी दुचाकीमदी भिरांकुळ अपघात; एकल्याक मरण

Rama Kankonkar: "रामाच्या तोंणान ही उतरां घातली कोणें?", 23 दिवस शांत, मग अचानक काय झालं? आरोपांवर खवंटेंचा पलटवार

SCROLL FOR NEXT