Junk Food Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Junk Food: सरकारी अहवाल सांगतो, आपला देश 2050 पर्यंत सर्वाधिक लठ्ठंभारती लोकांचा ‘पर्मनंट ॲड्रेस’ होणार आहे

Opinion: परंपरेतून आपल्यापर्यंत चालत आलेली आहारसंस्कृती टाकून देऊन नकळत आपण अनिष्ट अशा परक्या प्रभावाला कधी बळी पडलो, हे कळलेच नाही. जंक आणि फास्टफूडची गुलामगिरी पत्करल्याने त्याचे फटके जाणवू लागले आहेत. 

Sameer Panditrao, गोमन्तक डिजिटल टीम

दिव्यांची आवस ऊर्फ गटारी अमावस्या हातातोंडाशी आलेली असतानाच खवय्यांच्या पोटात गोळा आणणारी बातमी यावी, हे काही बरे झाले नाही. श्रावणात बरेच जण पथ्ये, व्रतवैकल्ये पाळतात. त्याआधी चांगलेचुंगले खाऊन घ्यावे, हा माफक इरादा तितका काही चुकीचा नाही.

पण आपण ज्याचा घास मुखी सोडणार आहो, त्या खमंग, लज्जतदार सामोसा, बटाटेवडा, िजलेबी अशा व्यंजनांमध्ये किती भयंकर उष्मांक आणि मेदजन्य अवगुण असतात, हे जाहीर करा, असा ‘फतवा’ केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काढल्याचे वृत्त आले.

अर्थात दोन-चार दिवस खवय्यांचा हाजमा बिघडवल्यानंतर ‘असा आदेश वगैरे काहीही नसल्याचे’ आरोग्य खात्याने जाहीर केले हे खरे. पण तोवर सडकछाप खाण्याला सोकावलेल्या आणि ते खाद्य बेधडक विकणाऱ्या खाद्यसम्राटांची मात्र झोप उडाली.

कॅफेटेरिया, कॅन्टीन, सरकारी उपाहारगृहे, मीटिंग रुम अशा ठिकाणी केवळ ‘जनजागृती’साठी हे फलक लावण्याची आरोग्य खात्याची माफक सूचना आहे. आदेश, कारवाई, बडगा वगैरे काहीही नाही.

अर्थात जरी हा आदेश आरोग्य खात्याने काढला असता तरी त्याची अंमलबजावणी कशी होणार हा प्रश्नच आहे. इथे निम्मा भारत रस्त्याच्या कडेला शिजलेले खातो. कुठल्या कुठल्या चुलीवर सरकारी विभाग लक्ष ठेवणार? रस्त्यावरचे पदार्थ हे तब्येतीला बरे नसतात, हा तर सुविचार झाला.

बुजुर्ग मंडळी तरुणांना हाच सल्ला पिढ्यानपिढ्या देत आली आहेत. पण ऐकतो कोण? आरोग्याला उपकारक पदार्थ चवीला वाईट असतात, आणि आवडीचे जिन्नस हटकून अपायकारक असतात, हे सुचवणारे विज्ञानाधारित वास्तव इथे कोणाला हवे आहे?

जगातील बहुतांश सर्वच धर्म-संस्कृतींनी स्थलकालाचा विचार करत व्यक्तीच्या ताटात नेमके काय हवे, याचे एक आहारशास्त्र तयार केले. पण पथ्यकर आहार हा सगळ्यांनाच परवडतो असे नव्हे. किंबहुना, पथ्य महाग, आणि कुपथ्य स्वस्त हाच नियम झाला आहे. हल्ली विविध स्वरुपाची सॅलड्स, ओट्स किंवा ‘सुपरफूड’चा बोलबाला आहे. कालपरवापर्यंत ज्याला कुणी विचारत नव्हते, ती भगर आणि गरीबाची नाचणीही आता ‘सुपरफूड’ झाली.

जोवर भरडधान्य आपल्या खाण्यात होती, तोवर त्यांना भाव नव्हता, आता ‘मिलेट्स’ म्हटले की त्याची किंमत दाणकन वाढते! हे सारे जनसामान्यांना कसे परवडावे? खिसा चाचपून पंधरावीस रुपयांचा वडापाव किंवा सामोसा चावावा की आरोग्यपूर्ण आहार घेण्यासाठी खिशाला तीन-चारशेची फोडणी द्यावी? प्रक्रियाविरहित शुद्ध खाद्यपदार्थ म्हणून ज्याला ओळखले जाते, तो रानमेवा आमच्या आदिवासी बांधवांच्या ताटात पाहायला मिळतो किंवा वातानुकूलित महागड्या दुकानात! 

चीनपाठोपाठ सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये मधुमेह, स्थुलत्व आणि हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये झालेली वाढ ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. आपला देश २०५० पर्यंत सर्वाधिक लठ्ठंभारती लोकांचा ‘पर्मनंट ॲड्रेस’ होणार आहे, असे सरकारी अहवाल सांगतो.

पदार्थांना लज्जत देणारे साखर, मीठ आणि तेल यासारखे घटक आता विष बनत चालले आहेत. हे सगळे एका रात्रीत घडलेले नाही. आर्थिक संपन्नतेच्या वृक्षाला आलेली ही कडू फळे होत. खरेतर ज्या गोष्टी चवीपुरत्या किंवा महिन्यातून एकदाच जिभेची चंगळ म्हणून खायच्या असतात, त्याच आपण जर रोज खायला लागलो तर त्याचे शरीरावर दुष्परिणाम होणार हे निश्चित आहे अन् आताही नेमके तेच घडते आहे. 

मोठ्याच्या ताटातील चमचमीत, चटपटीत लहान मुलांच्या डब्यातही शिरले आहे, त्यामुळे मुलांमधील मधुमेहाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून येते. नव्या तंत्रज्ञानयुगात जगणाऱ्या पिढीसमोर आज काळाने मेंदूचे आणि पोटाचे प्रश्न अधिक जटिल केले आहेत.

त्यामुळे दोन्ही इंद्रियांसाठी आपल्याला आहाराचा हल्लीच्या भाषेत ‘डाएट’चा वेगळा आराखडा तयार करणे अपरिहार्य झाले आहे. औटघटकेच्या रील्स, व्हिडिओ अथवा पोस्टमधून साध्य होणारी ही गोष्ट नाही.  या बदलांसाठी चिकाटी, मेहनत अन् मुख्य म्हणजे विवेक गरजेचा आहे.

आज नेमका त्याचाच विसर पडल्याचे दिसून येते. आंतरिक ऊर्मी आणि जिद्द यातून निर्माण होणारा मानसिक आणि शारीरिक ताकदीचा पीळ हा ‘प्रोटिन शेक’वर तयार झालेल्या ‘सिक्स पॅक’पेक्षा कधीही भारीच.

केवळ वजन कमी करायचे म्हणून कोरभर भाकरी आणि चपातीवर दिवस काढण्यापेक्षा पोटाची गरज नेमकी काय आहे, आपण त्याला नेमके काय देतो आहोत, ज्या प्रमाणात खातो त्या प्रमाणामध्ये व्यायाम करतो का, याचे गणित जुळविणे गरजेचे आहे.

हे जुळले तर व्यक्तीचा आरोग्यविवेक जागृत होऊन तिला आपोआप स्वास्थ्यलाभ होऊ शकतो. तसे ते लाभले तरच आपला तरुणवर्ग उत्पादक आणि सर्जक काम करू शकतो. आरोग्य ही संपत्ती आहे, हे तत्त्व व्यक्तीप्रमाणेच देशासाठीही लागू पडते. उदरभरण हे शरीरासाठी यज्ञकर्म आहेच, त्याहीपेक्षा ते राष्ट्रकर्म आहे, हा विवेक नव्या पिढीला द्यायला हवा. ते काम निव्वळ फलक लावून कसे होणार?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा, जीएमसीत उपचार सुरु; मये-डिचोलीतील घटना

Viral Video: 'पप्पा पोलीसमध्ये आहेत, गोळी घालेन...', होमवर्क दिल्यावर चिमुकल्याची थेट शिक्षिकेला धमकी; 'लिटिल डॉन'चा व्हिडिओ व्हायरल!

New Mahindra SUV: टोयोटाची झोप उडवणार महिंद्राची नवी पिकअप! स्कॉर्पिओ आणि थारचं जबरदस्त कॉम्बिनेशन

गोव्याच्या दारूवर महाराष्ट्राचे लेबल; तेलाच्या नावाखाली सुरु होती तस्करी, वैभववाडीत 41 लाखांचा मुद्देमाल जप्त

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये जो रुट गाठणार नवा 'माइलस्टोन'! 22 धावा करताच रचणार इतिहास

SCROLL FOR NEXT