मधुसूदन जोशी
बहुदा सर्वप्रकारचे चित्रपट इथे पाहायला मिळतात. त्यात विविध आंतराष्ट्रीय चळवळी, त्यातील संघर्ष हे विषय असतात. आरोग्य हाही असाच सर्वव्यापी विषय आहे. आरोग्यविषयक प्रश्न, धोरणे आणि मोहिमा हे विषय हाताळणारे चित्रपटही ‘इफ्फी’त असतात. एरवी हे चित्रपट इतरत्र कुठेच मिळण्याची शक्यता कमी असल्याने ते पाहाण्यात मजा असते.
इफ्फी’मधील चित्रपटांच्या भाऊ गर्दीतून आपल्याला हव्या त्या विषयांवरील चित्रपटांची निवड करता येते का असा प्रश्न रसिकांना पडू शकतो. इफी मध्ये सादर होणाऱ्या चित्रपटाना तसे विषयांचे बंधन नसल्याने बहुदा सर्वप्रकारचे चित्रपट इथे पाहायला मिळतात. त्यात विविध आंतराष्ट्रीय चळवळी, त्यातील संघर्ष हे विषय असतात. आरोग्य हाही असाच सर्वव्यापी विषय आहे. आरोग्यविषयक प्रश्न, धोरणे आणि मोहिमा हे विषय हाताळणारे चित्रपटही ‘इफ्फी’त असतात. एरवी हे चित्रपट इतरत्र कुठेच मिळण्याची शक्यता कमी असल्याने ते पाहाण्यात मजा असते.
केवळ आरोग्य आणि वैद्यकीय व्यवस्था ह्यांच्याशी निगडित असे काही चित्रपट हमखास इफी मध्ये प्रदर्शित होतात. आरोग्यविषयक रेहमा, मला राणी म्हणा व लुकिंग फॉर मायकेल हे तीन चित्रपट यंदाच्या इफी मध्ये पाहायला मिळाले. रेहमा हा चित्रपट एका अपत्यहीन व गर्भधारणेसाठी धपडणाऱ्या जोडप्याची कहाणी आहे. मेरियम ही शान्लिउर्फा तुर्कीये येथे पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून काम करते. तिचे लग्न होऊन बरीच वर्षे झालेली आहे पण अपत्य सुखाचा लाभ त्या जोडप्याला झालेला नसतो. ती दोघेही मुसलमान असल्याने आपत्य व गर्भधारणा ह्या बाबत त्यांना कुराण व शरियत यांच्या तत्वां नुसार आचरण करावे लागते. गर्भधारणेसाठी मेरियम अनेक वैद्यकीय उपचार घेते. त्यात एका अयशस्वी आयव्हीएफ (IVF) उपचारांचा समावेश देखील आहे. मेरियमची आई होण्याची आशा मावळू लागते.
धार्मिक संकेत आणि पती इब्राहिमच्या विरोधाला न जुमानता, ती शेवटचा पर्याय म्हणून जॉर्जियामध्ये सरोगसीचा मार्ग निवडण्याचा निर्णय घेते. सरोगेसी इस्लामला मान्य नसते परंतु घराच्या विरोधाला नजुमानता ती दोघे हा मार्ग पत्करतात. ह्या कथानकात एक उप कथानक आहे. ते समजणार तर शंभर वर्षा पूर्वी ओटोमन साम्राज्याच्या पतनानंतर तुर्की, इराक, सीरिया, इराण व इस्राएल आणि भोवतीच्या परिसरात काय घडलं ह्याची पार्श्वभूमी जाणून घ्यावी लागते. इराक व सिरिया मधील निर्वासित लोकांचे तांडे बेकायदेशीर रीत्या ग्रीस व जॉर्जिया मध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. अशा अयशस्वी प्रयत्नात मेरियमची भेट एका रहमा (रहीम ) नावाच्या नऊ वर्षांच्या सीरियन अनाथ मुलीशी होते.
त्यातून दोघांत भावनिक नाते निर्माण होते. ह्या जवळीकेतून रहीमचे गुपित मारियेमला समजते तेव्हा त्यांच्यात एक विशेष आणि रहस्यमय नाते निर्माण होते. चित्रपटात ते नाते उत्तरोत्तर घट्ट होत जाते. चित्रपटाचा शेवट हा काहीसा नाटकी व हिंदी चित्रपटाला साजेल असा पण सुसह्य आहे. अपत्यहीन जोडपं, गर्भधारणेचा प्रयत्न अशा बाबी असून ह्या चित्रपटात एकही तसला प्रणय प्रसंग नाही ही बाब विशेष आहे. चित्रपटाच्या सुरवातीला मेरियम व तिचा नवरा एका वैदू वा तांत्रिक बाबाकडे उपचारासाठी गेलेले दाखवलेले आहेत. तिथे बुरख्यात असताना मेरियमचा हात तिचा नवरा आपल्या हातात घेतो. पण मेरियम हळुवारपणे तो हात सोडवते. ह्या एकाच प्रसंगातून दिग्दर्शकाने अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत.
औषधांच्या किमती व न परवडणारे वैद्यकीय उपचार हे सामन्याच्या चिंतेचे विषय आहेत. आफ्रिकेत नव्वदच्या दशकात एड्सचे भयानक संकट होते. औषधांच्या किमती न परडवणाऱ्या होत्या. औषधे परवडणारी हवीत अशा मोहिमा व चळवळी जगात सुरू असतात. अशाच एक संघर्षाची कथा ‘इफ्फी’ मधील चित्रपटात पाहायला मिळाली. ‘मला क्वीन म्हणा’ ह्या चित्रपटात १९९० च्या दशकात नैरोबीत राहणाऱ्या एका एकल मातेचा संघर्ष आहे. मूळ क्वीनदा नांव असलेल्या ह्या केनियामधील आफ्रिकन वंशाच्या बाईला लोक क्वीन किंवा राणी का म्हणू लागतात हे ह्या चित्रपटात दाखवलेलं आहे. नायिका स्वतःचा आणि आपल्या दोन मुलांचा उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करत आहे.ती ॲना नावाच्या एका आयरिश पत्रकाराशी काहीशा आगाऊपणे जवळ जाते. त्यातून त्या दोघीत त्यांच्यात एक अनपेक्षित मैत्री निर्माण होते.
जेव्हा क्वीनला समजते की तिला ‘एड्स’ झाला आहे, तेव्हा ॲना तिला वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात मदत करते. क्वीन या आजारातून वाचते परंतु तिचे अनेक मित्र आणि शेजारी मात्र या आजारामुळे जीव गमावतात. या अनुभवामुळे तिची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते आणि ती अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याचा निश्चय करते. हा चित्रपट मैत्री, एकमेकांना दिलेला आधार आणि कठीण काळात लोक एकमेकांना कशी मदत करू शकतात, याचे चित्रण करतो. ह्या संघर्षात पेटंट, औषधांच्या किंमती, देशातील आरोग्य यंत्रणा, जगातिक आरोग्य संघटना असे सगळे विषय मूळ कथानकाशी योग्य ते नाते बाळगून आलेले आहे.
भारतीय औषध उद्योगाचा एक सार्थ उल्लेख ह्या चित्रपटात आहे. तो समजण्यासाठी ‘हार्ट’ह्या संक्षिप्त नावाने भारतीय औषध कंपन्यांनी निर्माण केलेली स्वस्त दरातील औषधे यांची माहिती कळते किंवा जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते. ‘लुकिंग फॉर मायकल’ ह्या चित्रपटात पार्किन्सन आजार झालेल्या ऑर्केस्ट्रा किंवा बँड पथकाची गोष्ट अगदी विनोदी अंगाने मांडली आहे. नायिकेला म्हणजे सोनियाला तरुण वयातच पार्किन्सन असल्याचे निदान होते. त्यामुळे आपले आयुष्य मर्यादित होऊ देण्याऐवजी, ती जीवनाचा आनंद घेण्याचे आणि आव्हानांचा सामना करण्याचे नवीन मार्ग शोधून काढते. या आजाराने ग्रस्त इतर व्यक्ती आणि त्यांचे संगीत थेरपी शिक्षक, पेड्रो यांच्यासोबत मिळून, ती पार्किन्सनबद्दल जागृतीचा प्रयत्न करते.
संगीत, मैत्री आणि एका सामायिक ध्येयामुळे हे सर्वजण एकमेकांच्या जवळ येतात. ते एका विशेष संधीसाठीही प्रयत्नशील असतात. हे संगीत पथक स्पेन मधील माद्रिद शहरात का येतं? तिथं मायकलला भेटण्याचा त्यांचा काय हेतू आहे? मायकल फॉक्स ह्यांना वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी ‘पार्किन्सन’ आजाराचे निदान झाले होते. पण खचून न जाता त्यांनी आजारावरील संशोधनासाठी व जनजागृतीसाठी खूप काम केलं. अशा प्रसिद्ध व्यक्ती समोर आपले सादरीकरण करणे हा ह्या संगीत मंडळींचा प्रयत्न असतो. त्या धडपडीचे अर्थपूर्ण प्रवासात झालेले रूपांतर म्हणजे ‘लुकिंग फॉर मायकल’ हा चित्रपट.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.