आशुतोष गोवारीकर
‘सीमाविरहित कथा’ ही यंदाच्या ‘इफ्फी’ची संकल्पना आहे. जरा हा विचार करा. हजारो मैल दूर बनवलेला, कदाचित तुम्हाला न समजणाऱ्या भाषेतील एखादा चित्रपट तुम्हाला हसवू शकतो, भावूक करू शकतो किंवा श्रेयनामावली संपल्यानंतरही बराच काळ विचार करायला भाग पाडू शकतो. आपण सर्वजण गोव्यात एकत्र येत असताना, तुम्ही ज्या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी नक्कीच उत्सुक असाल, अशा काही गोष्टी मी तुमच्याशी सामायिक करतो.
प्रिय इफ्फी-प्रेमींनो,
आज गोव्यात ५७वा ‘इफ्फी’ सुरू होत असताना, यंदाच्या महोत्सवाच्या उल्लेखनीय विविधतेची आणि भव्यतेची झलक अधिकृत कार्यक्रमपत्रिकेत पाहायला मिळते. २६७ पानांची ही कार्यक्रमपत्रिका तुम्हाला प्रतीक्षा असलेल्या चित्रपटांची अनुभूती देणारी मार्गदर्शिका आहे. अगदी सुरुवातीला असलेली ठळक वैशिष्ट्यांची २ पाने पुढे काय दडले आहे याची लगेचच कल्पना देतात.
‘सीमाविरहित कथा’ ही यंदाच्या ‘इफ्फी’ची संकल्पना आहे. जरा हा विचार करा. हजारो मैल दूर बनवलेला, कदाचित तुम्हाला न समजणाऱ्या भाषेतील एखादा चित्रपट तुम्हाला हसवू शकतो, भावूक करू शकतो किंवा श्रेयनामावली संपल्यानंतरही बराच काळ विचार करायला भाग पाडू शकतो. पडद्यावरील देश, संस्कृती किंवा तेथील लोकांबद्दल तुम्हाला फारशी माहिती नसली, तरीही त्यांच्या कथांमध्ये तुम्हाला काहीतरी परिचित असे नक्कीच सापडेल.
अनोळखी गोष्टींमधील परकेपणा कमी करण्याची ताकद चित्रपटात नेहमीच राहिली आहे. जेव्हा तुम्ही तुम्हाला न येणाऱ्या भाषेतील चित्रपट पाहता आणि तरीही त्यातील पात्रे, त्यांच्या भावना आणि अनुभवांशी जोडले जाता, तेव्हा काहीतरी विलक्षण घडते. माझ्या मते, हेच ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ या संकल्पनेचे सार आहे. यंदाच्या चित्रपटांची निवड या कल्पनेचा अनुभव घेण्याचे अनेक मार्ग उपलब्ध करून देत आहे.
पहिली सीमा भौगोलिक आहे. यंदा ‘इफ्फी’ ८६ देशांतील १५९ आंतरराष्ट्रीय चित्रपट एकत्र घेऊन येत आहे. यामध्ये स्पेन ‘सन्माननीय देश’ म्हणून केंद्रस्थानी आहे, तर रशिया ‘सहभागी देश’ म्हणून आपल्यासोबत जोडला गेला आहे. पुढील सीमा भाषिक आणि सांस्कृतिक आहे. यंदाच्या ‘इंडियन पॅनोरमा’ विभागामध्ये १८ भारतीय भाषांमधील ७६ चित्रपटांचा समावेश आहे. यामध्ये लडाख, गोवा आणि इतर प्रदेशांतील चित्रपटांचाही समावेश आहे.
तिसरी सीमा काळाची आहे. महान चित्रपटांना कोणतीही कालमर्यादा नसते. यंदा आपण थोर दिग्दर्शक आंद्रेज वाजदा यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करत आहोत. भारतीय चित्रपटसृष्टीला आकार देणाऱ्या कलाकारांची जन्मशताब्दी साजरी करत आहोत: अभिनेते प्रेम नझीर, सूर्यकांत मांढरे, राज कुमार आणि उत्तम कुमार; दिग्दर्शक शक्ती सामंत; आणि संगीतकार ओ.पी. नय्यर आणि रवी. त्यांचे कार्य हिंदी, बंगाली, मराठी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत पसरलेले आहे. या अभिवादनाचा भाग म्हणून दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांत ‘साधी माणसं’, ‘तुलाभारम’, ‘वक्त’, ‘काश्मीर की कली’ आणि ‘चौरंगी’ यांचा समावेश आहे.
आपण ‘ब्रिक्स’ चित्रपटसृष्टीवरही विशेष लक्ष केंद्रित करणार आहोत, ज्यात २१ चित्रपटांचा समावेश आहे, तसेच ‘ॲनिमेशन’ आणि ‘चित्रपटांवरील चित्रपट’ हे दोन नवीन विभागही सादर करत आहोत. यंदा पणजी, पर्वरी, मडगाव आणि फोंडा येथील १३ महोत्सव स्थळांवर चित्रपटांचे शो आयोजित केले जात आहेत, ज्यामुळे हा महोत्सव संपूर्ण गोव्यातील प्रेक्षकांच्या अधिक जवळ पोहोचला आहे. यंदाच्या इफ्फी आयोजनाला ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ या संकल्पनेने अशा प्रकारे दिशा दिली आहे.
परंतु मित्रांनो, माझी तुम्हाला छोटीशी विनंतीही आहे. तुम्ही एरव्ही सामान्यतः जो चित्रपट पाहण्यासाठी निवडणार नाही असा किमान एक तरी चित्रपट नक्की पहा. माझा असा ठाम विश्वास आहे की, आपल्यातील सीमा जितक्या वाटतात तितक्या रुंद नक्कीच नाहीत याची जाणीव तुम्हाला होईल. माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब म्हणजे, ‘लगान’ हा माझा आजवरचा सर्वात आवडता चित्रपट गौरवशाली २५वा वर्धापन दिन साजरा करत आहे. ‘लगान’चा तो मंतरलेला चित्रपटप्रवास आता आपण सर्वजण पुन्हा एकत्र अनुभवू शकणार आहोत.या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहतो आहे.
आपण याचा प्रारंभ ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ या उपक्रमापासून करू शकतो. हा माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचा (एनएफडीसी) संयुक्त उपक्रम आहे. तुम्ही कल्पना करा, की देशभरातील १०० प्रतिभावान युवांना इफ्फीसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चित्रपट निर्मितीच्या १३ विविध कलाप्रकारांमध्ये आपली सर्जनशील क्षमता दाखवण्याची संधी या निमित्ताने मिळत आहे. ‘वेव्हज बाजार’ म्हणजे एक अशी जागा आहे, जिथे कल्पनांना मदत करू शकणारे सहकारी मिळतात, चित्रपट प्रकल्पांना संभाव्य भागीदार मिळतात आणि संवादातून नव्या शक्यतांची दारे खुली होतात.
यंदा इफ्फीची सुरुवात नावाजलेले पोलिश चित्रपटकर्मी पावेल पावलिकोव्स्की दिग्दर्शित ‘फादरलँड’ या चित्रपटाने होणार आहे. १९४९ मधील युद्धानंतरच्या जर्मनीच्या पार्श्वभूमीवरचा कृष्णधवल चित्रपट. यातून नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक थॉमस मान आणि त्यांची कन्या एरिका यांच्या विभाजित जर्मनीतील प्रवासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. इफ्फीचा समारोप सिंगापूरचे चित्रपटकर्मी अँथनी चेन दिग्दर्शित ‘वी आर ऑल स्ट्रेंजर्स’ ने होणार आहे. हा महोत्सव एकत्र साजरा केल्यानंतर आपण सर्व इफ्फी प्रेमी एकमेकांसाठी थोडे कमी अनोळखी राहू, याची मला खात्री आहे.
हे पत्र म्हणजे महोत्सवाचे एक छोटेखानी सूचिपत्रच आहे, असे म्हणत जाता जाता मी माझ्या मनातली एक शेवटची गोष्ट मांडून थांबतो. मित्रांनो, ५७वा इफ्फी असाच निसटून जाऊ देऊ नका, की त्यामुळे पुढचे ३६५ दिवस तुम्हाला आपण या महोत्सवाचा भाग असायला हवे होते, अशी हळहळ वाटत राहील. इफ्फीमध्ये भेटू या!
आपला,
आशुतोष गोवारीकर
२० नोव्हेंबर२०२६
(लेखक ५७व्या इफ्फीचे महोत्सव संचालक असून ते भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते आहेत.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.