Gomantak newspaper 64 years Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Dainik Gomantak: निर्भीड पत्रकारितेचा वसा घेतलेले दैनिक 'गोमन्तक'

Gomantak Newspaper:संपादकीय पान व त्या पानावरचे लेख, तसेच रविवार पुरवणीही लोकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. यामुळेच ‘गोमन्तक’ पत्रकार क्षेत्रात आपले असे स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

दैनिक ‘गोमन्तक’ आज ६४ वर्षांचा होत आहे. गोव्याला मुक्ती मिळाल्यानंतर १९६२साली गोमंतक अस्तित्वात आला. त्यावेळची गोव्याची सामाजिक व भौगोलिक स्थिती वेगळी होती. लोकांची मानसिकताही आजच्यासारखी नव्हती. बरीच वर्षे पोर्तुगीज राजवाटीखाली असल्यामुळे गोमंतकियांचा दृष्टिकोनही परिपूर्ण झाला नव्हता.

अशा परिस्थितीत ‘गोमन्तका’ने आपले पाय रोवायला सुरुवात केली. आम्ही त्यावेळी म्हापशाला राहत होतो. माझे आजोबा सकाळी ‘गोमन्तक’ व संध्याकाळी मुंबईहून येणारा आचार्य अत्रेंचा दैनिक ‘मराठा’ आणत असत. त्यावेळी समजण्याचे वय नसले तरी वाचनाची आवड असल्यामुळे ‘गोमन्तक’ पूर्णपणे वाचून काढत असे. त्यावेळी ‘गोमन्तका’शी निर्माण झालेली बांधीलीकी इतक्या वर्षांनंतर आजही कायम आहे!

सुरुवातीला वाचक व नंतर लेखक अशा स्वरूपात ती आजही दिसते आहे. बाळकृष्ण दत्तात्रय सातोस्कर (बा. द. सातोस्कर) हे ‘गोमन्तका’चे पहिले संपादक.

त्यांनी जी निर्भीड पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली ती नंतरच्या बहुतेक संपादकांनी तेवढ्याच प्रभावीपणे कायम ठेवली. ’लाटा आणि लहरी’ हे त्यावेळच्या दैनिक ‘गोमन्तका’तील माझे सगळ्यात आवडते सदर. त्यावेळचे ज्येष्ठ पत्रकार वामन राधाकृष्ण हे या सदरातून मिश्किलपणे अशा काही टिप्पणी करायचे की कोणीही दाद द्यावी. म्हणूनच तर आज इतक्या वर्षानंतरसुद्धा हे सदर माझ्या मनातली ’मर्मबंधातील ठेव’ बनले आहे.

तशी ‘गोमन्तका’ने ही चतुरस्त्र पत्रकारितेची परंपरा आजसुद्धा अबाधित ठेवली आहे.‘गोमन्तका’चे बहुतेक संपादक हे याच पठडीतले. माधव गडकरी, नारायण आठवले यांच्यासारख्या संपादकांनी तर ‘गोमन्तक’ला सजग पत्रकारितेच्या अत्युच्च शिखरावर नेले.

आठवलेनी तर आमच्यासारख्या अनेक पत्रकारांना घडवले. ‘पत्रकारांनी कधीच पिंजऱ्यातील पोपट होता कामा नये’ असे ते नेहमी सांगायचे. आजही कोणता लेख वा राजकीय विश्लेषण लिहिताना मला त्यांच्या या संदेशाची आठवण होते. म्हणूनच तर दिवंगत रवि नाईकांचा निकटवर्तीय असूनसुद्धा ते भाजपमध्ये गेल्यानंतर ‘रवींचे भाजपमध्ये जाणे ही चूक’ हा परखड लेख लिहू शकलो. निर्भीड पत्रकारिता कशी करावी याचा वस्तुपाठ आठवलेंनीच आम्हाला दिला.

पत्रकारितेबरोबर सामाजिक बांधिलकीही ‘गोमन्तका’ने जोपासली. मडकई होडी दुर्घटनेच्या वेळी ‘गोमन्तक’ने घेतलेली भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. १९८६-८७साली झालेल्या मराठी भाषेच्या चळवळीतही.

‘गोमन्तक’ने सिंहाची भूमिका घेतली होती ’तुटो हे मस्तक फुटो हे शरीर मराठीचा गजर सोडू नये’ असे म्हणत मराठीप्रेमींच्या मनात अस्मितेचे हुंकार फुंकण्याचे काम त्यावेळी ‘गोमन्तक’नेच केले होते. ‘गोमन्तक’ मराठी अकादमी करता गावोगाव झोळी घेऊन फिरणारा संपादक गोव्याने पहिल्यांदाच आठवलेंच्या रूपाने पाहिला.

म्हणून तर ‘गोमन्तक’ या मातीचा एक घटक बनू शकला. आणि हा निर्भीड पत्रकारितेचा ‘गोमन्तका’ने घेतलेला वसा विद्यमान संचालक- संपादक राजू नायक हे मागच्या पानावरून पुढे नेताना दिसत आहेत.

नुकतेच उजेडात आलेले कला अकादमीच्या मराठी ‘अ’ गट नाट्यस्पर्धेतील ‘परीक्षक लाच प्रकरण’ असो वा कला अकादमीचेच नूतनीकरण प्रकरणातला ’घोटाळा’ असो; ‘गोमन्तक’ नेहमीच याबाबतीत अग्रेसर राहिला आहे. ‘परीक्षक लाच प्रकरणा’वर उजेड टाकल्यामुळे तर आजच्या नाट्यस्पर्धांत पडद्यामागून काय चालले आहे याची जाणीव संपूर्ण गोव्याला झाली आहे.

निर्भीड, निरपेक्ष, परखड राजकीय वार्तापत्रे ही ‘गोमन्तक’ची आणखी एक खासियत. याचे प्रतिबिंब संपादकांच्या अग्रलेखातूनसुद्धा उमटताना दिसते. कोणाची भीड, मुलाहिजा न बाळगता जे काय असेल ते चव्हाट्यावर आणणे हे ‘गोमन्तक’चे ब्रीद आजही जशास तसे आहे!

तसे पाहायला गेल्यास राजकारणावर परखडपणे लिहिणे हा तसा लवचिक मामला. आपल्या विरोधात लिहिले गेलेले अनेक राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आवडत नसते. खास करून निवडणुकीच्या दिवसात तर याचा जास्त प्रत्यय येत असतो.

त्याचे पडसादही उमटायला लागतात. मी ‘गोमन्तका’तून राजकारणावर लिहित असल्यामुळे मला याचा अनुभव बऱ्याच वेळ आला आहे. पण आठवल्यांसारख्या दिग्गज पत्रकारांच्या मुशीतून तयार झाल्यामुळे म्हणा, वा दैनिक ‘गोमन्तक’चा सक्रिय पाठिंबा असल्यामुळे म्हणा मी या अनुभवांना पार करून अजूनही लिहितो आहे. असे अनेक निर्भीड पत्रकार, स्तंभलेखक ‘गोमन्तक’ने तयार केले आहेत. म्हणूनच राजकीय विश्लेषणाबाबत ‘गोमन्तक’ आज ’नंबर वन दैनिक’ बनले आहे!

तीच गोष्ट नाट्यसमीक्षणाची. ‘गोमन्तका’तून प्रसिद्ध होणारी कला अकादमीच्या मराठी व कोकणी नाट्यस्पर्धांची निरपेक्ष व अभिरुचीपूर्ण समीक्षणे अनेक कलाकार व रसिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. संपादकीय पान व त्या पानावरचे लेख, तसेच रविवार पुरवणीही लोकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

यामुळेच ‘गोमन्तक’ पत्रकार क्षेत्रात आपले असे स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहे. मुख्य म्हणजे या दैनिकाने वाचकांची विश्वासार्हता संपादन करण्यात जे यश मिळवले आहे त्याला तोडच नाही. या विश्वासार्हतेच्या जोरावरच आज ‘गोमन्तक’ ६४ वर्षाची यशस्वी वाटचाल पार करीत आहे. भविष्यातही ‘गोमन्तक’ची ही उज्ज्वल परंपरा अशीच सुरू राहो तसेच पत्रकारितेचे नवे आयाम पार करण्यात हे दैनिक यशस्वी होवो हीच अपेक्षा. त्याचबरोबर ६४ वर्षांचा टप्पा गाठल्याबद्दल एक वाचक व लेखक म्हणून ‘गोमन्तक’चे हार्दिक अभिनंदन!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT