Goa Beach Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

अग्रलेख: दिल्लीश्‍वरांचरणी केवळ गोवाच नव्हे तर गोंयकारपणही विक्रीस काढलेल्यांकडून अपेक्षा तरी किती आणि का ठेवायच्या?

Goa Year Review: मूळ गोमंतकीय स्वभाव असा नाही. बदल होण्यास वाव आहे. जरी वरवर असे वाटत असले की गोमंतकीय समाजाच्या संवेदनाच बोथट झाल्या आहेत, तरी आत कुठे तरी ती धगधग अजून आहे, मनात खदखद आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सरत्या वर्षाची हुरहुर आणि नव्या वर्षाच्या स्वागताची लगबग असण्याचे हे दिवस. पण, गोमंतकीय समाजाच्या पायी न लगबग दिसतेय, ना हृदयी हुरहुर. घडणारी प्रत्येक घटना कोडगेपणाने बघत राहणे सुरू आहे.

गेल्या वर्षाची अखेर, सनबर्नमध्ये जीव गेलेल्या करणच्या मृत्यूचे कारण ड्रग्ज असण्याच्या रहस्योद्घाटनाने झाली. हीच मालिका पुढे बिट्स पिलानीच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येतही सुरू राहिली.

खासगी शिक्षण संस्थेत विद्यार्थी आपले जीवन संपवत होते, तर गोवा विद्यापीठाचा दर्जा घसरणे थांबत नव्हते. तिथल्या पेपरफुटीने ‘गोमन्तक’ने लावून धरले त्याला तोड नव्हती. शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी ही घटना एकूणच शिक्षण क्षेत्राची अधोगती सांगण्यास पुरेशी ठरावी.

केवळ शिक्षणच नव्हे तर अनेक क्षेत्रांची गती तशी धिमीच राहिली. काही क्षेत्रांत जोरदार घडामोडी गोव्यात घडल्या, त्यांपैकी एक म्हणजे गुन्हेगारी. टोळीयुद्ध, घरफोडी, दरोडे यात जे प्रावीण्य गुन्हेगारांनी मिळवले त्याचे कौतुक करावे, की पोलिस प्रशासनाच्या घसरत जाण्याचा विषाद बाळगावा असा प्रश्‍न पडतो.

गुन्हेगारांची प्रगती व पोलिसांची अधोगती यांची जणू स्पर्धाच गोव्यात सुरू आहे. चोरांनी पोलिसांनाच बदडण्यापासून अध:पतनाची अहमहमिका सुरू राहिली. ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणी तर सत्य शोधण्याऐवजी लपवण्याकडेच कल होता. पूजा नाईक स्वत: एका मंत्र्याची व दोघा उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची नावे घेत राहिली.

पोलिसांनी वेळेत त्याचा शोध घेण्याऐवजी, खापर पूजाच्याच माथी फोडून इतरांना क्लीन चीट दिली. पूजा नाईक एकटी एवढा मोठा घोटाळा करेल, यावर कुणाचाही विश्‍वास बसणार नाही. ‘कॅश फॉर जॉब’ हे त्यात सामील असलेल्या प्रत्येकासाठी अवघड जागीचे दुखणे आहे; सांगतही नाही आणि सोसवतही नाही.

हे जसे त्यात गुंतलेल्यांचे दुखणे होते, तसेच ते कुणीच ‘इमॅजिन’ न केलेल्या पणजी शहराचेही होते. झालेल्या व न झालेल्या कामांनी या शहराची केलेली दुर्दशा आम्ही कानीकपाळी ओरडून सांगत होतो, पण अकाली आलेल्या पावसाने ती उघडी करून दाखवेपर्यंत ती मान्य करण्याचे धाडस कुणालाच झाले नाही.

पाहावे तिथे खोदकाम करून उखडलेले रस्ते महामार्गास जाऊन मिळत असत तेव्हा त्यांची मान लाजेने खाली जात असे. तसे गुळगुळीत झालेल्या महामार्गासही डोके उंचावून सांगावे, असे काही नव्हते. अपघातांचे सत्र काही थांबण्याचे नावच घेत नाही.

अर्थात यात रस्त्यापेक्षाही बेदरकार वाहनचालकांना श्रेय अधिक द्यावे लागेल. तसे ते थोडेसे वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण न ठेवण्यासही द्यावे लागेल. या रस्त्यांमुळे शहरे वेगवान व वाहती झाली, तितकीच निष्काळजीही झाली. असुरक्षिततेने प्रत्येक नागरिक भयग्रस्त झाला. वाहतुकीचा, दळणवळणाच्या साधनांचा जेवढा प्रभावी वापर दरोडेखोरांनी पळून जाण्यासाठी केला तितका ‘गोंयकारां’ना करणे जमले नाही.

वाढत्या दरोड्यांनी जिथे शहरी माणूस धास्तावला, तिथे ग्रामीण भागातील लोक जागृत झाले. कधी नव्हे तो खाणीस विरोध ग्रामीण भागांतून होऊ लागला. अनेक पंचायतींनी ठराव घेऊन त्याविरुद्ध आवाज उठवला.

लोक रस्त्यावर उतरले. मरगळलेल्या चळवळीने ग्रामीण भागात नवसंजीवनी निर्माण केली. लोकांना आपल्या हक्कांची, अधिकारांची जाणीव झाली. डिचोली, शिरगाव येथील ग्रामस्थांत असलेली धगधग व्यक्त होऊ लागली. ‘सुशेगाद’पणा आड दडलेली ही आग आपली धग दाखवू लागली.

केवळ गोव्यालाच नव्हे तर संपूर्ण देशालाच ज्याच्या झळा बसल्या अशी आग लागली ती हडफड्यातील एका बेकायदेशीर नाइटक्लबला. मिठागरावर उभारलेल्या ‘बर्च रिमिओ लेन’ला आग लागली व त्यात २५ जीव गेले. वातावरण तप्त झाले. पण, जिथे बेकायदेशीर असलेले असे अनेक बार बंद व्हायला पाहिजे होते, त्या जागी नवे सुरू झाले.

चितेविना जिवंतपणी पेटलेल्या त्या लोकांची आग शांत होण्याआधीच मुर्दाड भ्रष्टाचाराने पुन्हा सक्रिय होण्यासाठी परवान्याची व परवानगीचीही वाट पाहिली नाही. पंच, सरपंच, अधिकारी हे लोक इतक्या कमी कालावधीत गब्बर कसे झाले, असा प्रश्‍नही कुणाला पडला नाही. दिल्लीश्‍वरांचरणी केवळ गोवाच नव्हे तर गोंयकारपणही विक्रीस काढलेल्यांकडून अपेक्षा तरी किती आणि का ठेवायच्या?

समाजकारण, राजकारण, विचारवंतांची सक्रिय चळवळ कशापासूनच काही अपेक्षा ठेवायला आता गोमंतकीय मन घाबरते. विरोधकांनी एकत्र येत सक्षम पर्याय उभा करण्याच्या जनतेच्या अपेक्षांचा भंग विरोधकांनीच जिल्हापंचायत निवडणुकीत करून दाखवला.

आता प्रतीक्षा २०२७च्या विधानसभा निवडणुकीची व त्याअनुषंगाने येत्या नववर्षात होणाऱ्या राजकीय समीकरणांची. पण, एकंदर पाहता सकारात्मक घडामोडींपेक्षाही या वर्षाची सलगी नकारात्मक गोष्टींशीच अधिक राहिली. सरत्या वर्षाचे रितेपण जाता जाता भरून राहिले. असे असले तरी बदल होण्यास वाव आहे.

जरी वरवर असे वाटत असले की गोमंतकीय समाजाच्या संवेदनाच बोथट झाल्या आहेत, तरी आत कुठे तरी ती धगधग अजून आहे, मनात खदखद आहे. गरज आहे ती योग्य वेळी प्रकट होण्याची. वेदना न जाणवण्याइतपत संवेदना बोथट होणे गोमंतकीयांच्या रक्तात नाही. गोवा ‘गोंयकारां’च्या हाती उरावा, यासाठी याच संवेदनशील जाणिवेची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'2026'चं स्वागत करा ग्लॅमरस! बागा बीचवर तमन्ना भाटिया लावणार हजेरी; असे आहेत तिकीट दर

राष्ट्रपती द्रैपदी मुर्मू चार दिवसांच्या गोवा, कर्नाटक, झारखंडच्या दौऱ्यावर; कारवार बंदरातून करणार पाणबुडी सफर

Goa News Live: ODP बायपास ते दामियान दी गोवा आणि कदंब हॉटेल ते ओकोकेरो जंक्शन दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद

Mandrem: मांद्रेतील जमिनी विकू देणार नाही! सरपंच फर्नांडिस यांचा निर्धार; भूमिपुत्रांसाठी जागा सुरक्षित ठेवण्याचे आवाहन

Goa Congress: जि.पं., विद्यापीठ निवडणुकांमुळे काँग्रेसला नवसंजीवनी! LOP आलेमाव य़ांचे प्रतिपादन; विजयी उमेदवारांचा मडगावात गौरव

SCROLL FOR NEXT