Tulsi Vrindavan Dainik Gomamtak
गोंयकाराचें मत

Tulsi Vrindavan: कधी देवता, कधी माता, तर कधी सखी; गोमंतकीय स्त्रियांच्या मनातली तुळस

Tulsi Vrindavan Tradition in Goa: गोव्यातल्या हिंदू नाना जाती-जमातींतल्या, नाना संप्रदाय आणि पंथांतल्या बहुतांश घरातल्या दारी तुळशीच्या रोपासह वृंदावन असणे गेल्या शेकडो वर्षांपासून धार्मिक आणि सांस्कृतिक संचित ठरलेले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

राजेंद्र पां. केरकर

गोव्यात पूर्वीच्या काळापासून मराठी संतांच्या अभंग रचना गायन, मनन, चिंतन करण्याची परंपरा असल्याने, त्या रचनांचा सर्वसामान्य लोकमानसावर प्रभाव पडलेला, त्यांच्या सहज आणि उत्स्फूर्तरित्या प्रकट होणाऱ्या लोकगीतांच्या ओळींतून ध्वनित होत असतो. गोव्यातल्या स्त्रिया धालो, कातयो, धिल्लो आदी उत्सवांच्यावेळी ज्या फुगड्या ओठांवरती आळवत, आपल्या नृत्यांतून त्यांचा आविष्कार घडवतात.

गोव्यातल्या हिंदू नाना जाती-जमातींतल्या, नाना संप्रदाय आणि पंथांतल्या बहुतांश घरातल्या दारी तुळशीच्या रोपासह वृंदावन असणे गेल्या शेकडो वर्षांपासून धार्मिक आणि सांस्कृतिक संचित ठरलेले आहे. त्यासाठी नाना आकारातील आणि नाना स्वरुपांतील शतकोत्तर परंपरा आणि इतिहास असलेली तुळशी वृंदावनं ही इथल्या घराच्या सौंदर्याचे, श्रध्देचे आणि मांगल्याचे प्रतीक बनलेले आहे. एकेकाळी दरवर्षी मान्सूनच्या पावसाच्या समाप्तीनंतर येणाऱ्या कार्तिक मासात परिसरात उपलब्ध असलेल्या मातीपासून तुळशीची प्रतिकृती निर्माण करून, तिला पांढरा चुना, तांबड्या कावीच्या, शेणमाती आणि अन्य नैसर्गिक रंगांनी रंगवण्याची कला दृष्टीस पडायची.

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या एकादशीचा सण साजरा केल्यानंतर द्वादशी ते पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाहाचे उत्साहाने आणि भावभक्तीने आयोजन करणे ही गोवा-कोकणातली आवश्यक परंपरा बनलेली आहे. तुळशी विवाहानंतर वर्षभर घरात जे सण उत्सव साजरे केले जातात, त्यात तुळशीचे स्मरण , पूजन केले जाते . पूर्वीच्या काळी सकाळी उठल्याबरोबर सुवासिनी दारातल्या वृंदावनात असलेल्या तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करून, तिच्या संदर्भातल्या ओव्यांचे गायन करायच्या .

पहिली माझी ओवी गं

दारातल्या तुळशीला ....

काही ठिकाणी वृंदावनी असलेले हिरव्यागार तुळशीचे रोप म्हणजे परमेश्वराचे रूपच मानले जाते आणि त्यासाठी सुवासिनी म्हणतात -

दारी तुळस हिरवीगार

तिला माझा नमस्कार ... .

तुळशी वृंदावनासंदर्भात गोवा, कोकणात जी लोकगीतं, ओव्या प्रचलित आहेत ,त्याला वारकरी संतांच्या भक्तीरसपूर्ण रचनांचे महत्त्वाचे योगदान कारणीभूत ठरलेले आहे.

तुळसीविण ज्याचे घर ।

ते तंव जाणावे अधोर ।

तेथे वसती यम किंकर ।

असे संत नामदेवाने म्हटलेले आहे तर त्यांची शिष्या जनाबाई यांनी -

तुळशीचे बनी ।

जनी उकलीत वेणी ।

असे म्हटलेले आहे. तर संत एकनाथ महाराजाना तुळशी वृंदावनाचे परंपरेने चालत आलेले महात्म्य समजलेले असल्याने त्यांनी आपल्या रचनेत -

धन्य तुळशीचा महीमा ।

नाही आणीक उपमा ।

असे नमूद केलेले आहे. गोव्यात पूर्वीपासून मराठी संतांच्या अभंग रचनांचे चिंतन करण्याची परंपरा असल्याने, त्यांचा लोकमानसावर प्रभाव दिसतो. स्त्रिया धालो, कातयो, धिल्लो आदी उत्सवांच्यावेळी ज्या फुगड्या ओठांवर आळवत, नृत्याविष्कार घडवतात, त्यात तुळशीची हमखास फुगडी अनुभवायला मिळते.

दारातले तुळशी गे पानान पान फुलशी

गळ्यातल्या मण्यासाठी किती लोक वनवासी

आपल्या दारात असणारी तुळस आणि तिला धारण करणारे वृंदावन गोव्यातल्या स्त्रियांनी आपल्या भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक मानलेले आहे आणि असे असले तरी इथल्या कष्टकरी स्त्रियांसाठी ही तुळस त्यांची जीवाभावाच्या सखीच्या रूपातही अवतीर्ण होते. त्यासाठी आपल्या हृदयीच्या भावभावना त्या तिच्यासमोर अभिव्यक्त करतात . फिरत्या जात्यात धान्याचे दाणे आपल्या हातातून अलगदपणे घालत असताना स्त्रिया, आपल्या ओठांवर पारंपरिक लोकगीताच्या रचना घोळवत गाऊ लागतात

तुळस म्हणे माता असे जंगलात

श्रीकृष्ण देवाने आणली अंगणात

सेवा सारी करी राधिका बाई

सकाळी उठोनी गुंतियली कामा

विसरले रामा तुळशीक रेवों काडूक . . . .

या लोकगीतातून कष्टकरी स्त्रियांचे तुळशी वृंदावनाशी असलेले ऋणानुबंध पहायला मिळतात. सकाळी उठल्यावर सडा संमार्जन करणाऱ्या स्रिया तुळशी वृंदावनाची साफसफाई करणे आणि रोपाला पाणी अर्पण करणे दैनंदिन कामाचा अविभाज्य घटक समजतात.

आज तुळशीचे रोप धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमुळे तसेच पवित्र वृंदावन लोकमानसाचे श्रध्देचे केंद्र बनलेले आहे. परंतु कधीकाळी ही तुळस रानात होती, पारंपरिक कथेनुसार ही तुळस, श्रीकृष्णाने वृंदावनी आणली आणि देवतेचे स्थान प्रदान केले.

रानी नी गे वनी एक तुळस माता

एक नार सवायसीण कृष्णाची राधा

गेली गेली गेली गे राधा गंगेच्या पाण्याला

गंगा माता धन्य होई, राधा येई स्नानी .....

अशा लोकगीतांतून प्रत्यक्ष कृष्णाच्या राधेने ही तुळशी वृंदावनाचे भजन, पूजन कसे केले त्याची महती मांडलेली आहे.

तुळशीला पाणी घाली । तुळस कोवळी

पुत्र मागते सावळी । उषाताई

तुळशी ग बाई । तुझा जन्म रानीं वनीं

बैस अंगणात । जागा देते वृंदावनीं

तुळशी ग माये । तुझ्या मंजुळ्या झळकती

तेथे कृष्णनाथ खेळती । सारीपाट

काशी काशी म्हणून । लोक जाती ग धावत

काशी माझ्या अंगणात । तुळसा देवी

तुळशी ग बाई । तुझी कातर कातर पाने

येता जाता गोविंदाने। विडा नेला

गोवा-कोकणातल्या स्त्रियांना तुळस आणि तिचे वृंदावन जशी सर्वश्रेष्ठ देवता भासते तसेच तिच्यात त्यांना वात्सल्यसिंधू मातेचे रूप ही अनुभवायला मिळाले आणि त्यासाठी त्यांच्या जीवनात त्यांनी तिला देवता,माता, सखी अशा नाना रुपांत पाहिली आणि तिच्यासमोर व्यक्त होण्यात धन्यता मानली. तुळशीला लक्ष्मीची मैत्रिण म्हणून लोकमानसाने जशी मानली, तशीच तिला पापहारिणी, पुण्यप्रदा आणि शुभदायिनी म्हणून पाहिलेली आहे. त्यामुळे तुळशीच्या रोपाखालची माती मस्तकी लावणे, सर्व देवांच्या पूजेत तुळशी पत्र अर्पण करणे इष्ट मानलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sandpapergate Scandal: 'उस्मान ख्वाजा सर्वात मोठा गद्दार', सँडपेपरगेट प्रकरणावरुन डिव्हिलियर्सचा संताप; क्रिकेटची बदनामी केल्याचा आरोप

Goa Spice Cultivation: जायफळ, वेलची, काळी मिरीला बाजारात मागणी; गोव्यात मसाला पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Accident News: दोन महिन्यांपूर्वी घेतली कार, 100च्या स्पीडमध्ये 20 फूट हवेत उडून झाडावर आदळली… भीषण अपघातात 7 तरुणांचा मृत्यू

Mohammed Siraj Selection: मोहम्मद सिराजला प्लेइंग-11 मधून वगळण्यावरुन राजकीय वादंग! काँग्रेस नेत्याने तोडले तारे; म्हणाले, 'नावामुळे भेदभाव...' VIDEO

Under 16 Cricket: गोव्याचा पहिला डाव 97 धावांत आटोपला; कर्नाटकने पहिल्याच दिवशी 127 धावांची आघाडी घेत वर्चस्व गाजवले

SCROLL FOR NEXT