Konkani Films Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Konkani Films: मोफत असूनही प्रेक्षक नाहीत; मग 'कोकणी चित्रपट' तिकीट काढून कोण पाहणार?

Goa state film festival: दहावा, अकरावा व बारावा अशा तीन महोत्सवांना एकत्र बांधून केलेला राज्य महोत्सव एकदाचा पार पडला. ‘एकदाचा’ अशा करता, की हा महोत्सव म्हणजे फक्त औपचारिकता वाटली. ’चट मंगनी पट ब्याह’ यातला प्रकार वाटला.

Sameer Amunekar

या महोत्सवात तरी सगळे अगदी ’फेस्टिव मूड’मध्ये असल्यासारखे वाटत होते. मूळ दुखण्याची कोणाला जाण आहे, असे दिसलेच नाही. यामुळे ’दहा पैशांची कोंबडी आणि रुपयाचा मसाला’ हेच या महोत्सवाचे खरे कवित्व!

दहावा, अकरावा व बारावा अशा तीन महोत्सवांना एकत्र बांधून केलेला राज्य महोत्सव एकदाचा पार पडला. ‘एकदाचा’ अशा करता, की हा महोत्सव म्हणजे फक्त औपचारिकता वाटली. ’चट मंगनी पट ब्याह’ यातला प्रकार वाटला. कोणाला काही कळण्याआधीच महोत्सव संपूनसुद्धा गेला. त्यामुळे उद्घाटन सोहळ्यासकट बहुतेक चित्रपटांना उपस्थिती अगदी कमी होती.

दोन दिवसांपूर्वी झालेला मराठी चित्रपट महोत्सव व त्यातील चित्रपटांना झालेली गर्दी पाहता हा राज्य महोत्सव एकदम ’फ्लॉप शो’ वाटला. एक-दोन चित्रपट वगळता इतर चित्रपट रिकाम्या खुर्च्यांना दाखवावे लागले. यातूनच आजच्या गोमंतकीय चित्रपटांची स्थिती अधोरेखित होते.

चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ व त्यांचे जवळचे वगळता सर्वसामान्य प्रेक्षक या महोत्सवाकडे फिरकलेले दिसले नाहीत. अगदी मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो यांनी महोत्सव विनामूल्य आहे प्रेक्षकांनी यावे, असे आवाहन करूनसुद्धा बहुतेक चित्रपटांना लोक आले नाहीत. ही गोमंतकीयांची गोमंतकीय चित्रपटांविषयीची अनास्था फार घातक आहे. याला काही अंशी मनोरंजन संस्था आणि तिचे ढिसाळ आयोजनही जबाबदार आहे.

महोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी मला मनोरंजन संस्थेतून उद्घाटन व समारोप सोहळ्याच्या तुमच्या पासेस तयार आहेत त्या घेऊन जाव्या असा फोन आला. त्यावर मी त्या बाईंना ‘तुम्ही पासेस घरपोच का पाठवले नाही?’ असा प्रश्न केला. यावर त्या बाईंनी घाई झाल्यामुळे या पासेस पाठवू शकलो नाही, असे उत्तर दिले. आता घाई कसली, हे मात्र मला कळले नाही. दोन अडीच महिन्यांपूर्वी हा महोत्सव जाहीर झाला असताना निमंत्रण पत्रिका पाठवायला वेळ कसा मिळाला नाही, याचे उत्तर मिळू शकले नाही. योग्य नियोजनाचा अभाव एवढाच ढोबळ अर्थ यातून काढता येतो.

चटावरील श्राद्धासारखा हा महोत्सव उरकून घेण्यात आला. अगदी समारोप सोहळ्यातच बक्षीस वितरण उरकून घेण्यात आले. वास्तविक बक्षीस वितरण नंतर एका खास समारंभात करण्यात येते. पण घाई गडबडीने हे बक्षीस वितरण उरकण्यात आले. त्यामुळे एका पुरस्काराला तीन नामांकन(नॉमिनी) जाहीर करणे या नेहमीच्या महोत्सवातील प्रकाराला फाटा देण्यात आला.

आता कोणाला पुरस्कार मिळाले? हे पुरस्कार योग्य व्यक्तीला वा योग्य चित्रपटाला मिळाले की नाही, हा मुद्दा इथे गौण आहे. इथे महत्त्वाचा मुद्दा आहे तो गोव्यातील चित्रपट क्षेत्र तगणार की नाही, हा! जीवन गौरव पुरस्कार मिळालेल्या प्रख्यात अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी, ‘कोकणी चित्रपट तिकीट काढून बघा!’, असे प्रेक्षकांना आवाहन केले असले तरी जिथे मोफत असूनसुद्धा चित्रपटांना गर्दी होत नाही तिथे तिकीट काढून येणार तरी कोण, हा प्रश्न निर्माण होतोच.

तसे पाहायला गेल्यास लोकांच्या दृष्टीने या पुरस्कारांना विशेष महत्त्व नसतेच. लक्ष्मीकांत शेटगावकर यांचा ‘पलतडचो मनीस’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार प्राप्त नितांत सुंदर चित्रपट. पण गोव्यात जेव्हा तो प्रदर्शित झाला तेव्हा त्याला कमी प्रतिसाद मिळाला. ‘तियात्र गोव्यात चालतात, तर कोकणी चित्रपट का चालू शकत नाही?’ हा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. पण तियात्र हा कलेचा एक वेगळा प्रकार असल्यामुळे त्याचा एक ठरावीक आणि मुख्य म्हणजे या कलेशी प्रामाणिक असलेला प्रेक्षकवर्ग गोव्यात आहे.

पण कोकणी चित्रपटांचे तसे नाही. त्यांची तुलना मराठी व हिंदी चित्रपटांशी केली जाते आणि तिथे आमचा कोकणी चित्रपट कमी पडतो. त्याकरता कोकणी चित्रपटांना आयनॉक्ससारखी चित्रपटगृहे उपलब्ध करून देणे, हे चित्रपट माफक दरात दाखविणे, त्यांची योग्य प्रसिद्धी करणे, असे उपाय सरकारने करायला हवेत. पण तसे होताना दिसत नाही.

किंबहुना तसा विचारही केला जात नाही. लक्षात घ्या, जोपर्यंत स्थानिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालणार नाहीत तोपर्यंत या चित्रपटांना भवितव्य नाही. आता सरकारने चित्रपटांकरता ५० लाख, ३० लाख व १० लाख असे असे तीन श्रेणीत अनुदान देणार असल्याचे जाहीर केले आहे. पण हे चित्रपट निर्माण झाल्यावर ते तिकीट बारीवर कसे चालतील यावर त्यांनी काय निर्णय घेतला आहे, हे मात्र कळलेले नाही.

जर चित्रपट लोकांपर्यंत पोहोचत नसतील वा लोक हे चित्रपट बघायला येत नसतील तर मग चित्रपट निर्मितीला अर्थ तो काय राहिला? त्याचबरोबर राज्यात ‘फिल्म कल्चर’ नाही असे म्हणणे धाडसाचे ठरू शकेल. गोव्यात हिंदी चित्रपट धो धो चालत असताना ‘फिल्म कल्चर’ नाही असे कसे म्हणता येईल? मात्र गोव्यात ‘कोकणी चित्रपट कल्चर’ नाही एवढे निश्चित.

म्हणूनच तर आपल्या प्रेक्षकांना स्थानिक चित्रपटांबाबत रसच राहिलेला दिसत नाही. पूर्वी गोव्यात अशी स्थिती नव्हती. त्यावेळी कोकणी चित्रपटसुद्धा यशस्वी होत असत. ‘निर्मोण’, ‘मजी घरकान’, ‘बोगलाट’, ‘भुंयारातलो मनीस’ यांसारख्या अनेक कोकणी चित्रपटांनी हिंदी चित्रपट स्पर्धेत असूनसुद्धा त्या काळात चांगला व्यवसाय केला होता. ‘निर्मोण’वरून तर राजश्री प्रॉडक्शनने ‘तकदीर’ हा हिंदी चित्रपट निर्माण केला होता.

पण आज गोमंतकीय आपल्याच चित्रपटांपासून दूर जायला लागले आहेत. आता या महोत्सवाचेच उदाहरण घ्या. अनेक जणांना असा महोत्सव राजधानीत सुरू आहे हे माहीतही नव्हते. आणि ज्यांना माहित होते त्यांपैकी अनेक जण ‘कोकणी चित्रपट ते बघायचे तरी का?’ अशी प्रतिक्रिया देताना दिसत होते.

आता या वास्तवावर ‘शल्यचिकित्सा’ करणे आवश्यक ठरते. पण ही शल्यचिकित्सा फक्त सोहळे साजरे करून होणे शक्य नाही. त्याकरता सकारात्मक दृष्टिकोन हवा. केवळ सरकारनेच नव्हे तर राज्यातील सिनेकर्मींनीही हा दृष्टिकोन आत्मसात करायला हवा.

पुरस्कार मिळाले म्हणजे सर्व काही मिळाले, अशा गोड भ्रमात सिनेकर्मींनी राहता कामा नये. पण या महोत्सवात तरी सगळे अगदी ’फेस्टिव मूड’मध्ये असल्यासारखे वाटत होते. मूळ दुखण्याची कोणाला जाण आहे, असे दिसलेच नाही. यामुळे ’दहा पैशांची कोंबडी आणि रुपयाचा मसाला’ हेच या महोत्सवाचे खरे कवित्व!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माउथ ऑर्गनवर वाजवली राष्ट्रगीताची धून; प्रतापसिंग राणेंचा 'हा' व्हिडीओ सध्या होतोय Viral

India vs Pakistan: क्रिकेट चाहत्यांसाठी गुड न्यूज! भारत-पाकिस्तान यांच्यात होणार महामुकाबला, आशिया कपमधील लढतीला भारत सरकारचा ग्रीन सिग्नल

Nigeria Mosque Attack: नमाजावेळी मशिदीवर गोळीबार; 50 जण ठार, 60 जणांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

Assagao Incident: उघड्या विहिरीत पडून 54 वर्षीय व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू, आसगावातील धक्कादायक घटना; स्थानिकांमध्ये संताप

Asia Cup 2025: ‘त्यानं आणखी काय करायला हवंय?’; आशिया कपसाठी मुलाची निवड न झाल्यानं श्रेयस अय्यरच्या वडिलांचा संताप!

SCROLL FOR NEXT