Devrai in Goa Dainik Gomatnak
गोंयकाराचें मत

Devrai in Goa: कुडशेच्या देवराईत गजलक्ष्मी स्वरूपातल्या केळबाय देवतेची महाकाय मूर्ती, देवराईंमुळेच घडलेले गोव्यातील वृक्षसंवर्धन

Sacred Groves of Goa: देवरायांच्या माध्यमातून वृक्षवेलींचे नव्हे तर त्यातल्या समस्त जैविक संपदेच्या घटकांसोबत निर्जीव घटकांनाही संरक्षण देण्याची कामगिरी स्थानिक जंगलनिवासी लोकसमूहाने केली होती.

राजेंद्र केरकर

आज गोवा राज्य देश विदेशातल्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरले आहे. असे असले तरी आपल्या पूर्वजांनी वृक्षवेलींच्या सान्निध्यात जीवन जगत असताना देवाच्या नावाने घनदाट जंगलांनी समृद्ध वनराईच्या संरक्षणाला आणि संवधर्नाला प्राधान्य दिले होते.

अशा देवराया गोव्यातल्या पेडणे ते काणकोणपर्यंतच्या लोकमानसाने श्रद्धा आणि भक्तीच्या माध्यमातून राखून ठेवल्या होत्या. आज त्यातल्या बऱ्याच देवराया तेथे बांधल्या जाणाऱ्या सिमेंट कॉंक्रीटच्या मंदिरांमुळे तसेच रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या उभारणीमुळे विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहेत.

दिव्य देह धारण करणारा देव या संज्ञेला प्राप्त असून ती दिव्य अशी शक्ती अदृश्य रूपाने सर्वत्र संचार करते आणि भक्ताची श्रद्धा-भक्ती उत्कट झाल्यास ती दृश्य स्वरूपात अभिव्यक्त होते, अशी लोकधारणा रूढ आहे.

मानवाला त्याच्या आदिम अवस्थेत देवतांचा साक्षात्कार झाला असावा. कालांतराने मानव जसजसा विचाराने आणि भौतिक मृद्धीने प्रगती करू लागला, तसतशी या देवतांतूनच धर्माची उत्पत्ती झाली आणि त्यातून विविध तत्त्वज्ञाने उगम पावली.

माणसाला त्याच्या भोवतालच्या पंचमहाभूतांचे जे भय वाटले, त्या भयातूनच देव तत्त्वाचा जन्म झाला. वादळी वारे, विद्युत्पात, मेघगर्जना, भूकंप, महापूर, अतिवृष्टी, अनावृष्टी है नैसर्गिक उत्पात पाहताना व अनुभवताना माणसाला वाटले की या कोणीतरी प्रचंड शक्तीच्या देवता आहेत आणि आपण त्याच्यासमोर तोकडे आहोत.

त्या देवतांनी आपले अहित, अशुभ करू नये, यासाठी मानवाने त्या देवतांच्या पुढे नतमस्तक होऊन, त्यांची प्रार्थना आरंभिली प्राथमिक अवस्थेतल्या मानवाने ज्या ठिकाणी वसाहत केली, त्याच ठिकाणी आपल्या संरक्षक देवतेचीही कल्पना करून तिची आराधना व बलिदान यांच्यासाठी गावाबाहेर एक जागा ठरवून टाकली.

गावाबाहेर एखाद्या मोकळ्या जागी किंवा वृक्षातली गडगा देवस्थान सूचित करत असे. वृक्षवेलींनी समृद्ध जागेत कधी गडगे तर कधी वेगवेगळ्या आकारातले दगड ठेवण्यात येऊ लागले. वर्षातून काही ठरावीक दिवशी अशा जागेत प्रार्थना करण्यासाठी भाविक जाऊ लागले.

देवाचे वसतिस्थान असलेल्या अशा जंगलांना कुठे ’देववन’, ’सास्ता’, ’सर्पकवू’, ’देवराकडू’ अशा विविध नावांनी संबोधण्यात येऊ लागले. मानवाच्या प्राथमिक अवस्थेत तो निसर्गातल्या दगड, डोंगर, वृक्ष, नदी, पशू व पक्षी यांना त्याचप्रमाणे विविध शक्तींना देव मानीत होता.

त्याची बुद्धी विकसित झाल्यावर त्याच्या मनात दैवी किंवा दानवी शक्ती संदर्भातील निश्चित कल्पना जन्माला आली आणि त्या कल्पनांना स्वरूप प्रदान केले. त्यातून दगड, लाकूड, धातू आदी घटकांपासून आपल्या आराध्य दैवतांच्या मूर्ती साकारण्याची परंपरा निर्माण झाली.

गोवा-कोकणातल्या काही भारतीय लोकमानसात मूर्तिपूजेच्या संचितांसाठी देवराया देवदेवतांच्या मूर्तीसाठी ख्यात असून, सह्याद्रीतल्या काही गावांत मूर्तींनी युक्त देवालये आहेत. देवराईच्या सांनिध्यात गावे वसलेली असल्याने तिथले लोक धार्मिक आणि सांस्कृतिक बाबींसाठी अशा देवरायांशी निगडित होते.

सत्तरीत म्हादई अभयारण्यात साटरे, देरोडे आणि कोदाळ येथील गावकरी अर्धशतकापूर्वी देवरायांच्या सांनिध्यात राहत होते. त्यांचे जुने गाव देवरायांच्या सांनिध्यात असल्याने त्यांना तिथल्या वृक्षवेली, पशुपक्ष्यांविषयीची आत्मीयता होती.

या गावातल्या लोकांनी आपल्या जुन्या वसतिस्थानाचा त्याग करून शिक्षण, उद्योगधंद्यांनिमित्त सोयीस्कर ठरणाऱ्या नव्या जागी स्थलांतर केले आणि देवाधर्मासाठी वारंवार देवराईतल्या देवदेवतांचे भजन, पूजन करण्यास जाणे कठीण ठरत असल्याने नव्या लोकवस्तीजवळ देवालयांची उभारणी केली.

सिमेंट कॉंक्रीटची अशी देवालये गावी उभी राहिली असली तरी ग्रामदैवत आणि पंचायतनातली दैवते यांच्या पाषाणी मूर्ती देवरायांतून आजतागायत स्थलांतरित करण्यासाठी धजलेले नाही.

त्यामुळे साटरे गावातल्या देवराईत महिषासुरमर्दिनीच्या रूपातली सातेरी, गडालक्ष्मीच्या रूपातली केळबाय, दोन्ही बाजूंना फणाधारी नाग असलेली ब्राह्मणी आदी देवतांच्या सुंदर मूर्ती तिथं पाहायला मिळतात. वर्षातून ठरावीक सण उत्सवाच्या प्रसंगी गावकरी देवराईतल्या मूर्तीचे पूजन करण्यासाठी भेट देतात.

देरोडे गावातल्या लोकांनी देवराईपासून अगदी हाताच्या अंतरावरती वास्तव्य करण्यास प्राधान्य दिल्या कारणाने आणि सातेरी आणि केळबाय यांच्या मूर्ती देवराईतच ठेवल्याने देवकार्यासाठी गावकरी देवराईत जातात.

कोदाळ गावात गावकऱ्यांनी नवे मंदिर बांधलेले असले तरी त्यांच्या सातेरी, केळबाय, ब्राह्मणी त्याचप्रमाणे नंदी-शिवलिंग आदी मूर्ती देवाचो ’हुडो’ इथे आहेत. सत्तरीत असलेल्या कुडशे गावातील देवराई आज बागायतीच्या विस्तारात आपले अस्तित्व हरवत चालली आहे.

आंबा, भेरली भाड यासारखी काही मोजकी वृक्षसंपदा वगळता अन्य जैविक संपत्ती नाममात्र शिल्लक राहिली आहे. कुडशेच्या देवराईत गोव्यातली गजलक्ष्मी स्वरूपातल्या केळबाय देवतेची महाकाय मूर्ती आहे.

दोन्ही हातात कमळांचे कळे धारण केलेली ही देवी ध्यानमुद्रेत आसनस्थ असून दोन्ही बाजूंना लक्ष्मीच्या मस्तकी जलकुंभाद्वारे अभिषेक करणारे आभूषणांनी युक्त हत्ती चित्रित केलेले आहेत. खांद्यावर पाण्याने भरलेले कुंभ, हाताने मृदंगासारखी लोकवाद्य वाजवणारे लोककलाकार याची मिरवणूक असून स्त्री-पुरुषाचे शारीरिक मीलन दाखवलेले आहे.

दोन बाजूला गोव्यात प्रामुख्याने आढळणाऱ्या माडाची चित्रे आहेत. आजपर्यंत ज्या गजलक्ष्मीच्या मूर्ती आढळलेल्या आहेत, त्यातली ही मूर्ती शिल्पकाराच्या अत्युच्च कलागुणांचा आविष्कार घडवते. म्हादई नदीच्या उजव्या तीरावर वसलेल्या या देवराईतल्या गजलक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असावेत.

आपल्या आराध्य देवतेची पाषाणी मूर्ती कोणत्याच छपराविना देवराईत स्थापन करण्याची परंपरा निर्माण झाली आणि अशा देवरायांच्या माध्यमातून वृक्षवेलींचे नव्हे तर त्यातल्या समस्त जैविक संपदेच्या घटकांनाच नव्हे तर निर्जीव घटकांनाही संरक्षण देण्याची कामगिरी स्थानिक जंगलनिवासी लोकसमूहाने केली होती.

आपल्या आराध्याचा अधिवास सिमेंट कॉंक्रीटच्या चार भिंतीत बंदिस्त नसून, तो देवराईतच आहे आणि त्यामुळे तेथील वृक्षवेलींचे आत्मीयतेने रक्षण न करता, त्यांची तोड केली तर दैवताचा प्रकोप होऊन आपणावर नुकसानीला सामोरे जाण्याची पाळी येईल, असे त्यांना वाटायचे.

त्यामुळे अशा देवराया बराच काळ सुरक्षित राहिल्या आणि जंगली श्वापदांसाठी आश्वासक आश्रयस्थान ठरल्या होत्या. आज त्यातल्या काही देवराया कधीच नष्ट झाल्या, तर काहींची स्थिती विकल झालेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tridashanka Yoga 2026: 26 जानेवारीला आकाशात मोठा चमत्कार! बुध-अरुणचा 'त्रिदशांक योग' पालटणार 4 राशींचं नशीब; सोमवार ठरणार भाग्याचा

Shri Shantadurga Jatra: श्री शांतादुर्गा देवी ही केवळ कुलदेवता नसून, ती शांती, समन्वय आणि करुणेची मूर्तिमंत अनुभूती आहे..

टेक्नॉलॉजीचा गैरवापर की अश्लीलतेची फॅक्टरी? एलन मस्कचा 'Grok AI' वादाच्या भोवऱ्यात; 11 दिवसांत बनवले 30 लाख आक्षेपार्ह फोटो

प्रेमाचा सापळा आणि मृत्यूचा खेळ! एकाच कुटुंबातील चौघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा; इभ्रतीसाठी क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्यांना दणका

Viral Video: कोकणी गाण्यावर आजीबाईचा तूफानी डान्स, लॉर्ड बॉबीला पाडलं फिकं; नेटकरी म्हणाले, ''आज्जी तुम्ही रॉकस्टार!"

SCROLL FOR NEXT