Shigao: सफर गोव्याची! दूधसागर नदीच्या तीरावर वसलेले, सदोदित हिरवाईने नटलेले 'शिगाव'

Shigao Village Goa: देशी-विदेशी पर्यटकांना वर्षभर सुखावणारा शुभ्र दुधाप्रमाणे फेसाळत कोसळणारा दूधसागर धबधबा, या सुंदर परिसराचे सौंदर्य कायम खुलवित आहे.
Shigao Village Goa
Shigao Village GoaDainik Gomantak
Published on
Updated on

दूधसागर धबधब्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला व जागतिक पर्यटनाच्या नकाशावर दिमाखाने मिरवणारा, निसर्गाची मुक्तहस्ताने उधळण झालेला माझा निसर्गसंपन्न टुमदार गाव म्हणजे शिगाव.

‘माझ्या गोव्याच्या भूमीत

गड्या नारळ मधाचे

कड्याकपारीमधोनी

घट फुटती दुधाचे...!’

या कविवर्य बा. भ. बोरकरांच्या काव्यपंक्ती माझ्या सर्वांगसुंदर सदोदित हिरवाईने नटलेल्‍या शिगाव गावाला तंतोतंत लागू पडतात. बारमाही संथ वाहणाऱ्या जीवनदायी दूधसागर नदीच्या तीरावर हे गाव वसलेले आहे.

आकाशाशी स्पर्धा करणारी घनदाट वनराई, हिरव्यागार डोंगरकपारी, देशी-विदेशी पर्यटकांना वर्षभर सुखावणारा शुभ्र दुधाप्रमाणे फेसाळत कोसळणारा दूधसागर धबधबा, या सुंदर परिसराचे सौंदर्य कायम खुलवित आहे.

निसर्गाची ही अभूत किमया पाहून निसर्गप्रेमी आश्चर्याने थक्क होऊन जातात. गेली अनेक दशके झालेल्या बेसुमार खनिज उत्खननामुळे या नैसर्गिक सौंदर्याला काही प्रमाणात गालबोट लागले होते. खनिजमाती नदीच्या पात्रात तसेच शेतात घुसून पाणी, शेतजमीन प्रदूषित होत होती. आता खाण व्यवसाय बंद असल्याने पर्यावरणाची हानी थांबली आहे.

१९८० च्या दशकापर्यंत या निसर्गरम्य खेडेगावात मुलभूत साधन सुविधांची प्रचंड कमतरता होती. वैद्यकीय तसेच वाहतुकीच्या, माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या. वीज नव्हती.

Shigao Village Goa
Taravale: सफर गोव्याची! गणेशचतुर्थीला घुमटच्या नादात तेजोमय होणारे, निसर्गरम्य असे ‘तरवळे’

त्याकाळी ज्याच्याजवळ सायकल आहे, त्याच्याकडे आदराने पाहिले जात असे. हा गाव खनिज पट्ट्यात येत असल्याने बहुतांश लोकांना खाणीवर कनिष्ठ श्रेणीचा रोजगार प्राप्त झाला होता. खनिज खाणी बंद पडल्याने अनेकांना रोजगाराला मुकावे लागले आहे. अनेकजण शेती व्यवसायाकडे वळले असून, शेतात राबत आहेत.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन नियोजनबद्ध शेती, दूग्ध व्यवसाय करत आहेत. आपल्या शेतात विविध पद्धतीने पिके घेऊन चांगले उत्पन्न मिळवत आहेत.

Shigao Village Goa
Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

सर्वाना एकत्र आणणारा शिंगाव-कुळे येथील शिमगोत्सव प्रसिद्ध आहे. सुवारीवादनाच्या तालावर दुरिंग (होळी) उभारणीला सुरवात होते. या होळीवर चढण्यासाठी लागलेली स्पर्धा पाहण्यासारखी असते. हा सोहळा पाहण्यासाठी राज्यातील हजारो लोक येथे जमतात. ओव्यातच गावा असा आजही माझा ‘शिगाव’ गाव आहे.

ॲड. सुभाष पंढरी देसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com