मधू य. ना. गावकर
आजचा माझा प्रवास केरी गावच्या विजयादुर्गा परिसरातील आमाडी, आमरसगे आणि सावईवेरेचे वेलकाशी भागातून वाहणाऱ्या ओहोळाच्या काठाने सुरू झाला. त्या ओहोळाचा उगम आमाडी आणि भुताकेट डोंगरामधील कायली फातर या ठिकाणी होतो व खालच्या भागात पाणी पुरवण्यास तो सरसावतो.
आमाडीचा उंच पाषाणी डोंगर, मधला भुताकटे डोंगर आणि तिसरा पोकळतेंब भुतखांब पठाराचा उत्तर बाजूचा भलामोठा उंच कठडा. या तीन डोंगरांनी आमाडी परिसर निसर्गत: त्रिकोणी, खोल, लांब, रुंद घळी बनतो. या नैसर्गिक ओहोळाने हजारो वर्षांपासून जैवविविधतेला जतन केली आहे. अशा त्या उंचावरील त्रिकोणी घळीत ओहोळच्या उगमाकडून साधारण दोन अडीच किमी खालच्या भागात तिथल्या पूर्वजांनी तळ्याच्या खालच्या भागातील केरी आमरखणे आणि वेऱ्याच्या वेलकाशी भागातील ओहोळाच्या दोन्ही काठावरील उतरणीवर कुळागरे उभारली.
या कुळागर-बागायतीला पाणी पुरवठा व्हावा यासाठी भुताटके आणी पोकळतेंब या डोंगराच्या घळीत भल्यामोठ्या तळ्याची निर्माती केली. वरून येणारे तीन डोंगराचे पाणी त्या तळ्यात साठवले. तळ्याच्या खालच्या भागात (खाण) भलामोठा बांध उभारला. त्या बांधाच्या खालच्या भागात ओहोळातील पाणी पाटाच्या साहाय्याने कुळागरांत पोहोचवले. या सिंचन व्यवस्थेच्या बळावर सुपारी, नारळ, आंबा, फणस, केळी, काजू, ओटम, कोकम, तिखट मिर्ची, जाम, मावळींग, जायफळ, तोरींग आदींच्या लागवडीने हा परिसर फुलवला.
या ओहोळाच्या माथ्यावरील डोंगराच्या कुशीत बिबटा, रानडुक्कर, गवे, ससा, मेरू, रानमांजर, घोरपडी, मुंगूस, सरपटणारे प्राणी, मुंग्यांची वारुळे, कृमी कीटक, मधमाश्या, अनेक प्रकारचे पक्षी या साऱ्या निसर्गघटकांची साखळी तयार झाली.
मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले पाणी व अन्न, चारा हे त्यामागचे मुख्य कारण. पावसाळ्यात या ओहोळातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. त्यावेळी ओहोळात घातलेला खाणीचा बांध उघडा करून तळ्यातील पाणी खालच्या ओहोळात सोडतात. पावसाळ्यात त्या तीन डोंगराच्या जमिनीत मोठ्या प्रमाणात वारुळांना अळंबी फुलतात. अळंबी उगवून फुलल्यानंतर त्यात किडे, अळी मोठ्या प्रमाणात तयार होतात. फुललेली अळंबी अळ्या नष्ट करतात. त्या किड्यांना खाण्यास वारुळात नागसर्प ठाण मांडून बसतात. यावरूनच ‘आयत्या बिळात नागोबा’ हा वाक्प्रचार तयार झाला आहे.
ओहोळाच्या काठावर, सुवासिक केवडा, बकुळी, सुरंग, सप्तपर्णी, जाम, जांभूळ, अननस, आंबा या झाडांच्या फुलाफळातील मध खाण्यासाठी मधमाश्या, कृमीकीटक आणि पक्ष्यांची झुंबड उडते. त्यांना खाण्यासाठी झाडावरील साप, घोरपडी मुंगूस येतात. साप, मुंगूस, घोरपडीला खाण्यासाठी गरुड पक्षी टपलेला असतो.
‘जीवो जीवस्य जीवनम्’(एक जीव दुसऱ्या जिवावर जगतो) या न्यायाने अशा ओहोळाच्या काठावरील परिसरात पर्यावरणीय अन्नसाखळी निर्माण होते. त्यासाठी आपल्या पूर्वजांनी अथक प्रयत्न केले.
पावसाळ्यात त्या परिसरात प्रवास करताना माणसाने कितीही मोठ्यांदा हाक मारली तरी खळखळणाऱ्या, फेसाळणाऱ्या पाण्याच्या आवाजासमोर ती फिकी पडते. डोंगरांच्या पठारावर अगर उतरणीवर असलेला परिसर मारट, हासण, जांबा, किंदळ, शिवण, शिसम, शिरस, कवच, पडवळ, बेल, अर्जुन, सप्तपर्णी, सावर, नाणा, पंगारा, घोटींग, कारा, खष्ट, मोय, एळंब, खैर, पाल-पणस अशा जंगली गर्द झाडांनी व्यापला आहे.
यात हुरा, बिबा कुमयो, बेल, जांभूळ, खैर, रुमड, पिंपळ, वड या वनस्पती झाडांचा मेळ आहे. त्यांच्या अंगावर, पालकाणे, गोडशेरा, अमृतवाल कात्रेवाल, उसकी, हरकूली, झिरमूळ, घोष्ट, फागल, गोडवाल अशा वेलींनी ते डोंगर सजवले आहेत. कणेर, हासाळी, चार फातरफळ, पिटकळ चुरण, करवंद, भेसड, आंबट असा पिकलेला रानमेवा, पक्षी आणि मानव यांना त्या परिसरात भरपूर मिळतो.
या जैवविविधतेला पोसण्याचे काम त्या ओहोळातील पाण्याने केले आहे. त्याच्या काठावर राहणाऱ्या पूर्वजांनी आपले जगणे आणि पुढील भविष्य घडण्यासाठी तिथल्या भूमीत आपल्या ज्ञानाच्या आधारे वेलकासच्या घळीत वर्षानुवर्षे काम केले. अमूल्य अशी भली मोठी कुळागरे तयार केलेली प्रवासात पाहावयास मिळतात.
ओहोळाचा उगम खोतको डोंगराच्या पायथ्याकडील फातर भागात होतो. तो वारच्या आमाडी भागातील गाडवस बानली आणि त्या खालच्या दोन बांधल्यात पाणी साठवून अंदाजे दोन किमी खालच्या विजयदुर्गा तळ्यात पाणी साठवतो. तिथून खालच्या भागात वाहत येत तो बांधली (खाण) तलावात येऊन ओहोळाच्या दोन्ही काठाच्या पाटाने भल्यामोठ्या उतारावरील लांबरुंद कुळागरास पाणी देतो.
टप्याटप्यांवरील सात-आठ बंधाऱ्यात आपले पाणी साठवून कुळागरांची जमीन भिजवतो. नंतर अंदाजे पाचसहा किमी खाली मावळिंगे बांधाकडील बागायतीला पाणी पुरवतो. वेऱ्याच्या बाजारातून पुढे अनंताच्या देवळासमोरून खळखळाट करत त्याच्या चरणाला स्पर्श करून पुढे जातो. पुढे डोणलूक शेतीला आणि जुव्यार भागाला पाणी देतो. कागवाळ ओहोळास मिळून थापणार मुखातून मांडवीच्या पात्रात खाऱ्या पाण्यातील क्षार कमी करण्याचा प्रयत्न करतो.
त्या ओहोळाच्या उगमाकडून प्रवास करताना आमाडी, आमरखणे आणि वेलकाशीला जाणे सोपे, पण वेऱ्याच्या सातेरी देवळाकडून मावळींगे बांध वेलकाशी आमरखणे आणि आमाडी कायली फातर उगमाकडे जाणे म्हणजे महाकर्मकठीण. पांडवांचा मंदार पर्वत सर करण्यासारखेच जणू! साधारण सहा, सात किमी पायपीट करीत वरच्या भागात जाताना राम आठवतो.
नकळत तोंडातून ‘आई’, ‘बाबा’ शब्द बाहेर पडतात. ओहोळाच्या मुखाकडे देऊळ शेत, सातेरपात, माडक, उलटे, जुवेरशेत, शेकरेबांध, कोळंब अशी सुपीक सरद-वायंगण भातशेती आहे. पूर्वजांनी त्या कसदार शेतात बैलाच्या नांगरणीने चिखल करून त्यात भात बियाणे पेरून अन्न मिळवले. त्या अन्नासोबत शेतातील खेकडे, कोंगे, ओहोळातील गोडी मासळी, मांडवीतील काळे खुबे आणि तिच्या पात्रातील खाऱ्या पाण्यातील रुचकर मासळी खाऊन तृप्त होत जगले.
आज त्या ओहोळाच्या काठाने खालच्या भागात प्रवास करताना, प्लास्टिक कचरा, काचेच्या बाटल्या आणि माती भरून वाहताना दिसते. आपल्या पूर्वजांनी जिथे सोने पिकवले, तिथे त्या शेताची आपण नासाडी केली आहे. आमच्या पूर्वजांनी नदीला बांध घालून शेती निर्माण करण्यास कैक पिढ्यांचे रक्त सांडले. ते भविष्य घडवण्यासाठी होते. त्यांनी कष्ट करीत घाम गाळला, तो स्वत:साठी हे आज आम्ही म्हणून मोकळे होतो. पण इतिहासात लक्ष घालून विचार केल्यास आणि त्यांचे काम पाहिल्यास, भविष्याला सुखाने जगण्यासाठीच त्यांनी ओहळ, झरी, तलाव, विहिरी बांधून आमच्या सुखासाठी-पाण्याची व्यवस्था केली.
कुळागरांची लागवड करून आम्हांला जगण्यास प्राणवायू दिला. पृथ्वी तापवणाऱ्या सूर्याच्या उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून मातीच्या भिंतीची घरे उभारून सुक्या झावळांनी शाकारणी करून भविष्याला विसावा ठेवला. पहाटे शेतात नांगरणी करून धान्य पिकवले ते त्यांनी खाल्ले, पण सोने पिकणारी जमीन आमच्यासाठी ठेवली.
फणस, आंबा, नारळ, काजू ही पिके घेतली त्यांचे सेवन त्यांनी आणि मुक्या प्राण्यांनी केले. पण आमच्यासाठी झाडे ठेवली. इतके करूनही आनंद मिळवण्यासाठी ओहोळाच्या काठावर धालो, फुगडी, नाटक, नृत्य, खेळून संस्कृती राखली. शिगमा, कालोत्सव, दसरा, जत्रा, चतुर्थी, दिवाळी साजरी करून एकोपा राखला. दुसऱ्यावर आलेले संकट आपले मानून त्याला मदतीचा हात दिला. हे सारे पूर्वजांचे संस्कार आणि संस्कृती आम्ही विकृत करत चाललो आहोत, ते आपल्या भविष्याला घातक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.