डॉ. नाऊ वरक
गोव्यातील १९६१नंतरचे राजकारण ‘मराठा’ आणि ‘गोवन’ या दोन सामाजिक अस्मितांनी प्रभावित केले आहे. ‘मराठा’ ही ओळख गोव्यातील कदंब आणि मराठा साम्राज्य या स्वदेशी सत्तांशी जोडली जाते, तर ‘गोवन’ ही ओळख पोर्तुगीज वसाहतवादातून निर्माण झालेला सांस्कृतिक वारसा अधोरेखित करते, असे अनेकांचे मत आहे.
या दोन ओळखींमधील संघर्षपूर्ण संबंधातून गोव्यातील वसाहतवादोत्तर राजकारण आकारास आल्याचे निदर्शनास येते. हा लेख या दोन्ही अस्मितांची चिकित्सा करण्याचा प्रयत्न करतो, तसेच त्यांच्या दैनंदिन राजकीय वापराबद्दल भाष्य करतो.
अनेक इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ आणि राज्यशास्त्रज्ञांनी ‘गोवन’ या संकल्पनेचा अभ्यास करून आपापल्या दृष्टिकोनातून तिची व्याख्या केली आहे. पोर्तुगीज राजवटीपासून ही संकल्पना शिक्षित लोकांमध्ये प्रचलित असल्याचे दृष्टीस पडते.
‘मराठा’ ही अस्मिता फारशी राजकीय दृष्टिकोनातून अभ्यासली न गेल्याचे आढळते. तिला केवळ ‘जात’ या अर्थापुरती मर्यादित केले गेले किंवा वर्णव्यवस्थेत क्षत्रिय ओळीमध्ये सोयीस्करपणे बसवले गेले. सामाजिक अस्मितांना राजकीय स्वरूप दिल्यानंतर त्या समाजोपयोगी होतात. अन्यथा त्या विशिष्ट समूहांचे सामाजिक भांडवल बनून राहतात.
‘मराठा’ आणि ‘गोवन’ या दोन्ही संकल्पनांचा राजकीय अर्थ सुस्पष्ट करणे आधुनिक समाजाच्या हिताचे आहे. ह्या दोन्ही अस्मितांचा ऐतिहासिक संगम सामाजिक दुफळी कमी करण्यास मदत करू शकतो.
इतिहासाच्या दृष्टीने पाहता, १५१०साली तिसवाडीचे पोर्तुगीज साम्राज्यात विलीनीकरण झाल्यानंतर प्रथमच या प्रदेशाला औपचारिकरीत्या ‘गोवा’ असे संबोधले जाऊ लागले. नंतर १५४३साली बार्देश आणि साष्टी हे प्रदेश पोर्तुगीज साम्राज्यात जोडले गेले.
आजचा गोवा हा पोर्तुगिजांनी अठराव्या शतकाच्या अखेरीस काबीज केलेला भूभाग होय. पोर्तुगीज राजवट प्रस्थापित होते आणि गोव्यात आधुनिकता उदयास येते, असा समज आहे. पोर्तुगीजपूर्वकालीन गोव्यातील आधुनिकतेवर फारसे संशोधन झाल्याचे आढळत नाही. भारतीय इतिहासात आधुनिकता ही ‘उसनी’ घेतलेली संकल्पना या अर्थाने वापरली गेल्याचे जाणवते.
ब्रिटिश वसाहतवाद आणि पोर्तुगीज वसाहतवाद यांमधील संघर्षात्मक इतिहासलेखन ‘गोवन’ ओळखीवरील दावे घट्ट टिकवून ठेवतात. पॉल ऍक्सेलरॉड आणि मिशेल ए. फ्युर्च यांच्या मते, पोर्तुगीज सत्तेने ‘कोमुनिदाद’ या स्वरूपात स्वतःची स्वतंत्र गावव्यवस्था निर्माण केली होती, जी ब्रिटिश भारतातील गावव्यवस्थेपेक्षा पूर्णतः वेगळी होती.
अलितो सिक्वेरा यांच्या मते पोर्तुगिजांनी गोव्यातील लोकांचे पोर्तुगीज संस्कृतीत समावेशन (अस्सीमिलेडो) केले. अलेक्झांडर हेन आणि रॉबर्ट न्यूमन यांनी पोर्तुगीज गोव्यातील समन्वयी लोकजीवनशास्त्र रेखाटले आहे.
प्रमोद काळे ‘गोवन’ ही संकल्पना पोर्तुगीजकालीन देशीवाद या अर्थाने वापरताना दिसतात. यावरून असे दिसून येते की आधुनिकतेचा उदय पोर्तुगीज राजवटीनंतर झाला.
मध्ययुगीन कालखंडातील आधुनिकतेचा वेध घेतल्यास कदंबकालीन गोवा हे अरब राज्यकर्ते तसेच अरब व्यापारी यांच्या संपर्कात होते. मध्ययुगीन गोव्यातील ‘गोवन’ या संकल्पनेचा शोध घेणे आवश्यक आहे. कदंबकालीन गोवे किंवा ओल्ड गोवा हे परदेशी व्यापारी केंद्रांशी जोडलेले एक महत्त्वाचे बंदर व शहर होते.
रणबीर चक्रवर्ती या इतिहासकाराच्या मते, कदंब राजा जयकेशी यांनी ‘नाऊ वित्तका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरब जहाजमालकांना गोवेच्या प्रशासनाची जबाबदारी दिली होती. चंद्रपूर किंवा चांदोर ही गोव्यातील कदंबांची राजधानी होती.
अकराव्या शतकात पाश्चिमात्त्य जगाशी असलेल्या व्यापारी जाळ्यांमुळे कदंब शासकांनी चंद्रपूरपेक्षा जुने गोवे या बंदराला प्राधान्य दिले. यावरून कदंब काळात ‘गोवे’ हे बहुसांस्कृतिक व वैश्विक स्वरूपाचे शहर होते, असे सूचित होते.
कदंब राजवटीशी ऐतिहासिक वारसा अधोरेखित करणारी ‘गोवन’ ओळख गोव्यातील आधुनिकतेला वसाहतवादी मोजमापातून मुक्त करू शकते. आधुनिकता इतिहासाच्या कप्प्यांमध्ये बंद करता येत नाही, ती समन्वयातून, संघर्षातून कालखंड पादाक्रांत करत असते. गोव्याच्या बाबतीत आधुनिकता ही आरंभ आणि अंत असणारी रेषा आहे.
इतिहासकार सी. ए. बेली यांच्या मते युरोपाबाहेरील समाजांनी इतिहासाच्या अनेक टप्प्यांवर वसाहतवादी सत्तांचे विचार व आचार विविध ठिकाणी आणि विविध कालखंडात आत्मसात केले.
बेली या प्रक्रियेला ‘आधुनिकतांची क्रांती’ असे संबोधतात. त्यामुळे गोव्यातील संस्कृती फक्त एखाद्या वसाहतवादी व एतद्देशीय सत्तेशी मर्यादित करता कामा नये. यादव, मुघल, विजयनगर, कदंब, मराठा अशा अनेक राजकीय सत्तासंक्रमणातून गोव्यातील आधुनिकता उदयास आलेली आहे. आधुनिकतेच्या ऐतिहासिक संशोधनातून समाजनिर्मिती आणि समाजसंवर्धन केल्यास विविध समुदायांचे सहअस्तित्व निर्माण करता येते.
जोतीराव फुलेंसाठी शिवाजी महाराजांचे मराठा साम्राज्य ही जशी एक आधुनिकता होती तसेच जातिव्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी, स्त्रीशिक्षणासाठी ब्रिटिश सरकारचा हस्तक्षेप हेही आधुनिकतेचे द्योतक आहे.
फुलेंसाठी ती स्थायी संकल्पना नव्हती. आंबेडकर जरी ब्रिटिश सरकारद्वारे समाजव्यवस्थेत हस्तक्षेप करून कुणबी, मराठा, महिला, दलितांच्या हक्कांसाठी लढले तरी त्यांच्या आधुनिकतेचा गाभारा हा प्रार्थना समाजाच्या संस्कारात दडलेला होता.
आंबेडकर आणि फुले यांनी आधुनिकतेला एखाद्या राजकीय सत्तेशी मर्यादित ठेवले नाही. ‘मराठा’ आणि ‘गोवन’ या अस्मितांकडे धार्मिक किंवा जातीय भावनेतून न पाहता आधुनिकतेच्या आरशातून पाहणे केव्हाही योग्य ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.