आपल्या मनातील आनंद आणि उत्साह याची धर्मशास्त्रींनी सांगड घालून सण, उत्सव निर्माण केले. भारतीय संस्कृतीत सर्वच बाबतीत विपुलता आहे. तशी ती सणांच्या बाबतीतही आहे. गोव्याला जसा सुंदर निसर्ग लाभला आहे, तसाच येथील सुंदर अशा पुरातन चर्च व मंदिरांनी गोव्याच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे.
अशा या प्रसिद्ध चर्च व मंदिरांतून पिढ्यानपि्ढ्या चालत आलेले उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरे होतात. गोव्यातील काही मोठ्या सण-उत्सवांपैकी पेडणे येथील दसरोत्सव. पेडणेकर या उत्सवाला ‘पुनाव’ म्हणतात.
पुनाव म्हणजे पौर्णिमा. दसरा सण भारताच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो. यंदा हा दसरोत्सव म्हणजे ‘पुनाव’ आज मंगळवार, ता.७ ऑक्टोबरला साजरा होत आहे. त्यानिमित्त...
उत्सवाची सुरवात नवरात्रोत्सवापासून घटस्थापनेने होते. घटस्थापना म्हणजे श्री भगवती देवीच्या उजव्या बाजूस मातीच्या कलशात पाणी, सुपारी, आंब्याचा टाळा व त्यावर श्रीफळ ठेवून हे सर्व मातीत ठेवतात, कलशाच्या खाली नऊ प्रकारची धान्ये टाकतात.
याला ‘रुजवण’ म्हणतात. या घटाजवळच महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या देवींच्या चौरंगावर कपडा व सुपारी ठेवून विधिपूर्वक स्थापना केली जाते. यानंतर नऊ दिवस यथे ज्योत लावली जाते व प्रत्येक दिवशी एक-एक माळ या कलशांवर सोडली जाते.
या काळात रोज सकाळी देवीवर न्हाव्यामार्फत सर्यकिरण सोडले जाते. नवरात्रोत्सवाच्या प्रत्येक रात्री देवीची पालखीतून मिरवणूक काढली जाते. पहिली पालखी देवस्थान समितीमार्फत व त्यानंतर विविध समाजांतर्फे पालखी काढली जाते.
नवमीच्या दिवशी श्री रवळनाथ मंदिरात या देवाच्या डोक्यावरील मंडपावर एक तोरण, दुसरे उजव्या बाजूच्या खांबाला व तिसरे रवळनाथ मंदिराच्या दरवाजावर बांधले जाते. तोरण बांधण्याचा हा मान सुतार व कोटकर घराण्याला आहे.
यथेूनच ढोल ताशे वाजवीत शेवटची पालखी काढली जाते, याला ‘ढोलाची पालखी’ म्हणतात. नऊही रात्रीच्यावेळी श्री भगवती मंदिरात भजन, कीर्तन व अन्य कार्यक्रम सुरूच असतात. यानंतर विजयादशमीला सुरवात होते.
या दिवशी सकाळी श्री भगवतीला अभिषेक, आरती केल्यावर देवीला गाऱ्हाणे घालून दसरोत्सवाला सुरवात होते. संध्याकाळी देवीला दागदागिने घालून सजविली जाते. यानंतर देवस्थानचे लोक व इतर भाविक ‘सोने’ लुटण्यासाठी ढोल ताशांच्या गजरात नानेरवाडा येथे जातात.
तेथे आपट्यांच्या झाडाची विधिपूर्वक पूजा केली जाते व सोने समजून आपट्याच्या झाडाची पाने लुटली जातात. ही सर्व पाने भाविक नेऊन मंदिरातील देवाच्या तबकात टाकतात. याच रात्री आदिस्थान (देवाचा मांगर) यथे नवसाच्या वस्तू दिल्या जातात.
त्यांना ‘चारे’ म्हणतात. घटस्थापनेच्या दिवशी इथेही रुजवण ठेवलेली असते. ती वाटण्यात येते, यावेळी पुजारी डोक्यावर पागोटे बांधून गाऱ्हाणे घालतो. नंतर सेवेकरी व पुजारी जक्ती ना रवळनाथाच्या मंदिरात आणतात.
‘जक्ती’ म्हणजे श्रीदेव रवळनाथ व श्री देव भूतनाथ यांचे उजवे हात! ‘जक्ती’ उपरण्यात झाकलेल्या असतात, रवळनाथाच्या मंदिरात त्या विधिपूर्वक ठेवतात. नंतर दोन्ही तरंगांना निऱ्या काढलेल्या साड्या नेसविल्या जातात. श्री रवळनाथला २० तर भूतनाथाला २१ याप्रमाणे त्या नेसविल्या जातात.
साड्या नेसवण्याचे काम पहाटे चार वाजेपर्यंत सुरूच असते. त्यावर नंतर झेंडूच्या फुलांचा गोंडा बांधला जातो. ही तरंगे बांधण्याचा मान गुरव, कोटकर, कुंभार व सुतार यांनाच असतो. श्री रवळनाथाच्या मंदिरातून तरंगे बाहेर पडण्यापूर्वी सुतारांकरवी ‘नेम’ केला जातो. नेम म्हणजे चहुबाजूंना सुरी दाखविणे, ढोलताशाच्या तालावर दोन्ही तरंगे बाहेर काढल्यावर त्यांची पूजा केली जाते.
मानकऱ्यांना टिळा लावतात. कलावंत देवाच्या पुढ्यात नाच करतात ‘हर हर महादेव’च्या जयघोषात देव कर्येचा पिंपळ यथे जायला निघतात, यथे सर्व विधी झाल्यावर ढोलताशांच्या तालावर श्री रवळनाथ व भूतनाथ तरंगासह श्री भगवती मंदिराकडे यायला निघतात.
श्री भगवती मंदिरात प्रवेश करण्याअगोदर हे देव भगवतीच्या चव्हाट्यावर येतात. या जागेला ‘बाराचो चव्हाटो’ असेही म्हणतात. यथेे लाकडी पाटांवर दोन्ही तरंगांना उभे करतात. श्री भगवतीच्या मंदिरातून पाण्याने भरलेला कलश तेथे आणतात. मंगलाष्टके म्हणून व अक्षता टाकून ‘शिवलग्न’ लावले जाते. नंतर दोन्ही तरंगे धावत श्री भगवतीच्या मंदिरात जातात.
तेथे त्यांची पूजा, धुपारती वगैरे विधी केले जातात. तेथून ढोलताशांच्या तालावर धावतच ती गटविकास कार्यालयाच्या जुन्या इमारतीजवळ असलेल्या वडाच्या झाडाखाली स्थिर होतात. तेथे देवांना अंडी ओवाळली जातात.
लगेच ती कोटकरांच्या मांगरात जाण्यास निघतात. पुढे अर्ध्यावरून ती धाव घेतात व कोटकरांच्या तुळशी वृंदावनाला वळसा घेऊन स्थिर होतात. हे चंद्रवंशी. सूर्यकिरण येण्यापूर्वी कोटकरांच्या मांगरात प्रवेश करतात. एकादशीच्या दिवशी सकाळी गुरवांतर्फे देवांची पूजा केली जाते. कोटकर समाजातर्फे महानैवेद्य दाखविला जातो.
त्याला ‘दाली’ म्हणतात. दुपारी कोटकर समाजातर्फे जेवण घालतात. रात्री कोटकरांच्या मांगरात ‘पावणेर’ घातला जातो. पावणेर म्हणजे शिजवलेला भात.
महानैवेद्यानंतर परत पावणेर घातला जातो. नंतर रात्री बाराच्या सुमारास अक्षता वाटून गाऱ्हाणे घातले जाते व देव कोटकरांच्या मांगरातून बाहेर काढले जातात. बाहेर तुळशी वृंदावनाकडे त्यांची पूजा केली जाते. धुपारती दाखवून विड्याची पाने बदलून मानकऱ्यांना ती वाटतात.देवाच्या पहिल्या कौलाची येथूनच सुरवात होते.
पहिल्या कौलाचा मान कोटकरांना मिळतो. हा कौल श्री रवळनाथ देतो. लगेच देव भगवती मंदिराच्या दिशेने कूच करतात. भगवतीच्या मंदिराकडे पोहचताच देव अधीरतेने देवालयात धाव घेतात. तेथे भगवतीशी त्यांची नजरानजर होते.
तेथे सरकार, पुराणिक, हरिदास व पोकळे यांना कौल दिला जातो. सरकारच्या वतीने हा कौल मामलेदारांनी नेमलेली व्यक्ती घेते. भगवती मंदिराच्या मैदानात सातेरी देवीला मानवंदना देऊन भाविकांना कौल देण्यास सुरवात होते. पुढे वार्षिक परंपरेप्रमाणे ठराविक ठिकाणी ठराविक समाजाच्या लोकांना कौल दिला जातो.
द्वादशीपर्यंत पूजा, ओट्या भरणे आदी प्रकार सुरूच असतात. चतुर्दशीच्या दिवशी रात्री आदिस्थानची उत्सवमूर्ती तबकात ठेवून गुरव डोक्याला
पागोटे व खांद्यावर उपरणे घेऊन ‘अब्दागीर’ व मशाली बरोबर घेऊन ही मूर्ती रवळनाथच्या पायरीवर ठेवतात. नंतर धुपारती करुन ही मूर्ती पालखीत ठेवण्यात येते. रवळनाथच्या देवालयाला प्रदक्षिणा घालून वाजत गाजत फटाके, दारू साहित्याच्या आतषबाजीत ठराविक जागेवर थांबत व मंगलाष्टके म्हणत आदिस्थानाकडे (देवीच्या मांगराकडे) नेली जाते.
पुनवेच्या दिवशी डोक्यावर टेकवतो. यावेळी पिशाच्च न गेल्यास ते भूत रवळनाथ काढतो, अशी भाविकांची भावना आहे. भूते काढण्याचा हा प्रकार पाहाण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. रात्री देवाचा मांगर येथे मनोरुग्णांवर उपचार होतात.
स्थानिक लोक याला भुते काढण्याचा कार्यक्रम असे संबोधतात. नंतर दरवर्षी प्रमाणे श्री भूतनाथ आपणासाठी ‘एका रातीन आनी एका वातीन माका देऊळ बांधून जाया’ (एका रात्रीत व एका वातीने मंदिर बांधून द्या) अशी मागणी करून रागाने रानाच्या दिशेने आपल्या तरंगासह जाण्याचा प्रयत्न करतो.
पण, महाजन व भाविक त्याची ‘बांतू देवा’ अशी मनधरणी करून समजूत घालतात. त्यांच्या विनंतीला मान देऊन व आश्वासनांवर विश्वास ठेवून भूतनाथ आपला मित्र रवळनाथ बरोबर माघारी फिरल्यावर पहाटे या उत्सवाची सांगता होते. देव दिवाणघराजवळ आल्यावर तेथे नाडकर्णी देवांची
ओटी भरतात. ती ओटी कोटकरांना दिली जाते. ढोलताशांच्या तालात देव पायऱ्यांवर जातात व लगेच फिरून खाली येतात. यावेळी सेवेकरी व हरिजनांना कौल दिला जातो. काकड आरती व कोंबड्याची ओवाळणी व आरती मागेपुढे करून नाचविल्यावर दोन्ही तरंगे आत जाण्यास निघतात. आत त्यांना बांधून ‘नेम’ केला जातो. ‘जक्ती’ (देवाचे हात) वाजत गाजत आदिस्थान येथे नेतात. नंतर तीर्थ दिल्यावर या दसरोत्सवाची सांगता होते.
- प्रकाश वि. तळवणेकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.