Goa Liberation Day Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Liberation Day 2025: पोर्तुगीज येण्यापूर्वी लोक आदिलशहाच्या सैन्यात भरती होत असत, गोवा मुक्तीसाठी अविरत लढ्याची त्रिस्थळी

Goa liberation history: गोवा मुक्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या आत्मसन्मान व क्षात्र वृत्ती गोव्यातल्या गावागावांत होती. जातिभेद, धर्मभेद विसरून लोक एकत्र येऊन लढले.

गोमन्तक डिजिटल टीम

सुशिला मेंडिस

गोवा मुक्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या आत्मसन्मान व क्षात्र वृत्ती गोव्यातल्या गावागावांत होती. जातिभेद, धर्मभेद विसरून लोक एकत्र येऊन लढले. जिथे जिथे पोर्तुगिजांचे अत्याचार जास्त प्रमाणात झाले, तिथे तिथे लहान प्रमाणात प्रतिकार होतच राहिला. पोर्तुगिजांनी केलेल्या धर्मांतरणाचाही काही परिणाम या आत्मसन्मानाच्या लढाईवर झाला नाही. याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून असोळणा, वेळ्ळी आणि कुंकळ्ळी यांचे देता येईल. ही त्रिस्थळी आत्मसन्मान, सांस्कृतिक संलयन आणि गोव्याची ओळख जपणे यांचे प्रतीक आहे. हाच वारसा पुढे नेणे ही काळाची गरज आहे, असे गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवते.

असोळणा, वेळ्ळी आणि कुंकळ्ळी ही दक्षिण गोव्यातील तीन गावे मिळून बनलेली एक त्रिस्थळी संघटना आहे, ज्यांचा इतिहास आणि संस्कृती यांची वीण फार पूर्वीपासून आहे व आजही ती उत्तरोत्तर घट्ट होत आहे.

पोर्तुगीजपूर्व काळात या गावांतील क्षत्रिय समाजातील लोकांची आदिलशाही सैन्यात भरती केली जात असे. १५८३साली कुंकळ्ळीमध्ये झालेला उठाव आणि सहा जेसुइट पाद्र्यांची हत्या ही पोर्तुगीजांच्या धर्मांतरण धोरणाविरुद्ध पुकारलेले बंड होते.

गोव्यात या तीन स्थळांना अनेकदा स्वातंत्र्यसैनिकांची भूमी म्हणून ओळखले जाते. येथील कॅथलिक समाजाची निष्ठा धार्मिक बंधनांमुळे चर्चप्रति असली तरीही हा समाज पूर्णपणे देशभक्त आणि राष्ट्रवादी होता.

किंबहुना या गावांतील हिंदूंसाठी झालाय तो फक्त धर्मबदल, बाकी दोघांच्याही नात्यात व आपुलकीत इतक्या पिढ्या झाल्या तरी काहीही फरक पडलेला नाही. आणखी एक बदल झालाय तो म्हणजे ‘क्षत्रिय’ ओळख असलेले आता ‘चाड्डे’ म्हणून ओळखले जातात, बाकी त्यांच्या क्षत्रिय असण्यात व क्षात्र वृत्तीत काहीही बदल झाला नाही.

या गावांतील ख्रिश्‍चनांपैकी अनेकजण डॉक्टर, वकील, पत्रकार, व्यापारी यांसारख्या व्यावसायिक क्षेत्रांत होते; तरीही त्यांनी चर्चकडून बहिष्कार आणि पोर्तुगिजांकडून कारावास, तर कधी कधी उपजीविकेवरच गदा असा दुहेरी धोका पत्करला. अनेकांनी प्रत्यक्ष त्याचा फटका सहन केला. १९३९ ते १९६१ या काळात काहीजण गोमंतक प्रजा मंडळ आणि आझाद गोमंतक दलाचे सदस्य होते.

असोळणा, वेळ्ळी आणि कुंकळ्ळी ही दक्षिण गोव्यातील, सासष्टी तालुक्यातील भौगोलिकदृष्ट्या सलग असलेली तीन गावे आहेत. आंबेली आणि वेरोडा ही दोन शेजारील उपगावे मिळून ही त्रिस्थळी पंचपावन होते.

या गावांतील लोकांना अगदी प्राचीन काळापासून लढाऊ, शौर्यगाथा असलेले व क्षात्र वृत्तीचे म्हणून ओळखले जाते. या तीन गावांचे वैशिष्ट्य असे की येथे हिंदू क्षत्रिय योद्धा जात प्रबळ होती; धर्मांतरानंतर हाच समाज कॅथोलिक ‘चाड्डो’ समुदाय म्हणून ओळखला जाऊ लागला.

बॅरेटो झेव्हियर आणि झुपानोव्ह यांच्या मते, ‘चाड्डो’ हा गोव्यातील स्थानिक उच्चवर्गीय गट असून, ते स्वतःला क्षत्रियांचे वंशज मानतात. पांडुरंग पिसुर्लेन्कर यांनी ख्रिश्चन ‘चाड्डे’ आणि हिंदू क्षत्रिय यांत भेद करताना असे नमूद केले की, चाड्डो समाजात क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र घटक मिसळलेले दिसतात - जसे गोव्यातील मराठ्यांच्या बाबतीत आढळते - म्हणून ते नेहमीच शुद्ध क्षत्रिय नसतात.

वंशपरंपरेने चालत आलेला मौखिक इतिहास पाहता, या दोघांचीही वंशपरंपरा एकच आहे असे म्हटले जाते. म्हणूनच असेल कदाचित, गोव्यातील इतर गावांपेक्षा या तीनही गावांचे वेगळे असे की, येथे जातीतील रोटीबेटी व्यवहार धर्मापेक्षा वरचढ ठरतात!

१५८३च्या बंडानंतर (ज्यात पाच जेसुइट आणि पाच स्थानिक लोक मारले गेले) या गावांनी लढाऊ संस्कृतीची सामूहिक ओळख टिकवून ठेवली आहे. कुंकळ्ळीच्या लोकांना उघडपणे ‘क्रिमिडोर्स’ किंवा गुन्हेगार म्हटले जात असे.

जेसुइट पाद्र्यांची हत्या क्रूर होती; मात्र त्यानंतर राज्याकडून घेतलेला सूड अत्यंत निर्दयी होता. या पाद्र्यांना मारणाऱ्यांपैकी सोळा प्रमुख व्यक्तींना समेट करण्यासाठी म्हणून पोर्तुगिजांनी असोळणा किल्ल्यात बोलावले व विश्‍वासघात करून सर्वांना ठार मारले. त्यांपैकी एका व्यक्तीने साळ नदीत उडी मारून आपला जीव वाचवला आणि ही हकीकत गावकऱ्यांना येऊन सांगितली.

१५८३मध्ये तलवार आणि क्रॉस एकमेकांच्या बाजूने उभे होते. रोविना रॉबिन्सन यांनी सोळाव्या शतकातील गोव्यातील धर्मांतरांवर चर्चा करताना सांगितले की, धार्मिक आणि राजकीय सत्तेच्या संयोगामुळे उच्च व नीच दोन्ही जातींचे सामूहिक धर्मांतरण शक्य झाले.

टिओटोनीयो दि सूझा यांनी कुंकळ्ळीचे आर्थिक महत्त्व अधोरेखित केले. हे तीनही गाव घाटमार्गांच्या चौकात वसलेले होते. मंदिराभोवती जत्रा व बाजार भरत; तसेच साळ नदीचे पाणी मुबलक असल्याने शेतीही समृद्ध होती.

यानंतर पोर्तुगीज प्रशासनाने या लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकला. सामुदायिक जमिनी जप्त केल्या गेल्या; सरकारी नोकऱ्यांत (नौदल व सैन्य वगळता) भेदभाव झाला आणि ‘गुन्हेगारांशी’ विवाह टाळले गेले. त्यामुळे पोर्तुगीज काळात या तीन गावांतील कॅथलिक चाड्डो समाजात अंतर्जातीय विवाहांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळाले.

इतर गोव्यातील भागांप्रमाणे या जमिनी समुदायांना परत न देता, त्या व्यक्तींच्या नावे करून नंतर जेसुइटांना देण्यात आल्या. ३ जून १६७६च्या राजाज्ञेनुसार कुंकळ्ळीमधील या मालमत्तांना ‘कोंदाद दि कुंकळीम’ असे नाव देऊन फ्रान्सिस्को मस्करेन्यास - मस्करेन्यास घराण्याच्या पहिला पुरुष - यांच्या नावावर करण्यात आले. याचा परिणाम असा झाला, की जवळजवळ प्रत्येक घरात जहाजांवर काम करणारे किंवा परदेशात स्थलांतरित झालेले पुरुष आढळतात; आणि विवाह प्रामुख्याने तीनही गावांमधील, विशेषतः चाड्डो समाजातच होत.

ही भूमी ‘स्वातंत्र्यसैनिकांची भूमी’ म्हणूनही ओळखली जाते; अनेकांनी आपल्या असंतोषाला लेखणीद्वारे वाट करून दिली.

पोर्तुगीज येण्यापूर्वी येथील लोक आदिलशहाच्या सैन्यात भरती होत. वसाहतवादी सत्तेने याच परंपरेचा फायदा घेत चाड्डोंना आपल्या संरक्षण दलात आणि नौदलात सामील करून घेतले. वसाहतवादी सत्तांना नेहमीच स्थानिक पाठबळाची गरज असते, आणि त्यांनी काही समाजघटकांतील जन्मजात लढाऊ वृत्ती ओळखली.

ही वृत्ती म्हणजे योद्धा जातीची परंपरा आणि शतकानुशतके जपलेली सामूहिक जखम; जिचे पोषण पिंटो कट, मॅथ्यूस दि कास्त्रो उठाव, वाळपई व माशेल बंड, राणे उठाव अशा पोर्तुगीजविरोधी चळवळींनी केले.

गोव्यात इतरही काही गावे आहेत जिथे क्षत्रिय समाज प्रबळ आहे; मात्र या गावांतील लोकांना ज्याप्रमाणे सामूहिक आघात सहन करावा लागला, तसे इतरत्र झाले नाही.

राजपूत वंशातून उद्भवलेले क्षत्रिय आपल्या निष्ठा, शौर्य आणि शब्दाला बांधील राहण्याकरिता ओळखले जात. आदिलशाही आणि पोर्तुगीज दोन्ही सैन्यांत ते निष्ठावान सैनिक होते. पहिल्या महायुद्धात मोठ्या संख्येने तरुण जहाजांवर मरण पावल्याने गावातील घंटानाद थांबत नव्हता. काही व्यापारी नौदलात, तर काही पोर्तुगीज व ब्रिटिश नौदलात होते.

या तीनही गावांतील - विशेषत: कुंकळ्ळीतील - लोकांकडे इतर गावांतील लोक कसे पाहतात, याचेही निरीक्षण झाले पाहिजे. संपूर्ण गोव्यात कुंकळ्ळीच्या लोकांना - आबालवृद्धांना - लढवय्ये म्हणूनच ओळखतात.

हा ‘चाड्डो’, हा क्षत्रिय असे भेदभाव येथील समाजाने कधीही मानले नाहीत; उलट आपल्या ‘क्षात्र वृत्तीचा’ अभिमानच बाळगला आहे. ही गावे पोर्तुगीज सत्तेविरुद्धच्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करणारी गोव्याच्या इतिहासाची लघुरूप प्रतिमा आहेत.

मात्र बहुसंख्य कॅथलिक असल्याने त्यांना दुहेरी संघर्षाला सामोरे जावे लागले. एकीकडे चर्चकडून आणि दुसरीकडे पोर्तुगिजांकडून त्यांचा छळ झाला. तरीही परकीय वसाहतवादी सत्तेविरुद्धच्या संघर्षात क्षत्रिय योद्धे म्हणून ख्रिश्‍चनांची ओळख ठळकपणे समोर आली. धर्मांतरण आणि परकीय सत्तेविरुद्ध हा आत्मसन्मानाचा लढा १६व्या शतकापासून १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा मुक्त होईपर्यंत असोळणा, वेळ्ळी आणि कुंकळ्ळी या त्रिस्थळीतील क्षत्रियांनी आणि ख्रिश्‍चनांनी अविरत सुरूच ठेवल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कंडोमवरचा टॅक्स कमी करा; पाकिस्तानने IMF समोर पुन्हा पसरले हात, पदरी पडली निराशा

Bharat Taxi: रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि सुरक्षित प्रवास; केंद्र सरकार लाँच करणार 'भारत टॅक्सी' अ‍ॅप, ओला-उबरला टक्कर

Bangladesh Violence: बांगलादेशात माणुसकीला काळिमा! हिंदू तरुणाची निर्घृण हत्या, मृतदेह झाडाला टांगून जाळला Watch Video

Margao: मडगावात पादचारी पूल बंद! टॅक्सीचालक, दुकानदारांमध्ये नाराजी; साबांखा मंत्र्यांनी केली पाहणी

Goa Liberation Day: 'ऑपरेशन विजय'च्या शूरवीरांना सलाम! राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांकडून 'गोवा मुक्ती दिना'च्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT