Shri Ganesha History Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

हत्तीने प्रलंयकारी होऊन नासधूस करू नये, म्हणून गजमुखी देवतेची पूजा प्रचलित झाली असावी; गणपतीपूजनाची गोमंतकीय प्रथा

Ganesh Idol Making History: मातीला गजमुखी देवतेचा आकार देण्याची ही गोव्यातली पारंपरिक हस्तकला म्हणजे या माती आणि संस्कृतीच्या अनुबंधांचा अविस्मरणीय समन्वय आहे!

Sameer Panditrao

पश्चिम घाट आणि पश्चिम किनारपट्टीच्या कुशीत वसलेल्या गोवा-कोकणात मृण्मयी गणपती मूर्ती पूजनाची समृद्ध परंपरा शेकडो वर्षांपासून प्रचलित आहे. गोव्यात पूर्वापार मातीकामाचे कला कौशल्य परंपरेने इथल्या कुंभार समाजात असले तरी च्यारी, चितारी आणि अन्य कारागिरीशी निगडीत कष्टकरी

जातीजमातीबरोबर ब्राह्मणांसारख्या समाजानेही परंपरा सांभाळण्यात धन्यता मानलेली आहे. परमेश्वर निराकार आणि निर्गुण असल्याची वर्णने वेदोपनिषदांच्या कालखंडात प्रचलित असली तरी बौद्धधर्मीय ग्रीक राज्यकर्त्यांनी भारतात मूर्ती कलेच्या उन्नयनाच्या आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे योगदान दिले आहे.

गोव्याची भूमी कधी घाटमाध्यावरच्या तरी कधी कोकण प्रांतांतल्या प्रदेशातल्या नावारूपास आलेल्या राज्यांशी संलग्न असल्याने दगडी, मृण्मयी, काष्ठ, धातू, मेण आदी घटकांपासून तयार केलेल्या मूर्तीचे पूजन प्रचलित आहे.

गोव्यातल्या डोंगर उतारावर जेव्हा झाडेझुडपे छाटून आणि त्याची जाळपोळ केल्यावर तेथे बीजारोपण करण्याला प्राधान्य देणारी कुमेरी शेती सुरू झाली तेव्हा मृण्मयी मूर्ती स्थलदेवतेला किंवा अदृश्य शक्तीला अर्पण करण्याची परंपरा प्रचलित झाली असावी. हत्ती हा सस्तन प्राण्यांतला महाकाय मेंदू निसर्गदत्त लाभलेला जंगली प्राणी

आदिम काळापासून माणसाच्या आसपास राहत असल्याने त्याच्या प्रचंड ताकदीची आणि शेतीची नासधूस करण्याची ताकद त्यांनी अनुभवली होती. त्यामुळे हत्तीने प्रलंयकारी होऊन शेतीची नासधूस करू नये म्हणून गजमुखी देवतेची पूजा प्रचलित झाली असावी. गोवा-कोकणातल्या या गजमुखी देवतेच्या किंवा तत्कालीन जमातीतील कुलचिन्हाचे पूजन आरंभले असावे.

कालांतराने मातीपासून गणपतीच्या मूर्ती साकारण्याची कला गोवा कोकणातल्या लोकमानसाने स्वीकारली. पर्वतांचा ईश म्हणून गिरीश नावाने शिवशंभो ओळखला जात असून पर्वतांना धारण करणारी ती गिरिजा म्हणजेच देवी पार्वती. आषाढात डोंगरमाथ्यावरती जेव्हा मान्सूनचा पाऊस कोसळतो तेव्हा तेथील ओहळ नाल्यांतून वाहणाऱ्या पाण्याबरोबर गाळ, माती यायची आणि त्यातून घरोघरीचे कलाकार त्या मातीपासून गणपतीची मूर्ती साकारायचे.

नदीनाल्यातल्या दगडगोट्यांतून जो नैसर्गिक रंग लाभायचा त्याद्वारे त्याला रंगरंगोटी केली जायची. गणपतीच्या मूर्ती शाडू मातीचा कल्पकतेने वापर करून साकारल्या जायच्या. कालांतराने अशा मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांची कुटुंबे निर्माण झाली.

पावसाच्या आगमनाबरोबर मातीपासून सुबक मूर्ती समूर्त करण्याची कला नावारूपाला आली आणि त्यामुळे कारागिरांना उपजीविकेचे साधन प्राप्त झाले त्यांच्या अर्थार्जनाला चालना लाभली.

मातीच्या गणपतींच्या मूर्तींची पूजा करण्याची परंपरा गोवा कोकणात प्रामुख्याने रूढ झाल्यावर अशा मूर्तींची निर्मिती करणाऱ्या चित्रशाळा ठिकठिकाणी सुरू झाल्या. गणेश चतुर्थीचा सण जरी भाद्रपदात येत असला तरी ३-४ महिन्यांपासून त्या संदर्भातल्या पूर्वतयारीला प्रारंभ होतो. बऱ्याचदा गणपतीच्या मूर्ती करण्यासाठी आवश्यक शाडूची माती गावात उपलब्ध नसेल तर ती मिळवण्यासाठी दुसऱ्या गावात संपर्क साधला जायचा आणि तेथून ती आणेपर्यंत कारागिरांना चैन पडत नसे.

काणकोण तालुक्यातले कारागीर शाडूची माती बऱ्याचदा दुसऱ्या टोकाला असलेल्या पेडणे तालुक्यातल्या मोपासारख्या गावातून न्यायचे . एकेकाळी डिचोली, धारबांदोडा, पेडणे आणि सत्तरी तालुक्यात चांगल्या प्रतीची शाडूची माती उपलब्ध असल्याने मातकामासाठी कुशल कारागिरांची मोठ्या प्रमाणात वस्ती इथे होती.

सत्तरीत पिसुर्ले ग्रामपंचायत क्षेत्रातले कुंभारखण मूर्ती आणि इतर कलाकृती घडवण्यास आवश्यक मातीसाठी प्रसिद्धीस पावले होते. डिचोलीत मये, बोर्डे येथील कुंभार मातीकामासाठी गोवाभर एकेकाळी प्रसिद्धीस पावले होते. सुबक आणि रेखीव मूर्ती तयार करण्याचे उपजत कौशल्य त्यांच्याजवळ असल्याने तेथील मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी असायची.

डिचोली तालुक्यातल्या कुंभार समाजातल्या कारागिरांनी मातीकामात विशेष नावलौकिक मिळवला होता . विष्णू महादेव कुंकळकर यांनी मातीकामाबरोबर शिल्पकलेतही राष्ट्रीय स्तरावरती प्रसिद्धी मिळवली होती. कुंभार समाजाबरोबर गोव्यातल्या च्यारी समाजाने लाकूड कामाबरोबर मातीकामातही विशेष लौकिक मिळवलेला आहे.

काणकोणातील इडदर येथील च्यारी कारागिरांनी मातीपासून आखीव आणि रेखीव मूर्ती करण्यासाठी लौकिक साध्य केलेला आहे. मातीपासून गणपतीची मूर्ती तयार करणारे कारागीर माती कामातून अर्थार्जन करत असले तरी या कामात गुंतलेल्या हातांना देवत्व प्रदान करण्याचे कला कौशल्य असल्याने त्यांच्याविषयी लोकमानसात आदराची भावना रूढ होती.

मातीकामाचा व्यवसाय त्यांना पैसे मिळवून देत असला तरी अर्थार्जनापेक्षा हे पवित्र काम आत्मीयता आणि श्रद्धेने करण्याकडे कारागिरांचा अधिक कल होता. त्यामुळे गणेश चतुर्थीला घरातून मातीची मूर्ती पूजेसाठी आणण्यास जाणारी मंडळी पूर्वीच्या काळी मूर्तीच्या शुल्काबरोबर नारळ आणि तांदूळ यांनी युक्त तळी कारागिराविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी न विसरता न्यायचे.

पिढ्यान्पिढ्या ठरावीक कुटुंबांना मृण्मयी गणपतीच्या मूर्ती पुरवण्याची जबाबदारी गावातले कारागीर आवडीने घ्यायचे आणि त्यामुळे लोकमानस त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करायचे.

मातीची मूर्ती घरी नेऊन भाद्रपद चतुर्थीला तिची विधिवत पुजा करण्यात गोव्यातल्या लोकमानसाने प्राधान्य दिल्याने अशा मूर्तींसाठी चित्रशाळा वर्षांतल्या ३-४ महिन्यांसाठी गजबजून उठत असल्या तरी त्या चित्रशाळेचे समाजात उल्लेखनीय स्थान असायचे.

त्यामुळे ठरावीक दिवसांसाठी गणपतींच्या मूर्तीचे भजन पूजन झाल्यावर तिची उत्तरपूजा करून नदीनाल्यांत पाण्यात अशा मूर्तीचे विसर्जन हे खरे तर मातीशी एकात्मता साध्य करण्यासाठी करायचे. मातीच्या सुबक गणपतीच्या मूर्ती तयार करण्यात गावोगावीचे कारागीर प्रसिद्धीस पावले होते आणि त्या मूर्तीतूनच त्यांची कला उत्कटपणे आविष्कृत व्हायची.

गोवा कोकणातल्या कारागिरांनी आपल्या पारंपरिक मूर्तीकामात प्रसिद्धी मिळवली होती आणि त्याचे दर्शन त्यांच्या देवत्व बहाल करणाऱ्या हस्तकलेतून व्हायचे.

गोव्यातली मातीला गजमुखी देवतेचा आकार देण्याची ही पारंपरिक हस्तकला म्हणजे या माती आणि संस्कृतीच्या अनुबंधांचा अविस्मरणीय समन्वय आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Duleep Trophy 2025: चार चेंडूंत चार विकेट्स! दुलीप ट्रॉफीत पहिल्यांदाच 'या' खेळाडूने रचला इतिहास; जम्मू काश्मीरचा पठ्ठा चमकला

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; 'यलो अलर्ट' जारी

Boat Accident: स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट उलटली! 49 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता; 17 जणांना वाचवण्यात यश

Duleep Trophy 2025: पुनरागमन ठरलं निष्फळ! दुलीप ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीची निराशाजनक कामगिरी, गोलंदाजीत केलं ‘शतक’

Margao Gangwar: मुंगूल-मडगाव गँगवॉरचे बिश्नोई गँगशी कनेक्शन; कुख्यात गुंड 'ओमसा'ला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT