गणेशचतुर्थी हा गोमंतकीयांचा आवडता सण असून या सणाची तयारीही जोरात सुरू आहे. गावोगावी वाद्यांची दुरुस्ती, खरेदी सुरू झाली आहे. त्यासाठी खास पंढरपूरचे कारागीर गोव्यात दाखल झाले आहेत.
भजन म्हटले की, पखवाज व हार्मोनियम ही वाद्ये आलीच. त्यामुळे या वाद्यांच्या दुरुस्तीसाठी सध्या माशेलात पंढरपूरहून आलेल्या कारागिरांकडे गर्दी वाढू लागली आहे. नवीन वाद्ये खरेदी करण्यापेक्षा जुनी वाद्ये दुरुस्त करण्याकडे भजनी कलाकारांचा कल आहे. तबला, पखवाज, ढोलकी, हार्मोनियमच्या दुरुस्तीसाठी मोठी झुंबड उडत आहे. पंढरपूर येथील किरण नंदकुमार भोसले यांनी माशेलात वाद्ये दुरुस्तीस सुरवात केली असून त्यांना याकामी त्यांची पत्नी अर्चना व छोटा पुत्र अर्णव मदत करतो.
आषाढ महिन्याच्या सुरवातीला चतुर्थीनिमित्त येऊन घुमट, तबला, पखवाज, समेळ, ढोल, कासाळे, ताशे, टाळ व इतर सर्वप्रकारची वाद्ये दुरुस्त करून ते देतात. अनंत चतुर्दशीपर्यंत हे कारागीर वाद्यांची दुरुस्ती करतात. भोसले यांना स्वरांचे ज्ञान असल्यामुळे ही दुरुस्त केलेली वाद्ये योग्यप्रकारे ‘ट्यून’ झाली आहेत का? हे तपासण्यासाठी ते स्वतः दुरुस्तीनंतर ती वाजवून पाहतात. त्यांचा छोटा मुलगाही काही वाद्ये वाजवून दाखवतो.
कारागीर भोसले यांची दोन्ही छोटी मुलेही माशेलात दाखल झाली असून चौथीत शिकणारा अर्णव ऑनलाईन शिकतो. शाळेच्या शिक्षकांशी संपर्क साधून रोजचा रोज अभ्यास आई-वडिलांच्या मार्गदर्शनानुसार करतो. शिवाय वाद्येही दुरुस्त करतो, वाद्ये वाजवून दाखवतो. पोटासाठी शाळेकडे पाठ फिरवून दोन महिन्यांसाठी तो गोव्यात दाखल झाला असून चतुर्थीनंतर पुन्हा शाळेत जाणार आहे. सर्वांना शिक्षणाचा हक्क आहे; पण पोटासाठी अशी तडजोड करावी लागते.
पंढरपूर ते गोवा ३८० किलोमीटर अंतर असून गोव्यात वाद्यांची दुरुस्ती, विक्रीसाठी किरण भोसले प्रत्येक वर्षी येतात. दोन महिन्यांत साधारणतः लाखाचा व्यवसाय होतो; पण त्यात सर्व खर्च, दुकानाचे भाडे वजा करून खूप काही रक्कम हाती शिल्लक राहते. तरीही ही वाद्ये दुरुस्ती करून संस्कृतीच्या जतनासाठी त्यांची धडपड सुरू असते. आपल्यासारखे अनेक कारागीर गोव्यात येतात, प्रत्येकाला येथे काम मिळते. कलाप्रेमी गोव्यात अधिक आहेत. त्यामुळेच पैशांबरोबरच सन्मानही येथे मिळतो, असे भोसले म्हणाले.
घुमटाची ‘घुमी’ म्हणजे घुमटामधून निघणारा अनुनाद (रेझोनान्स) हा त्याच्यावर पडणाऱ्या थापेमुळे लपता कामा नये. त्या ‘घुमी’मध्येही स्वरांची साथ करण्याची क्षमता असायला हवी. विविध बोलांसाठी घुमटाच्या विशिष्ट भागावर विशिष्ट तऱ्हेने बोट यायला हवे आणि वाद्यांवर होणाऱ्या आघातांच्या तारतेमधूनही (वॉल्युम) आरतीचे शब्द नीट ऐकू आलेच पाहिजेत, असे ‘घुमट आरती परिचय’चे लेखक विनायक आखाडकर म्हणतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.