मान्सूनच्या पावसाळ्यानंतर येणाऱ्या शरद ऋतूतली पौर्णिमा कोजागिरी म्हणून गोवा कोकणात भक्तिभाव आणि उत्साहाने साजरी केली जाते. आकाशातल्या चंद्र आणि सूर्याची साथ मानवी समाजाला आदिम काळापासून लाभलेली असून, त्यांचे प्रतीकात्मक पूजन करण्याची परंपरा अज्ञात काळापासून प्रचलित आहे.
वर्षभरातल्या बारा पौर्णिमा भारतीय संस्कृतीने पवित्र मानलेल्या असून, शरदातली पौर्णिमा विशेष महत्त्वाची मानलेली आहे. तिचे ऋणानुबंध नवान्न पूजनाशी पूर्वापार जोडलेले आहेत.
पावसाळ्यातल्या शेतात भाताच्या प्रत्येक रोपारोपावर विलसणाऱ्या कणसांचे दर्शन त्याच्यावरच्या सोन्याच्या लकाकीमुळे जुन्या काळच्या माणसाला श्रीलक्ष्मीच्या आगमनाची जणू काही वर्दी द्यायचे आणि त्यामुळे शरदातल्या पौर्णिमेच्या शीतल चांदण्या रात्री श्रीलक्ष्मी कोण जागे आहे का?
हे जाणून घेण्यासाठी परिसरात संचार करते आणि त्या रात्री भगवद्भक्तीद्वारे जागरण करणाऱ्याला आशीर्वचन देते अशी धारणा निर्माण झालेली आहे. त्यामुळे ही पौर्णिमा श्रीलक्ष्मीच्या आगमनाने घरादारात सुख समृद्धी आणते अशी पूर्वापार लोकश्रद्धा प्रचलित झालेली आहे.
पेडणे ते काणकोणपर्यंत गोव्याची भूमी पूर्वी कृषिप्रधान होती आणि त्यामुळे भाद्रपदापासून गणेश चतुर्थी, गौरीपूजन, हरितालिका, बारस, नवे पूजन, नवरात्रीतले घटपूजन, विजयादशमी या सण उत्सवांतून इथल्या कष्टकरी समाजाची भूमीविषयीचे प्रेम, भक्ती आणि कृतज्ञता अभिव्यक्त होते.
भाताची नवीन धान्यांनी परिपुष्ट झालेली कणसे कृषक समाजाच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचा शिडकावा करतात आणि त्यामुळे वाऱ्यावरती सळसळ डोलणाऱ्या कणसांचे दर्शन श्रीलक्ष्मीच्या आगमनाची जाणीव करून देत असते.
त्यामुळे गावोगावी भूमीशी नाते असणाऱ्या श्रीरवळनाथ आणि सांतेर या ग्रामदैवतांचे प्रतीक असणाऱ्या तरंग मेळांची भेटाभेट प्रकृती पुरुषाच्या मीलनाची प्रचिती आणून देत असते. पेडणे महालाच्या मुख्यालयाचे ग्रामदैवते असणाऱ्या रवळनाथ, भूतनाथ आणि भगवती यांच्याशी निगडीत दसऱ्याच्या उत्सवात तरंगांची होणारी शारदीय चंद्रकळेच्या आल्हाददायक प्रकाशातली भेटाभेट ‘देवाची पुनाव’ म्हणून ओळखली जाते.
शरदातल्या चांदण्याच्या रात्री श्रीदेव रवळनाथ, भगवती आणि भूतनाथ यांच्या तरंग मेळांच्या मिरवणुकीत जमलेले भाविक वर्षपद्धतीप्रमाणे डोंगर माथ्यावरच्या भूतनाथ देवाला आपल्या शाब्दिक चातुर्याने त्याच्या जंगलातल्या मंदिराला पक्के बांधकामाचे आश्वासन देताना ‘बांध तू सायबा’ असे सांगून चकवतात.
कृषी व्यवसायाशी निगडीत विधी, परंपरांचे यावेळी होणारे सादरीकरण एकेकाळी इथल्या कृषक समाजाचे भूमीशी असणारे नाते किती अतूट होते याची प्रचिती आणून देतात. चांदण्या रात्री होणाऱ्या उत्सवाला देवांच्या तरंग मेळाच्या आणि पारंपरिक चर्मवाद्यांच्या संगीत साथीने जणू काही दिव्यत्वाची झालर लाभलेली असते आणि त्यामुळे हा सोहळा ‘देवाची पुनाव’ म्हणून नावारूपाला आलेला आहे.
केवळ पेडणेच नव्हे तर रवळनाथ देवाची जेथे मंदिरे आहेत तेथील उत्सव ‘देवाची पुनाव’ म्हणून नावारूपाला आलेले आहेत. दर तीन वर्षांच्या कालखंडानंतर पार्सेची भगवती आपली बहीण असणाऱ्या आगरवाडा येथील सातेरीच्या भेटीला जाते.
सोमवारी भगवती देवी तरंगांच्या लव्याजम्यासह पारंपरिक मार्गाने मंगळवारी जेव्हा आगरवाड्याच्या सीमेवर पोहोचली तेव्हा तिच्या हार्दिक स्वागतासाठी भाविक मोठ्या संख्येने जमले आणि देवाच्या पुनवेच्या या अलौकिक मीलनाचे साक्षीदार झाले. पेडणे तालुक्यातील कोलवाळ नदीकिनारी वसलेली पार्से आणि आगरवाडा ही गावे एकेकाळी कृषिप्रधान होती.
इथल्या खारभूमी क्षेत्रात पावसाळी मोसमात कष्टकरी खाजन शेती करायचे आणि दर तीन वर्षांनी भगवती आणि देवदेवतांचे तरंगामेळ घेऊन आगरवाड्यावरच्या सातेरी देवीच्या भेटीला जायचे.
पुनवेच्या चांदण्यातली दोन्ही भगिनींची तीन वर्षांनंतर होणारी ही भेट दोन्ही गावातल्या कष्टकरी समाजाच्या अंतर्गत असणारे ऋणानुबंध घट्ट करत असल्याने त्यांना या सोहळ्याची विलक्षण उत्कंठा लागून राहते.
पार्से आणि आगरवाडा ही दोन्ही गावे जरी पेडणे तालुक्यातली असली आणि त्यांच्यातले अंतर फार मोठे नसले तरी दोन्ही गावांतल्या लोकांच्या प्रवृत्ती आणि स्वभावात असलेली भिन्नता पदोपदी दृष्टीस पडते आणि कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यात एकात्मतेच्या अनुबंधांना नवा उजाळा मिळतो आणि भाविकांच्या जगण्याला ऊर्जा लाभते.
देवाच्या पुनवेचा हा उत्सव पारंपरिक विधी आणि रीतीरिवाजांचे पुनरुज्जीवन करण्याबरोबर इथल्या शेतकऱ्यांना वायंगणी शेतीची पूर्वतयारी करण्यासाठी आवश्यक बळ द्यायचा आणि त्यामुळे दर तीन वर्षांनी येणाऱ्या या सोहळ्याची विलक्षण प्रतीक्षा भाविकांना लागून राहायची.
पूर्वीच्या काळी मातीच्या रस्त्यातून दुतर्फा असलेल्या वृक्षवेलींच्या सान्निध्यातून हे तरंगामेळ दर तीन वर्षांनी पार्सेहून आगरवाड्याला जायचे, तेव्हा रात्रीचा प्रवास पारंपरिक मशालीच्या प्रकाशात व्हायचा. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात भाविक मार्गक्रमण करताना अजिबात न कंटाळता पुढे जायचे.
गोवाभर कोजागिरी पौर्णिमेला रात्रीच्या आल्हाददायक चांदण्यात बऱ्याच मंदिरांत भजन, कीर्तन आणि तत्सम धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आकाशातला पूर्ण कला विकसित झालेल्या चंद्राच्या शीतल चांदण्याला शरद ऋतूची लाभलेली आगळीवेगळी किनार भाविकांना अवीट सुख समाधान प्रदान करत असते.
त्याला परमेश्वरी अधिष्ठानाने दिव्यत्वाचा स्पर्श अनुभवण्याची संधी लाभत असते. आगरवाड्याची सातेरी आणि पार्सेची भगवती या दोन्ही ग्रामदेवता आज पाषाणी मूर्तीद्वारे महिषासुर मर्दिनीच्या रूपात पुजल्या जातात.
दोन्ही शक्तिरूपिणी दुर्गेची रूपे असली तरी त्यांना एकमेकांच्या भगिनी कल्पून भाविकांनी मानवीकरणाचा केलेला प्रयत्न इथल्या कष्टकऱ्यांच्या समृद्ध भावविश्वाचे दर्शन घडवतो. पार्से मुबलक भाताच्या पैदासीमुळे तर आगरवाडा चवदार मिठाच्या उत्पादनामुळे नावारूपाला आले होते.
आपापली वैशिष्ट्ये आणि अस्मिता टिकवून ठेवताना, दोन्ही गावांना एकमेकांच्या सहकार्याची नितांत गरज देवाच्या पुनवेच्या त्याचप्रमाणे समन्वय महत्त्वाचा असल्याने, त्यांनी भगवती आणि सातेरी या दोन्ही ग्रामदैवतांना भगिनीच्या नात्याच्या धाग्यात गुंफणे आवश्यक मानले आणि देवाच्या पुनवेच्या उत्सवाचे नियोजन करून त्यांच्या तरंगांच्या भेटीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याला प्राधान्य दिले होते.
देवाच्या पुनवेच्या उत्सवाच्या आयोजनातून आपल्या पूर्वजांच्या परंपरेला उजाळा देण्याचा प्रयत्न केला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.