Goa Kala Academy Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Kala Academy : कला अकादमीला आता तरी जाग येणार का?

Goa Kala Academy : परीक्षक लाच प्रकरण महाराष्ट्र सरकारकडे पोहोचल्यामुळे आता तरी कला अकादमीला जाग येते की काय यावर सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

दैनिक गोमंतक

मिलिंद म्हाडगुत

परीक्षक लाच प्रकरण महाराष्ट्र सरकारकडे पोहोचल्यामुळे आता तरी कला अकादमीला जाग येते की काय यावर सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. आणि आताही जर जाग आली नाही तर अकादमीची उरलेली प्रतिष्ठाही लयास जायला वेळ लागणार नाही एवढे निश्चित.

झोपलेल्यांना उठवता येते पण झोपेची सोंग घेणाऱ्यांना उठवणे अशक्य, अशा प्रकारची जी प्रख्यात उक्ती आहे तिचा प्रत्यय सध्या कला अकादमीचा कारभार पाहून यायला लागला आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या मराठी ‘अ’ गट नाट्यस्पर्धेतील दैनिक ‘गोमन्तका’ने उजेडात आणलेले परीक्षक लाच प्रकरण राज्यातील कलाकारांत, रसिकांत संतापाची लाट निर्माण करून गेले.

त्यामुळे यावर कला अकादमी काहीतरी कारवाई करेल अशी अपेक्षा होती. काही जमलेच नाही तर या प्रकरणाची चौकशी, कमीत कमी चौकशीचे नाटक, करून ’दूध का दूध पानी का पानी’ करून दाखवतील, असेही काहींना वाटत होते. पण कला अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी ’तेरी भी चूप मेरी भी चूप’ असे धोरण अवलंबल्यामुळे सगळ्या नाट्यस्पर्धाच संशयाच्या पिंजऱ्यात सापडल्यासारख्या झाल्या आहेत. या स्पर्धा बंद कराव्यात अशी मागणीही काही घटकांकडून व्हायला लागली आहे.

लोकांच्या स्मृती अल्पजीवी असतात त्यामुळे चूप राहणेच योग्य अशी मानसिकता ठेवून कला अकादमी वागते की काय असेही अनेकांना वाटायला लागले आहे. याच प्रकरणाबाबत नव्हे तर एरव्हीसुद्धा कला अकादमी नाट्यस्पर्धांबाबत गंभीर आहे असे कधी वाटलेच नाही. गेल्या वर्षीच्या कला अकादमीच्या कोकणी नाट्यस्पर्धेत वाङ्मय चोरी सापडली, त्याचा गवगवाही झाला. पण अकादमी डोळ्यावर कातडे ओढून बसल्याचे बघायला मिळाले. आता तर हे परीक्षक लाच प्रकरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचले आहे. याचा अर्थ कला अकादमीची लक्तरे सध्या महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

ही परिस्थिती का आली याचा खरे तर कला अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी विचार करायला हवा. या मराठी ‘अ’ गट नाट्यस्पर्धेचे तीन परीक्षक आपल्या धोरणाशी प्रामाणिक राहिले म्हणून ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचालनालयाकडे तक्रार करू शकले. आणि सांस्कृतिक संचालनालयाने फडणवीस सरकारकडे चौकशीची शिफारस केल्यामुळे या प्रकरणाला एक नवे वळण लागू शकले. पण सगळेच परीक्षक असे करू शकतील की काय हाही प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

वास्तविक प्रस्तुत मराठी ‘अ’ गट नाट्यस्पर्धा ही कला अकादमीची सर्वात महत्त्वाची नाट्य स्पर्धा. या स्पर्धेत पहिला क्रमांक प्राप्त करणारे नाटक महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पोहोचत असल्यामुळे या स्पर्धेला एक वेगळेच वलय प्राप्त झाले आहे. पण या परीक्षक लाच प्रकरणामुळे या वलयाला काळा डाग लागल्यासारखे वाटायला लागले आहे. या स्पर्धांत आता पारदर्शकता राहिली आहे असे वाटतच नाही. परीक्षकांच्या नियुक्तीबाबत तेच म्हणता येऊ शकेल. परीक्षक कोणाला नियुक्त करावे याचे काही निकष असायला हवेत. पण कोणताही निकष लागू न होणाऱ्यांनासुद्धा परीक्षक म्हणून नियुक्त केले जात असल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसत आहे. पुरस्कारप्राप्त नाट्यकलाकार, तंत्रज्ञ तसेच नाट्यलेखक हा या नियुक्तींचा खरे तर निकष असायला हवा. नाट्यलेखन हे वेगळ्या प्रकारचे लेखन असते. त्याचा साहित्यातील कथा, कादंबरी वा तत्सम विभागात समावेश केला जाऊ शकत नाही. म्हणूनच स्पर्धांकरता परीक्षक म्हणून नाट्यलेखकांचाच विचार व्हायला हवा. आता या निकषाकडे पाहिल्यास नाट्य स्पर्धांचे किती परीक्षक या निकषात बसतात त्याचा शोध घ्यावा लागेल. ही झाली एक बाजू.

दुसरी बाजू म्हणजे सध्या गाजत असलेल्या परीक्षक लाच प्रकरणाची. अकादमीच्या एका महत्त्वाच्या स्पर्धेतील परीक्षक लाच प्रकरण उजेडात आल्यामुळे सगळ्याच स्पर्धांच्या निकालाकडे आता संशयास्पद नजरेने बघितले जाऊ लागले आहे. सगळेच परीक्षक असे असतात असे कोणीच म्हणणार नाही. पण ओल्याबरोबर सुके जळते तसा प्रकार आता होऊ लागला आहे. सरसकट सर्व परीक्षकांना आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाऊ लागले आहे. पूर्वी असे आरोप होत नसत असे नाही. पण या आरोपांना तसे व्यापक स्वरूप प्राप्त झाले नव्हते. कारण त्यावेळी तसा कोणता मुद्दा नव्हता. पण आता या परीक्षक लाच प्रकरणामुळे लोकांना मुद्दा मिळाला आहे. आणि त्यामुळेच या आरोपांना आता जाहीर स्वरूप प्राप्त व्हायला लागले आहे. आणि स्पर्धांबाबत संशयास्पद वातावरण निर्माण झालेले बघायला मिळत आहे. मुख्य म्हणजे लोकांचा नाट्यस्पर्धांवरचा विश्वासच कमी होत चालल्याचे बघायला मिळत आहे. नाट्यस्पर्धांना कमी होत चाललेली गर्दी हेच सूचित करत आहे.

नुकत्याच साखळी येथे पार पडलेल्या मराठी ‘ब’ गट नाट्यस्पर्धेतील नाटकांना मिळालेला अल्प प्रतिसाद हीच गोष्ट अधोरेखित करून गेला. पुरस्कार मिळालेल्या अनेक ज्येष्ठ रंगकर्मींचेेही यामुळे मनोधैर्य खचल्याचे दिसायला लागले आहे. परवा अनेक पुरस्कारप्राप्त एक ज्येष्ठ रंगकर्मी हेच सांगत होता. या परीक्षक लाच प्रकरणामुळे मिळालेल्या पुरस्कारांकडे पाहिले की आम्हांलाच अपराध्यासारखे वाटायला लागले आहे असे तो म्हणाला. आणि या सर्वाला सर्वस्वी जबाबदार ठरत आहे ती गोव्याच्या कलाक्षेत्रातील अग्रगण्य संस्था कला अकादमी!

दैनिक ‘गोमन्तका’ने परीक्षक लाच प्रकरण उघड केल्यानंतर कला अकादमीने खरे तर प्रकरणाची शहानिशा करून सत्य काय ते उजेडात आणले असते तर सध्या जे नाट्यस्पर्धांवर संशयाचे ढग दाटायला लागले आहेत, ते कधीच दूर झाले असते. ‘कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही’ हे कला अकादमींसह अशा प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.

मागे फोंड्याच्या राजीव गांधी कला मंदिराच्या एका स्पर्धेबाबतही असाच प्रकार घडला होता. तिथे या स्पर्धेतीलच एका संस्थेने निकालाबाबत तक्रार करूनसुद्धा या तक्रारीचे पुढे काय झाले हे कळले नव्हते. अशा प्रकारामुळे ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतो आहे’ या उक्तीची याद यायला लागते. कला अकादमीचे हे परीक्षक लाच प्रकरण महाराष्ट्र सरकारकडे पोहोचल्यामुळे आता तरी कला अकादमीला जाग येते की काय यावर सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. आणि आताही जर जाग आली नाही तर अकादमीची उरलेली प्रतिष्ठाही लयास जायला वेळ लागणार नाही एवढे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women's Reservation Bill 2026: महिला आरक्षण फसलेला की फसवलेला प्रयोग?

खास 'आदमी पक्ष'!- संपादकीय

Marriage Registration: पोर्तुगीज कायद्याचा अडथळा दूर! रशियन महिला आणि कोलव्याच्या तरुणाच्या लग्नाला हायकोर्टाचं ग्रीन सिग्नल; काय नेमकं प्रकरण?

Goa Politics: पणजी पोलिसांचा दणका! विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार क्रुझ सिल्वा यांची 'त्या' आंदोलनप्रकरणी चौकशी

खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांची फोंड्यातही ‘क्रेझ’?

SCROLL FOR NEXT