Goa  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

भोगभूमी बनलेला गोवा: कळंगुट-बागा पट्ट्यात दिल्लीवाल्यांची 'नंगानाच' पर्यटन राजधानी; स्थानिक ओळख धोक्यात

Goa: घटकराज्यापर्यंतचा प्रवास गोव्याने बुद्धिवंतांच्या संगतीने केला. त्यानंतर नेत्यांनी त्याला कुरतडणे सुरू केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

घटकराज्यापर्यंतचा प्रवास गोव्याने बुद्धिवंतांच्या संगतीने केला. त्यानंतर नेत्यांनी त्याला कुरतडणे सुरू केले. आता तो भुरटे आणि अट्टल चोर-दराेडेखोरांच्या हातात गेला आहे. ज्या पद्धतीने गोव्याचे लचके तोडले जात आहेत आणि दिल्लीहून पैशांचा ओघ वाहतो आहे- ती व्यवस्थाच बनली आहे आणि क्षणोक्षणी गोव्याचा प्राण घोटला जात आहे. या गोव्यात आता बुद्धिवाद्यांना आपले म्हणण्यासारखे काय राहिले आहे? बाजारबुणगे आता नेते बनतात, पक्ष काबीज करतात आणि गोव्याची जगभर छी-थू होत असताना त्यांना कसलीही शरम वाटत नाही.

व्याचे अस्तित्व संपले आहे काय, याची चर्चा गेला आठवडाभर चालली आहे. लोक गटांमधून, बुद्धिवाद्यांच्या वर्तुळातून, समाजमाध्यमांवरून तीच चर्चा करीत आहेत.गोवा इज डेड? तिचे कलेवर बनले आहे की थोडी धुगधुगी शिल्लक आहे? ज्यात परत प्राण फुंकला जाऊ शकेल?

माझ्या कार्यक्रमात मी डॉ. ऑस्कर रिबेलोंना हा प्रश्न केला. तेव्हा त्यांनी मला चकीत करणारे उत्तर दिले, ‘‘गोवा इज डेड!’’

गोव्याचा मृत्यू म्हणजे गोव्याच्या संकल्पनेचा मृत्यू. आम्ही जो गोवा हृदयाशी कवटाळला होता, ज्याला ज्या तत्त्वावर उभा केला, त्याचा मृत्यू. हा जो काही शिल्लक राहिलाय, तो आमचा गोवा नाही. तो अनोळखी, बीभत्स, अचेतन, अत्यंत बुरसटलेला- ज्याच्याशी ओळख दाखवायलाही आम्हाला लाज वाटेल.

पत्रकार देविका सिकेरा म्हणत होत्या, ‘‘गेली अनेक वर्षे आम्ही कळंगुटला गेलेलोच नाही. तो भाग जणू गोव्याचा नाहीच कसा! तेथे दिल्लीवाल्यांनी आपली भोगभूमी वसवली आहे. दिल्लीला हवे तसे पर्यटन येथे नंगानाच खेळते.’’ सिकेरा नेहमी अत्यंत स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे म्हणणे आहे, दिल्लीला गोवा असाच अड्डा बनलेला हवा आहे. दिल्लीचे चोचले पुरवणारे भक्ष्य. जेथे त्यांच्या बायका आणि मुलीही बेहोष होऊन नाचू शकतात. दिल्लीहून येणारे नेते, मुलकी अधिकारी यांचा हव्यास तोच आहे. देशातील एक भोगभूमी तेथे निर्माण करून साऱ्या आंबटशौकिनांना येथे पाठवायचे. त्याची सुरुवात कॅसिनोंपासून झाली.

पैसा, हव्यास, अधाशीपणा या प्रवृत्ती एवढ्या थराला गेल्या, की स्थानिक नेते आणि प्रशासनालाही या वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यावेसे वाटले.

कळंगुट-बागा या किनारीपट्ट्याचेच उदाहरण घेऊया. कसलेही परवाने नसताना तिथे गल्लीबोळात नाईट क्लब सुरू झाले. भररस्त्यात असलेल्या हडफडे येथील ‘बर्च रिमिओ लेन’कडे पाहा. तो मिठागरावर उभारलेला, येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसत होता. दिल्लीवाल्यांचा धाकदपटशा, पैसा व रंगेल उद्योजकता यामुळे त्यांनी या नाईट क्लबलाच नव्हे तर संपूर्ण गोव्याला आपले बटिक बनवले. प्रादेशिक विकास आराखडा २०२१मध्ये हा भूभाग मिठागर म्हणून जाहीर करण्यात आला, म्हणजेच खाजन जमिनीचा भाग.

अर्थात पर्यावरणीय, संवेदनशील भूभाग प्रथम दर्जा- समाविष्ट होतो. म्हणजे ‘ना विकास प्रभाग’. तरीही हडफडे-नागोवा पंचायतीच्या १९९६ दाखल्यानुसार त्या तात्पुरत्या बांधकामाला व्यापारी म्हणून मान्यता दिली जाते. त्यानुसार त्याला व्यापारी परवाना, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला, अग्निशमन दलाची मान्यता मिळते. किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरण काणाडोळा करते. दिल्लीवाल्यांना पैसे कसे चारायचे हे पक्के माहीत असते.

दोन्ही बाजूच्या वकिलांना पकडून पंचायत संचालकांकडे प्रकरणाला स्थगिती मिळविली जाते. या अशा व्यवस्थेतून कळंगुट-बागाचा बेकायदेशीरपणा फोफावला आहे. स्थानिक पंच, सरपंच प्रचंड माया जमवून बसले आहेत. पंच मर्सिडीज गाड्या उडवतात. जमिनींच्या व्यवहारापासून हॉटेल, क्लब यांच्या मान्यता, बेकायदेशीर घरांवर कब्जा, ड्रग्स व्यवसाय, मुलींची विक्री आणि वेश्याव्यवसाय यात ही सर्व मंडळी गुंतलेली नाहीत म्हणणे धैर्याचेच ठरेल. त्यांनी सर्वांनी मिळून गोव्याचे धिंडवडे काढलेले आहेत.

गेला आठवडाभर विविध पत्रकार, राष्ट्रीय वृत्तवाहिन्या आणि समाजमाध्यमे आक्रंदत आहेत. रिव्होल्युशनरी गोवन्सचे मनोज परब ‘तार स्वरात’ घाट्यांविरुद्ध बोलतात. वास्तविक दिल्लीचे पुंजीपती आणि स्थानिक दलाल जे आता पंचायत पातळीवरील सारी पदे हस्तगत करून अब्जाधीश बनले आहेत, यांनी गोव्याचे नि:संतान करण्याची कोणतीही संधी दवडलेली नाही.

पत्रकारितेत इतकी वर्षे तग धरून असलेले आम्ही काहीजण या सर्वांचा वाईटपणा घेत असतो. परंतु ही गोव्याची दरी सतत रुंदावते आहे. वास्तविक सत्य बोलायला कुणीही तयार नाही. आम्ही फक्त स्थलांतरित कामगारांविरुद्ध उसासे सोडत आलो. बदललेल्या गोव्यात त्यांचा सहभाग कितीसा?

गोवा फार झपाट्याने बदलला. इतक्या वेगाने की कळंगुट-बागा पट्ट्यात, एकूणच किनारपट्टीवर हा सर्व जो नंगानाच सुरू आहे त्याचा आम्हाला सुगावाच लागला नाही. सुरुवातीला खाण कंपन्यांनी अंतर्गत गोवा लुटला. या खाण निर्यातदार कंपन्या पाच-सहाच असतील; परंतु त्यांनी हजारो रक्तपिपासू घटक निर्माण केले. परवा हडफड्याचे सरपंच तावातावाने बोलत होते. आमदारांना (मायकल लोबो) चार पिढ्यांना लागेल एवढी संपत्ती निर्माण करायची आहे काय? आम्हाला ते काहीच का करू देत नाहीत? असा त्यांचा सवाल होता. म्हणजे त्यांना आणखी किती मर्सिडीज हव्या आहेत?

खाणपट्ट्यात हजारो ट्रकचालक, अवजड सामग्री तयार करणाऱ्यांचे जाळेच निर्माण झाले. खाण कंपन्यांनी जर वर्षाकाठी पाचशे कोटी कमावले, तर या नवश्रीमंत फौजेनेही हात धुऊन घेतले. उलट खाणी बंद पडल्या, तेव्हा सरकारकडेच मदतीची याचना केली. परवा एका लग्नाला त्या पट्ट्यात गेलो असता, सोन्याने मढवलेल्या स्त्रियांचे दर्शन झाले. गोव्याची ही नवी ‘भाटकार’ व्यवस्था आहे. या सर्वांनी मिळून खाणपट्टा लुटला. एकेकाळी हीच मंडळी कॅसिनोंमध्ये दिसायची. केस कापायला पणजीत ‘स्पा’मध्ये येण्यासाठी रीघ लागायची. एके रात्री वीज गेली तर ते शहरांमधील हॉटेलांत मुक्काम करायचे.

पैशांचा एवढा माज पहिल्यांदा गोव्यात निर्माण झाला. सरपंच, पंचायत सचिवांपासून स्थानिक पोलिस आणि साऱ्यांनी या माजोरीत हात धुऊन घेतले. रस्त्यावर पडलेला खनिज गोळा करून लोक गब्बर झाले. लोकांनी शेती सोडली; उपजीविकेसाठी परिश्रम करणे सोडून दिले. अनायासे मिळत असलेल्या वाहत्या गंगेत हात धुऊन घेत ऐतखाऊ बनण्यात त्यांनी धन्यता मानली. खाण कंपन्यांचे ते माफिया बनले व राजकारण्यांनी त्यांची ही सर्व अराजकता चालू दिली.

खाणपट्ट्यातील अराजक व्यवस्था त्या व्यवसायालाच संपवून गेली. तोच कित्ता आता पर्यटन क्षेत्रात गिरवला जात आहे. गोवा ‘ब्रॅण्ड’ बनला, दिल्लीचा पैसा ओतला जाऊ लागला आणि स्थानिकांच्याही तोंडात लाळ घोळू लागली. खाणपट्ट्याप्रमाणेच येथे लोक ऐतखाऊ बनले. कोणालाच श्रमाचा पैसा नको! पर्यटन-माफियांचा हा भाग आहे. किनारपट्टीतही चालू असलेला हा नंगानाच एक व्यवस्था बनली आहे आणि सरकारी आशीर्वादाने साऱ्यांचेच चोचले तेथे पुरवले जाऊ लागले.

सुरुवातीला वाटत होते, गोवा आता बदलला आहे. खेडी शहरे बनू लागली. शहरांमध्ये कॉंक्रीटचे रान उभे राहिले, भाडे वाढले, मोठ्या प्रमाणावर बाहेरच्यांनी येऊन बस्तान बसविले. कोकण रेल्वेतून हजारो लोक उतरू लागले. स्थानिक अल्पसंख्य बनले. गावात आता कोणी स्थानिक भाषा बोलत नाहीत. कळंगुट-बागा पट्ट्यात पंजाबी रेस्टॉरंट गल्लीबोळात सुरू झाले आहेत. सुरुवातीला हा सांस्कृतिक धक्का वाटत होता. परंतु गोव्याचे हे अधःपतन आहे.

हडफड्याच्या नाईट क्लबमध्ये विदेशी नृत्यांगना नाचत होती. या दिवसांत जे व्हिडिओ प्रसारित झाले आहेत, तसले कॅबरे आणि इतर धांगडधिंगा कोणत्याही ‘सेक्स डेस्टिनेशन’ध्ये सापडणार नाही. वास्तविक केवळ बाहेरच्यांना दोष देऊन चालणार नाही. आपले नेते आयपीएस अधिकाऱ्यांना दोष देऊन स्वतः साळसूदपणाचा आव आणत आहेत. त्यांना चाललेय काय ते माहिती नव्हते? ते त्यात सामील नाहीत? मुळात हा धांगडधिंगा नेत्यांनीच पोसलेला आहे.

दिल्लीपासून गल्लीपर्यंत सारे त्यात सामील आहेत! सुरुवातीला ज्यांनी खाण व्यवसाय बेदरकारीने चालू दिला- जे कॉंग्रेस राजवटीत घडले, तोच कित्ता भाजपने पुढे चालू ठेवला. आज तर ज्यापद्धतीने बांधकाम व्यवसाय आणि पर्यटनातील धनदांडगे आपली व्यवस्था येथे चालवत आहेत, ते पाहिले तर गोव्यात शासन नावाची चीज अस्तित्वात आहे का, असा प्रश्न कोणालाही पडेल. कळंगुटला आमचा प्रतिनिधी प्रतिक्रिया घेत होता, एक स्थानिक महिला पुढे होऊन म्हणाली, ‘‘आम्ही कळंगुटला राहतोय म्हटल्यावर आमच्याकडे लग्नही करायला कोण तयार नसतात.’’ बेछूट पर्यटनाने स्थानिकांना लाज आणली आहे.

एकेकाळी पर्यटन म्हणजे शॅक व काही होम स्टे, त्यानंतर टॅक्सीचालकांना रोजगार मिळत असे. परंतु सध्या गोव्याचे पर्यटन म्हणजे अमलीपदार्थ आणि वेश्याव्यवसाय, काळा पैसा, दलाल, गुन्हेगारी यांचे एक मोठे दुष्टचक्र आहे! या व्यवसायाने सारी तत्त्वे पायदळी तुडवली आहेत. कोणालाही त्याबद्दल शरम नाही. एवढे सारेजण निर्ढावलेले आहेत! पर्यटन क्षेत्रातील आजच्या नेत्यांना मुळीच हात झटकता येणार नाहीत!

प्रचंड धनसंपत्ती मंत्र्यांकडेच जमा होते, असा समज होता; परंतु तुम्ही खेडेगावात चला, सरपंच-पंचांपासून तलाठ्यांपर्यंत छोटे-मोठे दलाल यांनी जो पैसा कमावलेला आहे, तो बोटे तोंडात घालायला लावणारा आहे. हडफड्याचे सरपंच हे त्यातील हिमनगाचे वर दिसणारे टोक. ज्या पद्धतीने लोक त्यांना पाठिंबा द्यायला आले, त्यावरूनच त्यांची ‘वट’ समजत होती.

गावात मोठे रस्ते झाले, मोठ्या इमारती, दिमाखदार हॉटेले आणि असंख्य देवळे! एवढ्या मोठ्या प्रमाणात श्रीमंत देवळे कशी उभी झाली. सर्व धर्मस्थानांना पैसे देण्यात कोणीही हात आखडता घेतला नाही. देवळांवर ख्रिस्ती लोकप्रतिनिधींचीही नावे आहेत. नाईट क्लबनी तर अक्षरशः पैशांची खैरात केलेली असणार. आतमध्ये कोंडले गेलेले देवही किती अस्वस्थ असतील, तेच जाणे. बाहेरून थैल्या घेऊन येताच याच गावातील लोकांनी त्यांना मोकळ्या जमिनी दाखवल्या. मिठागरेही याच सरपंच-दलालांनी दाखविली. मोकळ्या घरांवर कब्जा सुरू झाला. स्थानिकांच्या संपूर्ण पाठिंब्याशिवाय कळंगुट-बागा पट्टा असा रसातळाला गेलाच नसता.

एकेकाळी या सर्वांनी भाटकारांना शिव्या दिल्या होत्या. आज हेच नवे भाटकार झालेले आहेत. त्यांनी सर्वांनी गोव्याची अब्रू काढली आहे. यातील एकालाही गोव्याबद्दल व आपल्या राज्याच्या भवितव्याबद्दल प्रेम असण्याचे कारण नाही. या भागातील सर्वसामान्य माणसाचेही घर पाहा. सर्व घरे बेकायदेशीर, ती दोन-तीन मजली उभी आहेत.

कळंगुट-बागापासून मोरजी-पेडणे येथे एकही डोंगर शिल्लक ठेवलेला नाही. ज्याप्रकारे दिल्लीवरून नोएडावर आक्रमण झाले, तेथील शेतकऱ्यांनी जमिनी विकून टाकल्या, तसेच गोव्यात सर्वांनी आपल्या जमिनी पर्यटनासाठी देऊन टाकल्या. या वाहत्या गंगेत हात धुऊन घेणे ही प्रत्येकाची इतिकर्तव्यता ठरली. गावातील माणसे कामच करीत नाहीत. प्रत्येकजण या पर्यटनाच्या गंगेत हात धुऊन घेतोय, प्रत्येकाचे पर्यटनाशी काहीना काही नाते जोडले आहे. पैसाच इतका येतो, की काम करण्याची आवश्यकता नाही.

हीच लागण संपूर्ण गोव्याला झालेली आम्ही पाहत आहोत. शेतकऱ्यांना शेतात काम करायला नको आणि किनारपट्टीवर साऱ्यांना बेकायदेशीर घरे, हॉटले काढायची आहेत. पंचायतीत जिंकून येणे हे तर प्रत्येकाचे स्वप्नच बनले आहे. कारण पंचायतीत आल्याबरोबर जो कोण नवीन मान्यता घ्यायला येतो, त्याचा रेट ठरलेला असतो. हे सरपंच-पंच आमदारांचे पाठीराखे असतात, नवीन प्रकल्प उभारल्याबरोबर आमदाराचा हप्ता ठरलेला आहे.

सरपंच आपले वेगळे दुकान काढून बसलेला असतो, त्यामुळेच हे अनेक सरपंच वर्षानुवर्षे निवडून येत चाललेले आहेत. या पट्ट्यातील एका-एका पंचाची कमाई ५० लाख रुपये आहे. तेथील सरपंच कोट्यधीश बनले आहेत. त्यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाची धाड कशी पडत नाही? कारण ते आज भाजपच्या बाजूने उभे आहेत. उद्या ज्या-कोणाचे सरकार असेल, त्यांच्या बाजूने ते उभे राहतील. एवढा गडबड-घोटाळा होऊनही ते पुन्हा जिंकून येणार आहेत आणि त्यांची राजवट विनासायास चालू राहील.

या भागातील पंचायत सचिव आणि पर्यटन अधिकारी किती गब्बर झाले आहेत, याचा हिशोब स्थानिक लोकच देत असतात. मंत्री पातळीपर्यंत हे सारे हप्ते पोहोचवले जातात. ही व्यवस्थाच त्यांना आश्रय देते. गोव्याच्या अस्तित्वाचाच हा लिलाव आहे. पैसा एवढा येतोय की सर्वांनीच त्यात माखून घेतले आहे. यालाच गोव्याच्या अस्तित्वाचा घोट घेणे म्हणतात. महत्त्वाचे म्हणजे आपल्या राज्यकर्त्यापैकी एकालाही त्याबद्दल शरम वाटत नाही. आणि शरम तरी का वाटावी? कारण हा चोरबाजार निर्माण करणारी व्यवस्थाच त्यांच्या आशीर्वादाने निर्माण झाली. गोव्याची कबर त्यांनीच तर खणून ठेवली आहे.

मग यावर उपाय काय? उपाय एकच- मुख्यमंत्र्यांनी बेकायदा नाईट क्लबवर जो हातोडा उगारला आहे, तो संपूर्ण किनारपट्टी स्वच्छ करीपर्यंत त्यांनी चालूच ठेवावा. मी त्याही पुढे जाऊन म्हणेन: त्यांनी या अवैध पर्यटनावर पुढच्या दहा वर्षांची बंदी लागू करावी. बेकायदेशीर कळंगुट-बागा पट्टा संपूर्णतः दहा वर्षे बंद ठेवावा. गोव्याला जिवंत ठेवण्याचा हा एकच धाडसी मार्ग आहे. ही जी कबर खणली आहे, त्यात पर्यटनातील साऱ्या बाजारबुणग्यांना गाडून टाका.

पर्यटनातील सारी गलिच्छता, बीभत्सता यांना मूठमाती द्या. गोव्याला दंश करणाऱ्या विकृत पर्यटनाला संपविण्याचा हा एकमेव मार्ग आहे. त्यातून कदाचित काही नेत्यांचे अस्तित्व दोलायमान बनेल. परंतु गोवा संपण्यापासून वाचेल. पुढच्या पिढ्या तुम्हांला धन्यवाद देतील. तसे घडले नाही तर किनारपट्टीत राहणाऱ्या स्थानिक मुलीच उद्या डान्सबारमध्ये नाचताना दिसतील. थायलंडमध्ये तसेच घडलेय. स्थानिक मुलीच तेथे रस्त्यावर उभ्या राहून देहविक्रय करतात. ती तेथे ‘व्यवस्थाच’ बनली आहे. राज्यकर्त्यांनी त्याग करण्याची तयारी ठेवली तरच हा आपला चिमुकला गोवा जिवंत राहणार आहे.

- राजू नायक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Bus Accident: 25 शाळकरी मुलांवर काळाचा घाला! स्कूल बस नदीत कोसळल्याने हाहाकार; पालकांची धावपळ

Accident News: कार थेट झाडावर आदळली, रामनगर-धारवाड महामार्गावर भीषण अपघात; पणजीच्या 55 वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

2 मुलं, 6 वर्ष एकत्र; धुरंधर फेम अर्जुन रामपाल 'एंगेज्ड'! गिर्ल्डफ्रेन्डबद्दल म्हणाला, 'मी तिच्यामागे लागलो कारण ती..."

IND vs PAK: डोक्याला चेंडू लागला, पण मैदान सोडलं नाही, भारताचा 'फायटर' लढला; हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची केली चांगलीच धुलाई VIDEO

Firecracker Ban: फटाके उडवताय? सावधान! आतषबाजीवर पूर्ण बंदी, ख्रिसमस-नवीन वर्षाचा उत्साह थंड

SCROLL FOR NEXT