

पणजी: वादग्रस्त ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबचा सहमालक अजय गुप्ता याला मांद्रे ग्रामपंचायतीने नोव्हेंबर महिन्यातच त्याचे एक प्रशस्त रेस्टॉरन्ट तत्काळ बंद करण्याची नोटीस बजावली होती.
कर न भरल्यामुळे ही नोटीस जारी करून व्यवसाय बंद करण्याचा आदेश दिला होता. ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबमधील ‘स्लीपिंग पार्टनर’ असा दावा करणाऱ्या अजय गुप्ता याचे राज्यातील अन्य काही ठिकाणीही व्यवसाय असून त्याच्यावर यापूर्वी कारवाई केली असल्याचे उघड झाले आहे.
मांद्रे पंचायतीच्या नोटिशीत परवानगीशिवाय व नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय सुरू असल्याचा ठपका ठेवला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, गुप्ता हा गोव्यात अनेक बेकायदेशीर व्यवसाय चालवत असून व कर न भरलेल्या व्यावसायिकांमध्ये त्याचाही समावेश असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.६ डिसेंबर रोजी हडफडे येथे ‘बर्च’ नाईट क्लबमध्ये झालेल्या भीषण आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भागीदार म्हणून अजय गुप्ता याला अटक केली असून तो सध्या पोलिस
कोठडीत आहे. या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच तपासात अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन व अनधिकृत बांधकाम असल्याचे उघड झाले आहे.
अजय गुप्ता याला दिल्लीतून ताब्यात घेऊन सात दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवले आहे. आर्थिक गैरव्यवहार, करचुकवेगिरी आणि कथित शेल कंपन्यांच्या दुव्यांचा तपास तूर्तास यंत्रणांकडून सुरू आहे. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक हरीश मडकईकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की या प्रकरणाची चौकशी सुरू असून आम्हाला जी माहिती आवश्यक आहे, ती मिळविण्याचे काम सुरू आहे.
मांद्रेचे सरपंच रॉबर्ट फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अजय गुप्ता हा त्या जागेचा मालक नाही. त्याने ती जागा भाड्याने घेतली होती आणि तिथे व्यवसाय सुरू केला होता. तो पंचायतीचा कर बुडवत असल्याचे लक्षात आल्यावर ही आस्थापने त्वरित थांबविण्याचे आदेश जारी केले. त्याचे अजूनही काही व्यवसाय बेकायदेशीरपणे सुरू असून त्यांच्यावरही लवकरच कारवाई होईल.
जळीतकांडावेळी अजय होता गोव्यात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हडफडेत नाईट क्लबला आग लागली होती, त्यावेळी क्लबचा सहमालक अजय गुप्ता हा गोव्यातच होता. ही घटना घडल्यानंतर तो तातडीने गोव्याबाहेर गेला. त्यामुळे त्याने आपली जबाबदारी टाळून पलायन केल्याचे अधोरेखित झाले आहे.
बँकॉकमार्गे भारतात
अटक केल्यानंतर लुथ्रा बंधूंना फुकेत येथील स्थानिक इमिग्रेशन कार्यालयात नेण्यात आले आहे. पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना बँकॉक येथील डिटेन्शन सेंटरमध्ये हलवण्यात येणार असून, त्यानंतर भारतात प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. बुधवारी त्यांना भारतात आणले जाण्याची शक्यता आहे. त्यांना प्रथम दिल्लीत, नंतर गोव्यात चौकशीसाठी आणले जाईल.
भूक लागली अन् लुथरा बंधू अडकले
लुथरा बंधूंची थायलंडमधील अटकेची कारवाई एखाद्या थरारक चित्रपटाला साजेशी होती.
फुकेत येथील एका हॉटेलमध्ये लपलेल्या लुथरा बंधूंच्या हालचालींवर भारतीय तपास यंत्रणांनी आधीच लक्ष केंद्रित केले होते.
भारतीय तपास एजन्सींनी थायी अधिकाऱ्यांना अचूक आणि विश्वासार्ह माहिती पुरवली होती.
थायी इमिग्रेशन व पोलिसांनी संबंधित हॉटेलवर गुप्त पाळत ठेवली होती.
अटक टाळण्यासाठी लुथरा बंधू अनेक दिवस हॉटेलबाहेर न पडता खोलीतच थांबले होते.
मात्र, ९ डिसेंबरच्या संध्याकाळी आपण सुरक्षित आहोत, या समजुतीने ते हॉटेलबाहेर पडले. प्राथमिक माहितीनुसार ते जेवणासाठी बाहेर गेले होते.
हाच काही मिनिटांचा कालावधी थायी अधिकाऱ्यांसाठी निर्णायक ठरला. हॉटेलबाहेर पडताच थायी इमिग्रेशन व पोलिस अधिकाऱ्यांनी लुथरा बंधूंची प्रत्यक्ष तपासणी केली.
त्यानंतर थायी अधिकाऱ्यांच्या एका विशेष पथकाने त्यांना रितसर अटक केली.
दस्तावेजांची छाननी
तत्कालीन पंचायत सचिव रघुवीर बागकर यांनीही शनिवारी हणजूण पोलिस स्थानकात हजेरी लावली. हडफडे-नागवा पंचायतीने वादग्रस्त बर्च क्लबला परवाना दिला होता. यासंदर्भात सध्या पोलिसांकडून पंच सदस्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी हडफडे-नागवा पंचायत कार्यालयातून आणलेल्या क्लबशी संबंधित सर्व फाईल्स आणि दस्तावेजांची छाननी सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.