डॉ. नाऊ वरक
काँग्रेस पक्ष २२ सप्टेंबरपासून ‘गोंय राखण’ यात्रेमार्फत गोव्याची अस्मिता, जमीन आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी चाळीसही मतदारसंघामध्ये जागृती मोहीम राबवित आहे. भाजपच्या १५ वर्षांच्या राजवटीनंतर कोलमडलेल्या काँग्रेससाठी ही संपर्क यात्रा महत्वपूर्ण आहे. भाजपनेही ७ ऑक्टोबर रोजी ‘सेवा ज्योती यात्रा’ सुरू केली आहे.
सध्या गोव्यात यात्रा आणि जात्रा ह्या दोन शब्दांची चर्चा आहे. यात्रा हे सामाजिक ध्येयाचे द्योतक आहे. तर जात्रा स्थानिक अर्थव्यवस्थेचे व व्यवहार्यतेचे प्रतीक. पूर्वी जात्रेच्या ठिकाणी खरेदी-विक्रीचे व्यवहार व्हायचे. यात्रा आणि जात्रा यांचा योग्य ताळमेळ असेल तरच राज्यव्यवस्था सुरळीत चालते. विधानसभेच्या यात्रेला निघताना गोव्यातील जात्रांचा अनुभव आवश्यक आहे. काँग्रेस पक्ष २२ सप्टेंबरपासून ‘गोंय राखण’ यात्रेमार्फत गोव्याची अस्मिता, जमीन आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी चाळीसही मतदारसंघामध्ये जागृती मोहीम राबवित आहे. भाजपच्या १५ वर्षांच्या राजवटीनंतर कोलमडलेल्या काँग्रेससाठी ही संपर्क यात्रा महत्वपूर्ण आहे.
भाजपनेही ७ ऑक्टोबर रोजी ‘सेवा ज्योती यात्रा’ सुरू केली आहे. त्यामुळे गोंय राखण यात्रेचा सेवा ज्योती यात्रेसमोर निभाव लागणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. निवडणूक यात्रा म्हटल्यावर घोषणा आणि गाणी मतदारांना आकर्षित करतात. निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना १६ जानेवारी, २०१२ रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी १६ दिवसांच्या गोवा संपर्क यात्रेला आझाद मैदान, पणजी येथून सुरुवात केली. २०१२ मध्ये ‘३’ या तमिळ चित्रपटात धनुष यांचे ‘व्हाय धीस कोलावरी दि?’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. याच गाण्याच्या धर्तीवर भाजपचे विष्णू वाघ यांनी ‘मत तुझे कमळावरी दि’ हे कोकणी प्रचारगीत रचिले.
या गाण्याचे काही बोल असे होते - मत तुझे कमळावरी कमळावरी दि! मायनिंग कलर रेड रेडं, कॅसिनो गोयांत बॅड! ड्रग्ज नेक्सस सॅड सॅड! एसइझेड लँड व्हडलें फ्रॉड फ्रॉड, रिजनल प्लॅन फुल! हे लोकगीताचा मुलामा असलेले गाणे भाजपच्या जन संपर्क यात्रेत गोवाभर गायले गेले. गोंय राखण यात्रेचे कोकणी रॅप गीत जनमानसात तेवढे लोकप्रिय नाही. २०१२ ची भाजपची यात्रा आणि काँग्रेसच्या २०२६ मधील यात्रेतील मुद्यांमध्ये बऱ्याचअंशी साम्य तसेच कार्यप्रणालीमध्ये विसंगतीही आहेत. भाजपने २०१२ मध्ये उपस्थित केलेले मुद्दे लोकांसाठी नवीन असल्यामुळे लोकांनी भाजपवर विश्वास ठेवला. २०२६ मध्ये तेच मुद्दे काँग्रेसने वेगळ्या भाषेत मांडले तर लोक विश्वास ठेवतील का? २०१२ पर्यंत भाजप हा कार्यकर्ते व पक्ष संघटनेवर अवलंबून होता. २०१२ नंतरच्या भाजपला विशिष्ट जनाधार आहे.
‘गोंय विकपाक दिवचे ना, बीजेपीक जिकपाक दिवचे ना!’ ही काँग्रेसची घोषणा भाजपच्या २०१२ तील ‘भांगराळे गोंय’ या कल्पनेशी सुसंगत आहे. राखण यात्रेतील घोषणांमध्ये नावीन्य नसल्याचे आढळते. २०१२ मधील भाजपचेच प्रचारतंत्र काँग्रेस वापरत आहे का? असाही प्रश्न पडतो. काँग्रेसने सहा महिने अगोदरच निवडणुकीचे रणशिंग हाती घेतल्याने प्रचारतंत्रात आवश्यक बदल करणे शक्य आहे. भाजप जिंकली तर मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री होतील याची मतदारांना २०१२ मध्ये माहिती होती. राखण यात्रेवेळी मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असेल याची लोकांना कल्पना नाही. त्यामुळे मतदारां‘त संभ्रम आहे.
निवडणुकीच्या दृष्टीने मतदारांची आणि उमेदवारांची जात्रा सांभाळणे हे काँग्रेसपुढे मोठे आव्हान आहे. गेल्या काही वर्षांत कन्नड व हिंदी भाषिकांची संख्या वाढत आहे. बिगर गोमंतकीय मतदारांचा राष्ट्रीय पक्षांकडे ओढा असतो. जगन्नाथ यात्रा व छठ पूजा अशा कार्यक्रमांत भाजपच्या नेत्यांची उपस्थिती असते. त्यामुळे बिगर गोमंतकीय मतदार हा निवडणुकीच्या जात्रेतील प्रमुख घटक आहे. याचीच प्रचिती कुठ्ठाळी येथील राखण यात्रेत आली. गोवा काँग्रेसचे नेते हिंदीत बोलत होते तर कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी कन्नड भाषेतून सभेला संबोधित केले. काँग्रेस मतदारांची जात्रा सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे यावरून दिसून आले.
काँग्रेसचे प्रचारतंत्र निकामी करण्यात भाजप चाणाक्ष आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष यांची युती तसेच तामिळनाडूमध्ये काँग्रेस व द्रमुक मधील युतीला ''महामिलावटी आघाडी'' म्हणून संबोधले. गोव्यातही विरोधकांच्या आघाडीवर भाजप अशाचप्रकारे हल्ला चढविणार आहे. गोव्यातील प्रादेशिक पक्ष व काँग्रेसमधील वैमनस्याच्या पार्श्वभूमीचा पुरेपूर प्रचार करणार आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्ड व काँग्रेसमधील मधील युतीपेक्षा विलीनीकरण काँग्रेसला फादेशीर ठरेल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधींनी ‘चौकीदार चोर है!’ ही घोषणा दिली.
भाजपने त्याचा पलटवार ‘हम भी है चौकीदार!’ या घोषणेने केला. राहुल गांधींना ‘नामदार’ ठरवून भाजपने नरेंद्र मोदींना ‘मोदी है तो मुमकिन है!’ या घोषणेतून ‘कामदार’ घोषित केले. राखण यात्रेतील काँग्रेसच्या घोषणा या चाणाक्षरित्या आखलेल्या नाहीत. त्या सरळ आणि नीरस आहेत. सध्या काँग्रेस पक्ष ‘राहुल गांधींनी लढावे, बाकी सगळ्यांनी बघावे’ या तंद्रीत आहे. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यामधील लढाईचा फायदा काँग्रेसला राज्यांमध्ये झालेला दिसत नाही. म्हणून कर्नाटक, तेलंगण आणि केरळप्रमाणे गोव्यात काँग्रेसला प्रादेशिक हाय कमांडची गरज आहे. राहुल गांधींना गोवा भेटीत प्रादेशिक हाय कमांडचा चेहरा निवडावा लागेल. तरच काँग्रेसच्या यात्रेचा आणि जात्रेचा योग्य मेळ बसू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.