हल्लीच्या निवडणुका जिंकणे म्हणजे युद्ध जिंकण्यासारखेच असते. त्याकरता सर्व आयुधे वापरून रणांगणात उतरावे लागते. आता याची जाणीव काँग्रेसला जेव्हा होईल तोच खरा सुदिन ठरेल. अन्यथा २७ जागा जिंकण्याची काँग्रेसची घोषणा म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ठरण्यापलीकडे दुसरे काहीही नाही.
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेस २७ जागा मिळवणार, अशी अपेक्षा व्यक्त केली. पण त्या कोणत्या आणि त्या कशा मिळवणार हे सांगायला मात्र ते विसरले. आता निवडणूक २०२७ साली होणार म्हणून २७ जागा मिळणार हे समीकरण ऐकायला ठीक आहे. पण प्रत्यक्षात आणणे मात्र कठीणच. भाजपनेसुद्धा येत्या निवडणुकीत २७ जागा मिळविणार अशी घोषणा केली आहे. सध्या विधानसभेत भाजपचे सत्तावीस आमदार असल्यामुळे त्यांनी तशी अपेक्षा करणे एकवेळ समजता येते. पण गोव्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार केल्यास भाजपलाही २७ जागा प्राप्त करणे हे कठीणच वाटते.
काँग्रेसबाबत बोलायचे तर सध्या काँग्रेसची बऱ्याच मतदारसंघात पक्ष बांधणीच नाही. उत्तर गोव्यात तर पाटी बहुतांशी कोऱीच वाटते. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने उत्तर गोव्यातील कळंगुट, शिवोली, साळगाव, हळदोणे, सांताक्रूज, कुंभारजुवे या सहा जागा जिंकल्या होत्या. पण त्यावेळी मायकल लोबो भाजप सोडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये आले होते. आणि त्यामुळे काँग्रेस बार्देश तालुक्यातील चार जागा जिंकू शकला होता.
पण आज या सहा जागांपैकी काँग्रेसजवळ फक्त हळदोण्याची एकच जागा शिल्लक राहिली आहे. आणि राजकीय शक्तीचा विचार केल्यास गेल्या वेळेला जिंकलेल्या उत्तर गोव्यातील पाच जागांपैकी सांताक्रूजचा अपवाद वगळता इतर चार जागा काँग्रेसला मिळणे जवळजवळ अशक्यच वाटते आहे. आता प्रस्तुत मतदारसंघावर प्रभाव असलेला एखादा राजकीय नेता आयात करून त्याला काँग्रेसने उमेदवारी दिल्यास फरक पडू शकेल, नाही असे नाही. पण निवडून आल्यास तो पक्षात टिकेल की काय हे सांगणे मात्र ब्रह्मदेवालाही जमणार नाही.
खरे तर काँग्रेसची वाट लावली आहे ती अशाच पक्ष बदलू नेत्यांनी. उमेदवारी मिळवण्याकरता हे लोक काँग्रेसचा शिडीसारखा वापर करतात हे आता लपून राहिलेले नाही. मायकल लोबोचेच उदाहरण घ्या. आपली पत्नी डिलायला यांना भाजपची उमेदवारी मिळत नाही हे पाहून त्यांनी काँग्रेसमध्ये उडी घेतली. आणि दोघे पती-पत्नी निवडून आल्यानंतर भाजपमध्ये ‘घरवापसी’ केली. आणि हे सगळे पक्षातून फुटणार नाही अशी देवासमोर शपथ घेऊन. हे पाहता कोणाच्या भरवशावर काँग्रेस मनोरे बांधू पाहत आहे हेच कळत नाही.
त्यात परत सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील असे सध्याची स्थिती पाहता बिलकूल वाटत नाही. नुकत्याच रद्द झालेल्या फोंडा पोटनिवडणुकीचेच उदाहरण घ्या. या पोटनिवडणुकीत काँग्रेस एकाकी लढली. आम आदमीने अधिकृतपणे वेगळी चूल थाटली. गोवा फॉरवर्ड प्रचारात कुठेही दिसला नाही. आणि आरजीही अलिप्तच राहिला. आता या गोष्टीकडे जर ’ट्रेलर’ म्हणून पाहिले तर आगामी पिक्चर काय असू शकतो हे सहज लक्षात येते. आजची स्थिती पाहिल्यास सात आठ मतदारसंघ वगळल्यास काँग्रेस स्वबळावर निवडून येईल असे मतदारसंघच दिसत नाहीत. आणि तसे प्रयत्नही बघायला मिळत नाहीत. त्यामुळे उगाच २७ जागांचे स्वप्न बघण्यापेक्षा काही हमखास जिंकून येऊ शकेल अशा जागांवर लक्ष केंद्रित केल्यास त्याचा फायदा त्यांना आगामी निवडणुकीत होऊ शकतो.
आज काँग्रेसजवळ रवि नाईक, दिगंबर कामत यांसारखे नेते नाहीत हेही लक्षात घ्यायला हवे. विरोधी पक्षनेते युरीच्या नेतृत्वाला अनेक मर्यादा आहेत. त्यांच्याकडे राजकारणाचा मोठा अनुभवही नाही. काँग्रेसच्या इतर दोन आमदारांबाबतही तेच म्हणता येऊ शकेल. आता राज्यात भाजपविरोधी वातावरण आहे म्हणून लोक काँग्रेसला मतदान करतील अशी जर काँग्रेसची समजूत असेल तर ती वस्तुस्थितीला धरून आहे असे नक्कीच म्हणता येणार नाही.
गेल्या निवडणुकीच्या वेळीही अशीच स्थिती होती. पण त्यावेळी विरोधी पक्षात मत विभागणी झाल्यामुळे फक्त ३४% मते पडूनसुद्धा भाजप सत्तेवर येऊ शकला होता. काँग्रेसला त्यावेळी ११ जागा मिळाल्या होत्या. पण आता राहिल्या आहेत फक्त तीन. यावेळीही तसेच होऊ शकते. भाजप सत्तेवर आला नाही तर गेल्या निवडणुकीसारखा ‘प्लॅन बी’ वापरून म्हणजे काँग्रेस आमदारांना आयात करून वा इतर पक्षाच्या आमदारांना हाताशी धरून सत्ता मिळवू शकतो.
२०१७साली तर दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी भाजपचे फक्त १३ आमदार निवडून येऊनसुद्धा सत्ता पटकावून दाखविली होती. आणि याच फॉर्मुल्याचा वस्तुपाठ सध्याचे नेते गिरवताना दिसत आहेत. भाजपने आगामी निवडणुकीकरता रणनीती आखायला आतापासूनच सुरुवात केली आहे. काँग्रेस मात्र अंधारात तीर मारताना दिसत आहे. म्हणूनच फक्त स्वप्ने बघण्यापेक्षा ‘रात्र वैऱ्याची आहे जागा राहा’ या तत्त्वानुसार सकस अशी रणनीती आखायला काँग्रेसने सुरुवात केली पाहिजे.
‘प्लॅन ए’, ‘प्लॅन बी’ असे विविध प्रकारचे प्लॅन तयार करण्याचे बघितले पाहिजे. हल्लीच्या निवडणुका जिंकणे म्हणजे युद्ध जिंकण्यासारखेच असते. त्याकरता सर्व आयुधे वापरून रणांगणात उतरावे लागते. आता याची जाणीव काँग्रेसला जेव्हा होईल तोच खरा सुदिन ठरेल. अन्यथा २७ जागा जिंकण्याची काँग्रेसची घोषणा म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ठरण्यापलीकडे दुसरे काहीही होऊ शकणार नाही, एवढे निश्चित!
- मिलिंद म्हाडगुत
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.