राजेंद्र पां. केरकर
‘अझुलेजोस’ हा पोर्तुगीज शब्द अरबी भाषेतील अल-जिलिज या शब्दापासून विकसित झाला आहे. या शब्दाचा अर्थ लहान, गुळगुळीत आणि पॉलिश केलेला दगड असा होतो. इमारतींचे सौंदर्य आणि आकर्षकता वाढविण्याबरोबरच, दमट हवामानाच्या प्रदेशांत आतील तापमान नियंत्रित ठेवणे आणि भिंतींचे ओलाव्यापासून संरक्षण करणे, या उद्देशांनीही या फरशांचा वापर केला जात असे.
अझुलेजोस (Azulejos) ही आयबेरियन प्रदेशातील रंगीत चित्रांनी सजविलेल्या, कथिलाचा मुलामा दिलेल्या सिरॅमिक फरशांची कलाकुसर आहे. पोर्तुगीज राजवटीच्या काळात ही कला गोव्यात पोहोचली, असे मानले जाते. सुरुवातीला आयबेरियन द्वीपकल्पात भौमितिक रचना आणि इस्लामी कलाशैलीपासून प्रेरित आकृतिबंधांसह या कलेची वृद्धी झाली. मात्र, पोर्तुगीज काळात गोव्यात या कलाप्रकाराला विशेष राजाश्रय लाभला. स्पॅनिश आणि पोर्तुगीज स्थापत्यशैलीच्या प्रभावामुळे या कलेला अधिक महत्त्व प्राप्त झाले. चर्च, राजवाडे आणि घरांच्या अंतर्गत तसेच बाह्य भागांना या कलाकृतींनी सौंदर्य आणि वैभव प्राप्त करून दिले.
त्याचबरोबर, या कलाकृती आपल्या भूमीतील सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचेही दर्शन घडवतात. पोर्तुगीज सत्ताधीशांनी गोव्यात या वैशिष्ट्यपूर्ण कलाप्रकाराची ओळख करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असली, तरी स्थानिक कारागिरांनी त्यात गोव्याच्या संस्कृतीनुसार बदल केले. त्यांनी स्थानिक जीवनातील रंगीबेरंगी आकृतिबंध, दृश्ये आणि सामाजिक-सांस्कृतिक परंपरांचा समावेश करून या कलेला एक स्वतंत्र ओळख मिळवून दिली.
‘अझुलेजोस’ हा पोर्तुगीज शब्द अरबी भाषेतील अल-जिलिज या शब्दापासून विकसित झाला आहे. या शब्दाचा अर्थ लहान, गुळगुळीत आणि पॉलिश केलेला दगड असा होतो. इमारतींचे सौंदर्य आणि आकर्षकता वाढविण्याबरोबरच, दमट हवामानाच्या प्रदेशांत आतील तापमान नियंत्रित ठेवणे आणि भिंतींचे ओलाव्यापासून संरक्षण करणे, या उद्देशांनीही या फरशांचा वापर केला जात असे.
या कलेची मुळे मुरिश स्थापत्यशैलीतील भौमितिक आकृतिबंधांत असली, तरी पोर्तुगीजांनी ही कला गोव्यात आणल्यानंतर येथील प्रतिभावान आणि सर्जनशील कारागिरांनी स्थानिक कलाप्रतीके, सामाजिक-सांस्कृतिक जीवन आणि ग्रामीण भागातील दृश्ये यांचा समावेश केला. त्यामुळे या कलाप्रकाराची व्याप्ती आणि कलात्मक उंची अधिक विस्तारली. पोर्तुगीज राजवटीत इथल्या कष्टकरी समाजाने मोठ्या श्रद्धेने आणि आत्मियतेने जपलेल्या गोव्यातल्या बऱ्याच सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संचितांचा विद्ध्वंस केला.
आपल्या इथल्पा वास्तुकलेला आणि स्थापत्यकलेला त्यांनी राजाश्रय दिल्याने, त्यांना भावलेल्या कला प्रकारांना रुजवण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी गावोगावी कार्यरत असणाऱ्या कलाकार आणि कारागिरांचे सहाय्य घेतले, त्यावेळी त्यांनी आपले कला कौशल्य पणास लावून कलेच्या एकंदर अभिवृद्धित विशेष भर घातली होती. तत्पूर्वी त्यांनी युरोपातून निमंत्रित केलेल्या तज्ञ कलाकार आणि कारागिरांनी इथल्या स्थानिकांना प्रशिक्षित केले आणि त्यांनी प्रादेशिक वैशिष्ट्याने या कलेच्या प्रचार आणि प्रसारात लक्षणीय भर घातली.
जुन्या गोव्यातील से कॅथेड्रल, बॉम जीझसची बॅसिलिका आणि सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी चर्च येथे सोळाव्या आणि सतराव्या शतकांतील निळ्या-पांढऱ्या रंगांच्या फरशांवरील कलात्मक पट्टिका पाहायला मिळतात. त्यांवर बायबलमधील प्रसंग, सांस्कृतिक कथने आणि धार्मिक घटनांचे चित्रण केलेले आहे. गोव्याच्या काही भागांतील शेकडो वर्षे जुन्या इंडो-पोर्तुगीज घरांमध्ये आजही हाताने रंगविलेल्या फरशा आणि गोमंतकीय कारागिरांच्या कलात्मक निर्मिती पाहायला मिळतात. पोर्तुगीज राजवटीत बांधलेल्या काही शैक्षणिक वास्तुंच्या सुशोभिकरणात भर घालण्याच्या हेतूने, त्यांनी अजुलेझोसचा वापर केला होता. फोंडा, काणकोण येथील अशा वास्तूतून त्यांचे दर्शन आजही घेता येते.
पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा या वारसा स्थळाच्या इमारतीत प्रवेश करताच दोन्ही बाजूंच्या भिंतींवर ऐतिहासिक प्रसंगांची चित्रे दिसतात. १८७१ मध्ये पूर्ण झालेली ही इमारत पूर्वी इन्स्टिट्यूट वास्को द गामा या नावाने ओळखली जात होती. या ऐतिहासिक चित्रांची निर्मिती मोरोक्कोमध्ये जन्मलेल्या पोर्तुगीज कलाकार जॉर्ज कोलासो यांनी केली होती. हाताने रंगविलेल्या पाच मोठ्या चित्रांपैकी वास्को द गामा यांचा भारताकडे झालेला ऐतिहासिक सागरी प्रवास आणि कालिकतच्या झामोरिनशी झालेली त्यांची भेट ही चित्रे विशेष महत्त्वाची आहेत. निळ्या-पांढऱ्या रंगांतील या अझुलेजोस फरशांवरील चित्रपट्टिका १९३५ ते १९३६ या काळात लिस्बन येथे रंगविण्यात आल्या होत्या.
पोर्तुगीज कोंबडा, अर्थात गालो द बार्सेलोश , हे गोव्यातील लोकप्रिय प्रतीकांपैकी एक बनले. १९९८ मध्ये स्थापन झालेली अझुलेजोस द गोवा गॅलरी ही पणजी शहराच्या मध्यवर्ती भागातील सुमारे २५० वर्षे जुन्या इंडो-पोर्तुगीज घरात वसलेली आहे. या गॅलरीत हाताने रंगविलेल्या फरशांच्या निर्मितीत विशेष प्रावीण्य असलेल्या स्थानिक कलाकारांनी तयार केलेल्या विविध कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन भरविले जाते. अझुलेजोसच्या कलेने गोव्यातील घरे, चर्च, रस्ते आणि शाळांच्या भिंतींना जणू कथाकथन करणाऱ्या कलात्मक माध्यमांत रूपांतरित केले. मडगाव आणि पणजी यांच्याबरोबरच, डिचोली औद्योगिक वसाहतीतील शंकर तुरी यांनी तुरी अझुलेजोस या उपक्रमाच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या उपक्रमाद्वारे हाताने रंगविलेल्या गोमंतकीय फरशांचे विविध प्रकार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांनी महत्त्वाचे योगदान केलेले आहे . जागतिक ख्यातीचे व्यंग्यचित्रकार मारियो मिरांडा यांनी आपल्या रेखाचित्रांनी गोव्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पैलुंचा प्रभावीपणे आविष्कार घडवला होता. या चित्रांचे विलोभनीय दर्शन घडवणाऱ्या अझुलेजोसच्या निर्मितीने गोव्याची चिरंतन स्मृती आपल्या भिंतीवरती विराजमान करण्यासाठी प्रभावी माध्यम उपलब्ध झालेले आहे. अझुलेजोस ही केवळ सजावटीची कला नसून गोव्याच्या ऐतिहासिक वारशाचे, सांस्कृतिक वैविध्याचे आणि स्थानिक कलाकारांच्या सर्जनशीलतेचे दर्शन घडविणारी एक महत्त्वपूर्ण कलापरंपरा आहे.
जेथे जेथे वास्तुच्या एकंदर भिंतीवर त्या दृष्टीस पडतात, तेव्हा त्याद्वारे सजावटीत भर पडत असलेले प्रकर्षाने पहायला मिळते. अझुलेजोस कला पोर्तुगीज आमदानीत गोव्यात आली आणि गोव्यातल्या प्रतिभावंत आणि सर्जनशील कलावंतांनी आपल्या हृदयातील प्रादेशिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संचितांच्या आविष्काराने त्यात भरीव योगदान करून, त्या कलेच्या उत्कर्षाला हातभार लावलेला आहे. अझुलेजोसच्या कलेनं गोव्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घातलेली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.