Ancient Goan water conservation Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa History: कुशावती गाळाने भरली, गोव्यातील कदंब राजकर्त्यांनी चांदोर येथून जुवारी नदीकिनारी राजधानी नेली..

Ancient Goan water conservation: युरोपातल्या पोर्तुगाल या गरीब देशातून महासागर ओलांडून आलेल्या दर्यावदी पोर्तुगिजांचे पाय गोव्याला लागण्यापूर्वी ही भूमी आर्थिकदृष्ट्या संपन्न होती.

राजेंद्र केरकर

गोव्याची भूमी साक्षात देवभूमीच्या लौकिकास एकेकाळी पात्र झाली होती. त्याला इ्थल्या भूमिपुत्रांचे निसर्ग आणि पर्यावरणाच्या अस्तित्वाचे भान रोखून जगत असलेले जीवन कारणीभूत होते.

पश्चिम घाट आणि पश्चिम किनारपट्टीच्या कुशीत, छोट्या छोट्या असंख्य नद्यांच्या कुशीत पहुडलेल्या या भूमीत राहणाऱ्या कष्टकऱ्यांनी वृक्षवेली, दगडधोंडे, नदीनाले यांच्यात देवत्वाचा अंश अनुभवत असताना पर्यावरणीय संस्कृतीवरती आपले जीवन समृद्ध केले होते. युरोपातल्या पोर्तुगाल या गरीब देशातून महासागर ओलांडून आलेल्या दर्यावदी पोर्तुगिजांचे पाय गोव्याला लागण्यापूर्वी ही भूमी आर्थिकदृष्ट्या संपन्न होती.

अकराव्या शतकात त्या काळची तिसवाडीतल्या जुवारी नदीच्या किनारी वसलेली, कदंबांनी स्थापना केलेली गोवापुरी हे राजधानीचे शहर भरभराटीला पोहोचले होते.

शिवचित्त पेरमाडी देवाच्या कर्नाटकातल्या देगाव येथे सापडलेल्या दानपत्रात म्हटलेले आहे की, ‘जयकेशीच्या काळात गोवापुरीच्या (गोवा वेल्हा) रस्त्यांवरून पंडितांच्या पालख्यांची गर्दी व्हायची. या पालख्यांच्या दांड्यांना हिरेजवाहर जडवले होते आणि त्यात बसलेल्या पंडिताच्या कानातले डूल पालखीला बसलेल्या हेलकाव्यांबरोबर हलत असत.’

दुसऱ्या षष्ठदेवाच्या ताम्रपटात म्हटल्याप्रमाणे गोवापुरीतले रस्ते गर्दीने नेहमी फुललेले असत. सुंदर उद्याने व उपवने, मोठमोठे वाडे, शीतल तलाव, गजबजलेले बाजार, घोड्यांचे तबेले आणि सुंदर गणिकांची वस्ती यांनी गोवापुरीचे सौंदर्य वृद्धिंगत झाले होते. आणखी ऐतिहासिक पुराव्यानुसार गोवापुरी इंद्राच्या स्वर्गनगरीपेक्षाही अधिक सुखसंपन्न असल्याचे उल्लेख आढळतात.

गोतापुरी या शहरात उन्हाळ्यात पाणी आटल्यावर गंडगोपाळ तलावाच्या पाण्याचा वापर होत असावा. ११२५च्या एका शिलालेखात बोमीसेटटीला (महासामंत बोमदेवाला) एका तलावाच्या डागडुजीसाठी काही जमीन दान दिल्याचा जो उल्लेख आढळतो तो गुहललदेवाने केलेल्या दानाबाबत आहे.

११०६च्या आणखी एका ताम्रपटात गुहल्लदेवाच्या सेवेतील केलिवमनि गोपकपट्टण शहरात गंड गोपाळ ललाव बांधल्याचा उल्लेख आहे. या साऱ्या संदर्भावरून गोवा कदंब राजवटीतल्या राज्यकर्त्यांनी इये परंपरागत असलेल्या तलावाद्वारे पाण्याचे संवर्धन आणि विनियोग करण्याला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होते.

करमळी रेलवेस्थानकाजवळून नेवऱ्याहून पिलार जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला सुलाभाटीचा तलाव आहे. या तलावाच्या परिसरात सुमारे डझनभर मूळ आफ्रिकेतल्या बाओबाब म्हणजे गोरखचिंचेचे जुने वृक्ष उभे आहेत.

या साऱ्या पुराव्यांनुसार येथील मंदिराच्या सांनिध्यात इथल्या भूमिपुत्रांनी आपल्या शेतीच्या सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून डोंगर टेकडीच्या पायथ्याशी सुलाभाटीच्या तलावाची निर्मिती केली असावी.

गोवा कदंबाच्या राजवटीपूर्वी दक्षिण गोव्यातल्या चांदोर येथे भोजांनी चंद्रपूर या राजधानीची स्थापना केली होती .दोन हजार वर्षांच्या इतिहासाशी नाते सांगणाऱ्या चंद्रपूरच्या उत्खननाला महाकाय भग्न नंदी आणि त्याठिकाणी मंदिराचे अवशेष, कौले, विटा आढळलेल्या आहेत.

या मंदिरापासून काही अंतरावरती तलाव होता. गोव्यात भोजवंशीय राजापासून सावंतवाडकर राजवटीपर्यंत जी शिवालये आढळलेली आहेत , तेथे लोकांनी पाण्याच्या उपलब्धतेसाठी तलाव खोदून, त्यांचे बांधकाम या परिसरात मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या जांभ्या दगडांचा कल्पकतेने उपयोग करून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

जुवारीच्या बारमाही वाहणाऱ्या कुशावतीच्या तिरी वसलेल्या चंद्रपूर शहरातल्या नागरिकांना पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी मिळावे म्हणून तलावांची निर्मिती करण्यात आली होती. त्याची प्रचिती या शहरावरती राज्य करणाऱ्या राज्यकर्ते आणि त्यांच्या प्रजेत असलेल्या सौहार्दपूर्ण संबंधांतून उमजते.

गोव्यातल्या समाजांनी पूर्वीच्या काळी नद्या आणि जेथे जेथे जलाशयांचे अस्तित्व आहे तेथे तेथे आपली गावे वसवलेली आढळतात. सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी गोव्यातली जी गावे आहेत तेथील लोकमानसाला मान्सूनचा पाऊस चार महिने मुसळधार कोसळून हिवाळ्यानंतर पाण्याच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत होते.

पाण्याचा शोध घेत दाही दिशांना भटकंती करावी लागत असे. मान्सूनच्या पावसात कोसळले हे पाणी नदीनाल्यांतून खळाळत अरबी सागरात जाताना त्यांनी पाहिले होते. जेथे वृक्षवेलींनी समृद्ध जंगले तेथे पाणी जमिनीत मुरते. जमिनीत मुरलेले हे पाणी झऱ्यांतून बारमाही वाहत, वाहत आपली तृष्णा भागवत असते.

हे पाणी पुढे वर्षभर टिकवण्यासाठी त्यांनी गावोगावी तलावाचे सामूहिकरीत्या शक्तीद्वारे खोदकाम केले. हे पाणी चवदार राहावे यासाठी त्यांनी जांभ्या पठारावरचे चिरे आणून, अत्यंत कल्पकतेने अशा जलाशयांचे बांधकाम केले. या तलावातल्या पाण्यात लोकांनी केरकचरा टाकू नये, घाण करू नये, त्याचे पावित्र्य, शुद्धता टिकावी म्हणून नियम तयार करून त्यांची अंमलबजावणी केली.

मान्सूनचा पाऊस सुरू होण्यापूर्वी तलावांतल्या साठलेल्या गाळ, चिखल आणि अन्य घटकांचा उपसा व्हावा, तलावाच्या बांधकामाची डागडुजी व्हावी म्हणून आराध्य दैवताची स्थापना त्यांनी तलावाभोवताली केली होती.

एके काळी सुजलाम् आणि सुफलाम् असलेल्या सासष्टीतील चांदोर गावात कुशावती वाहते. चांदोरपासून काही अंतरावरती चंद्रनाथ पर्वत आहे. या पर्वतावरती असलेल्या वृक्षवेलींचे रक्षण व्हावे, डोंगराच्या अस्तित्वाला बाधा येऊ नये, पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याच्या प्रक्रियेला बाधा येऊ नये म्हणून इथल्या समाजांनी चंद्रेश्वर-भूतनाथाची स्थापना उल्कापात होऊन सोमकांत शिला म्हणून नावारूपास आलेल्या परिसरात केली होती.

संपूर्ण परिसरच गिरीशाचे रूप म्हणून भावला जात असल्याने जंगल तोडीस कोणी धजत नसे. त्यामुळे कुशावती नदी तुडुंब पाण्याने वाहत असे. गावांतल्या तलावांना बारमाही पाणी उपलब्ध असायचे.

गोवा कदंब राजवटीत जेव्हा भाजलेल्या विटांपासून घरांचे बांधकाम करण्याला चालना मिळाली आणि त्यामुळे चंद्रनाथ आणि परिसरातल्या जंगलात वृक्षतोड सुरू झाली. पावसाळ्यात जंगलतोड झाल्याने जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत वाढ झाली आणि कुशावती गाळाने भरून तिच्यातल्या नैसर्गिक जलमार्गात अडथळे निर्माण झाले.

होड्या, गलबते चंद्रपूर राजधानीत येणे मुश्कील झाले आणि त्यामुळे गोवा कदंब राजकर्त्यांना आपली राजधानी तिसवाडी गोपकपट्टण म्हणजे आजच्या गोवा वेल्हा येथील जुवारी नदीकिनारी करावी लागली. भरभराटीला आलेली राजधानी विस्मृतीत गेली. धर्मांधांनी महाकाय नंदी आणि प्राचीन मंदिर उद्ध्वस्त केले आणि त्याच्याशी निगडीत असलेला तलाव इतिहासजमा झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lionel Messi In India: 3 दिवस, 4 शहरं… मेस्सी भारत दौऱ्यावर! कधी, कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात उपस्थित राहणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

Watch Video: संघ हरला म्हणून राग आला, चाहत्यांनी स्टेडियमच पेटवलं; क्षणात सगळं जळून खाक, आग लावणारे 15 वर्षांखालील मुलं

चोरीसाठी चोरट्याचा अजब जुगाड! सुपरमार्केटमध्ये पिशवी घेवून गेला अन्…. Viral Video एकदा बघाच

अग्रलेख: कष्टकऱ्यांचा आनंदोत्सव! ख्रिस्तीकरणानंतरही पूर्वकालीन संकेत विसरले नाहीत; गोमंतकीयांच्या भक्तीचा 'सांगडोत्सव'

SCROLL FOR NEXT