Bastora Accident Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Accidents: गोव्यात एप्रिल महिन्यात 26 जणांचा अपघाती मृत्यू! ही मालिका कधी संपणार?

Goa Road Accidents: काही महिन्यांपूर्वी अशाच एका वेगाने धावणाऱ्या मोटरसायकलने स्कूटरवरून जाणाऱ्या माझ्या एका मित्राला जबरदस्त धक्का दिल्यामुळे त्याला चार महिने इस्पितळात काढावे लागले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

गोव्यातील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. एका एप्रिल महिन्यात २६ जणांचा अपघाती मृत्यू होणे तसेच गेल्या १४० दिवसांत १०६ जणांचे अपघातामुळे मृत्युमुखी पडणे यातूनच राज्यातील विदारक चित्र अधोरेखित होते. १८ व १९ मे या दोन दिवसांत तर वेगवेगळ्या अपघातांमुळे पाच जण दगावले होते.

आणि विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेले बहुतेक जण हे युवा वर्गात मोडतात. ज्यांचे भविष्य अजून घडायचे आहे तेच जर मृत्यूच्या बाहूपाशात जायला लागले तर मग समाजाने बघायचे तरी कोणाकडे, हा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. या अपघातांबाबत आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या अपघातात बळी पडलेले बहुतेक जण हे दुचाकीने प्रवास करणारे होते.

आता प्रश्न असा पडतो की या अपघातांना जबाबदार कोण? बऱ्याच वेळा दोष सरकारला दिला जातो. यात सरकारची चूक नाही असे कुणीही म्हणणार नाही.

रस्त्यांची शोचनीय अवस्था, वेळोवेळी सुरू असलेली रस्त्यावरची कामे, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष या सारख्या बाबीही वाढत्या अपघातांना जबाबदार आहेत यात संशयच नाही. पण त्याचबरोबर वाहनचालकांचे बेदरकारपणे वाहने हाकणे, यामुळेही अपघातात वाढ व्हायला लागली आहे हेही तेवढेच खरे.

खास करून युवक ज्या वेगाने मोटरसायकल चालवितात तो वेग पाहिल्यास अंगावर अक्षरशः काटा येतो. वेगमर्यादा नोंद केलेल्या रस्त्यांवरसुद्धा ते भरधाव वेगाने वाहने हाकतत. त्यामुळे ते तर त्रासात पडतातच, पण त्याबरोबर इतरांनाही त्रासात घालतात.

काही महिन्यांपूर्वी अशाच एका वेगाने धावणाऱ्या मोटरसायकलने स्कूटरवरून जाणाऱ्या माझ्या एका मित्राला जबरदस्त धक्का दिल्यामुळे त्याला चार महिने इस्पितळात काढावे लागले होते. अशा प्रकारच्या घटना या आमच्या दैनंदिन जीवनाचा आता एक भाग बनायला लागल्या आहेत. बहुतेक स्वयंअपघातही याच भरधाव वेगामुळे झालेले बघायला मिळतात. त्याचबरोबर अशा प्रकारच्या वाहनचालकांनी पादचाऱ्यांना धक्का दिल्यामुळे झालेले मृत्यूही मनाला क्लेश देऊन जातात.

दीड वर्षापूर्वी बाणस्ताऱी पुलावर भरधाव वेगाने एका गर्भश्रीमंताने आपली आलिशान गाडी चालविल्यामुळे तीन निरपराध व्यक्ती कशा मृत्युमुखी पडल्या होत्या हे लोक अजूनही विसरलेले नाहीत.

Goa Paragliding Accident Viral Video

हे पाहता वाहन हाकताना मनावर नियंत्रण ठेवणे अतिमहत्त्वाचे असते. रस्ता ही सार्वजनिक मालमत्ता आहे याचे भान प्रत्येक वाहनचालकाने ठेवायला हवे. त्याचबरोबर वाहन चालविताना मोबाइलचा वापर कटाक्षाने टाळला पाहिजे.

आता राज्यातील काही शहरांत सीसीटीव्ही बसविल्यामुळे वाहन चालवताना मोबाइलवर बोलणारे वाहनचालक कॅमेऱ्यात कैद व्हायला लागले आहेत. पण अजूनही सगळीकडे अशा प्रकारचे सीसीटीव्ही न बसविल्यामुळे वाहनचालकांचे मोबाइलवर बोलत वाहने हाकणे सुरूच आहे.

जीवन अनमोल असते हे कधीच विसरता कामा नये. अपघातामुळे झालेला मृत्यू हा मृताच्या नातेवाइकांना दीर्घकाळ टोचत असतो. त्यात परत अशाप्रकारे युवा वयातली व्यक्ती गेल्यास ती हानी कधीच भरून न येणारी असते.

आता पावसाळा येत आहे. पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण नेहमीच जास्त असते. रस्त्यावर वाहने घसरल्यामुळे दगावलेल्यांची कितीतरी उदाहरणे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे या काळात वाहने खास करून दुचाकी चालविणाऱ्यांनी अतिदक्षता घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सरकारनेही सतर्क व्हायला पाहिजे.

काही का असेना पण सर्व घटकांनी आता ही अपघाताची विस्तारित होत चाललेली कथा बंद करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. तसे झाले नाही तर गोवा म्हणजे ‘अपघातप्रवण राज्य’ असा जो शिक्का बसला आहे तो पुसला जाणे केवळ अशक्य.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT