महाराष्ट्रात गेल्या वर्षी अशाच प्रकारची अधिसूचना जारी करण्यात आली. मात्र, चोवीस तास सुरू ठेवण्याची सवलत कोणत्या प्रकारच्या आस्थापनांना लागू होणार नाही, याचा स्पष्ट उल्लेख त्यात होता. गोव्यातील अधिसूचनेत मात्र अशी नेमकी वर्गवारी किंवा अपवाद स्पष्टपणे नमूद नाही.
रात्र ही विश्रांतीची वेळ असली तरी आधुनिक अर्थव्यवस्थेत व्यवहारांचे घड्याळ थांबत नाही. मात्र, रात्रीच्या व्यवहारांनाही काही मर्यादा असणे आवश्यक आहे. गोव्याचा बहुतांश भाग रात्रीच्या वेळी निद्राधीन होतो. इस्पितळे, औषधालये व अत्यावश्यक सेवा मात्र सुरू असतात. याला अपवाद असलेले रात्रीचे व्यवहार कोणते, याचा विचार केल्यास चोऱ्यामाऱ्या, वेळेची मर्यादा ओलांडणारी मद्यालये, छुपे डान्स बार, मसाज पार्लर व त्या अनुषंगाने निर्माण होणारी गुन्हेगारी यांचा उल्लेख करावा लागेल. या प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. काही महिन्यांपूर्वीच राजधानी पणजीत निर्धारित वेळेनंतरही सुरू राहणारी मद्यालये व त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा चर्चेत आला होता.
पहाटेपर्यंत सुरू राहणाऱ्या बारवर कारवाई करण्याचे आश्वासन देत महापौर रोहित मोन्सेरात यांनी वेळेचे नियमन करण्याची घोषणाही केली होती. ही पार्श्वभूमी पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे, व्यवसाय सुलभता व पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने कामगार खात्याने नुकतीच जारी केलेली अधिसूचना. त्यानुसार दुकाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मॉल्सना चोवीस तास सुरू ठेवण्याची मुभा मिळेल. म्हणजेच ही आस्थापने २४*७ सुरू राहू शकतात. अर्थात, या प्रक्रियेत कामगारांची पिळवणूक होऊ नये, त्यांच्या कामाच्या वेळा आणि हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी नियमावलीही निश्चित करण्यात आली आहे.
व्यवसायाच्या दृष्टीने हा निर्णय स्वागतार्ह म्हणावा लागेल. मात्र, या अधिसूचनेच्या व्याप्तीबाबत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात. मद्यालये, स्पा आणि डान्स बार यांनाही चोवीस तास व्यवसाय करण्याची मुभा मिळणार आहे का? उपलब्ध माहितीनुसार, मसाज पार्लर आरोग्य खात्याच्या, तर मद्यालये अबकारी खात्याच्या अखत्यारीत येतात. डान्स बारच्या बाबतीत तर त्यांची नेमकी व्याख्या आणि नियमन याबाबत स्पष्टता दिसत नाही. ‘बर्च बाय रोमिओ लेन’ अग्नितांडवानंतर हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला होता.
अशा परिस्थितीत कामगार खात्याच्या नव्या अधिसूचनेचा आधार घेऊन हे व्यवसाय रात्रभर सुरू ठेवण्यासाठी परवानगी मागितली जाऊ शकते. (यापूर्वी अशा प्रकारची मागणी करणे शक्य नव्हते.) त्यावर सकारात्मक विचार झाल्यास व्यवसाय सुलभतेच्या निर्णयातून नवा सामाजिक उपद्रव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजधानी पणजीत आजघडीला किमान ४०स्पा आहेत. काही ठिकाणी सरकारी कार्यालय- निवासी सदनिका व मसाज पार्लरकडे जाण्याचा मार्ग एकच आहे. अशा ठिकाणी रात्री-अपरात्रीही स्पा सुरू ठेवण्याची मुभा मिळाल्यास ग्राहकांची टकटक भलत्याच दारांवर पडणार नाही कशावरून? असा प्रश्न उपस्थित होण्यामागे कारण म्हणजे - शेजारच्या महाराष्ट्रात गेल्या वर्षी अशाच प्रकारची अधिसूचना जारी करण्यात आली.
मात्र, चोवीस तास सुरू ठेवण्याची सवलत कोणत्या प्रकारच्या आस्थापनांना लागू होणार नाही, याचा स्पष्ट उल्लेख त्यात होता. गोव्यातील नव्या अधिसूचनेत मात्र अशी नेमकी वर्गवारी किंवा अपवाद स्पष्टपणे नमूद नाही. सरकारचा हेतू विधायक असला तरी उपद्रवमूल्य असलेल्या व्यवसायांना मोकळे रान मिळता कामा नये. एकीकडे राज्यात गुन्हेगारीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त होत आहे. कायदा-सुव्यवस्था राखताना दमछाक होणाऱ्या पोलिस यंत्रणेवर अधिकचा ताण नको. याच संदर्भात इतर राज्यांनी घेतलेले निर्णय गोव्याला मार्गदर्शक ठरू शकतात.
आसाम सरकारने गुवाहाटी, डिब्रूगढ, सिलचर येथे दुकाने २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी दिली; मात्र मद्यविक्रीच्या दुकानांना सवलतीतून स्पष्टपणे वगळले. चंदीगड प्रशासनानेही २०२४ मध्ये दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांना वर्षभर चोवीस तास सुरू ठेवण्याची मुभा दिली; परंतु बार, पब, मद्यविक्रीच्या दुकानांना सवलत लागू केली नाही. गोव्यातही अशाच प्रकारची स्पष्टता अपेक्षित आहे. फार्मसी, पेट्रोल पंप रात्री सुरू असतातच. मॉल आणि दुकाने चोवीस तास सुरू राहणार असतील तर त्याचे स्वागतच होईल. अर्थात, मध्यरात्री एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात जाणाऱ्यांची संख्या किती असेल, हा वेगळा प्रश्न. मात्र, रात्रीच्या अर्थव्यवस्थेला चालना देताना कायदा-सुव्यवस्थेवरील नियंत्रण ढिले पडता कामा नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.